महाराष्ट्रातल्या मुसलमानांनी मराठीतून कुराण वाचायला हवं

सध्या पवित्र रमजान सुरु आहे. महाराष्ट्रातल्या अनेक गावाशहरात रोषणाईचा माहोल असून इफ्तारच्या पाककृतींचा घमघमाट पसरलाय. रमजान हा ज्ञानाचा आणि स्वतःला परमेश्वराच्या जवळ नेण्याचा महिना आहे. त्यासाठी आपण मातृभाषेतून कुराण समजून घ्यायला हवं. महाराष्ट्रातल्या मुसलमानांनी प्रार्थना करताना मराठीचा आग्रह धरायला हवा, असा आशय मांडणारी पैगंबर शेख यांची फेसबुक पोस्ट.

रोजा इफ्तार झाल्यानंतर काल तरावीहची म्हणजे निवांतपणे करावायची नमाज पठण करण्यासाठी मशिदीत गेलो होतो. त्यावेळी मशिदीत काल थोडं वेगळं चित्र दिसलं. मशिदीत एका ठिकाणी साधारण शंभर एक पुस्तकांचा गठ्ठा मला दिसला. प्रत्येक दोन रकात म्हणजेच झुकून नमाज झाल्यानंतर माझं लक्ष त्या पुस्तकांकडे जात होतं. 

पुस्तकांच्या कडेने त्या पुस्तकांची भाषा ही उर्दू किंवा अरबी वाटत नव्हती. मी लांब असल्याने ते नीट दिसतही नव्हतं. मी माझ्या सोबत असलेल्यांना विचारलं, पुस्तकं कसली आहेत ही? ते म्हणाले, काय माहित! मी म्हणालो, वाचायला घेऊन जाता येतील एखाद-दोन. तेवढंच नवीन काहीतरी ज्ञान मिळेल. त्या पुस्तकांच्या निमित्ताने मौलानांशी साधलेल्या संवादातून माझ्या मराठीपणाचा मला नव्याने शोध लागला.

महाराष्ट्रातल्या मशिदीत मराठी बयान

तरावीहची नमाज झाल्यानंतर मी त्या पुस्तकांकडे गेलो. बाजूलाच मौलाना बसलेले होते. मी म्हणालो, पुस्तकं कोणाची आहेत? मौलाना म्हणाले, माझीच आहेत. मी मागवून घेतलीत ही पुस्तकं. मी म्हणालो, कुठल्या भाषेत आहेत ही? ते म्हणाले बंगाली भाषेत आहेत. वर अरबी किंवा उर्दूमधे लिहिलंय आणि खाली बंगाली भाषेत. मी मौलनांना विचारलं, तुम्ही कुठून आलाय? ते म्हणाले, मी आसामचा आहे. 

मौलाना साहेबांनी साधारण १०० पेक्षाही जास्त पुस्तकं बंगाली भाषेत मागवली होती. मी म्हणालो, तिकडे मशिदीत मुसलमान कुठल्या भाषेत बोलतात? मौलाना म्हणाले, म्हणजे? मी म्हणालो, आणि तुम्ही आणि मी जसं इथं बसून हिंदीत बोलतोय तसं आसाममधे मशिदीत तिकडचे मुसलमान कुठल्या भाषेत बोलतात? मौलाना म्हणाले, ते आसामी आणि बंगाली अशी मिक्स असलेली भाषा बोलतात. 

मी म्हणालो, हिंदी बोलतात का? मौलाना म्हणाले, नाही हिंदी बोलत नाहीत. बयान म्हणजे प्रवचनही आसामी आणि बंगाली भाषेतच दिलं जातं. पण हिंदी बोलायला येते. मौलाना असं बोलताना थोडे ऑकवर्ड झाले. मी म्हणालो, माझा विषय तो नाही. येतो म्हणालो आणि निघालो. मशिदीत बयानही बंगाली आणि आसामी भाषेत दिलं जातं याचं मला जरा जास्तच कौतुक वाटलं. 

कारण मी मागेच काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या मशिदीतून येणाऱ्या बयानाचा आवाज मराठीत असावा असे विचार मांडले होते. त्यावर मी आज अजून जास्त ठाम झालो. असाच प्रकार मी अजमेरलाही पाहिला होता तिकडे अकबरी मशिदीत मला राजस्थानी आणि गुजराती भाषेमधले हादिस पाहायला मिळाले होते. 

हेही वाचा: तुमचं जळकं हिंदुराष्ट्र नको, असं प्रबोधनकारांचा वारसदार का म्हणतोय?

मराठी मुसलमानांवर उत्तरेचा प्रभाव

आपल्या महाराष्ट्रात मात्र मुसलमानांना मशिदीत मराठी बोलायची मात्र लाज वाटते. नसेल वाटत तर सांगा. मलाही पहायचंय कोण मुसलमान आणि किती मुसलमान मशिदीत मराठी बोलतात ते. जे बोलत नाहीत त्यांनी त्यांच्या न बोलण्याची कारणंही सांगावीत. तुरळक काही मुसलमान सोडले तर बहुतांश मुसलमान मराठी त्यांची भाषाच नाही असं समजतात. 

अगदी काही वर्षांपूर्वी मला मराठी बोलल्यावर ‘क्या हिंदू के जैसे बात करता’ असं म्हणणारे मुसलमानही मी पाहिलेत. मला उलट त्या आसामच्या मौलानाचं कौतुक वाटलं जो इथं येऊनही आपली भाषा सोडत नाही. माझी मातृभाषा असलेल्या मराठीवर प्रेम करण्यासाठी मला आता अजून एक कारण मिळालं.

एक महत्वाची गोष्ट सांगतो. उत्तर प्रदेश केंद्रित राजकारण महाराष्ट्रात झालं असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा उत्तर प्रदेशीय धार्मिक हस्तक्षेपामुळे इथल्या मराठी संस्कृतीत वाढलेल्या मुसलमानांवर उत्तर भारतीय सांस्कृतिक अतिक्रमणही तेवढेच झालं. हे काय एक दोन दिवसात घडलेलं नाही तर हे दोन तीन दशकांपासून सुरु आहे. 

बहुतांश मशिदीत असलेले उत्तर भारतीय मौलाना हे याचं जिवंत उदाहरण आहेत. ज्यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि भाषेचा थोडाही गंध नाही. यामुळे मराठी मुसलमानांनी त्यांची मूळ भाषा मराठी आणि इथली संस्कृती हळूहळू सोडली हे अतिशय खेदाने सांगावं लागतंय. यावर आत्मपरीक्षण करणं आणि स्वतःमधे बदल घडवणं गरजेचं आहे.

भाषेची बंधने झुगारणारा इस्लाम

फक्त स्वतःला मराठी मुसलमान म्हणून चालत नाही. मराठी भाषा आपल्या केंद्र स्थळांवर कुठलाही संकोच न बाळगता वापरायला सुरवात कराल तोच खरा आनंदाचा दिवस राहील. मी माझ्या जीवनात जेव्हा कुराण वाचलंय तेव्हा ते कायमच मराठीतून वाचत आलोय. इथं मला पवित्र कुराणातलं एक वचन सांगायला आवडेल.

सुरह : ४१, आयात- ४४ सांगते, ‘जर आम्ही याला अरबीशिवाय इतर भाषेचा कुराण बनवून पाठवलं असतं तर हे लोक म्हणाले असते, याची वचने स्पष्ट करून का सांगितली गेली नाहीत? काय अजब गोष्ट आहे की वाणी तर अरबेतर आणि श्रोता अरबी.’

इस्लाम भाषेची बंधने झुगारतो यासाठी ही एक आयात सर्वांना आयुष्यभर आणि जगाच्या अंतापर्यंत पुरेशी आहे. अल्लाहची अल्लाहने पेटंट करून ठेवलेली विशेष अशी जगात कुठलीही भाषा नाही. अरबीही नाही. जगातल्या सर्व भाषा अल्लाहच्या आहेत आणि अल्लाह सर्व भाषांचा ज्ञानी आहे. तसं नसेल तर कृपया सांगायला हवं.

हेही वाचा: बेगमपूर : संत रविदासांचं दु:ख नसलेलं शहर (भाग २)

मी मराठीतच कुराण वाचतो कारण…

 जसे मराठी भाषेचे विविध प्रकार आहेत तसे अरबी भाषेचेही आहेत. जगात कुठलीही भाषा एका फॉर्ममधे नसते. अगदी इंग्रजीतही अमेरिकन आणि ब्रिटीश हे दोन भेद आहेत. अरबी भाषा ही अरब देशात इसवी सन पूर्व ६०० वर्षे आधीपासूनच वापरली जात होती. पैगंबर साहेबांच्या आधीपासूनच अरबी लोक अरबी भाषेत काव्य लिहायचे. 

माझी यंदा कुराण वाचण्याची ही सातवी वेळ. यंदा साधारण २०० पेक्षाही जास्त नोट्स कुराणमधून काढल्या. याआधी पण ज्या ज्या वेळी कुराण वाचलं त्या त्या वेळी नोट्स काढल्या गेल्या आहेतच. ज्याचा फायदा सुधारणावादी चळवळीसाठी झाला. इंशा अल्लाह पुढेही याचसाठी फायदा होईल. 

अल्लाहला माझी नियत खूप चांगली माहीत आहे. त्यामुळे जगातल्या कुठल्याही मुसलमानासमोर स्वतःला सिद्ध करत बसणं म्हणजे स्वतःचा अमूल्य वेळ वाया घालवणं असं मला आता वाटतं. त्यासाठी मला कुराणातलं पुढचं वचन मार्गदर्शक वाटतं.

सुरह -१०, आयात – ४१ सांगते, ‘माझे कार्य माझ्यासाठी आहेत आणि तुमचं कर्म तुमच्यासाठी. जे काही मी करतो त्याच्या जबाबदारीतून तुम्ही मुक्त आहात आणि जे काही तुम्ही करत आहात त्याच्या जबाबदारीतून मी मुक्त आहे.’

सर्वसामान्यांना कुराण कळायला हवं

एखाद्या सामान्य व्यक्तीला, मग तो मुसलमान असो की मुसलमानेतर, ज्याला कोणाला तुम्ही कुराण वाचायला देता, तेव्हा सामान्यतः पहिल्यांदा ते त्याच्या डोक्यावरूनच जाईल. ज्या काही नैतिकतेच्या गोष्टी आहेत त्या पचनी पडायला वेळ लागत नाही. कारण त्या एका वाक्यात असल्याने लगेच समजून येतात.

कुराणातल्या काही आयात मात्र त्या जागी नक्की का आल्या आहेत? त्याची पार्श्वभूमी काय? हे समाजयला बराच वेळ जातो. वेळ त्याची चिकित्सा करण्यासाठी जातो. फक्त वेळ घालवूनही फायदा नाही. व्यवस्थित पध्दतीने चिकित्सा करणं महत्वाचं. त्यासाठी कुराण मातृभाषेतून वाचल्यास ते समजण्यास अधिक फायदा होतो.

हेही वाचा: मराठी गरबा का बंद झाला?

अरब इतिहासाशिवाय इस्लाम कळणार नाही

मुळात कुराण वाचण्याआधी मक्का शहराचा आणि अरबचा इतिहास समजून घेणं गरजेचं आहे. हादिस आणि अरबचा इतिहास या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आखाती देश आणि त्यांच्या आजूबाजूच्या देशांच्या इतिहासाच्या बहुतांश अवतीभवती कुराण भाष्य करतं. पैगंबर मोहम्मद स. यांच्या पूर्वी या भागातली परिस्थिती आणि त्यांच्या नंतरची परिस्थिती या गोष्टी समजल्या की अरबमधे इस्लामिक क्रांती नक्की का झाली? हे समजतं.

पण त्याकाळात झालेली प्रत्येकच गोष्ट या काळात क्रांती असेल असं नाही. कारण काळाप्रमाणे क्रांतीच्या व्याख्या बदलतात. ज्याला १४०० वर्षांपूर्वी आपण क्रांती म्हणतो त्यातले काही विचार हे आता कालबाह्य झालेले असतात. हे सत्य स्वीकारणं म्हणजेच खरं तर पैगंबर मोहम्मद स. यांच्या पावलावर पाऊल ठेवणं होय.

अरबच्या संस्कृती, चालीरीती, त्यांचे आधीचे पोशाख, इस्लाम स्वीकारल्यानंतरचे पोशाख, त्यांची आधीची प्रार्थना पद्धत, इस्लाम आल्यानंतरची प्रार्थना पध्दत, अरब लोकांचं एकमेकांशी वागणं, स्त्रियांशी त्यांचं वागणं, या सर्व अभ्यास करण्याच्या गोष्टी आहेत. मग इस्लाम अधिक सोपा होतो आणि सुधारणेसाठी निर्माण झालेली स्पेस आपोआप आपल्याला दिसून येते. 

स्वतः ज्ञानी बनणं हाच मार्ग

हे सर्व करण्यासाठी आधी परिपूर्णतेच्या मानसिकतेतून बाहेर निघावं लागतं. मला चांगलं आठवतंय, ज्यावेळी मी कुराण दोन ते तीन वेळा वाचलं होतं, त्यावेळी मी बऱ्याच जणांना म्हणत होतो, ‘कुराणातली एक गोष्ट दाखवा जी या काळात लागू होत नाही.’

पण जसजसा अभ्यास वाढला तसतसं मी स्वतः, आता कुराणातल्या बऱ्याच गोष्टी या कालबाह्य आहेत. ज्याचा या काळाशी काहीही संबंध नाही आणि परिस्थिती बदलल्याने काही आयत आता लागूही होत नाही, हे ठामपणे सांगतो. इंशा अल्लाह पुढेही या सांगण्यात आणखी ठळकपणा येईल. कारण दृष्टिकोन दिवसेंदिवस आणखीन बदलत चाललाय. इंशा अल्लाह हळूहळू एकेक गोष्ट समोर आणत राहील.

तूर्तास कुठलीही नवीन गोष्ट हराम या मानसिकतेतून बाहेर निघायला हवं, एवढंच मला कळतं. ज्या सीमारेषा धर्मांधांनी स्वतःची मक्तेदारी समाजावर बनून रहावी, म्हणून मुसलमानांसाठी बनवल्या त्या तोडायला हव्यात. आपले मेंदू कोणाकडे गहाण ठेवण्यापेक्षा स्वतः ज्ञानी बना. एवढं कळलं तरी खूप काही कळेल.

हेही वाचा: 

वो सुबह कभी तो आयेगी!

पेशवाईला वंदा किंवा निंदा, त्याआधी हे वाचा

खुळी न जनता फसेल आता, पुरे करा हे ढोंग!

पुन्हा कुणी लिहिल का एखादी संवेदना जागवणारी प्रार्थना?

0 Shares:
You May Also Like
amphibians endangered
संपूर्ण लेख

उभयचर नष्ट होताहेत, उरलेल्या जीवसृष्टीवरही धोक्याची घंटा!

जगप्रसिद्ध ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान…
संपूर्ण लेख

‘लिव्ह इन’ की ‘लग्न’ यावर उत्तर कसं शोधणार?

‘लिव्ह इन’ अर्थात लग्नाशिवाय शारीरिक संबंधात राहण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या…
संपूर्ण लेख

सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य उलगणारा ‘बेन्नू’तील खजिना

पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘नासा’नं २०१६ मधे यान पाठवलं होतं. ते यान या लघुग्रहावजवळ…
संपूर्ण लेख

लॅटिन अमेरिका ही पर्यावरणपुरक जगासाठी नवी अर्थशक्ती

लॅटिन अमेरिकेत,  दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ३३ देशांचा समावेश होतो. लॅटिन हे नाव सर्वप्रथम फ्रान्सचे सर्वेसर्वा असलेल्या तिसऱ्या…
संपूर्ण लेख

फक्त ८० रुपयात ‘लिज्जत’ हा ब्रँड घडविणाऱ्या आज्जी गेल्या

ही गोष्ट आहे, १९५९ मधली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो भारावलेला काळ होता. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू देशाची नवी…
संपूर्ण लेख

सत्यशोधक पत्रकारितेचे विस्मृतीत गेलेले अतुलनीय योगदान

एकोणिसाव्या शतकातील नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा आणि आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले…