‘नकोसा’ स्पर्श नकोच : मुलांच्या लिंगभावसंवेदनशील संगोपनासाठी

‘मुक्ता’ या संस्थेनं कमला भसीन यांच्या ‘काश! मुझे किसी ने बताया होता!!’ या हिंदी पुस्तिकेची ‘नकोसा’ स्पर्श नकोच या शीर्षकाची अनुवादित आवृत्ती प्रसिद्ध केलीय. ही पुस्तिका केवळ स्पर्शाविषयीची जाणीव निर्माण करत नाही; तर मुलांच्या लिंगभावसंवेदनशील जडणघडणीच्या प्रक्रियेतलं एक महत्त्वाचं साधन ठरू शकतं. या पुस्तिकेची ओळख करून देणारी दिलीप चव्हाण यांची फेसबूक पोस्ट.

बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेची एक बातमी ‘हिंदुस्तान टाइम्स’ या इंग्रजी पेपरमधे २० मार्च २०२२च्या अंकात वाचायला मिळाली. बाल लैंगिक अत्याचाराच्या या अत्यंत घृणास्पद प्रकरणात एका ११ वर्षीय मुलीवर तिचे वडील, मोठा किशोरवयीन भाऊ आणि आजोबांसह तिच्या कुटुंबातल्या चार सदस्यांनी अनेक वेळा बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. ही माहिती पुण्यातल्या बंड गार्डन पोलिस स्टेशनमधे १८ मार्चला दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमधे देण्यात आली होती.

लैंगिक अत्याचाराचं घृणास्पद प्रकरण

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जेव्हा ही पीडित मुलगी आठ वर्षांची होती तेव्हापासून मागच्या पाच वर्षांत हे दुष्कृत्य करण्यात येत होतं. ही मुलगी रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांच्या कुटुंबातली आहे. सकृतदर्शनी, ही घटना खोटी असावी असं वाटतं. कुटुंबातल्या अंतर्गत वादांमधून मुद्दामहून असा आरोप करण्यासाठी कुणीतरी मुलीला वेठीला धरलं असावं, असाही विचार मनात चमकून जातो. पण, सत्य हे कल्पनेपेक्षाही भयंकर असतं, याचा प्रत्यय या घटनेत येतो.

या मुलीच्या बाबतीत जे घडलं त्याबद्दल साक्षात या मुलीनेच एका कार्यक्रमात सर्वांना सांगितलं. लहान मुलांना लैंगिकतेशी संबंधित पैलूंची ओळख करुन देण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या एका सामान्य शैक्षणिक कार्यक्रमात हे सत्य पुढं आलं होतं. शाळेच्या समुपदेशकाने शाळेला ही माहिती दिली, ज्यातून पोलिसांशी संपर्क साधला. अशी माहिती पोलिस निरीक्षक-गुन्हे अश्विनी सातपुते यांनी दिली होती.

समुपदेशकाच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आला. हिंदुस्तान टाइम्सच्या प्रतिनिधीने एफआयआरच्या आधारे दैनिक गुन्हेगारी अहवालाच एक प्रत पाहिली. भारतीय दंड संहिता आणि लैंगिक अपराधांपासून मुलांच संरक्षण – पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली संबंधित कुटुंबातल्या चार सदस्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: जागतिक कन्या दिनः स्त्री सन्मानासाठी दाढीमिशा लावून काम करणाऱ्या शास्त्रज्ञ

९६ टक्के प्रकरणांमधे आरोपी ओळखीचे

१४ वर्षीय भाऊ, ४५ वर्षीय वडील, ६० वर्षीय आजोबा आणि २५ वर्षीय काका यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सर्व घटना वेगवेगळ्या घडल्यानं सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला नाही, असंही सातपुते यांनी सांगितलं. ‘पाच वर्षांपूर्वी शाळांमधे सुरू केलेल्या ‘गुड टच बॅड टच’ वरच्या संभाषणाद्वारे हे प्रकरण उघडकीला आलंय.

सकृतदर्शनी शांत आणि प्रेम-जिव्हाळा यावर आधारलेल्या कुटुंबाचे प्रत्यक्ष अंतरंग किती भीषण असू शकतात हे यावरून पुढे आलंय. आपण पालकांना याबद्दल शिक्षित करणं आवश्यक आहे कारण त्यांना याबद्दल अधिक ज्ञान नाही. अशी प्रकरणं लवकर शोधण्यासाठी शाळेनं १८ वर्षांखालच्या मुलींच्या मानसिक आरोग्याची तपासणी त्यांच्या पालकांशी आणि पालकांशी महिन्यातून किमान एकदा तरी नियमितपणे बोलून केली पाहिजे,’ असं बालमानसशास्त्रज्ञ कमलेश सोनावणे यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’ला सांगितलं.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने गेल्या वर्षी प्रकाशित केलेल्या क्राइम इन इंडिया २०२० च्या अहवालात असं दिसून आलंय की, देशात दाखल झालेल्या मुलांविरूद्धच्या एकूण गुन्ह्यांपैकी ३८.८ टक्के गुन्हे लैंगिक अत्याचाराशी संबंधित आहेत. २०१९पासून पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांच्या घटनांमधेही वाढ झाली आहे. शिवाय, लैंगिक अत्याचार आणि लैंगिक अत्याचाराच्या ९६ टक्के प्रकरणांमधे, गुन्हेगार ही पीडित मुली-मुलाची ओळखीची व्यक्ती होती.

ही संपूर्ण माहिती ‘हिंदुस्तान टाइम्स’ या पेपरमधे नदीम इनामदार यांनी या घटनेवर जो रिपोर्ताज लिहिला त्यावरून समजली. या प्रकरणात संबंधित मुलगी, शाळेतले समुपदेशक, पोलीस अधिकारी या साऱ्यांचंच धैर्य वाखाणण्यासारखं आहे.

वर्षानुवर्ष घटना घडतायत

१८ व्या वाढदिवसापूर्वी १० पैकी एका मुलावर लैंगिक अत्याचार होत असल्याची माहिती एका अहवालात समोर आली आहे. या प्रकाराबाबत सर्वसामान्य लोकांना लैंगिक अत्याचाराच्या परिणामांची पूर्णपणे जाणीव नाही. बाल लैंगिक अत्याचार ही भारतातली एक जुनी समस्या आहे आणि वर्षानुवर्ष अशा अश्लाघ्य घटना घडत आलेल्या आहेत.

‘आमच कुटुंब असं नाही’, असा भ्रम आपण बाळगतो. विशेषत:, मध्यमवर्गीय बाळगतात. वस्तुत: समाजातल्या सर्वच घटकांमधे असं घडत असतं. उच्च-मध्यमवर्गीय कुटुंबात ते कसं घडते, हे उदाहरणार्थ ‘मॉन्सून वेडिंग’ या सिनेमात मीरा नायर यांनी प्रभावीपणे दाखवलंय. अशा घटना युरोप-अमेरिकेत घडतात, शहरात घडतात, श्रीमंत कुटुंबात घडतात असे भ्रम आपण अकारण बाळगतो.

हेही वाचा: अपर्णाताई, आता दिवस स्त्री पुरूष समतेचे आहेत!

अशीही एक बोलकी घटना

स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात घडलेली एक घटना खूप बोलकी आहे. या विद्यापीठात केवळ मुलींसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात कुण्यातरी वक्त्याने मुलींना सरळ असा प्रश्न विचारला ‘तुमच्यापैकी किती जणींना कुटुंबांतर्गत लैंगिक हिंसेला सामोरं जावं लागलं?’ हा प्रश्न सरळ विचारणं शहाणपणाचं नव्हतं. त्यामुळे, अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. एकाही मुलीने हात वगैरे वर केला नाही.

नंतर, एका प्राध्यापकाने एक युक्ती वापरली. प्रत्येक मुलीला एक कागद देण्यात आला आणि जर त्यांच्या बाबतीत कुटुंबांतर्गत लैंगिक दुर्वर्तन, अनाचार, हिंसेचा प्रकार घडला असेल तर त्यांना ‘१’ हा अंक लिहायला सांगण्यात आलं आणि तसं घडलं नसल्यास ‘२’ हा अंक लिहायला सांगण्यात आलं. सगळी कागदं गोळा केल्यानंतर असं दिसून आलं की, बहुतेक मुलींनी त्यांना दिलेल्या कागदांवर ‘१’ हा अंक लिहिलेला होता.

स्त्रीवाद्यांचं सकारात्मक पाऊल

ही समस्या एव्हाना कुटुंबातली व्यावहारिक समस्या राहिलेली नाही; तर स्त्रीवाद्यांनी आता यामधे सकारात्मक सहभाग घ्यायला सुरवात केलेली आहे.

आपण जेव्हा वयस्क मुलांना स्त्रीवाद, लिंगभाव, पितृसत्ता या संकल्पना शिकवतो तोपर्यंत त्यांच्या जाणिवांची जडणघडण ही पितृसत्ताक वातावरणात पूर्णत्वाला गेलेली असते. त्यामुळे, वयाच्या या टप्प्यावर या कल्पना त्यांनी आत्मसात कराव्यात, ही अपेक्षा फारशी फलदायी ठरत नाही.

घडवणुकीचं वय निघून गेल्यावर प्रबोधनाची पाठ्यपुस्तकी, शुष्क मात्रा फारशी प्रभावी ठरत नाहीत, हा अनुभव आहे. हे टाळण्यासाठी कुटुंबांतर्गत मुली-मुलांचे लिंगभावसंवेदनशील सामाजीकरण घडवून आणणं, हे स्त्रीवाद्यांना आवश्यक वाटतं.

मुली-मुलांचं संगोपन करताना स्त्रीवादी – म्हणजे लिंगभावसंवेदनशील कसे घडतील किंवा आपल्या अपत्यांची जडणघडण ही स्त्रीवादी पद्धतीने कशी होईल, याकडे आता स्त्रीवादी लक्ष देत आहेत. अर्थात, तसं घडलं नाही तर ही मुलं पुरुषसत्ताक जाणीवाच विकसित करतात, हेही तितकंच खरं!

हेही वाचा: बायका आंदोलक बनून रस्त्यावर उतरतात, त्याचा अर्थ पुरुष कसा लावणार?

तर पितृसत्ताक जाणीवाच विकसित होतील

अलीकडे, काही स्त्रीवाद्यांनी अशा विषयांना अनुलक्षून अपत्यांची स्त्रीवादी जडणघडण अशा आशयाची पुस्तकं लिहिली आहेत. उदाहरणार्थ, अॅलिसन वेल आणि विक्टोरिया राल्फ्स यांचं ‘How to Raise a Feminist: Bringing Up Confident Kids Who Could Change the World’ हे पुस्तक महत्त्वाचं आहे. मराठीत किंवा भारतीय भाषांमधे अद्याप अशा प्रकारची पुस्तकं फारशी पाहायला मिळत नाहीत.

आपल्याकडे लहान मुलांसाठीच्या साहित्यामधे तसंच पेपरनी बालकांसाठी तयार करण्यात आलेल्या पुरवण्या, शालेय पाठ्यपुस्तकं, दूरदर्शन वाहिन्यांवरच्या कार्टून मालिका, लोकप्रिय बालसाहित्य या सार्‍यांच्या सानिध्यात मुली-मुलांची जडणघडण ही पितृसत्ताक वातावरणात होते.

उदाहरणार्थ, ‘छोटा भीम’ सारखी मालिका तर पितृसत्ताक जाणीवच विकसित करत नाही; तर सामंतीयुगातली ‘स्वामीनिष्ठा’ हे मूल्य मुली-मुलांमधे रुजवते. हुकूमशाहीला पूरक अशी जाणीव लोकशाही समाजात निर्माण करण्याचं काम अशा मालिका पार पाडतात. अशावेळी, लहान मुली-मुलांच्या लिंगभावसंवेदनशील घडवणूकीचा प्रश्न हा अनुत्तरित राहतो.

लिंगभावसंवेदनशील जडणघडणीसाठी

या पार्श्वभूमीवर ‘मुक्ता’ या संस्थेनं या कमला भसीन यांच्या ‘काश! मुझे किसी ने बताया होता!!’ या हिंदी पुस्तिकेची ‘नकोसा’ स्पर्श नकोच या शीर्षकाची अनुवादित आवृत्ती प्रसिद्ध केली. लहानग्यांसाठी लिहिलेल्या या पुस्तिकेच्या दोन हजार प्रतींची पहिली आवृत्ती हातोहात संपणं, ही गोष्ट समाधानाची आहे.

ही पुस्तिका केवळ स्पर्शाविषयीची जाणीव निर्माण करत नाही; तर ज्या देहाला अध्यात्मामधे दुय्यमत्व बहाल केलं गेलं आणि स्वदेहाच्या जाणिवा विकसित करण्याविषयी अनास्था ज्या समाजात बाळगली गेली त्या समाजात ‘नकोसा’ स्पर्श नकोच ही पुस्तिका खरंतर अपत्यांच्या लिंगभावसंवेदनशील जडणघडणीच्या प्रक्रियेमधे एक महत्त्वाचं साधन ठरू शकते.

या पुस्तिकेची नुकतीच दुसरी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सारिका यांनी या पुस्तिकेचा अनुवाद केलेला असून या संस्थेची ही पहिली निर्मिती आहे. संपूर्ण पुस्तिका ही रंगीत असून बालकांना भावेल अशा रीतीने तिची मांडणी करण्यात आलेली आहे. या पुस्तिकेचं सर्वांनी स्वागत केलं पाहिजे.

पुस्तक : ‘नकोसा’ स्पर्श नकोच
लेखिका : कमला भसीन
अनुवाद : सारिका
पानं : २८, किंमत : ५०/-
संपर्क : मुक्ता, ३९-१, शांतीनगर, अजय मंगल कार्यालयाजवळ, यशोदानगर चौक, अमरावती – ४४४ ६०६
ई-मेल : [email protected]
मोबाईल : ८०८०४६३४८३

हेही वाचा:

आम्हाला गुजरात ऐवजी केरळ मॉडेलच हवंय!

लोक आपापल्या सोयीपुरता स्त्रीवाद का मांडतात?

इरफान खान: त्याला जातानाही चमेलीचा सुगंध हवा होता!

लॉकडाऊनमधे पॉर्न पहातच आहात; तर त्याआधी हे वाचा

बायकांचा अकलेशी संबंध काय, असं म्हणणाऱ्यांना बबिता ताडेंची चपराक

0 Shares:
You May Also Like
संपूर्ण लेख

आदिपुरुष : नव्या पिढीचं नवं रामायण

दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा नव्या पिढीला रामायण नव्याने सांगू पाहतोय. या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा कित्येकांनी…
संपूर्ण लेख

सावधान… भारतावर आदळणारी वादळं वाढतायत!

किनाऱ्यावर आदळलेल्या भयंकर लाटांचे वीडियो तुम्हाला सोशल मीडियावर आले असतील. बिपरजॉय वादळ गुजरातकडे गेल्याचे मेसेजही तुम्हाला आले असतील.…
संपूर्ण लेख

हरवलेल्या कथेच्या शोधात : साध्या शब्दांत उग्र वास्तव मांडणारा कथासंग्रह

लेखक सीताराम सावंत यांचा ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा नवा कथासंग्रह गावातलं समाजवास्तव नव्याने सांगू पाहतोय. रयत शिक्षण संस्थेत…
संपूर्ण लेख

महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई हीच क्रिकेटची खरी लवस्टोरी

तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकला. त्याची एक झलक पाहण्यासाठी आजही तरुणाई अक्षरश: आपला जीव ओवाळून टाकते.…
संपूर्ण लेख

करियर करणाऱ्या पोरींसाठी एग फ्रीजिंग ठरतंय वरदान

अभिनेत्री प्रियांका चोप्राने मध्यंतरी आपण वयाच्या तिशीमधे एग फ्रीजिंग केल्याचा खुलासा केला होता. सुपरस्टार रामचरण आणि उद्योजिका असणारी…
संपूर्ण लेख

‘फायर इन द माऊंटन्स’ : सरकारी आश्वासनांचा फसलेला रोडमॅप

सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच ‘फायर इन द माऊंटन्स’ हा नवा सिनेमा रिलीज झालाय. वरवर पाहता, या…