अल्लू अर्जुन : साडी, खाकी आणि खादीतही स्टाईल मारणारा हिरो

सध्या भारतभर ‘पुष्पा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अल्लू अर्जुनचा आज वाढदिवस. यावर्षी त्याचा ‘पुष्पा : द रूल’ रिलीज होतोय. कालच त्याने या सिनेमातला त्याचा एक साडी नेसलेला फोटो टाकला. हा फोटो प्रचंड वायरलही झाला. आपल्या अंगावर साडी असो, खाकी असो किंवा खादी, अल्लू अर्जुन कायम एक स्टायलिश स्टार म्हणूनच ओळखला जातो.

कालीमातेला शोभाव्या अशा निळ्या रंगात रंगवलेलं शरीर. गळ्यात टपोऱ्या लिंबाची माळ. लाल काठपदराची निळी साडी. दोन्ही हातात मिळून दोन डझनभर बांगड्या. कानाच्या झुमक्यांपासून बाजूबंदांपर्यंतच्या दागिन्यांचा भरभक्कम साज, नव्या नवरीसारखं मळवट भरलेलं कपाळ, उंचवलेल्या उजव्या खांद्यावर बांधलेलं बाशिंग आणि डाव्या हातात पिस्तुल घेऊन ‘तो’ शेवटी अवतरला. तो. पुष्पाराज.

२०२१च्या डिसेंबरमधे भारतभर रिलीज झालेल्या ‘पुष्पा : द राईज’ या तेलुगू सिनेमाने दक्षिणेकडून उत्तरेकडे झेपावू पाहणाऱ्या सिनेमांना आत्मविश्वास दिला. त्यानंतर तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड सिनेमांनी २०२२चं अख्खं वर्ष गाजवलं. याच ‘पुष्पा’चा दुसरा भाग म्हणजेच ‘पुष्पा : द रूल’ यावर्षी रिलीज होतोय. या सिनेमात पुष्पाराज या चंदन माफियाची मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या अल्लू अर्जुनने काल आपला या सिनेमातला आगळावेगळा लूक सोशल मीडियावर जाहीर केला.

तेलुगू सिनेसृष्टीतल्या आघाडीच्या नायकांपैकी एक असलेल्या अर्जुनला ‘स्टायलिश स्टार’ म्हणूनही ओळखलं जातं. त्याने कसलीही केशभूषा, वेशभूषा केली तरी तो स्टायलिशच दिसतो. हा साडीतला अर्जुनही तितकाच स्टायलिश आहे, जितका स्टायलिश ‘पुष्पा’च्या पहिल्या भागातला अस्ताव्यस्त दाढी वाढवलेला, मळकट कपड्यातला पक्का गावठी अर्जुन होता.

हेही वाचा: जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा

भरभक्कम घराणेशाहीचा बंदा रुपया

अर्जुनचा जन्म ८ एप्रिल १९८२चा. त्याचे वडील अल्लू अरविंद हे तेलुगू सिनेसृष्टीतले प्रख्यात निर्माते. त्याचे आजोबा आणि तेलुगू सिनेसृष्टीतले दिग्गज विनोदी अभिनेते पद्मश्री अल्लू रामलिंगैय्या यांची मुलगी सुरेखा हिचं लग्न १९८०मधे मेगास्टार चिरंजीवीसोबत झालं आणि अल्लू-कोनिदेला कुटुंबाचे ऋणानुबंध कायमचे जुळले.

तेलुगू सिनेसृष्टीतली घराणेशाही आणि वशिलाबाजी ही बॉलीवूडलाही लाजवेल इतकी मजबूत आहे. अल्लू अर्जुनही याच घराणेशाहीचं एक प्रोडक्ट आहे. त्याचं अल्लू-कोनिदेला हे कुटुंब तेलुगू सिनेसृष्टीत ‘मेगा फॅमिली’ म्हणून ओळखलं जातं. तेलुगू सिनेसृष्टीतल्या सर्वाधिक प्रभावी कुटुंबांपैकी हे एक कुटुंब आहे. त्यामुळे या तेलुगू सिनेसृष्टीत अर्जुनला कसलाही संघर्ष करावा लागला नाही, असं वाटणं साहजिकच आहे.

पण प्रत्यक्षात इतर स्टारकिडप्रमाणेच अर्जुनलाही भरमसाठ अपेक्षांचं ओझं अगदी आजही आपल्या खांद्यावर वाहून न्यावं लागतं. अर्जुनला चांगल्या भूमिका मिळण्यामागे त्याच्या घराणेशाहीचा वाटा मोठा असला तरी, त्या टिकवण्यासाठी त्याने घेतलेली मेहनत नक्कीच कौतुकास्पद आहे. कारण इतकं मोठं पाठबळ असूनही त्याचा सख्खा भाऊ अल्लू शिरीष हा तेलुगू अभिनेता अजूनही अपेक्षित यश मिळवण्यासाठी झगडताना दिसून येतो.

चिरंजीवीचा मुलगा आणि अर्जुनचा मामेभाऊ रामचरण तेजा हाही सध्याच्या काळातला एक लोकप्रिय अभिनेता असला तरी अल्लू अर्जुनइतकी स्वतःची अशी वेगळी ओळख आणि विशेष क्रेझ त्याला अजून निर्माण करता आलेली नाही. त्यामुळे अल्लू-कोनिदेला कुटुंबातल्या आपल्या इतर भावंडांच्या तुलनेत अर्जुन खऱ्या अर्थाने एक बंदा रुपया ठरतो.

लक्षात राहणाऱ्या नावांचा नायक

अर्जुनच्या बहुतांशी सिनेमांना हिंदीत डब करण्यात आलंय. महाराष्ट्राच्या दक्षिण आणि आग्नेय बाजूच्या सीमाभागातल्या गावांमधे तेलुगू सिनेमांचाही खास असा प्रेक्षकवर्ग आहे. सुकुमार दिग्दर्शित ‘आर्या की प्रेमप्रतिज्ञा’ आणि ‘आर्या २’ या सिनेमांनी अर्जुनची लोकप्रियता प्रचंड वाढवली. हे दोन्ही चित्रपट अर्जुन आणि त्याच्या चाहत्यांच्या काळजात घट्ट रुतून बसलेत. आर्याची एक गाजलेली धून कित्येकांच्या फोनची रिंगटोन होती, आहे नि असेलही!

‘आर्या’ने अर्जुनला सर्वोत्कृष्ट तेलुगू अभिनेता म्हणून त्याचा पहिला फिल्फेअर पुरस्कार मिळवून दिला. हा सिनेमा इतका गाजला की अर्जुनला आजही कित्येकजण आर्या नावानेच ओळखतात. त्याचबरोबर तो बनी, बद्री, डीजे, लकी, सूर्या अशा वेगवेगळ्या नावांनीही ओळखला जातो. ही सगळी त्याच्याच गाजलेल्या सिनेमातली नावं. आता यात भर पडलीय ती ‘पुष्पा’ या नावाची आणि योगायोग म्हणजे हा सिनेमाही सुकुमारच दिग्दर्शित करतोय.

हेही वाचा: मनातला रावण काढायची ‘ऊर्मी’ देणारा स्वदेस

तो नाचतो आणि नाचवतोही!

अर्जुनचं आणखी एक बलस्थान म्हणजे त्याचा डान्स! भारतातल्या उत्तम नाचू शकणाऱ्या हिरोंपैकी तो एक आहे. ही इज अ बॉर्न डान्सर. निव्वळ अफलातून डान्स स्टेप्स असतात त्याच्या. गाणं कुठलंही असो, हा भिडू आपल्या स्टेप्सनी ते गाणं अजरामर करून टाकतो. तो गावातल्या उत्सवात, मंदिरात, गाड्यांवर, क्लबमध्ये, रस्त्यावर कुठेही नाचू शकतो, अगदी बिनधास्त!

२००४ला ‘आर्या’ रिलीज झाला होता तेव्हा त्यातलं ‘आ आंटे अमलापुरम’ जबरदस्त हिट झालं होतं. महाराष्ट्रात अर्जुनला खरं तर याच गाण्यामुळे लोक ओळखू लागले. त्यानंतर आलेली ‘बन्नी बन्नी’ आणि ‘रिंगा रिंगा’ ही गाणीही हमखास गणेशोत्सवात, दहीहंडीला नि वरातीला वाजवली जातात.

या बेफाम नृत्याबरोबरच अर्जुन ज्या प्रकारे त्याचा राग व्यक्त करतो करतो ते एकमेवाद्वितीय आहे. रागात असलेल्या अर्जुनचा ऍटीट्युड कमाल असतो. हा ऍटीट्युड अनुभवण्यासाठी ‘पुष्पा’मध्ये भंवरसिंगला धडा शिकवल्यानंतर त्याने त्याच्या लग्नात घेतलेली एंट्रीच पुरेशी आहे.

त्याचा तो गोड, प्रेमळ वाटणारा चेहरा अशावेळी एकाएकी कणखर होतो, आवाजाला धार येते आणि कायम मिश्कील वाटणाऱ्या डोळ्यांत नुसती आग दिसू लागते. कधी अचानक निर्विकारपणे, थंड डोक्याने मारामारी करणं असो किंवा सर्व राग एकवटून तो आजूबाजूच्या तोडफोडीतून दाखवणं असो, हे तो एकटाच करू जाणे. बिलकुल छोटा अँग्री यंग मॅनच जणू!

खराखुरा स्टायलिश स्टार

अर्जुनचा फॅशन सेन्स आणि स्टाईल अतिशय जबरदस्त आहे. त्याचे कितीतरी वेगवेगळे लूक आहेत. एकाची कॉपी करायला जावं तर गडी दुसऱ्या सिनेमात अगदी नवा लूक घेऊन हजर होतो. ‘द डेंजरस खिलाडी’मधला चेक्सचा शर्ट घालून फिरणारा मध्यमवर्गीय रवी कुठे आणि अंगावर लेदर जॅकेट घालून ‘द डेंजरस खिलाडी २’मधे स्पेनच्या रस्त्यावर गिटार वाजवत फिरणारा संजू कुठे.

‘रुद्रम्मादेवी’मधे गोना गन्ना रेड्डी हा योद्धा, ‘संघर्ष और विजय’मधे बद्रीनाथ नावाचा रक्षक आणि ‘डीजे’मधे कधी देवळाचा पुजारी, कधी अंडरकवर ऑफिसर तर कधी फॅशन डिझायनर साकारणाऱ्या अर्जुनच्या या सगळ्या लूकमधेही प्रचंड तफावत आहे. आर्या २ मधला त्याचा ‘मिस्टर परफेक्ट’ हा ऑफिस लूक आजही कित्येकांचा ड्रीम लूक आहे. ‘एक और रक्षक’मधला त्याचा नवरदेवाचा लूकही एकदम डॅशिंग आहे.

‘लकी द रेसर’, ‘अंतिम फैसला’, ‘बनी द हिरो’मधले थोडे रावडी लूक एकीकडे आणि ‘सर्रायनोडू’, ‘येवडू’, ‘सन ऑफ सत्यमूर्ती’ आणि ‘सूर्या द सोल्जर’मधले थोडे फॉर्मल वाटणारे लूक्स एकीकडे. आता सुकुमारच्या ‘पुष्पा’तल्या साध्या, गावठी, मळकट आणि नॉन-ग्लॅमरस लूकलाही अल्लूच्या चेहऱ्याने भारी ग्लॅमर चढलंय. त्याने ‘पुष्पा’साठी साडी घातली. ‘सर्रायनोडू’त खादी घालून नाचला. ‘लकी द रेसर’मधे पोलीस तर ‘सूर्या द सोल्जर’मधे सैनिक साकारला.

पण कितीही वेशभूषा, केशभूषा आणि रंगभूषा बदलल्या तरी त्याच्या दिसण्यातली आणि वागण्याबोलण्यातली स्टाईल तसूभरही ओसरली नाही. उलट प्रत्येक सिनेमागणिक ती आणखीनच बहारदार होत गेलीय. त्यामुळेच मेगा, पॉवर, रिबेल, नॅचरल, राऊडी अशा वेगवेगळ्या बिरुदावल्या मिरवणाऱ्या स्टारमंडळींचा भरणा असलेल्या तेलुगू सिनेसृष्टीत आज अर्जुनच्या नावापुढे ‘स्टायलिश स्टार’ हे बिरूद अभिमानाने झळकतंय!

हेही वाचा: 

जुन्या इफ्फीच्या ताज्या आठवणी

सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट? 

ऋषी कपूर : ‘ढाई किलो’च्या हाताखाली दबला गेलेला हिरो

नागराज मंजुळेंनी आरएसएसच्या शाखेत जाणं का थांबवलं?

0 Shares:
You May Also Like
संपूर्ण लेख

आदिपुरुष : नव्या पिढीचं नवं रामायण

दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा नव्या पिढीला रामायण नव्याने सांगू पाहतोय. या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा कित्येकांनी…
संपूर्ण लेख

सावधान… भारतावर आदळणारी वादळं वाढतायत!

किनाऱ्यावर आदळलेल्या भयंकर लाटांचे वीडियो तुम्हाला सोशल मीडियावर आले असतील. बिपरजॉय वादळ गुजरातकडे गेल्याचे मेसेजही तुम्हाला आले असतील.…
संपूर्ण लेख

हरवलेल्या कथेच्या शोधात : साध्या शब्दांत उग्र वास्तव मांडणारा कथासंग्रह

लेखक सीताराम सावंत यांचा ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा नवा कथासंग्रह गावातलं समाजवास्तव नव्याने सांगू पाहतोय. रयत शिक्षण संस्थेत…
संपूर्ण लेख

महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई हीच क्रिकेटची खरी लवस्टोरी

तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकला. त्याची एक झलक पाहण्यासाठी आजही तरुणाई अक्षरश: आपला जीव ओवाळून टाकते.…
संपूर्ण लेख

करियर करणाऱ्या पोरींसाठी एग फ्रीजिंग ठरतंय वरदान

अभिनेत्री प्रियांका चोप्राने मध्यंतरी आपण वयाच्या तिशीमधे एग फ्रीजिंग केल्याचा खुलासा केला होता. सुपरस्टार रामचरण आणि उद्योजिका असणारी…
संपूर्ण लेख

‘फायर इन द माऊंटन्स’ : सरकारी आश्वासनांचा फसलेला रोडमॅप

सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच ‘फायर इन द माऊंटन्स’ हा नवा सिनेमा रिलीज झालाय. वरवर पाहता, या…