वेताळ टेकडी, आरे कारशेड आणि आपला ‘विकास’!

पुण्यातल्या वेताळ टेकडीच्या रक्षणासाठी पुण्यात जोरदार आंदोलन सुरु आहे. तिथं नियोजित असलेल्या रस्त्यासाठी टेकडी खोदून त्यातून बोगदे काढल्याने, होणारं पर्यावरणाचं नुकसान नागरिकांना मान्य नाही. असंच निसर्गाच्या रक्षाणासाठीचं आंदोलन गेले काही वर्ष मुंबईत आरेच्या जंगलात मेट्रोसाठी उभारल्या जाणाऱ्या कारशेडसाठी होतंय. शहरातले उरलीसुरले हिरवे तुकडेही उध्वस्त करून आपला विकास होईल?

एकीकडे पर्यावरणपूरक विकास, ग्रीन एनर्जी, हवामान बदल रोखण्यासाठीची सज्जता वगैरेच्या बाता मारायच्या आणि दुसरीकडे मोठमोठ्या विकासप्रकल्पासाठी पर्यावरणाचा विनाश करायचा, हे ढोंगी धोरण देशात गेली कित्येक दशके सुरु आहे. याविरोधात अनेक आंदोलनं झालीत. चिपको आंदोलन, अप्पिको आंदोलन, सायलेंट व्हॅली आंदोलन, नर्मदा बचाव आंदोलन अशी राष्ट्रीय पातळीवरची कितीतरी उदाहरणे देता येतील. 

नर्मदेतल्या सरदार सरोवराविरुद्धचं मेधा पाटकरांचं आंदोलन प्रचंड गाजलं आणि जगभरातील माध्यमांनीही उचलून धरलं. त्यातून विस्थापितांना न्याय मिळवून देण्याचं मोठ काम झालं खरं, पण अखेर अवाढव्य सरदार सरोवर उभं राहिलंच. तेवढंच नाही तर त्यावर सरदार पटेलांचा पुतळा उभारला गेला आणि तिथून बुडवलेली गावं पाहण्यासाठी आज हजारो लोक तिकीट काढून तिथं येतायत.

जोशीमठाला तडे गेले, महापूर आला, दुष्काळ पडला, गारपीट पडली, अवकाळी पाऊस पडला की सगळ्यांना पर्यावरण आठवतं. पण आज पुण्याच्या वेताळ टेकडी आंदोलनातल्या किंवा आरेच्या मेट्रो कारशेड विरोधातल्या पर्यावरणप्रेमींना शहरी नक्षल, विकासविरोधी वगैरे दूषणे लावली जातात. हे ढोंगी धोरण थांबवून, मुंबई-पुण्यातल्या या आंदोलनांची दखल गांभीर्यानं घेणं जीवनावश्यक आहे, हे आपण समजून घ्यायला हवंय.

वेताळ टेकडी आंदोलन काय आहे?

सर्वच बाजूंनी वाढत चाललेल्या पुणे शहरात वाहनेही मोठ्या प्रमाणात वाढतायत. त्यामुळे शहरातल्या अनेक रस्त्यावर कोंडी होते. त्यातली लॉ कॉलेज रोडवरची वाहतूक कोंडी मोकळी करण्यासाठी सेनापती बापट रोडवरच्या बालभारती ऑफिसपासून ते पौड फाटा जवळच्या केळेवाडी जंक्शन पर्यंतचा एक रस्ता बांधण्याचं नियोजन आहे. साधारणतः २५३ कोटींचा हा प्रकल्प आहे.

यातला जवळपास २.१ किलोमीटर लांबीचा रस्ता वेताळ टेकडी छेदून जाईल. त्यामुळे अर्थातच टेकडीवरच्या निसर्गाला हानी पोचेल. आधीच काँकिटचं जंगल आणि गाड्यांची बजबजपुरी बनलेल्या शहरात अशा निवांत जागा कमी उरल्या आहेत. त्याही आता उध्वस्त केल्या जाणार असल्याने शहरातले निसर्गप्रेमी नागरिक संघर्ष करतायत. या संघर्षाला मोठं लोकसमर्थन असल्याने सगळ्याच राजकारण्यांना यात उतरावं लागलंय.

हे आंदोलनही आजचं नाही. याआधी ऐंशीच्या दशकातही या रस्त्याचा प्रस्ताव आला होता. तेव्हाही नागरिकांनी याला विरोध करून प्रकल्प रोखला होता. १९८२ मध्ये लता श्रीखंडे, तारा वारियर, सुलभा ब्रह्मे या तीन महिलांच्या नेतृत्वाखाली वेताळ टेकडी वाचवण्यासाठी पहिलं आंदोलन झालं होते. त्यानंतर १९८७ मध्ये तत्कालीन राज्य सरकारने हा रस्ता विकास आराखड्यातून वगळला होता. आता पुन्हा हा प्रकल्प पुढे आलाय.

हेही वाचा: आरेत झाडं तोडण्याचं समर्थन आणि विरोध का होतोय?

वेताळ टेकडीवर पुणेकरांचा जीव का?

वेताळ टेकडी हा साधारणतः चार किलोमीटर परिसरात पसरलेला निसर्गसंपन्न डोंगर आहे. आज शहरीकरणाच्या गदारोळातही या टेकडीवर २३९ झाडे प्रकारची वेगवेगळी झाडे आणि वेली आहेत. ज्यात काही दुर्मीळ आणि याच भागात आढळणाऱ्या वनस्पती आहेत. या सगळ्यांचा अभ्यास झाला असून वनस्पतिशास्त्राचे अभ्यासक डॉ. सतीश फडके यांनी ‘फ्लोरा ऑफ वेताळ टेकडी’ हे पुस्तक प्रसिद्ध केलंय.

या टेकड्या म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगाचा एक भाग आहेत. त्यामुळे विविध पक्षी, स्थलांतरित पक्षी यांच्यासाठी या टेकड्या फार महत्त्वाची आश्रयस्थानं आहेत. प्राणी, पक्षी, किटक, फुलपाखरे अशा विविध प्रकराच्या नैसर्गिक संपत्तीचा अधिवास असलेल्या या टेकड्या शहराला ऑक्सिजन देणारी निसर्गव्यवस्थाही आहे. त्यामुळे या टेकड्या उजाड करून आपण आपलाच घात करतोय.

शहरातली हिरवळ कमी होत असताना, या रस्त्यामुळे हजारो झाडे तोडली जातील. तिथल्या पाण्याचे स्रोत नष्ट होतील. त्यामुळे टेकडीवरच्या परिसंस्थेला धोका उद्भवेल. दुसरं म्हणजे, पुण्यातल्या नागरिकांसाठी ही टेकडी आरोग्यदायी जागा आहे. इथं व्यायाम करण्यासाठी, चालण्यासाठी दररोज अनेक जण येतात. हे सगळं गमावून, ज्याचा धड अभ्यासही झालेला नाही असा रस्ता बांधायचा, हा चुकीचा निर्णय असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे.

आरे कारशेडचं काय झालं?

आज जसं वेताळ टेकडीचं आंदोलन माध्यमामध्ये दिसतंय, तसंच गेल्या काही महिन्यांपूर्वी मुंबईतल्या आरे कारशेडविरोधात आंदोलन पेटलं होतं. मेट्रो उभारण्यासाठी कारशेड लागणार होती. त्यासाठी आरेच्या जंगलातल्या ६५ एकर जागेवरची जवळपास दोन हजाराहून अधिक झाडे कापण्यासाठी नोटिसा लावल्या गेल्या. हे सगळं पाहून पर्यावरणप्रेमींनी आंदोलन छेडलं. 

मुळात ३३ एकर ठरलं असताना जवळपास दुप्पट जागा ताब्यात घेतली गेल्याची शंका पर्यावरणप्रेमी नागरिकांना आली. त्यामुळे आणखीच प्रकरण चिघळलं. सरकारी कार्यालयातल्या बैठका, कोर्टातले खटले आणि रस्यावर आणि सोशल मीडियावर पेटलेलं आंदोलन सरकारलाही अवघड जाऊ लागलं. ‘सेव आरे’ हा हॅशटॅग लोकप्रिय होत गेला आणि कोर्टानंही सप्टेंबर २०१९ मध्ये झाडं तोडण्याला नकार दिला.

पण लगेच पुढल्या महिन्यात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला कोर्टानं हिरवा सिग्नल दिला. त्याच महिन्यात रातोरात कारवाई झाली आणि झाडे तोडण्याला सुरवात झाली. हे कळताच पुन्हा लोक आरेमध्ये एकवटले, आंदोलन पेटलं आणि शेवटी लोकांचा विरोध पाहून वृक्षतोड स्थगित करण्यात आली. त्यानंतर सरकारच पडलं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांनी तातडीने कारशेडलाच स्थगिती दिली.

उद्धव ठाकरे यांनी ही कारशेड आरेऐवजी कांजुरमार्गला हलवण्यासाठी प्रयत्न केले. पण त्यानंतर कोरोना आला, मेट्रोची डेडलाइन कोलमडली आणि पुढे ठाकरे सरकारही पडलं. भाजपच्या साथीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी पुन्हा कारशेड आरेमध्ये नेण्याचं ठरवलं. अजूनही या प्रकरणी पुरेशी स्पष्टता नसून वृक्षतोडीचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

हेही वाचा: रात्रभर झाडांचे खून होत राहिले, रात्रभर जागणारी मुंबई झोपून राहिली

विकास हवा, पण पर्यावरण संपवून नको

मानवी उत्क्रांतीच्या इतिहासात माणसानं जमेल तेवढं निसर्गाशी जुळवून घेत तर कधी निसर्गाला आपल्या पद्धतीने वळवून घेत आपली उत्क्रांती साधलीय, असं दिसतं. पण औद्योगिकीकरणानंतर माणसानं निसर्गाशी जुळवून घेण्याऐवजी, मनाला येईल तसा निसर्गाचा ऱ्हास करायला सुरवात केली. आज हवामान बदल आणि नैसर्गिंक संकटाचं वाढतं प्रमाण यामुळे त्याचे परिणाम आपल्याला दिसू लागले आहेत.

एवढं सगळं होत असूनही जगभरातच माणसाला अद्याप शहाणपण येताना दिसत नाही. भारतात तर पर्यावरणाबद्दल कमालीची अनास्था असून, भांडवलशाहीने इथल्या राज्यव्यवस्थेवर मजबूत पकड मिळवलीय. त्यामुळे लगेच मिळणाऱ्या नफ्याच्या पुढे भविष्यातल्या पिढ्यांसाठी निसर्ग वगैरे गोष्टी तिथं गौण ठरतात. या सगळ्याचा मोठा परिणाम आपल्याला आणि पुढल्या पिढ्यांना भोगावा लागणार आहे.

विकास म्हणजे नक्की काय? हा एकच प्रश्न चिपको आंदोलनापासून मुंबई-पुण्यात होत असलेल्या आंदोलनामध्ये सातत्याने विचारला जातोय. फक्त मोठमोठे रस्ते, धूर ओकणाऱ्या गाड्या, काँक्रिटच्या आकाशाला भेदणाऱ्या इमारती आणि सतत धावत राहायला लावणारी जीवनशैली हाच विकास आहे का? या प्रश्नाचं उत्तर, एक देश म्हणून, माणूस म्हणून ठरवलं नाही तर ही सगळी आंदोलने विकासविरोधीच ठरणार आहेत.

कृती राहू दे, विचार तरी करणार का?

त्यामुळे आज वेताळ टेकडी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मुंबईत तर आजवर अशा अनेक टेकड्या जमीनदोस्त झाल्यात. या दोन्ही शहरातल्या नद्या या गटारापेक्षाही घाण झाल्यात. मुंबई-पुण्यातच नाही तर देशातल्या सर्वच शहरात कमीअधिक प्रमाणात हीच परिस्थिती आहे. या सगळ्या अनिर्बंध विकासानं आपण नक्की काय साधणार? याचा आपण आपल्यासाठी नाही, तर आपल्या मुलाबाळांसाठी तरी विचार करणार आहोत का?

आज जगभरात पर्यावरणपूरक जीवनशैली कशी प्रत्यक्षात आणता येईल, यावर संशोधन सुरु आहे. लोकसंख्या नियोजनापासून ते पाण्याच्या पुनर्वापरापर्यंत आणि मानवनिर्मित जंगलांपासून ते नैसर्गिक बांधकाम साहित्यापर्यंत अनेक विषयावर जगभर काम केलं जातंय. त्यासाठी अनेक प्रयोग होतायत. भारतातही अनेक संस्था हे प्रयोग प्रत्यक्ष आणून पाहतायत. पॉन्डेचेरीरीमधला ह्युमनस्केप हा असाच एक प्रकल्प आहे.

हे सगळे प्रयोग म्हणजे प्रत्यक्षात न आणता येणारी स्वप्नं आहेत, अशा टीका आजवर अनेकदा झाल्या आहेत. पण, जेव्हा जोशीमठासारख्या घटना घडतात किंवा चिपळूसारखं शहर पाण्याखाली जातं तेव्हा मात्र आपल्याला आपलं काहीतरी चुकतंय याची आठवण होते. आज शहरात राहणाऱ्या अनेकांना निसर्गाची ओढ लागलीय. ही ओढ आपल्याला पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे नेऊ शकेल. त्यासाठी आज एकदम कृती करता आली नाही, तरी त्या दिशेने विचार तर नक्कीच केला पाहिजे.

हेही वाचा: 

जंगलातून मेट्रो धावताना जंगल उरेलच कसं?

प्लॅस्टिकमुक्त भारताचं स्वप्न कसं शक्य होणार?

शुद्ध हवेसाठी, हॅशटॅग ‘शुद्ध हवा हक हमारा’ कॅम्पेन

‘आरे’ला कारे केल्याने मुंबईतली एक संस्कृती हरवणार आहे!

0 Shares:
You May Also Like
संपूर्ण लेख

आदिपुरुष : नव्या पिढीचं नवं रामायण

दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा नव्या पिढीला रामायण नव्याने सांगू पाहतोय. या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा कित्येकांनी…
संपूर्ण लेख

सावधान… भारतावर आदळणारी वादळं वाढतायत!

किनाऱ्यावर आदळलेल्या भयंकर लाटांचे वीडियो तुम्हाला सोशल मीडियावर आले असतील. बिपरजॉय वादळ गुजरातकडे गेल्याचे मेसेजही तुम्हाला आले असतील.…
संपूर्ण लेख

हरवलेल्या कथेच्या शोधात : साध्या शब्दांत उग्र वास्तव मांडणारा कथासंग्रह

लेखक सीताराम सावंत यांचा ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा नवा कथासंग्रह गावातलं समाजवास्तव नव्याने सांगू पाहतोय. रयत शिक्षण संस्थेत…
संपूर्ण लेख

महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई हीच क्रिकेटची खरी लवस्टोरी

तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकला. त्याची एक झलक पाहण्यासाठी आजही तरुणाई अक्षरश: आपला जीव ओवाळून टाकते.…
संपूर्ण लेख

करियर करणाऱ्या पोरींसाठी एग फ्रीजिंग ठरतंय वरदान

अभिनेत्री प्रियांका चोप्राने मध्यंतरी आपण वयाच्या तिशीमधे एग फ्रीजिंग केल्याचा खुलासा केला होता. सुपरस्टार रामचरण आणि उद्योजिका असणारी…
संपूर्ण लेख

‘फायर इन द माऊंटन्स’ : सरकारी आश्वासनांचा फसलेला रोडमॅप

सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच ‘फायर इन द माऊंटन्स’ हा नवा सिनेमा रिलीज झालाय. वरवर पाहता, या…