सलीम दुराणी : रूपाइतकंच देखणं क्रिकेट खेळणारा एक शापित यक्ष

सलीम दुराणी आपल्या देखण्या रूपानं आणि बहारदार खेळीनं रसिकांना रिझवत राहिले. प्रेक्षकांच्या आग्रहावरून सिक्सर मारणाऱ्या दुराणींचं क्रिकेट १९७८मधे संपलं. प्रतिभावंतांना मनस्वी जगण्याचा, तसं आयुष्य व्यतित करताना लौकिक जगाचा विचार न करण्याचा शाप असतो. दुराणी त्याला अपवाद नव्हते. नुकतंच रोजी त्यांचं निधन झालं. या शापित गंधर्वाला आदरांजली वाहणारा हा लेख.

सलीम दुराणी हा एक शापित यक्ष होता. फिरकी बॉलींगमधे वाकबगार असणार्‍या दुराणींची बॅटींगही दणकेबाज होती. क्रिकेटचा मनमुराद आनंद घ्यावा आणि त्यामधे प्रेक्षकांनाही सामील करून घ्यावं, असा त्यांचा एकंदर खाक्या होता.

हेही वाचा: कमीत कमी सोयीसुविधा, तरीही अपंगाच्या भारतीय क्रिकेट टीमचं मोठं यश

मोठी संधीच मिळाली नाही

खेळ हा आनंद घेण्यासाठी आणि देण्यासाठी खेळला पाहिजे, अशी त्यांची एकंदर वृत्ती होती. त्याप्रमाणंच ते कायम खेळत राहिले. त्यामुळंच असेल, पण दुराणी हा एक अत्यंत मूडी खेळाडू आहे, अशी एक समजूत होती. ती दूर करण्यासाठी दुराणींनी कधीही प्रयत्न केले नाहीत.

कसोटी सामन्यात निवड झाल्यातंर मात्र आपल्याला जे काही करणं शक्य आहे, ते सर्व त्यांनी केलं. कधी अप्रतिम बॉलींग करून, तर कधी बहारदार बॅटींग करून त्यांनी आपल्यावर निवड समितीनं दाखविलेला विश्वास सार्थ केला.

दुर्दैवाची गोष्ट अशी की त्यांना हवी तितकी संधी मिळाली नाही. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांच्या दौर्‍यावर त्यांची कधीही निवड करण्यात आली नाही. पण त्याची खंतही दुराणींनी बाळगली नाही. त्याबद्दल कडवटपणानं ते कुणाशी काही बोलले नाहीत. हा त्यांचा फारच मोठा विशेष गुण होता.

देखणा गडी, अष्टपैलू खेळाडू

दुराणी ज्या काळात क्रिकेट खेळत होते, त्याकाळात अब्बास अली बेग, मन्सूर अली खान पतौडी, एम. एल. जयसिंह, फारुख इंजिनीअर असे अनेक देखणे आणि रुबाबदार खेळाडू भारतीय संघात होते. त्या सगळ्यांमधे दुराणी आपल्या अष्टपैलू खेळानं उठून दिसणारे होते.

१९७०-७१मधे कर्णधार अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतानं वेस्ट इंडिजचा दौरा केला होता. पहिली कसोटी अनिर्णित राहिली. दुसरी कसोटी भारतानं जिंकली. त्या विजयात दुराणींनी अमोल कामगिरी केली. आपल्या फिरकीनं क्लाइव लॉईड आणि गॅरी सोबर्स यांना त्यांनी बाद केलं.

विशेष म्हणजे ‘मी या दोघांना उद्या बाद करीन’, असं त्यांनी आदल्या दिवशीच्या संध्याकाळी कर्णधार अजित वाडेकर यांना सांगितलं होतं. बोलल्याप्रमाणे ते त्यांनी करून दाखवलं.

त्यावेळी दुराणींनी अप्रतिमच बॉलींग केली. १७पैकी आठ ओवर निर्धाव टाकत आणि २१ रन देत दोन महत्त्वाच्या खेळाडूंना बाद करण्याची किमया त्यांनी केली होती. भारताच्या ऐतिहासिक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण दुराणींच्या या कामगिरीचं स्मरण नंतर फारसं कुणी ठेवलं नाही.

हेही वाचा: लेडी सेहवाग शफालीचा सिक्सर पुरुषांनाही तोंडात बोट घालायला लावतो!

दुराणी नाही, तर कसोटी नाही!

वेस्ट इंडिजच्या पाठोपाठ भारतानं इंग्लंडचा दौरा केला. पण त्यावेळी दुराणींची संघात निवड झाली नाही. मात्र त्यानंतर इंग्लंड भारतात आल्यावर दुराणी दोन कसोटी सामन्यांमधे खेळले. दोन अर्धशतकं त्यांनी केली. प्रेक्षकांनी सिक्सरची मागणी करावी आणि दुराणींनी ती पूर्ण करावी, असा प्रकार त्यावेळी घडला. मात्र या दोन कसोटी सामन्यांमधलीली त्यांची निवड सहज झालेली नव्हती.

मुंबई कसोटी सामन्याच्या अगोदर ‘दुराणी नाही, तर कसोटी नाही’, असे फलक जागोजागी लागले. निवड समितीवर प्रचंड दबाव आला. दुराणींना संघात घेतलं गेलं. आणि त्यांनी दुराणी ही काय चीज आहे, ते पुन्हा एकदा दाखवून दिलं. पण ती कसोटी ही दुराणींची अखेरची कसोटी ठरली. त्यानंतर दुराणींचा विचार कसोटी सामन्यांसाठी कधीही करण्यात आला नाही.

बोलकी आकडेवारी

१९६० ते १९७३ अशा १३ वर्षांमधे २९ कसोटी सामने दुराणी खेळले. त्यामधे त्यांनी १२०४ रन केले आणि ७५ बॅट्समनना बाद केलं. आकडे हे पूर्ण सत्य सांगत नाहीत, हेच दुराणींच्या संदर्भातही दिसून येतं. दुराणी पहिली कसोटी खेळले, ते ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९६०ला.

त्यावेळी ब्रेबॉन स्टेडियमवर १०व्या क्रमांकावर बॅटींगला येत त्यांनी १८ रन केले. बॉलींगमधे ते काहीच करू शकले नाहीत, याचं कारण त्यांना एकच ओवर मिळाली. त्यानंतर इंग्लंडचा संघ भारताच्या दौर्‍यावर आला होता. या मालिकेवर दुराणींचीच छाप पडली. कलकत्त्यातल्या कसोटीत ४३ रन त्यांनी केलेच, पण सामन्यात ११३ रन देऊन त्यांनी एकंदर आठ बळी घेतले.

मद्रासमधल्या कसोटीत तर त्यांनी १०५ रन देऊन सहा बॅट्समनना बाद केलं, तर दुसर्‍या डावात ७२ रन देऊन चार बॅट्समनना बाद केलं. एकाच कसोटीत दहा बळी मिळविण्याचा पराक्रम त्यांनी केला. ही मालिका भारतानं २-० अशी जिंकली. त्या पाच कसोटी सामन्यांच्या मलिकेत दुराणींनी २७.०४च्या सरासरीनं २३ गडी बाद केले.

भारतानं १९६२मधे वेस्ट इंडिजचा दौरा केला. त्यावेळी दुराणींनी तिसर्‍या क्रमांकावर बॅटींग करत १०४ रन फटकावले, त्या वेस्ली हॉल, गीब्ज, सोबर्स यांच्या बॉलींगपुढे! हे दुराणींचं कसोटीमधलं एकमेव शतक. मात्र त्यांनी कसोटी सामन्यांमधे सात अर्धशतकं फटकावली, हे विसरून चालणार नाही.

हेही वाचा: कॉमेंट्रीटर असे अतिशहाण्यांसारखे का वागतात?

स्थानिक क्रिकेटमधेही जलवा

१९७३नंतर दुराणींना पुन्हा कसोटीत संधी मिळाली नाही. मात्र त्यामुळं नाउमेद न होता ते कांगा लीग, रणजी, दुलिप सामने खेळत राहिले. गुजरात, सौराष्ट्र आणि राजस्थान या संघांचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं. दुलिप कपच्या सामन्यांमधे ते मध्य विभागाकडून खेळत.

१९७२मधे दुलिप कपचा अंतिम सामना पश्चिम विभाग विरुद्ध मध्य विभाग असा झाला होता. पश्चिम विभागात त्यावेळी सुनिल गावसकर, अजित वाडेकर, दिलीप सरदेसाई, रामनाथ पारकर, एकनाथ सोलकर, पद्माकर शिवलकर यांच्यासारखे खेळाडू होते. पण तो सामना मध्य विभागानं जिंकला.

त्यामधे दुराणींचा सिंहाचा वाटा होता. पश्चिम विभागच्या पहिल्या डावात त्यांनी ३८ रनमधे तीन बॅट्समनना बाद केलं, तर दुसर्‍या डावात ४४ रनमधे सहा गडी बाद केले. बॅटींग करताना पहिल्या डावात २० आणि दुसर्‍या डावात नाबाद ८३ रन करून त्यांनी मध्य विभागाला विजय मिळवून दिला.

रुपेरी पडद्यावरही दुराणी हिरोच!

दुराणी हे मनःपूतपणं वागणारे आणि खेळणारे होते. क्रिकेटवर त्यांचं मनापासून प्रेम होतं आणि त्याचा आनंद कसा घ्यायचा-द्यायचा हे त्यांना चांगलंच माहीत होतं. गॅरी सोबर्स आणि रोहन कन्हाय यांना दुराणींच्या गुणांची जाणीव होती. त्या दोघांशी त्यांचे उत्तम संबंध होते. भारतीय वंशाचे कन्हाय अनेकदा भारतात यायचे. आल्यानंतर ते आवर्जून दुराणींना भेटायचे.

मात्र दुराणींचं मैत्र क्रिकेटपटूंपुरतंच मर्यादित नव्हतं. देव आनंद, हेमंत कुमार, अशोक कुमार, मीना कुमारी, शिवाजी गणेशन, जेमिनी गणेशन यांच्याशीही त्यांची मैत्री होती. त्यांच्या देखणेपणामुळेच ‘चरित्र’ या हिंदी सिनेमात ते नायक म्हणून चमकले. नायिका होती, परवीन बाबी! सिनेकलाकार, गायक, उद्योगपती यांच्यापासून ते लहान दुकानदार असा त्यांचा मित्रपरिवार होता.

हेही वाचा: इंग्लंड जगजेत्ता आणि न्यूझीलंडला चौक्यांचा चकवा

प्रेक्षकांच्या आग्रहावरून सिक्सर

जे मिळालं, त्यावर ते समाधानी होते का? सांगता येत नाही. पण जे मिळालं नाही, त्याबद्दल त्यांचा कुणावरच राग नव्हता. रणजी आणि दुलिप कपमधे ते १९७६-७७ सालापर्यंत खेळत राहिले. त्या सामन्यांमधे १४ शतकं करत त्यांनी ८५४५ रन केले आणि ४८४ बळी मिळवले. कसोटी सामन्यांमधे संधी मिळत नाही, म्हणून स्थानिक क्रिकेटमधे खेळायचंच नाही, असं त्यांनी केलं नाही.

अगदी कांगा लीगमधेही ते मनापासून खेळत राहिले आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक गर्दी करत राहिले. त्यांच्या आग्रहावरून ते सिक्सर मारत राहिले. हे कसं साध्य करता? असा प्रश्न त्यांना एकदा विचारला होता. तेव्हा निगर्वी स्वभावाच्या दुराणींनी ती केवळ ‘बोलाफुलाला गाठ पडते’ असं सांगितलं!

दंतकथा बनले दुराणी

मूळचे अफगाणिस्तानचे असलेले दुराणी काबूलहून कराची आणि मग जामनागरला आले. फाळणीनंतर त्यांचे वडील पाकिस्तानमधे गेले, पण सलीम दुराणी भारतातच राहिले. भारतात आणि भारतासाठी खेळत राहिले. आपल्या देखण्या रूपानं आणि बहारदार बॅटींगनं, बॉलींगनं रसिकांना रिझवत राहिले. बघता बघता दुराणींचं क्रिकेट संपलं. मग त्यांच्या फटकेबाजीला आणि बॉलींगला दंतकथेचं स्वरूप येत गेलं.

अधिक संधी मिळाली असती आणि त्यांनी आपल्या मनःपूतपणाला आवर घातला असता, तर त्यांच्या हातून अधिक उत्तम कामगिरी झाली असती. तसे गुण त्यांच्याकडं होते. पण प्रतिभावंतांना मनस्वी जगण्याचा, तसं आयुष्य व्यतित करताना लौकिक जगाचा विचार न करण्याचा शाप असतो. दुराणी त्याला अपवाद नव्हते.

हेही वाचा: 

लेजंड धोनीचा अखेरचा ‘षटकार’

अपघाताने जन्माला आलेल्या वनडे क्रिकेटची आज पन्नाशी 

स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं

क्रिकेटच्या देवानेही विल्यम्सनला कॅप्टन म्हणून निवडलं, कारण

( साभार : बहार – पुढारी )

0 Shares:
You May Also Like
संपूर्ण लेख

आदिपुरुष : नव्या पिढीचं नवं रामायण

दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा नव्या पिढीला रामायण नव्याने सांगू पाहतोय. या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा कित्येकांनी…
संपूर्ण लेख

सावधान… भारतावर आदळणारी वादळं वाढतायत!

किनाऱ्यावर आदळलेल्या भयंकर लाटांचे वीडियो तुम्हाला सोशल मीडियावर आले असतील. बिपरजॉय वादळ गुजरातकडे गेल्याचे मेसेजही तुम्हाला आले असतील.…
संपूर्ण लेख

हरवलेल्या कथेच्या शोधात : साध्या शब्दांत उग्र वास्तव मांडणारा कथासंग्रह

लेखक सीताराम सावंत यांचा ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा नवा कथासंग्रह गावातलं समाजवास्तव नव्याने सांगू पाहतोय. रयत शिक्षण संस्थेत…
संपूर्ण लेख

महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई हीच क्रिकेटची खरी लवस्टोरी

तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकला. त्याची एक झलक पाहण्यासाठी आजही तरुणाई अक्षरश: आपला जीव ओवाळून टाकते.…
संपूर्ण लेख

करियर करणाऱ्या पोरींसाठी एग फ्रीजिंग ठरतंय वरदान

अभिनेत्री प्रियांका चोप्राने मध्यंतरी आपण वयाच्या तिशीमधे एग फ्रीजिंग केल्याचा खुलासा केला होता. सुपरस्टार रामचरण आणि उद्योजिका असणारी…
संपूर्ण लेख

‘फायर इन द माऊंटन्स’ : सरकारी आश्वासनांचा फसलेला रोडमॅप

सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच ‘फायर इन द माऊंटन्स’ हा नवा सिनेमा रिलीज झालाय. वरवर पाहता, या…