गुढीपाडव्याच्या शोभायात्रेनं २५ वर्षात नक्की काय साधलं?

गुढीपाडव्याला निघणारी पहिली शोभायात्रा १९९९मधे डोंबिवलीत निघाली. त्यानंतर गिरगाव, पार्ले इथपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शोभायात्रेचा ट्रेण्ड बनला. गुढीपाडवा हे सर्व हिंदूंचं नववर्ष नसतानाही, तिची मांडणी ही हिंदू नववर्ष स्वागतयात्रा अशी केली गेली. यापाठी निश्चितच राजकीय गणित होती आणि आहेत. ते अनेकदा स्पष्ट दिसलंय. यंदा या यात्रेच्या पंचविशीनिमित्त हे पुन्हा समजून घ्यायला हवं.

गुढीपाडवा म्हणजे घरगुती सण होता. घरात गुढी उभारायची, देवळात जायचं घरी येऊन श्रीखंडपुरी खायची आणि दुपारी गपगुमान झोप काढायची… असं रुटीन २५ वर्षापूर्वी मराठी घराघरात दिसायचं. पण गेल्या २५ वर्षात हा सण घरगुती उरला नाही…. तो शोभायात्रेत फोटो काढण्याचा दिवस बनला. चकचकीत कपडे घालून, शोभायात्रेत फोटो काढणं आणि ते आधी फेसबूक आणि आता व्हॉट्सअप, इन्स्टावर ठेवणं म्हणजे गुढीपाडवा ठरला आहे.

हे सगळं घडण्याचं कारण होतं ते म्हणजे नववर्षानिमित्त निघणारी शोभायात्रा. सोशल मीडिया वाढत असताना काही ना काही कारणाने फोटो, वीडियो काढण्याचं निमित्त शोधणाऱ्या थोरापोरांना शोभायात्रा हे मोठं निमित्त मिळालं. एकीकडे संस्कृती वगैरे नावाखाली नाचायला, मिरवायला आणि सोशल मीडियावर इम्प्रेशन मारायला ही मोठी संधी होती. त्यामुळे त्यामागच्या राजकीय वगैरे हेतूंकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही. पण हा राजकीय हेतू निश्चितच साध्य झाला, असं आज तरी म्हणता येतं.

कशासाठी आणि कोणी सुरू केली शोभायात्रा?

थोडी जागतिक आणि राष्ट्रीय पार्श्वभूमी समजून घेऊयात. १९९१च्या डिसेंबरमधे सोवियत रशियाचं विघटन झालं.  सोवियत रशिया पडल्यानं अमेरिकेला जगाच्या बाजारात खुला प्रवेश मिळाला. त्याचवेळी भारतातही खुलं आर्थिक धोरण स्वीकारलं गेलं. लोकांच्या हातात पैसा खुळखुळायला लागला. तिथून खऱ्या अर्थानं अमेरिकेचा प्रभाव असलेलं जागतिकीकरण भारतात थेट येऊ लागलं.

दुसरीकडे त्याचवेळी भारतात हिंदू-मुस्लिम तेढ पुन्हा वाढवली जाऊ लागली आणि १९९२च्या डिसेंबरमधे अयोध्येतली बाबरी मशिद पाडली गेली. एकीकडे जागतिकीकरणामुळे येत असलेले पाश्चिमात्य वारे आणि दुसरीकडे ‘गर्व से कहो हम हिंदू है’चे नारे जोरात होते. मशिद पडल्यानंतर झालेले दंगे शांत होतायत तोच मुंबईत बॉम्बस्फोट झाले. पुढे हा तणाव असाच सुरू राहिला. 

मध्यमवर्गाकडे जागतिकीकरणातून आलेल्या पैशामुळे त्यांचं जीवनमान बदलत होतं. स्कूटर जाऊन फोरविलर येत होत्या. चाळीतून वन बीएचके आणि टूबीएचकेमधे स्थलांतर होत होतं. त्यातून हॅपी बर्थडे, वॅलेंटाइन डे, ३१ डिसेंबर जोरात होऊ लागले होते. या सगळ्या परकीय संस्कृतीला उत्तर म्हणून डोंबिवलीत १९९९ला पहिली शोभायात्रा निघाली, हे लक्षात घ्यायला हवं.

डोंबिवलीच्या गणेश मंदिर संस्थानाच्या पुढाकारानं ही पहिली शोभायात्रा निघाली. त्यामागचं कारण आजवर अनेकदा छापून आलंय. हिंदू संस्कृतीवर होत असलेलं आक्रमण रोखण्यासाठी ही शोभायात्रा काढण्याचं ठरलं, असं या संस्थानानतर्फे जाहीरपणे सांगितलं गेलं आहे. त्यामुळे या सगळ्यामागे हिंदूंना आपण हिंदू आहोत, याची जाणीव करून देणं आणि त्याचा पुढे राजकीय उपयोग करणं, हे आपोआपच झालं.

हेही वाचाः गुढीपाडवाः शिवपार्वती विवाहाचा वारसा सांगणारा हजारो वर्ष जुना उत्सव

गुढीपाडवा हे सर्व हिंदूंचं नववर्षच नाही

सर्व हिंदूंचं नववर्ष हे गुढीपाडवा नाही, याबद्दल अनेकदा लेख लिहिले गेलेत. तरीही या शोभायात्रेला हिंदू नववर्ष शोभायात्रा असं म्हटलं जातं. कोलाजमधल्या एका लेखानुसार, गुढीपाडवा हा आपला मराठी नववर्षदिन. एकाच दखनी सांस्कृतिकतेचा भाग असणाऱ्या महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि नव्या तेलंगाणा या राज्यांमधेच गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष साजरं होतं. कारण या भागावरच सातवाहनांचा प्रभाव होता.

सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं, की नर्मदेच्या उत्तरेला विक्रम संवत मानलं जातं तर दक्षिणेला शालिवाहन शक. काहीजण ही सीमा तापी नदी सांगतात. पण हे विभाजन तितकंसं खरं नाही. दक्षिणेत तमिळींचं स्वतःचं वेगळं कॅलेंडर आहे. ते जगभर आपलंच कॅलेंडर घेऊन जातात. मल्याळींचंही स्वतःचं कोल्लावर्षम नावाची कालगणना आहे. 

उत्तरेतही विक्रम संवत वापरलं जातं, असं आपण सर्रास म्हणतो. आजच्या मध्यप्रदेशातल्या माळव्याचा राजा विक्रमादित्याच्या नावाने सुरु झालेली ही कालगणना देशात सर्वात जास्त वापरली जाते. बंगाल्यांचं स्वतःचं वेगळं कॅलेंडर आहे. राजा भास्करवर्मनाची आठवण म्हणून ओरिसा, त्रिपुरा, बंगाल आणि बांगलादेशात हे वर्षं वापरलं जातं. 

ही सगळी हिंदू नववर्षच असताना, गुढीपाडव्याच्या शोभायात्रेला मराठी नववर्ष शोभायात्रा म्हणणं जास्त योग्य ठरलं असतं. पण त्याऐवजी, हिंदू नववर्ष स्वागतयात्रा म्हणणं यामागे निश्चितच राजकारण आहे. ते राजकारण या शोभायात्रांच्या आयोजनातही स्पष्टपणे दिसलं आहे. गिरगावातल्या शोभायात्रेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केशव हेडगेवार, बाळासाहेब देवरस यांच्या प्रतिमा असलेल्या गाड्या असतात. त्यामुळे ही संघाची शोभायात्रा आहे, यावर शिक्कामोर्तब होतं.

भाजपला झालेला फायदा हे शोभायात्रेचंही यश

बाबरी पडल्यानंतर हिंदूंचं संगठन म्हणून भाजपने मारलेली मुसंडी यावरही प्रचंड विश्लेषण झालेलं आहे. त्यामधे कोणत्याही प्रकारांनी हिंदूंना भाजपनं कसं संघटीत केलं हे अनेकदा मांडलं गेलं आहे. गुढीपाडव्याची शोभायात्रा हे देखील त्याचंच एक रूप होतं. हिंदू प्रतिकं आणि त्यासंदर्भातले देखावे ही या शोभायात्रेची कायम वैशिष्ट्य राहिली आहेत. लोकांना जोडून हिंदू अस्मितेचं एकगठ्ठाकरण करण्यात संघाला आणि भाजपला यश मिळालं, हे नाकारून चालणार नाही.

राज्यभर आज शोभायात्रांचं लोण पसरलं आहे. सर्वच शोभायात्रा या संघ किंवा भाजपच्या नाहीत. पण त्याची सुरवात डोंबिवली आणि गिरगावात या हिंदुत्ववादी विचारांनीच केली हे कुणीही अमान्य करणार नाही. या सगळ्यातून साधलेलं राजकीय माप पदरात पाडून घेण्यात भाजपने कोणतीच कसर ठेवली नाही. त्यासाठी विविध ज्ञातीच्या आणि व्यापाऱ्यांची मदतही योग्यरितीने घेण्यात आली.

एवढंच काय तर शिवसेना-भाजप युती असताना, ही शोभायात्रा मोठं करण्याचं काम शिवसैनिकांनीही निष्ठेने केलं. शाखेचं नेटवर्क वापरून तसंच स्थानिक पातळीवर वाट्टेल ती मदत करत, शिवसैनिकांनी ही शोभायात्रा मोठी केली. पण नंतर शिवसैनिकांना भाजपचं आणि संघाचं खरं राजकारण कळू लागलं. त्यामुळे प्रत्यक्षात शिवसेना-भाजप युती तुटण्याआधी गिरगावातली शोभायात्रा फुटली.

एक वर्ष तर सकाळी संघविचारातून निघणारी शोभायात्रा तर संध्याकाळी शिवसेनेची स्वतंत्र शोभायात्रा अशी परिस्थिती होती. त्यानंतर एक वर्ष तर एका दिशेनं संघविचारांची शोभायात्रा तर दुसऱ्या दिशेनं शिवेसेनेची शोभायात्रा असंही घडलं. मुख्य म्हणजे भाजप-शिवसेना युती तुटण्याआधी शोभायात्रांमधे रस्त्यावर पडलेली ही फूट नंतर राजकीयदृष्ट्या प्रत्यक्षात आली.

हेही वाचाः गुढीपाडव्याला श्रीखंड पुरी खाताय, पण तुम्हाला त्याविषयी काय माहितीय?

महाआरती पुढे शोभायात्रा कशी झाली?

१९९२च्या दंगलीनंतर वेगवेगळ्या स्थानिक देवळांमधे महाआरती करण्याचा प्रकार काही दिवस झाला. मोठमोठ्या आवाजात घंटा आणि स्पीकरच्या सहाय्याने महाआरती करण्यात यायची. महाआरतीचा हा प्रयत्न झाला खरा पण त्याला यश येत नव्हतं. कारण फक्त देवाच्या आरतीसाठी मोठ्या प्रमाणावर लोक जमवणं हे काही सोपं नव्हतं. त्यामुळे लोकांना आवडेल असा पर्याय शोधणं सुरू झालं.

त्याच वेळी टीवी चॅनल्सची संख्या वाढत होती, त्यांना विज्युअल कंटेट हवाच होता. ऑर्कुट, फेसबूकसारखा सोशल मीडिया फोफावत होता. लोकांच्या हातात मोबाईल वाढू लागले होते. या सगळ्यात स्वतःला सादर करणं तरुणाईला भूरळ घालत होता. दरवर्षी दिवाळीला डोंबिवलीच्या फडके रस्त्यावर होणारी फॅशन परेड लोकप्रिय ठरत होती. त्यातूनच याच फॅशन परेडला सांस्कृतिक रूप देण्याचं ठरलं आणि शोभायात्रेचं गणित बांधलं गेलं.

थेट रस्त्यावर बाईक घेऊन वगैरे उतरायचं म्हटल्यावर सगळ्यांच्या उत्साहाला उधाण आलं. वेगवेगळ्या संकल्पना ठरल्या आणि बघताबघता शोभायात्रांचा प्रयोग तुफान यशस्वी ठरला. दरवर्षी त्यासाठी होणाऱ्या गर्दीचं प्रमाणही वाढलं. फोटो, वीडियोचा तर खच पडला. डोंबिवलीच्या शोभायात्रेपेक्षाही गिरगावातली शोभायात्रा सरस ठरली. कारण दक्षिण मुंबई सगळ्यांनाच सोयीची होती. त्यामुळे पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी येणारा पहिल्यापानावरचा फोटोही निश्चित झाला.

हे सगळं लोकांनी सहजपणे स्वीकारलं. त्यातून अनेक संघटना मजबूत झाल्या. त्यांचं नेटवर्क उभं राहिलं. त्याच्यातून ग्रूपमधून आधी सॉफ्ट हिंदुत्व आणि प्रसंगाप्रमाणे थेट हिंदुत्वावादी मेसेज पसरवले जाऊ लागले. सांस्कृतिक ऐक्यातून राजकीय गणित परफेक्ट जमलं आणि २०१४ मधे देशात भाजपचं सरकार आलं. त्यामुळे शोभायात्रा हे देखील महाराष्ट्रातल्या भाजप यशाचं एक मोठ्ठ कारण आहे, हे स्वीकारायलाच हवं.

शोभायात्रा हाताबाहेर चालल्या आहेत का?

सार्वजनिक गणेशोत्सवाचा उपयोग जसा टिळकांनी राजकीय हेतूनंच केला होता, पण तो नंतर मात्र हाताबाहेर गेला आणि पैसे कमवायचा उद्योग बनला. तसंच आता शोभायात्रांचं होऊ लागलंय. आज अनेक शोभायात्रा हे ब्रँडिग आणि जाहिरातबाजीचं केंद्र ठरल्या आहेत. शोभायात्रेच्या पँप्लेटपासून प्रत्यक्ष शोभायात्रेत होणाऱ्या विक्रीपर्यंत अनेक गोष्टींचा तो बाजार झालाय.

जत्रेत जसे सगळं असतं, तसं आता शोभायात्रांचा होऊ लागलंय. सांस्कृतिक नावानं सुरू झालेला हा इवेंट आता प्रमोशन आणि मार्केटिंगचा उत्तम पर्याय बनलाय. अनेक सिनेमांचं आणि प्रॉडक्टचंही लाँचिग या शोभायात्रेमधे होत असतं. दुसरीकडे राजकारणी आणि भावी राजकारण्यांचंही प्रमोशन करण्यासाठी होणारी बॅनरबाजी तर शोभायात्रेचा मोठा भाग आहे.

त्यामुळे सांस्कृतिक देखावा म्हणून उभ्या केलेल्या या शोभायात्रेचा राजकीय हेतू साध्य झाला असला, तरी तो संपलेला नाही. अजूनही शोभायात्रांची गरज लागणार आहे. त्यासोबत ब्रँडिंग आणि मार्केटिंगवाल्यांसाठीही शोभायात्रा आवश्यकच आहे. त्यामुळे गणपतीच्या मिरवणुका जशा आज कुणाच्या हातात उरल्या नाहीत, तसंच गुढीपाडव्याच्या शोभायात्रांचं होणार आहे, किंबहुना व्हायला सुरवात झालीय.

हेही वाचाः 

गुढीपाडव्याला साजरा करुया महाराष्ट्राचा पहिला स्वातंत्र्यदिन

गुढीपाडवा FAQs: आपल्या मनात असणाऱ्या प्रश्नांची साधीसरळ उत्तरं

युधिष्ठिर शक ते शिवशक, जाणून घेऊया महाराष्ट्राच्या कालगणनेचा प्रवास

गुढीपाडव्याला गुढीपाडवाच राहू दे, त्याला हिंदू नववर्ष कशाला बनवताय?

0 Shares:
You May Also Like
संपूर्ण लेख

आदिपुरुष : नव्या पिढीचं नवं रामायण

दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा नव्या पिढीला रामायण नव्याने सांगू पाहतोय. या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा कित्येकांनी…
संपूर्ण लेख

सावधान… भारतावर आदळणारी वादळं वाढतायत!

किनाऱ्यावर आदळलेल्या भयंकर लाटांचे वीडियो तुम्हाला सोशल मीडियावर आले असतील. बिपरजॉय वादळ गुजरातकडे गेल्याचे मेसेजही तुम्हाला आले असतील.…
संपूर्ण लेख

हरवलेल्या कथेच्या शोधात : साध्या शब्दांत उग्र वास्तव मांडणारा कथासंग्रह

लेखक सीताराम सावंत यांचा ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा नवा कथासंग्रह गावातलं समाजवास्तव नव्याने सांगू पाहतोय. रयत शिक्षण संस्थेत…
संपूर्ण लेख

महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई हीच क्रिकेटची खरी लवस्टोरी

तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकला. त्याची एक झलक पाहण्यासाठी आजही तरुणाई अक्षरश: आपला जीव ओवाळून टाकते.…
संपूर्ण लेख

करियर करणाऱ्या पोरींसाठी एग फ्रीजिंग ठरतंय वरदान

अभिनेत्री प्रियांका चोप्राने मध्यंतरी आपण वयाच्या तिशीमधे एग फ्रीजिंग केल्याचा खुलासा केला होता. सुपरस्टार रामचरण आणि उद्योजिका असणारी…
संपूर्ण लेख

‘फायर इन द माऊंटन्स’ : सरकारी आश्वासनांचा फसलेला रोडमॅप

सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच ‘फायर इन द माऊंटन्स’ हा नवा सिनेमा रिलीज झालाय. वरवर पाहता, या…