प्रकाश आंबेडकरांना ‘वन मॅन शो’ का म्हटलं जातंय?

माटुंग्याचा लेबर कॅम्प हा दलित, कामगार चळवळीचा अड्डा. जलसे, मोर्चे, राडे असं सगळं या भागानं अनुभवलंय. शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीनं इथली आंबेडकरी जनता अस्वस्थ आहे. एकीकडे या युतीची गरज कळतेय, पण आपल्यातल्या गटातटाचं राजकारणही त्यांना नीट माहिती आहे. त्यामुळे ही युती टिकवायची असेल, तर प्रकाश आंबेडकरांनी ‘वन मॅन शो’ करण्याची ताकद दाखवायला हवी, अशी भावना तिथं जाणवत होती.

दादरवरून माटुंगा लेबर कॅम्पला जाण्यासाठी टॅक्सी केली. पुढच्या वीसेक मिनिटांत टॅक्सी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडपाशी येऊन थांबली. हा सगळाच भाग वर्दळीच्या होता. आजूबाजूला प्रचंड गजबज होती. टॅक्सी ड्रायवर म्हणाला, ‘ये देखो भय्या इधरसें लेबर कॅम्प शुरू होता हैं!’

मुंबईतली सगळ्यात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या जवळच लेबर कॅम्प आहे. रेल्वे, महानगरपालिकेत काम करणारे असंख्य कामगार इथं मोठ्या संख्येनं दाटीवाटीने रहायचे. त्यामुळेच या भागाला लेबर कॅम्प हे नाव पडलं.

ड्रायवरनं टॅक्सी उभी केली त्याच्या अगदी समोरच ‘लेबर रेस्टाॅरंट’ नावाचं एक हाॅटेल होतं. खरंतर हे इराणी हॉटेल. पण कष्टकरी कामगारांच्या इथल्या रोजच्या राबत्यामुळे हॉटेलचं नाव लेबर रेस्टाॅरंट असं पडलं. या रेस्टाॅरंटमधे प्रवेश केल्यावर त्याचा सार्थ अनुभव आला.

हेही वाचा: संघर्ष करायचा की शरणागती पत्करायची, हे ठाकरे कुटुंबाला ठरवावं लागेल

वाचनालयात बुद्ध, आंबेडकर आणि शिवाजी

दलित चळवळीचं मुंबईतलं केंद्र म्हणूनही हा भाग ओळखला जातो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागूल अशा अनेकांचं या भागात वास्तव्य होतं. तर या सगळ्याचा कानोसा घेत मी लेबर रेस्टाॅरंटच्या समोरच असलेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड बोर्डपाशी पोचलो. ते खरंतर एक छोटं वाचनालय होतं. सात-आठ माणसंच बसू शकतील अशी ती जागा होती.

याच वाचनालयात एक छोटं टेबल आणि त्यावर दोनेक पेपर होते. पंच्याहत्तरीच्या आसपास असलेली पाचेक ज्येष्ठ मंडळी आतमधे बसलेली होती. त्यांनी गप्पांचा फड जमवलेला होता. त्यात चाळीशीतले एक काका या सगळ्यांचं बोलणं अगदी शांतपणे ऐकत होते. मीही त्यांच्यात पोचलो. इथं यायचं कारण सांगितलं. तशी लागलीच एका आजोबांनी बसायला खुर्ची दिली.

टेबलच्या वर दादासाहेब गायकवाड यांची एक उभी फोटोफ्रेम होती. दादासाहेब गायकवाड हे बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी आणि दलित चळवळीतलं मोठं नाव. त्यांच्या फोटोफ्रेमच्या वरती गौतम बुद्ध, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांचा फोटो होता. शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने होणाऱ्या उपक्रमांविषयी ते काहीतरी बोलत होते.

ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्त्यांचा गोतावळा

एका आजोबांचं लक्ष माझ्याकडे गेलं. ‘अरे त्याच्या कामावर बोला…’ तितक्यात सगळ्यांनी माझ्याकडे मोर्चा वळवला. इथं यायचं कारण सांगितलंच होतं. त्याची आठवण काढत एक आजोबा माझ्याकडे बघून बोलू लागले. ‘ठाकरे-आंबेडकर युतीबद्दल बोलायचं तर तुम्हाला इथल्या वंचित मंडळाशी बोलावं लागेलं.’ हे मंडळ काय आहे याचा विचार करत असतानाच ‘तो इथल्या तरूणांचा ग्रुप असल्याचं’ त्यांनीच सांगितलं.

तितक्यात ग्रुपमधल्या एका आजोबांकडे दुसऱ्याचं बोट गेलं. ‘हे बघा. हे बनसोडे गुरूजी. हे इथले बौद्धाचार्य. ते तुम्हाला चांगली माहिती देतील.’ बौद्ध धर्मात ‘बौद्धाचार्य’ हे लग्नविधी, बारसा, मृत्यूनंतरचं बारावं वैगरे अशा कार्यक्रमांमधे विधीचं काम करतात. बनसोडे गुरूजींनी मात्र मान डोलवत काही बोलायला नकार दिला. अशाप्रकारे बराचवेळ त्यांची आपापसात टोलवाटोलवी सुरूच होती.

एक आजोबा अगदी शांतपणे हे सगळं बघत, ऐकत होते. तितक्याच चाळीशीतल्या एका काकांनी त्यांच्याकडे बोट केलं. ‘हे घेगडमल काका. इथले आंबेडकरी चळवळीतले जुने कार्यकर्ते. यांनी बाबासाहेबांसोबतही काम केलंय.’

एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही

के. एम. घेगडमल असं त्यांचं नाव होतं. ते भरभर बोलू लागले. ‘मी काही बाबासाहेबांसोबत काम केलं नाही. पण त्यांच्या भेटीचा एक किस्सा आहे.’ त्याआधी त्यांनी शिवसेनेचा उल्लेख केला. ‘वरळी असो की, नायगाव. इथल्या जातीय दंगली आम्ही विसरलेलो नाही. ना रमाबाई नगरचं हत्याकांड विसरू शकत. यामागे शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे होते. पण…’ त्यांनी मधेच पाॅज घेतला आणि ते पुन्हा बोलू लागले.

‘बाबासाहेबांच्या समाजाचे आज किती पक्ष आहेत? आज घरोघरी गट आहेत. एक अध्यक्ष निवडला की, लगेच दुसरा अध्यक्ष बनतो. अशी आजच्या आंबेडकरी समाजाची दशा आहे. यांनी युती केली तर नक्कीच ताकद वाढेल. दहापाच कॅार्पोरेटर निवडून येतील. यांचाही फायदा होईल. पण आजही महारवाड्यात एका घरात दहा विरोधी तोंडं आहेत. आम्ही असे विस्कळीत उभे राहिलो तर फायदा कुणाचा आहे? त्यामुळे युती केल्याशिवाय पर्याय नाही.’ असं बोलून घेगडमल आजोबा थांबले. त्यांनी वापरलेला महारवाडा हा शब्द खटकला. पण त्यांचं वय पाहून त्यावर वाद घालणं टाळलं.

उद्धव ठाकरेंच्या सध्याच्या संविधानवादी भूमिकेचं हे सगळेच ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते स्वागत करताना दिसले. भाजपचं द्वेषाचं राजकारण आपल्याला मान्य नाही. सध्या उद्धव ठाकरे त्या विरोधात मैदानात उतरलेत. त्यामुळे त्यांच्यासोबत उभं राहणं ही आंबेडकरवादी म्हणून आमची नैतिक जबाबदारी असल्याचं या सगळ्यांचं म्हणणं होतं. प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेमुळे आज आठवले गटाकडे असलेली मतंही आंबेडकरांकडे वळू शकतील, अशी आशा या आजोबांना वाटतेय.

हेही वाचा: तुमचं जळकं हिंदुराष्ट्र नको, असं प्रबोधनकारांचा वारसदार का म्हणतोय?

बाबासाहेबांच्या भेटीविषयीचा किस्सा

त्यांच्या समोरच बर्वे नावाचे त्यांच्याच वयाचे एक इसम बसलेले होते. अण्णाभाऊ साठे, अमर शेख आणि दत्ता गव्हाणकर यांनी माटुंग्याच्या लेबर कॅम्पमधे ‘लाल बावटा कला पथक’ स्थापन केलेलं होतं. या कला पथकात आपणही काम केल्याची आठवण बर्वे यांनी सांगितली. ते या भागात कम्युनिस्ट पक्षाचं काम करतात. त्यांनीच घेगडमलना पुन्हा एकदा बोलतं करायचा प्रयत्न केला. तसं ते बाबासाहेबांच्या भेटीविषयीचा किस्सा सांगू लागले.

'१९५४ची गोष्ट. मी नाशिकच्या मनमाड इथल्या बोर्डिंगला होतो. त्यावेळी बाबासाहेब दिल्लीवरून मुंबईला येतायत ही बातमी रेक्टरला लागली. त्यांनी थेट रेल्वे मास्तरचं ऑफिस गाठलं. आमच्या बोर्डिंगच्या पाचपन्नास विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचं दर्शन घ्यायचंय असं त्यांना सांगितलं. विद्यार्थ्यांमधे मीही होतो. रेल्वे मास्तरनं परवानगी दिली. बाबासाहेब यायचा दिवस कळवला. त्यादिवशी आम्ही सगळे तिथं पोचलो. गाडी आली. बाबासाहेब खिडकीकडे बसलेले होते. त्यांनी हात दाखवला आणि आम्ही पाच फुटांच्या अंतरावरुन एकेक जण त्यांचं दर्शन घेत पुढं सरकत होतो.' ही आठवण सांगताना घेगडमलना काहीसं गहिवरून आलं होतं.

त्याकाळी बाबासाहेबांचं प्रत्यक्ष असणं अनेकांसाठी प्रेरणा देणारं होतं. अनेकांसाठी ते आयकॉन होते. दलित समाजात शिक्षणाच्या माध्यमातून आत्मसन्मानाचं बीज रोवण्याचं काम त्यांनी केलं होतं. त्यामुळेच तो काळ बाबासाहेबांच्या भेटीनं भारावून जायचा होता. त्यात अशाप्रकारच्या भेटी म्हणजे सोनेपें सुहागा. घेगडमलना गहिवरून येणं तेच सांगत असावं.

अशातच ‘आता पुन्हा ठाकरे-आंबेडकर युतीकडे या.’ असं म्हणत बर्वेनी त्यांना माझ्या मूळ मुद्याकडे आणलं. मी आजूबाजूच्या इतरांनाही बोलायची विनंती केली पण सगळ्यांचं बोट घेगडमल यांच्याकडे होतं. तसं ते हसत हसत पुन्हा बोलू लागले.

जातीयवादामागे चेहरा शिवसेनेचा

‘तुम्ही कितीही म्हणालात तरी प्रकाश आंबेडकर फक्त स्वत:च्या ताकदीवर निवडून येणार नाहीत. त्यामुळे युतीशिवाय पर्याय नाही. पण ती युती टिकवायची कशी हा यातला महत्त्वाचा मुद्दा आहे.’ घेगडमल यांचा रोख प्रकाश आंबेडकर यांच्यावर होता. त्यासाठी त्यांनी एमआयएमचं उदाहरण दिलं. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांनी ओवेसींच्या एमआयएमसोबत एकत्रित निवडणुका लढवल्या होत्या. पण विधानसभेच्या आधीच त्यांच्यात मतभेद झाले आणि काडीमोडही झाला.

‘आताच्या ठाकरे-आंबेडकर युतीकडे तुम्ही पाॅझिटीव पद्धतीनं पाहता?’ ‘होहो एकदम पाॅझिटीव.’ सगळ्यांचं एकदम उत्तर. हे उत्तर येईस्तोवर एकानं बर्वे हे शाहीर आणि कामगार चळवळीचे नेते असल्याचं सांगितलं. हा संपूर्ण भाग एकेकाळी कामगार चळवळीचा अड्डा होता. त्यामुळे त्यांना बोलतं करायचा प्रयत्न केला. सुरवातीला त्यांनी टाळाटाळ केली. पण त्यांना फोर्स केल्यावर ते बोलू लागले.

'याधीचे लोक भावनिक होते. पण आताचे लोक व्यवहार्य काय याचा नक्कीच विचार करतात. आंबेडकरी समाजाबाबतीतही तसंच आहे. आता लोक नुसते भावनिक राहिलेले नाहीत. राजकीय तडजोडीही आहेतच. पण १९७४ची दंगल शिवसेना. नामांतराची दंगल शिवसेना. रमाबाईची दंगल शिवसेना. खैरलांजी? पडद्यामागून कोण होतं? जातीयवाद होताच ना? हे सगळं विसरायचं का?' 'पण कम्युनिस्टांनी तर अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा दिला होता.' बर्वेंना विचारताच 'म्हणून शिवसेनेनं जे काही केलंय ते विसरायचं?' त्यांचा प्रतिप्रश्न.

समोर बसलेले सगळेच या भागातले ज्येष्ठ कार्यकर्ते. आंबेडकरी चळवळीतली अनेक स्थित्यंतरंही त्यांनी पाहिलीत. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या दलित अत्याचाराच्या घटना आणि त्यातली शिवसेनेची थेट भूमिका याबद्दल त्यांच्या मनात चीड आहे. तो राग बर्वे यांच्या चेहऱ्यावरर स्पष्टपणे दिसत होता. ‘हे समोर बसलेत ते भावनिकपणे विचार करत असतील पण मी तसं करत नाही.’ बर्वे म्हणाले.

प्रकाश आंबेडकर ‘वन मॅन शो’

माझ्याच बाजूला बसलेले काका बोलणार तितक्यात त्यांना बर्वेंनी अडवलं. ते स्वत: बोलू लागले. ‘बाबासाहेब म्हणाले होते परिस्थितीनुसार बदलायला शिका. आताही ठाकरे-आंबेडकर युती झाली तरी त्याचा दोघांनाही फायदाच होईल. पण सध्या जे चालूय ते सत्तेचं भांडण आहे. त्यामुळे आंबेडकर शिवसेनेकडे आल्यामुळे शिवसेनेचीच ताकद अधिक वाढणार आहे.’

‘प्रकाश आंबेडकर म्हणजे ‘वन मॅन शो’ आहे. सेटलमेंट करण्यात माहीर. त्यांना युती कुणाशी आहे याच्याशी फारसं देणंघेणं नसतं. ‘माझं काय ते बोला…’ इतकंच असतं त्यांचं.’ बर्वे असं म्हणताच प्रत्येकाचं बोलणं शांतपणे ऐकणारे ‘बौद्धाचार्य’ बनसोडे गुरूजी भडकले. त्यांच्याकडे रागाने बघू लागले. पण बर्वेंनी आपलं बोलणं चालूच ठेवलं. त्यांनी लोकसभेचं उदाहरण दिलं. सत्तेतच यायचं तर प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसशी युती करायला हवी होती असं बर्वेंचं म्हणणं होतं.

मधेच घेगडमल यांनी कधीकाळी शरद पवार युतीसाठी राजगृहावर गेल्याची आठवण सांगितली. वंचितचा फायदा कुणाला? पुन्हा बर्वेंचा प्रश्न. पुन्हा त्यांनी २०१९च्या विधानसभेची गोष्ट सांगितली. ‘आपल्याकडे हाय किती त्याप्रमाणात सत्तेचा वाटा मागायला हवा की नको? आपला टक्का किती? या टक्क्यावर तुम्ही सत्तेत येणार? बर्वेंचा सगळ्यांनाच प्रश्न.

हेही वाचा: बाळासाहेब ठाकरेंनी सेक्युलर पक्षांबरोबर २२ वेळा केली होती दोस्ती

बाबासाहेबांच्या पत्राची आठवण

शिवसेना-ठाकरे गट आणि वंचितची युतीसाठी बोलणी सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दादरच्या राजगृहाला भेट दिली होती. इंदू मिलच्या संदर्भात ही भेट असल्याचं त्यावेळी दोघांनीही म्हटलं होतं. पण त्यावरूनही अनेक तर्क-वितर्क लढवले गेले. अर्थात प्रकाश आंबेडकर यांनी शिंदेंसोबतच्या राजकीय चर्चेचे दावे फेटाळून लावले होते.

‘लाल बावट्या वाल्यांना हे शिव्या घालतात. पण त्यांनी बाबासाहेबांसोबत काम केलं नाही का? असो तेही जाऊद्या. पण प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांचा नातू आहे हे त्यांनी स्वतः विसरायला नको’ असं म्हणत बर्वेंनी प्रकाश आंबेडकरांच्या अचानक बदलणाऱ्या भूमिकांबद्दल नाराजी व्यक्त केली. घेगडमल यांनीही त्यांच्याशी सहमत असल्याचं सांगितलं.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या 'शेड्युल्ड कास्टस् फेडरेशन' पक्षाला त्यांच्या हयातीमधेच मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे समविचारी पक्षाशी युती करून निवडणुका लढवायला हव्यात असं बाबासाहेबांचं मत होतं. त्यांनी स्वत: तसं पत्रही दादासाहेब गायकवाड यांना लिहिल्याची एक महत्वाची नोंद आहे. त्याची आठवण घेगडमल आणि बर्वेंनी करून दिली.

चळवळीची प्रेरणा शिवराय-बाबासाहेब

प्रकाश आंबेडकरांनी ‘आंबेडकरी चळवळ संपली आहे…’ या नावाचं एक पुस्तक लिहिलंय. त्याबद्दल इथल्या जुन्या आंबेडकरी कार्यकर्त्यांमधे राग असल्याचं दिसलं. यातल्या एका आजोबांना तुम्ही हे पुस्तक वाचलंय का असा प्रश्न केला. त्यांनी ‘हो’ असं उत्तर दिलं. ‘चळवळ कुणामुळे उभी राहिली? शिवाजी महाराज आणि बाबासाहेब. हीच आमची मुख्य प्रेरणा. पण प्रकाश आंबेडकरांना ही चळवळ संपली असं म्हणायचा अधिकार कुणी दिला? आता शिवराय-बाबासाहेब हे समीकरण घेऊन यांनी समाजात पोचायला हवं.’

तितक्यात बनसोडे गुरूजी आणि इतर अशी शाब्दिक बाचाबाची झाली. बौद्धाचार्य असलेले बनसोडे गुरूजी सोडले तर बाकी सगळेच घेगडमल आणि बर्वेंशी सहमत असल्याचं दिसलं. बनसोडे भारतीय बौद्ध महासभा या बौद्ध धर्मातल्या एका संस्थेशी संबंधित असल्याचं कळलं. त्याचं नेतृत्व प्रकाश आंबेडकर यांच्या मातोश्री मिराताई आंबेडकर करतायत. या सगळ्यांशी बनसोडे गुरूजींचा थेट कनेक्ट असल्यामुळे ही मांडणी त्यांना मान्य नसल्याचं दिसत होतं.

पण भाजप-शिंदेंचं आव्हान

या सगळ्यांचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो. वाचनालयापासून सरळ चालत गेलो. आजूबाजूला बऱ्याच इमारती होत्या. काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांचे बॅनर बऱ्याच ठिकाणी लागलेले होते. चालत असताना मधेच एक गल्ली लागली. आत शिरलो. तिथं विशीतला एक तरुण मोबाईलवर गाणी ऐकत होता. ‘तुला फुकट दिलंय सारं…’ अशी एक ओळ कानावर पडली. त्याच्या जवळ गेलो. म्हटलं कोणतं गाणं आहे. त्याआधी त्याला इथं येण्याविषयी सांगितलं. ‘माझा भिमराव लय दिलदार… तुला फुकट दिलंय सारं…’ त्यानं गाणं सांगितलं.

किरण त्याचं नाव होतं. मी त्यालाच थेट ठाकरे-आंबेडकर युतीबद्दल प्रश्न केला. विशीत असला तरी पहिल्या दोन-तीन प्रश्नातच राजकीय पक्षांविषयी त्याला बरीच माहिती असल्याचं समजलं. महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोंडीबद्दल तो बोलू लागला. ‘उद्धव ठाकरेंनी कोविड काळात खूप चांगलं काम केलंय. त्याबद्दल त्यांच्याविषयी नक्कीच आदर आहे. प्रकाश आंबेडकर सोबत आल्यामुळे त्यांना फायदाच होईल. शिवाय वंचित-मुस्लिम फॅक्टरनं केलेली कमाल आम्ही पाहिलीय. पण सध्या भाजप आणि एकनाथ शिंदेंचं आव्हान नक्कीच असेल. त्यांच्याकडे पैसा आहे.’

त्याला इतर आंबेडकरी नेत्यांविषयी विचारलं. त्यानं एका विहाराकडे बोट दाखवलं. तिथ खूप सारे चळवळीतले लोक बसलेले असतात. तेच तुला याबद्दल अधिक माहिती देऊ शकतील. त्यावर अधिक बोलणं मात्र त्यानं टाळलं. जाताजाता इथल्या एका आंबेडकरी नेत्यानं नुकताच भाजपमधे प्रवेश केल्याचं त्यानं सांगितलं. रस्त्यावर बॅनर दिसतील बघ असं म्हणत त्यानं एक वीडियो दाखवला. भाजप प्रवेशाआधी हा नेता संविधान कसं धोक्यात आलंय आणि त्याला भाजप सरकार कसं जबाबदार आहे असं बोलल्याचा तो वीडियो होता.

हेही वाचा: हिंदूहृदयसम्राटांच्या भूमिकेत एक मुसलमान कसा स्वीकारला गेला?

तरुणांना वाटलं तसं…

त्याच गल्लीतून पुढं गेलो. एक पोलिस चौकी लागली. त्याला कुलूप होतं. त्याच्या समोर लागूनच एक मशीद होती. इथं सगळी मुस्लिम वस्ती असावी. या मशिदीच्या गेटला हिरवा आणि निळा असे दोन झेंडे दिसले. चालत थोडा पुढं आलो. काही तरुणी गप्पा मारत होत्या. गडबडीत दिसल्या पण त्यांना इथं येण्याचं कारण सांगितलं. त्यांनी काही बोलायला नकार दिला. पण त्यातली एक मुलगी मात्र पुढं आली.

वैशाली असं तिचं नाव होतं. एमएसडब्ल्यू करत असल्याचं तिनं सांगितलं. मी थेट तिलाच इथल्या कामगार आणि दलित चळवळीबद्दल काही प्रश्न केले. ठाकरे-आंबेडकर युतीच्या प्रश्नाकडे वळलो. या भागात तरी दोघांनाही फायदा होईल असं तिचं उत्तर आलं. तिच्या सोबतच्या इतर मैत्रिणींना तिनं बोलायला लावलं. त्यातल्या दोघींनी वैशालीशी सहमत असल्याचं म्हटलं.

त्या बोलत असतानाच दोन मुलं तिथं आली. बहुतेक हा सगळा एक ग्रुप असावा. वैशालीनं त्यांना माझ्या इथं येण्याविषयी सांगितलं. तसं उशीर होतोय असं म्हणत सगळेजण तिथून निघायची घाई करत होते. जातानाच वैशालीनं एका मशिदीच्या पलिकडे असलेल्या विहाराकडे बोट केलं. ‘तिथं खुप सारी लोक बसलेली असतील. त्यांना प्रश्न विचारा ठाकरे-आंबेडकर युतीबद्दल. ‘ त्यांना जाॅईन झालेल्या त्या दोन मुलांनी मात्र तिथं कुणीच नसल्याचं सांगितलं.

आठवलेंचा कार्यकर्ता म्हणतो संविधानावर संकट

जवळच एक फुल-हाराचं दुकान होतं. तिथंच एक काका भेटले. त्यांना कामाविषयी सांगितलं. ते याआधी रिपब्लिकन पक्षाचं काम करत असल्याचं समजलं. मी त्यांना कोणता गट असं विचारणार तितक्यात त्यांनी ‘रामदास आठवले…’ असं उत्तर दिलं.

सध्या काकांनी पक्षाचं काम करणं थांबवलंय. त्याबद्दल विचारताच ‘आठवले साहेब ज्यापद्धतीने भाजप प्रचारकाच्या भूमिकेत आलेत. ते आपल्याला मान्य नाही. आज संविधानावर संकट आलंय हे विसरून कसं चालणार?’ हे बोलतानाच सामान्य कार्यकर्त्याच्या एका काॅलवरही साहेब कसे उपलब्ध असतात हे सांगायला ते विसरले नाहीत.

मी त्यांना ठाकरे-आंबेडकर या नव्या समीकरणाविषयी विचारलं. पण ही युती केवळ प्रकाश आंबेडकरांची इच्छा असे पर्यंतच टिकेल असं बोलत ते निघून जातायत तितक्यात दोन पावलं चालून माघारी आले. बोलू लागले.

'प्रकाश आंबेडकर खूप विद्वान माणूस आहे. आम्हाला त्यांचा आदर आहे. पण त्यांनी सोयीचं राजकारण करू नये. त्यांनी ठाकरेंसोबत युती केली पण संजय राऊत कोण? असा प्रश्न केला. काय बोलायचं? हेकटपणा आणि 'मी म्हणेल ते' हा हट्ट त्यांनी सोडायला हवा. बस इतकंच माझं म्हणणं आहे.'

आमच्या प्रश्नांवर लिवा

फुल-हाराचं दुकान असलेल्या काकुंनाही काही प्रश्न केले. आत बाबासाहेब आणि संत रोहिदास यांचा फोटो होता. त्यांना मी शिवसेनेच्या आधीच्या भूमिकेविषयी विचारलं. ‘दोघांनाही एकमेकांची गरज आहे. आता जुनं विसरायला हवं.’

तितक्याच काकूंनी एक वेगळ्या मुद्याकडे लक्ष वेधलं. 'महागाई, बेरोजगारी किती वाढलीय. माझा पोरगा बीए झालाय. पण चांगली नोकरी नाही. बारा हजारावर एका कंपनीत काम करतोय. संध्याकाळचा इथं दुकानात येतो.' काकुंच्या चेहऱ्यावर राग आणि हतबलता एकाचवेळी दिसत होती. यावर कुठंतरी लिवा असं म्हणत त्या पुन्हा आपल्या कामात गुंतल्या.

मी मुख्य रस्त्याच्या दिशेनं निघालो. तिथं प्रचंड वर्दळ होती. रस्त्याच्यापलिकडे एक आॅफिस दिसलं. त्यावर बॅनर आणि बॅनरवर बाबासाहेबांचा मोठा फोटो होता. ते आॅफिस मोरे नावाच्या कुण्या भाजपच्या पदाधिकाऱ्याचं असल्याचं समजलं. याआधी भेटलेल्या किरणनं ज्या आंबेडकरी नेत्याविषयी सांगितलं ते हेच तर नसावेत ना? असा विचार करत मी तिथून घाटकोपरच्या दिशेनं निघालो.

हेही वाचा:

राष्ट्रपती राजवट हे राजकीय पक्षांचं नाही तर राज्यपालांचं अपयश!

अमित शाहांनी फडणवीसांचा, शरद पवारांनी अजितदादांचा केला गेम?

स्वबळावर सत्तेसाठी भाजपने हा फॉर्म्युला वापरल्यास शिवसेनेला बसणार झटका

राजेश टोपेः आईच्या आजारपणातही महाराष्ट्र बरा होण्यासाठी लढणारा आरोग्यमंत्री

राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना आमदार बनवणं, हे कायद्याला धरून आणि देशभक्तीलाही

0 Shares:
You May Also Like
amphibians endangered
संपूर्ण लेख

उभयचर नष्ट होताहेत, उरलेल्या जीवसृष्टीवरही धोक्याची घंटा!

जगप्रसिद्ध ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान…
संपूर्ण लेख

‘लिव्ह इन’ की ‘लग्न’ यावर उत्तर कसं शोधणार?

‘लिव्ह इन’ अर्थात लग्नाशिवाय शारीरिक संबंधात राहण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या…
संपूर्ण लेख

सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य उलगणारा ‘बेन्नू’तील खजिना

पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘नासा’नं २०१६ मधे यान पाठवलं होतं. ते यान या लघुग्रहावजवळ…
संपूर्ण लेख

लॅटिन अमेरिका ही पर्यावरणपुरक जगासाठी नवी अर्थशक्ती

लॅटिन अमेरिकेत,  दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ३३ देशांचा समावेश होतो. लॅटिन हे नाव सर्वप्रथम फ्रान्सचे सर्वेसर्वा असलेल्या तिसऱ्या…
संपूर्ण लेख

फक्त ८० रुपयात ‘लिज्जत’ हा ब्रँड घडविणाऱ्या आज्जी गेल्या

ही गोष्ट आहे, १९५९ मधली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो भारावलेला काळ होता. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू देशाची नवी…
संपूर्ण लेख

सत्यशोधक पत्रकारितेचे विस्मृतीत गेलेले अतुलनीय योगदान

एकोणिसाव्या शतकातील नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा आणि आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले…