आता म्हणे माणसाला आकाशात बाळ जन्माला घालायचंय

टेस्टट्युब बेबीबद्दल आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल. पण थेट अवकाशात बाळ जन्माला घालण्याची कल्पना रोमांचक म्हणायला हवी. त्याच दिशेनं एक पाऊल पडतंय. इंग्लंडमधले संशोधक प्राण्यांवर असा प्रयोग करतायत. पण अशा रीतीनं अंतराळात माणसाचं बाळ जन्माला घालण्याची गरज का वाटतेय? त्याचं कारण पृथ्वीवरचा माणूस चंद्र आणि मंगळावर वसाहती करण्याचं स्वप्न पाहू लागलाय.

गाव अगदीच छोटं असलं तर लगतच्या मोठ्या गावात, तालुक्याच्या ठिकाणी, शहारात ‘ते’ नकीच आहे. ‘ते’ म्हणजे आयवीएफ सेंटर. इन वायट्रो फर्टिलायझेशन सेंटर, टेस्टट्युब बेबी सेंटर. प्रसूतीगृह असणं ही प्रत्येक गावाची गरज असतेच, पण आताच्या काळात फक्त प्रसूतिगृह असणं पुरेसं ठरत नाही. आयवीएफ सेंटर असणंही आता गरजेचं झालं आहे.

याला कारणं अनेक आहेत. पण मुख्य कारणं दोन. एक म्हणजे मुला-मुलींची लग्नं उशिरा होणं आणि दुसरं म्हणजे लग्न झाल्यानंतरसुद्धा मूल होणं लांबणीवर टाकणं. वयाची तिशीच काय पण पस्तीशी ओलांडल्यानंतर आपल्याला आता बाळ हवं असा विचार सुरू झाला की बहुतेकांना आयवीएफ सेंटरची मदत घ्यावी लागते. जी गोष्ट निसर्ग सहजपणं घडवून आणतो, त्याच गोष्टीसाठी ‘शरीरबाह्य फलन तंत्राटची मदत घेणं अनेकांच्या बाबतीत अपरिहार्य झालंय.

काही प्राण्यांवर प्रयोग

हेच तंत्र वापरून अवकाशात माणसाचं बाळ जन्माला घालता येईल का, या दृष्टीनं आता विचार सुरू झाला आहे. ‘स्पेसबॉर्न युनायटेड’च्या सहकार्यानं इंग्लंडमधले संशोधक असा प्रयोग करणार असल्याची बातमी आपण वाचली असेल. अशा रीतीनं अंतराळात माणसाचं बाळ जन्माला घालण्याची गरज वाटण्याचं कारण असं की आता माणूस, आपल्या पृथ्वीचा चंद्र आणि दूरच्या अंतरावर असणारा मंगळ यावर वसाहती करण्याचं स्वप्न पाहू लागला आहे.

तिथं वसाहत करायची तर तिथं माणसाच्या नवीन पिढ्या जन्माला आल्या पाहिजेत. पण दोन्ही ठिकाणी मुख्य अडचण आहे, ती गुरुत्वाकर्षणशक्तीची! दोन्ही ठिकाणी पृथ्वीपेक्षा खूपच कमी गुरुत्वाकर्षण आहे. कमी गुरुत्वाकर्षण असलेल्या ठिकाणी अवकाशवीरांचा रक्तदाबही कमी होतो. त्यामुळं लैंगिकसंबंधासाठी आवश्यक ती शरीरावस्था साधणंही, विशेषतः पुरुषाला, अवघड असतं.

कमी गुरुत्वाकर्षणशक्तीच्या ठिकाणी स्त्रीबीज आणि पुंबीज यांचं यशस्वीरीत्या मीलन होणं खूपच अवघड आहे. या अडचणीवर कशी मात करता येईल, याचा विचार गेली काही वर्षं सुरू आहे. यासंदर्भात काही प्राण्यांवर प्रयोग करण्यात आले आहेत. त्यासाठी त्यांना अंतराळात पाठवण्यात आलं आणि तिथं त्यांचं मीलन होऊन मादी गर्भार राहू शकते का, याची पाहणी करण्यात आली. हा प्रयोग उंदरांवर करण्यात आला.

हेही वाचा: पहिल्या अग्निबाणाच्या यशस्वी उड्डाणाची आज पन्नाशी

गुरुत्वाकर्षणाचा परिणाम

कोणतीही मादी गर्भार राहिली नाही. मग अंतराळात उंदरांचं शरीरबाह्य फलन करण्याचा प्रयोग करण्यात आला. तोसुद्धा यशस्वी झाला नाही. मग उंदराचा भ्रूण अंतराळात पाठवण्यात आला आणि तो व्यवस्थित वाढतो काय, याची पाहणी करण्यात आली. पण अवकाशात उंदराचा भ्रूण अपेक्षेप्रमाणं वाढत नसल्याचंच दिसून आलं.

यानंतर प्राण्याचे शुक्राणू आणि त्यांचं भ्रूण यांच्यावर कमी गुरुत्वाकर्षणाचा काय परिणाम होतो, याचा अभ्यास रशियाच्या मीर या अवकाशकेंद्रावर करण्यात आला. तेव्हा कमी गुरुत्वाकर्षणाचा अनिष्ट परिणाम या सर्वांवर होत असल्याचं स्पष्ट झालं. या सर्व प्रयोगांतून संशोधकांच्या असं ध्यानात आलं की प्राण्याला अंतराळात बाळ होणं कठीणच आहे.

मग आता काय करायचं? प्रश्न कठीण आहे, म्हणून तो सोडून द्यायचा, असं संशोधक करत नाहीत. उलट प्रश्न जितका अवघड तितकेच अधिक कठोर प्रयत्न ते करतात. हाती घेतलेल्या प्रश्नाचा विविधांगांनी विचार करतात. आपली बुद्धी, प्रतिभा, कल्पकता, चिकाटी यांना अथक श्रमाची जोड देतात आणि त्या कठीण प्रश्नाचं उत्तर शोधतात. आजवर विज्ञानाची जी प्रगती झाली आहे, तिच्यामागं हेच तर रहस्य आहे. आताही संशोधकांनी तेच केलं.

शुक्राणूंचा आयवीएफ तंत्रामधे वापर

अवकाशात गोठवलेले शुक्राणू आणि भ्रूण पाठवले तर त्यातून काही साध्य होईल काय, असा विचार ते करू लागले. या विचारामागे काही निश्चित असे फायदे होते. एकतर माणसाला अवकाशात पाठवण्यासाठी लागते, त्यापेक्षाही खपूच कमी जागा गोठवलेले शुक्राणू आणि भ्रूण अवकाशात नेण्यासाठी पुरणार होती. दुसरं असं की ते त्याच अवस्थेत प्रदीर्घ काळ ठेवता येणं शक्य असतं, ही मोठीच जमेची गोष्ट होती.

असे गोठवलेले शुक्राणू आणि भू्रण अपेक्षित ठिकाणी पोचल्यानंतर त्यांना त्या अवस्थेतून सामान्य स्थितीला आणणं आणि त्यांचं आरोपण गर्भाशयात करणं तुलनेनं सोपं जाणार होतं. अर्थात अवकाश प्रवासाच्या दरम्यान वैश्विक किरणोत्साराचं संकट कायमच असणार आहे. त्या किरणोत्साराचा गोठवलेल्या शुक्राणूंवर आणि भ्रूणांवर काय आणि किती परिणाम होईल, याची धास्ती संशोधकांना वाटत होतीच.

ती दूर करण्यासाठी २०१७मधे एक प्रयोग करण्यात आला. त्यामधे उंदराचे गोठवलेले शुक्राणू रशियाच्या अवकाश केंद्रावर पाठवण्यात आले. तिथं १० महिने ते ठेवले गेल्यानंतर ते परत पृथ्वीवर आणले गेले. त्यानंतर त्यांची तुलना त्याच उंदराच्या ताज्या शुक्राणूंबरोबर करण्यात आली. त्या तुलनात्मक अभ्यासात असं दिसून आलं की १० महिने अवकाश केंद्रावर ठेवण्यात आलेल्या गोठवलेल्या शुक्राणूंच्या डीएनएमधे काही बदल झाले आहेत. हे शुक्राणू वापरले तर गर्भपाताचा धोका आहेच, पण समजा नवीन ‘नर-पिल्लू’ जन्माला आलं तर ते नपुंसक असण्याची संभाव्यता खूप मोठी आहे.

हे धोके लक्षात घेऊनसुद्धा संशोधकांनी पृथ्वीवर परत आणलेल्या शुक्राणूंचा आयवीएफ तंत्रामधे वापर केला. तेव्हा या शुक्राणूंमुळे उंदराच्या मादीचं बीज फलित झालं आणि नवीन भ्रूण तयार झालं! हे भ्रूण उंदराच्या मादीच्या गर्भाशयात आरोपित करण्यात आलं. यथावकाश त्या मादीला पिलं झाली आणि ती अगदी सर्वसाधारण पिलांसारखीच आहेत, असं संशोधकांच्या लक्षात आलं. साहजिकच संशोधकांचा हुरुप वाढला. त्यांनी मानवी शुक्राणू आणि भ्रूण यांच्यावर कमी गुरुत्वाकर्षणाचा काय परिणाम होतो, ते पाहण्याचं निश्चित केलं.

हेही वाचा: गावाकडच्या मराठी पोराचा चांद्रयान २ मोहिमेत सहभाग

तपासणीतून पुढं आलेला निष्कर्ष

असं करणं हे अनैतिक आहे, अशी भूमिका काहीजणांनी घेतली. पण मंगळासारख्या ग्रहावर किंवा त्याही पल्याडच्या ग्रहावर माणसाला जाऊन तिथं आपली वसाहात उभी करायची असेल तर कमी गुरुत्वाकर्षणाचा मानवी शुक्राणूंवर आणि भ्रूणावर काय, किती आणि कसा परिणाम होतो, हे जाणून घेणं अत्यावश्यक आहे, असं मत बहुसंख्य संशोधकांनी व्यक्त केलं. त्यानुसार एक प्रयोग केला गेला.

मानवी शुक्राणूंवर कमी गुरुत्वाकर्षणाचा होणारा परिणाम आजमावून पाहण्यासाठी त्यांनी मानवी शुक्राणूंचे १० नमुने अवकाशात पाठवले. त्यासाठी अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यासाठी जे विमान वापरलं जातं, त्याच विमानाचा उपयोग करून घेण्यात आला. अवकाशात काही काळ राहून परत आलेल्या या शुक्राणूंची नंतर तपासणी करण्यात आली.

पुनरुत्पादन क्षमतेची चाचणी घेणार्‍या कोणत्याही केंद्रात माणसाच्या शुक्राणूंची जशी तपासणी करण्यात येते, तशीच अवकाशात मुक्काम करून आलेल्या शुक्राणूंची करण्यात आली. तेव्हा अवकाशात कमी गुरुत्वाकर्षण असलेल्या अवस्थेत राहिलेल्या शुक्राणूंवर कोणताही अनिष्ट परिणाम झाला नसल्याचं संशोधकांच्या लक्षात आलं. तपासणीतून पुढं आलेला हा निष्कर्ष संशोधकांना आनंद देणारा आणि यासंदर्भात पुढचं पाऊल उचलायलाच प्रेरक ठरणाराच होता.

नव्या युगाची सुरवात

या प्रयोगानं सगळं आलबेल आहे, असल्याचं आपल्याला सांगितलेलं नाही. पृथ्वीचा चंद्र किंवा मंगळ यावर जाण्यासाठी लागणारा काळ लक्षात घेतला तर अधिक प्रयोग करण्याची आवश्यकता आहे, हे संशोधकांना माहीत आहे. म्हणूनच तर ‘स्पेसबॉर्न युनायटेड’सुद्धा अगोदर उंदरांवरच प्रयोग करणार आहे. त्यासाठी ‘जैविक उपग्रह’ अवकाशात पाठवले जातील. या उपग्रहांमधे पृथ्वीवर असते तशी आणि तितकीच गुरुत्वाकर्षण शक्ती आणि भ्रूणाच्या वाढीला पोषक असं वातावरण असणार आहे.

या वर्षाच्या शेवटी हा प्रयोग केला जाईल, असं आता तरी सांगितलं जात आहे. त्या प्रयोगांतून काय दिसतं यावरच त्यांना पुढचा निर्णय घेता येणार आहे. अवकाशात आपलं बाळ जन्माला घालण्याची कल्पना रोमांचकच आहे. त्यामुळंच आतापर्यंत १० लाख लोकांनी नावं नोंदवली आहेत. मात्र त्यामध्ये कोणताही धोका नाही, हे पूर्णपणं सिद्ध झाल्यानंतरच असं बाळ जन्माला यावं, असंच संशोधक म्हणतात. ते रास्तच आहे.

शरीरबाह्य फलन तंत्राचा वापर करून पहिली टेस्ट ट्युब बेबी १९७८मधे जन्माला आली. तिचं नाव लुइसी ब्राऊन! त्यानंतरच्या गेल्या ४४ वर्षात याच तंत्राचा वापर करून जगात आजवर जवळपास ८० लाखांहून अधिक बाळं जन्माला आली. या बाळांनी अनेकांच्या आयुष्यात सुखाचं आणि समाधानाचं वारं आणलं. निराशेच्या गर्तेत कोसळलेल्या जोडप्यांच्या संसारात आनंदाची बाग फुलवली. आता एकविसाव्या शतकात याच तंत्राचा वापर करून अंतराळातच बाळ जन्माला घालण्याचं स्वप्न माणूस बघत आहे.

सतत नवीन स्वप्नांच्या मागे धावणार्‍या, ती प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपडणार्‍या माणसाला याही प्रयोगात यश मिळेल, अंतराळात माणसाचं बाळ जन्माला येणं पूर्णपणे सुरक्षित असल्याची ग्वाही मिळेल आणि एका नव्या युगाची सुरवात होइंल, अशी आशा करू या.

हेही वाचा:

ती १५ मिनिटं ठरवणार आपल्या चांद्रयानाचं भवितव्य

विज्ञानदिनी ना सीवी रमण यांचा जन्मदिन, ना स्मृतिदिन

चंद्रावर पहिलं पाऊल कोण ठेवणार यावरुन वाद झाला होता

पुरामुळे वाहन खराब झाल्यास बेसिक विमा काही कामाचा नाही

स्टीफन हॉकिंगः आयुष्यभर खुर्चीत बसून उलगडलं अवकाशातलं गूढ

( लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि विज्ञानलेखक असून त्यांचा लेख दैनिक पुढारीतून घेतलाय )

0 Shares:
You May Also Like
संपूर्ण लेख

आदिपुरुष : नव्या पिढीचं नवं रामायण

दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा नव्या पिढीला रामायण नव्याने सांगू पाहतोय. या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा कित्येकांनी…
संपूर्ण लेख

सावधान… भारतावर आदळणारी वादळं वाढतायत!

किनाऱ्यावर आदळलेल्या भयंकर लाटांचे वीडियो तुम्हाला सोशल मीडियावर आले असतील. बिपरजॉय वादळ गुजरातकडे गेल्याचे मेसेजही तुम्हाला आले असतील.…
संपूर्ण लेख

हरवलेल्या कथेच्या शोधात : साध्या शब्दांत उग्र वास्तव मांडणारा कथासंग्रह

लेखक सीताराम सावंत यांचा ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा नवा कथासंग्रह गावातलं समाजवास्तव नव्याने सांगू पाहतोय. रयत शिक्षण संस्थेत…
संपूर्ण लेख

महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई हीच क्रिकेटची खरी लवस्टोरी

तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकला. त्याची एक झलक पाहण्यासाठी आजही तरुणाई अक्षरश: आपला जीव ओवाळून टाकते.…
संपूर्ण लेख

करियर करणाऱ्या पोरींसाठी एग फ्रीजिंग ठरतंय वरदान

अभिनेत्री प्रियांका चोप्राने मध्यंतरी आपण वयाच्या तिशीमधे एग फ्रीजिंग केल्याचा खुलासा केला होता. सुपरस्टार रामचरण आणि उद्योजिका असणारी…
संपूर्ण लेख

‘फायर इन द माऊंटन्स’ : सरकारी आश्वासनांचा फसलेला रोडमॅप

सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच ‘फायर इन द माऊंटन्स’ हा नवा सिनेमा रिलीज झालाय. वरवर पाहता, या…