अमेरिकेतलं न्यूयॉर्क हे जगातलं सगळ्यात श्रीमंत शहर. तब्बल ४०० वर्षांचा इतिहास असलेल्या या शहराच्या वैभवात गगनचुंबी इमारतींनी मोलाची भर टाकली. पण सध्या याच मोठ्याल्या इमारतींमुळे न्यूयॉर्क शहराचं अस्तित्व धोक्यात आलंय. इमारतींमुळे शहरावरचा भार वाढतोय. जमिनी खचतायत. त्यामुळे न्यूयॉर्क शहराचा लवकरच ‘जोशीमठ’ होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय.
शेकडो वर्षांचा इतिहास घेऊन एक शहर उभं राहतं. आपली वाटचाल करतं. सोबत असतो शहराचा दैदिप्यमान वारसा आणि संस्कृतीच्या पाऊलखुणा. अमेरिकेतलं न्यूयॉर्क शहरही आपल्या अशाच वारसा आणि संस्कृतीतून उभं राहिलं. जगभर ओळखलं जाऊ लागलं. या शहराच्या वैभवात अनेक गोष्टींनी वेळोवेळी भर टाकलीय.
आज जगातल्या सर्वात जास्त गगनचुंबी इमारती न्यूयॉर्कमधे पहायला मिळतात. त्यात स्ट्रीट बिल्डिंग आहे तशी वर्ल्ड ट्रेड सेंटर, क्रायस्लर अशा महाकाय इमारतीही आहेत. या इमारतींनी शहराला वेगळी ओळख दिली. शहराच्या वैभवात भर घातली. शहराचा झगमगाट वाढला. पण सध्या याच टोलेजंग इमारती न्यूयॉर्क शहराच्या मुळाशी उठल्यात. त्यामुळे शहराचं अस्तित्व धोक्यात आलंय. पुढच्या काही वर्षांत हे शहर टिकेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झालीय.
एक श्रीमंत शहर बुडणार!
अमेरिकेतल्या रोड आयर्लंड युनिवर्सिटीच्या ‘ग्रॅज्युएट स्कुल ऑफ ओशनोग्राफी’ आणि सरकारी संस्था असलेल्या ‘युनायटेड स्टेट जिओलॉजिकल सर्वे’च्या संशोधकांनी अलीकडेच एक रिसर्च पेपर प्रसिद्ध केला आहे. ‘अर्थ फ्युचर’ या विज्ञानविषयक जर्नलमधून हा पेपर प्रसिद्ध करण्यात आलाय. यात न्यूयॉर्क शहर बुडण्याचा इशारा देण्यात आलाय.
न्यूयॉर्क शहरावरचा गगनचुंबी इमारतींचा भार दिवसेंदिवस वाढतोय. त्यामुळे जमीन खचतेय. परिणामी न्यूयॉर्क शहर उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. हा अहवाल तयार करणाऱ्या दोन्हीही संस्था या अमेरिकेतल्या प्रतिष्ठित संस्था म्हणून जगभरात नावारूपाला आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी या रिसर्चमधून दिलेला इशारा आणि निरीक्षणं अधिक गंभीर आहेत.
न्यूयॉर्क हे लोकसंख्येच्या दृष्टीनं अमेरिकेतलं सगळ्यात मोठं शहर. जगाला या शहराबद्दल फार कुतूहल असतं. त्याची कारणंही तशीच आहेत. १६२४ला डचांनी एक व्यापारी शहर म्हणून न्यूयॉर्कची स्थापना केली होती. त्यावेळी हे शहर ‘न्यू ऑरेंज’ किंवा ‘न्यू ऍमस्टरडॅम’ या नावाने ओळखलं जायचं.
१६६४ला इंग्लिश वसाहतकारांनी याचं नामकरण न्यूयॉर्क असं केलं. बघता बघता हे शहर जगाच्या आर्थिक घडामोडींचं केंद्र बनलंच शिवाय अमेरिकेतल्या सांस्कृतिक चळवळींचं उगमस्थान म्हणूनही ओळखलं जाऊ लागलं. शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेलं न्यूयॉर्क जगातल्या महत्वाच्या शहरांपैकी एक म्हणून नावाजलं जातंय.
हेही वाचा: जंगलातून मेट्रो धावताना जंगल उरेलच कसं?
टोलेजंग इमारतींचा धोका
२०१९मधे वर्तमानपत्रातून न्यूयॉर्क सिटी बुडण्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. त्यावेळी हवामान बदल आणि समुद्राच्या पातळीत झालेली वाढ ही दोन कारणं फार चर्चिली जात होती. पण अलीकडच्या संशोधनातून न्यूयॉर्क शहराच्या पडझडीमागे आहेत इथल्या गगनचुंबी इमारती असल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलंय.
खरंतर इथल्या गगनचुंबी इमारती हे न्यूयॉर्कचं मुख्य आकर्षण आहे. या शहराची ही वेगळी ओळख आता जगभरात पोचलीय. १८९९ला न्यूयॉर्क शहरात पहिली गगनचुंबी इमारत उभी राहिली. ११ माळ्यांच्या या इमारतीनं पुढे उंचच उंच इमारती उभ्या राहण्याची सोय करून दिली. आणि बघता बघता न्यूयॉर्क शहरात टोलेजंग इमारती उभ्या रहायला लागल्या. या टोलेजंग इमारती शहराचं स्टेटस सिम्बॉल बनत गेलं.
न्यूयॉर्क शहराचे एकूण ५ उपविभाग आहेत. द ब्रॉक्स, ब्रूकलिन, मॅनहॅटन, क्विन्स आणि स्टेटस आयलँड. या ५ उपविभागांमधे १ मिलियन इतक्या इमारती असल्याचं न्यूयॉर्क पोस्टच्या एका रिपोर्टमधे वाचायला मिळतं. या इमारतींच्या वजनाचंही विश्लेषण करण्यात आलंय. यातल्या ब्रूकलिन, मॅनहॅटन, क्विन्स यांनी धोक्याची पातळी ओलांडलीय. इतर दोन्ही भागांच्या तुलनेत हे तीन भाग जलदगतीने बुडत असल्याचं निरीक्षण या रिसर्च पेपरमधे नोंदवलं गेलंय. यातल्या २४७ गगनचुंबी इमारती या १५० फूट उंचीच्या आहेत.
न्यूयॉर्क शहरावरचा इमारतींचा हा भार असाच वाढत राहिला तर हे शहर पूर्णपणे नष्ट होईल. न्यूयॉर्कच्या जमिनीवर ७६२ मिलियन टन इतकं वीट, दगड, स्टील, काचा आणि इतर बांधकाम साहित्य आहे. त्यामुळे न्यूयॉर्क शहर दरवर्षी १-२ मिलिमीटरनं इतक्या वेगाने बुडत असल्याचंही या पेपरमधे म्हटलंय.
प्रमुख शहरांवर घोंघावतंय संकट
एकीकडे टोलेजंग इमारती तर दुसऱ्या बाजूला समुद्राच्या पाणी पातळीत होणारी वाढही आज न्यूयॉर्कच्या अस्तित्वासाठी आव्हान ठरतंय. यात केवळ समुद्रकिनारी असलेली शहरंच नाहीत तर इतर शहरांनाही पुढच्या काळात या संकटाचा सामना करावा लागणार आहे.
अशी एकूण ९९ शहरं असल्याचं महत्वाचं निरीक्षणही या रिसर्चमधे नोंदवलं गेलंय. तिकडे इंडोनेशियामधे राजधानीचं शहर असलेलं जकर्ता इतक्या वेगाने बुडतंय की तिथलं सरकार पर्यायी राजधानीचा विचार करतंय. २०२५पर्यंत इंडोनेशियाचं सरकार बोरनिओ या शहराला राजधानीचं शहर म्हणून घोषित करेल अशी जकर्ताची सध्याची परिस्थिती आहे.
तर गर्दीचं शहर म्हणून ओळखलं जाणारं बांगलादेशचं ढाका शहर दरवर्षीच्या नैसर्गिक आपत्ती, समुद्रपातळीत होणारी वाढ, चक्रीवादळं यामुळे हवालदिल झालंय. तर इकडे भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई, बँकॉक, वेनिस, व्यूस्टन या शहरांच्या समुद्राच्या पाणी पातळीतही वाढ होतेय. त्यांनाही बुडण्याचा धोका आहे.
भविष्यात किनाऱ्यावर, नदीवर किंवा तलावाच्या ठिकाणी बांधलेली टोलेजंग इमारत भविष्यातला पुराचा धोका वाढण्याचं प्रमुख कारण ठरू शकतं. याकडेही हा रिसर्च करणारे संशोधक लक्ष वेधतायत. त्यामुळे न्यूयॉर्क ते लंडन आणि दिल्ली ते मुंबई अशा जगातल्या महत्वाच्या शहरांवर घोंघावणारं हे संकट वेळीच ओळखायला हवं. अमेरिकेतल्या संशोधकांनी त्यादृष्टीने धोक्याचा इशारा दिलाय.
हेही वाचा:
शुद्ध हवेसाठी, हॅशटॅग ‘शुद्ध हवा हक हमारा’ कॅम्पेन