गेम खेळता खेळता आयुष्याचाच गेम का होऊ लागलाय?

मोबाईल तंत्रज्ञानाचा प्रसार-प्रचार वेगाने झाल्याचे अनेक फायदे समोर दिसत असले तरी या ऑनलाईन विश्वातल्या भुलभुलैय्याने अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्तही झालंय. जालन्यातील एका तरुणाने मॉस्ट बेट या भारतात बेकायदेशीर असलेल्या इंटरनेट गेमच्या चक्रात ४० लाख रुपये घालवल्याची घटना नुकतीच समोर आलीय. अशा फसव्या गेम्सच्या सापळ्यापासून तरुणांनी दूर राहणं गरजेचं आहे.

जालना जिल्ह्यातल्या एका तरुणाला मागच्या एक वर्षांपासून मॉस्ट बेट नावाचा गेम खेळण्याची सवय लागली. सुरवातीला त्याने शंभर, एक हजार रुपयांनी हा गेम खेळला. यामधे त्याला बर्‍यापैकी पैसेही मिळाले. त्यानंतर तो हजारो रुपये यामधे गुंतवून हा गेम खेळू लागला.

बघता बघता यात त्याला शेतजमीनही विकावी लागली असून वर्षभरात त्यानं तब्बल ४० लाख रुपये गमावलेत. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी आज या तरुणाला गावात पानटपरी चालवण्याची वेळ आलीय. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या तरुणानं थेट पोलिसात धाव घेतली. मात्र, गुन्हा दाखल करून न घेता सायबर पोलिसांनी त्याला बँक स्टेटमेंट आणण्याचा सल्ला दिला.

या छोट्याशा गावात तीस ते चाळीस मुलं या गेमला बळी पडले असल्याचं सांगितलं जातं. मॉस्ट बेट या गेमवर भारतात बंदी आहे. त्यामुळे हा गेम प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही. पण त्याने ऑनलाईन लिंकद्वारे हे गेम डाऊनलोड केला आणि होतं नव्हतं ते सगळं घालवून बसला.

हेही वाचा: खुळी न जनता फसेल आता, पुरे करा हे ढोंग!

लुडो खेळून कर्जबाजारी झाला

गेल्यावर्षी इंदूरमधल्या बसंत नावाच्या एका तरुणाने आत्महत्या केली. आपल्या मेव्हण्यासोबत तो इंदूरमधे राहत होता. तो एका खाजगी कंपनीत कामाला होता. त्याला ऑनलाईन लुडो खेळण्याचं व्यसन होतं. या गेममधे त्याने पैसेही गुंतवले होते. गेमिंगमुळे वसंत खूप कर्जबाजारी झाला होता. यामुळे तो खूप तणावाखाली होता.

बसंतने त्याच्या सुसाईड नोटमधे संपूर्ण प्रकरण नोंदवून ठेवलं.त्यानुसार, त्याला ऑनलाईन गेममधे खूप त्रास झाला. यामधे त्यांचं सुमारे १७ हजार रुपयांचं नुकसान झालं. हे पैसे त्याने त्याच्या मालकाकडून घेतले होते. पैसे परत करणं कठीण होऊन दबाव वाढू लागल्यावर त्याने मृत्यूला कवटाळलं.

रमीपायी दागिने गेले

तमिळनाडूची राजधानी चेन्नईमधल्या मनाली न्यू टाऊनमधे २९ वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेत आत्महत्या केली. या महिलेला ऑनलाईन रमी खेळण्याचं व्यसन जडलं होतं. या व्यसनात तिने घरातले २० तोळ्यांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि लाखो रुपयांची रोकड गमावली.

भवानीच्या कुटुंबातल्या सदस्यांनी तसंच नातेवाईकांनी तिला वारंवार रमी खेळण्यापासून दूर राहण्याचं सांगितलं मात्र, तरीही भवानीने ऑनलाईन गेम खेळणं सुरुच ठेवलं. ऑनलाईन गेममुळे भवानीचं लाखो रुपयांचं नुकसान तर झालंच, शिवाय तिच्यावर कर्जही झालं होतं. तिला कर्ज फेडण्याची चिंता सतावत होती.

पण आपण ऑनलाईन गेममधे पैसे जिंकून आणि डोक्यावरचं कर्ज फेडू असा तिचा मानस होता. त्यामुळे तिने आपल्या दोन बहिणींकडून तीन लाख रुपये उसने घेतले आणि पुन्हा ऑनलाईन गेम खेळण्यास सुरवात केली. मात्र यातही तिचं नुकसान झालं आणि अखेर तिने तणावातून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.

राजगडमधल्या पडोनिया गावात राहणार्‍या तरुणाला ऑनलाईन तीन पत्ती गेमचं व्यसन लागलं होतं. तो दिवसभर खेळत राहायचा. पण या नादात त्याने आपले १० लाख रुपये गमावले. त्याने इतर लोकांकडूनही पैसे उसने घेतले होते. त्यामुळे त्याच्यावर लाखोंचं कर्ज झालं. तो महिन्याभरापासून खूपच शांत होता. एके दिवशी तो एकाएकी घरातून गायब झाला आणि अखेरीस त्याचा मृतदेह रेल्वेट्रॅकवर आढळला.

हेही वाचा: आयपॉड क्रांतीची सतरा वर्षं

ऑनलाईन विश्वाची काळी बाजू

गेल्यावर्षी हैदराबाद सरकारने संपादित केलेल्या जमिनीची भरपाई म्हणून एका शेतकर्‍याला १ कोटींची रक्कम मिळाली. मात्र हा सर्व पैसा त्याच्या मुलाने ऑनलाईन कॅसिनोमधे उडवल्याचं समोर आलं. किती भीषण आणि धक्कादायक आहेत या घटना? हल्ली दररोज वर्तमानपत्र उघडलं की अशा प्रकारची एखादी तरी बातमी वाचायला मिळते.

अशा बातम्या वाचून कोणाही सहृदयी माणसाचं मन हेलावून जातं. मग प्रत्यक्ष ज्याचा पैसा जातो त्याच्या मनाची काय अवस्था होत असेल? हे अतीव दुःख, हाराकिरी, त्यातून आलेलं नैराश्य आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आयुष्यभर झिजूनही गेलेला प्रचंड पैसा परत मिळवू शकू की नाही याबद्दलची साशंकता, जोडीला हा पैसा देण्यासाठी वाढणारा दबाव या सर्वांतून अखेरीस मृत्यूला कवटाळलं जातं.

एकविसाव्या शतकात मोबाईल आणि इंटरनेट तंत्रज्ञानाच्या प्रगतीने किती असाध्य गोष्टी साध्य झाल्या आहेत, वेगवान झाल्या आहेत, सुकर झाल्या आहेत याची प्रचिती आपण सर्व जण घेत असताना याच ऑनलाईन विश्वाची ही काळी बाजू किती भीषण आहे?

घडलेल्या सर्व घटनांमधे सदर व्यक्तीच दोषी आहेत, यात शंकाच नाही. परंतु त्यांना दोषी ठरवून या समस्येला पूर्णविराम देता येईल? मुळात वर उल्लेख केलेली उदाहरणं ही माध्यमांमधल्या बातम्यांमुळे समोर आली आहेत. प्रत्यक्षात ती हिमनगाचं टोक आहेत.

गेमिंग अ‍ॅपची जाहिरात आणि सेलिब्रिटी

गेल्या दोन-चार वर्षांमधे देशात झटपट श्रीमंतीच्या हव्यासापोटी लाखो रुपये गमावलेल्यांची संख्या काही हजारांमधे-लाखांमधे असण्याची शक्यता वर्तवली जातेय. शेअर बाजारातल्या फ्युचर-ऑप्शन ट्रेडिंगमधे दररोज हजारो रुपये गमावणार्‍यांचं प्रमाणही अलीकडच्या काळात प्रचंड वाढलंय. ऑनलाईन रमीसारखे गेम आणि शेअर बाजारातलं ट्रेडिंग या दोन्हींची तुलना करता येणार नाही.

कारण बहुतांशी ऑनलाईन गेम या लोकांची लुबाडणूक करण्यासाठीच बनवल्या गेल्या आहेत. तसंच त्यांच्याकडून अनेक नियमांचं उल्लंघन राजरोसपणाने होत असतं, ही वस्तुस्थिती आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे आपल्याच समाजाने डोक्यावर घेतलेले सेलिब्रिटी अशा गेमिंग अ‍ॅपच्या जाहिरातींमधून झळकताना दिसतात आणि पैसे मिळवून श्रीमंत व्हा अशा आशयाचं आवाहन करताना दिसतात.

या आवाहनासाठी त्यांना भरभक्कम पैसा मानधन म्हणून मिळत असला तरी त्यामुळे अनेकांची दिशाभूल होते हे लक्षात घ्यायला हवं. अर्थात, कोणत्याही प्रकारच्या व्यसनाबद्दल दुसर्‍यावर खापर फोडणं हे चुकीचं असतं. कारण व्यसनाधीन व्यक्ती ही स्वतःच्या मानसिक, आर्थिक स्वार्थासाठी, गरजेसाठी, आनंदासाठी ते व्यसन करत असते.

हेही वाचा: इतिहास सांगतो, निसर्गातलं वैविध्य संपत असल्यानं जगावर वायरस संकट

कायदे किती करणार?

ऑनलाईन गेमच्या नादाला लागून पैसे गमावणार्‍यांनाही त्यांचे मित्र, कुटुंबीय, नातेवाईक त्यापासून लांब राहण्याचा सल्ला देतच असतात; पण या खेळांमधे दिसणारा पैशांचा आकडा हा असे सल्ले झुगारण्यास प्रवृत्त करतो. इथं काही तासांत पैसे दुप्पट-तिप्पट होतात आणि आपण ते करु शकतो, असा फाजिल, फसवा आत्मविश्वास अशा गेमच्या आहारी गेलेल्यांमधे आलेला असतो आणि तोच अखेरीस त्यांचा घात करतो.

कायद्याच्या अंगाने विचार करता केंद्र सरकारने अलीकडेच ऑनलाईन गेमिंगसाठी नवे नियम जारी केले आहेत. त्यानुसार कोणत्याही प्रकारच्या सट्टा आणि जुगाराला त्यात मनाई करण्यात आलीय. त्यावर देखरेख ठेवण्यासाठी वेगळी यंत्रणा तयार करण्यात आलीय. ऑनलाईन गेमिंग कंपन्यांची यापुढे केवायसी पडताळणी करण्यात येणार आहे.

सरकारकडून कोणती पावलं उचलली जातात, त्यांची अंमलबजावणी कशी होते हे येणार्‍या काळात दिसून येईल; पण सायबरविश्वामधे कायद्यांपेक्षा पळवाटा अधिक आहेत. जालन्याच्या तरुणाचंच उदाहरण घेतल्यास भारतात बंदी असणारी गेम त्याने इंटरनेटवरच्या लिंकद्वारे डाऊनलोड करुन घेतली आणि खेळण्यास सुरवात केल्याचं समोर आलंय. अशा वेळी कायदे कडक करून काय उपयोग?

गेम खेळताय की जुगार

दुसरी गोष्ट म्हणजे मोबाईलमधे कोणतंही गेमिंग अ‍ॅप किंवा इतर अ‍ॅप डाऊनलोड करताना आपण असंख्य प्रकारच्या परवानग्या न वाचता-विचार करता स्वखुशीने देत असतो. त्यामुळे त्यानंतर घडणार्‍या सर्व परिणाम-दुष्परिणामांची जबाबदारी ही आपली आहे, असं गेम खेळणार्‍याने अ‍ॅपनिर्मात्या कंपनीला एका अर्थाने लिहून दिलेलं असतं.

त्यामुळे अनेकदा कायदेशीर दृष्ट्याही अशा कंपन्यांना कचाट्यात अडकवणं कठीण ठरतं. म्हणूनच कायद्याच्या प्रक्रियेचा विचार करण्यापेक्षा या सापळ्यापासून लांब राहणं, त्यात स्वतःला अडकू न देणं याची दक्षता सर्वांनी घेतली पाहिजे.

झटपट श्रीमंतीसाठीचा हा जुगार आयुष्य उद्ध्वस्त करणारा ठरतो आणि तोच त्याचा शेवटचा थांबा आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे सुरवातीला थोडे फार पैसे मिळाल्याच्या आमिषाला भुलून कष्टाने मिळवलेली सर्व पूंजी पणाला लावून तेलही गेलं आणि तूपही गेलं अशी वेळ येऊ द्यायची की नाही हा निर्णय सद्सद्विवेकबुद्धीने प्रत्येकाने घ्यायचाय.

हेही वाचा:

बॅननंतरही टिक टॉक वाजतं जोरात

भल्याभल्यांना घाम फोडतेय चीनची डिजिटल हेरगिरी

पुन्हा कुणी लिहिल का एखादी संवेदना जागवणारी प्रार्थना?

जगात पर्यावरण आणीबाणी घोषित करा सांगणाऱ्या ग्रेटाताईची गोष्ट

0 Shares:
You May Also Like
Toll issue in Maharashtra
संपूर्ण लेख

रस्त्यावरील ‘टोलचा झोल’ किती दिवस चालणार?

सामान्य जनतेला रस्ते असो वा कोणतीही सुविधा असो मोफत नको आहे. पण टोलवसुलीच्या नावे चाललेली जनतेची लूट लोकांना…
संपूर्ण लेख

वहिदा रेहमान : मोठेपण न मिरवणारी मोठी अभिनेत्री

वहिदा रेहमान हिला नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. वहिदाचे मोठेपण कशात आहे शोधायचं तर, तिनं स्वतःचे मोठेपण…