महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई हीच क्रिकेटची खरी लवस्टोरी

तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकला. त्याची एक झलक पाहण्यासाठी आजही तरुणाई अक्षरश: आपला जीव ओवाळून टाकते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करुन ३ वर्षांचा कालावधी लोटला असला तरी आयपीएलच्या निमित्ताने रस्त्यारस्त्यावर पिवळा समुद्र अवतरला तो याच धोनीसाठी, क्रिकेटच्या सुपरस्टारसाठी! महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई ही लवस्टोरी म्हणूनच विशेष रंजक आहे.

विवेक कुलकर्णी

काही महिन्यांपूर्वीची गोष्ट. अष्टपैलू रविंद्र जडेजा दुखापतीमुळे भारतीय क्रिकेट टीममधून बाहेर फेकला गेला होता. याचवेळी, गुजरातच्या निवडणुकांचा फड सुरु झाला आणि रविंद्र जडेजा आपली पत्नी रिवाबाच्या प्रचारासाठी बाहेर पडला. अर्थातच, जडेजाने प्रचारासाठी रस्त्यावर उतरल्यानंतर यावर अनेक मतमतांतरे नोंदवली गेली.

जडेजाचा रोल मॉडेल

वास्तविक, या दिग्गज खेळाडूच्या गैरहजेरीत आशिया कप आणि टी२० वर्ल्डकप स्पर्धेत भारताची कामगिरी निराशाजनक ठरल्याने चाहते यावर नाराज होते. त्यानंतर ४-५ महिन्यांचा कालावधी लोटला आणि रविंद्र जडेजा तंदुरुस्त होऊन २२ यार्डांच्या खेळपट्टीवर नव्या जोमाने परतला. बॉर्डर-गावसकर कप स्पर्धेत भारताने विजयश्री संपादन केली. बॅटींग आणि बॉलींग या दोन्ही आघाड्यांवर खेळ बहरत गेला.

पुढे आयपीएल सुरु झालं आणि या हंगामातल्या शेवटच्या दोन बॉलवर एक सिक्स आणि एक फोर फटकावत जडेजा हिरो ठरला. जडेजाने फोर मारला, तो क्षण त्याची पत्नी रिवाबाच्या कॅमेर्‍यात कैद झाला होता. रिवाबाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. ती मैदानात आली, तिने जडेजाकडे एका प्रेमळ नजरेने पाहिलं आणि एका क्षणार्धात त्याच्या बाहुपाशात विसावली.

त्या दिवशी जडेजा गुजरात निवडणुकीत रिवाबाचा विजय पाहत होता आणि इथं रिवाबा ही आयपीएलच्या रणांगणावर जडेजाचा विजय पाहत होती! योगायोग यापेक्षा वेगळा काय असू शकतो? आता ज्या जडेजाने अगदी मोक्याच्या क्षणी, शेवटच्या क्षणी आयपीएल जिंकून दिली, त्याच्यासाठी रोल मॉडेल एकच, तो म्हणजे, रांचीचा १९८१मधे जन्मलेला सुपरस्टार महेंद्रसिंग धोनी!

धोनी रिव्यू सिस्टीम

तसं पाहता, धोनी आणि चेन्नई ही खर्‍या अर्थाने एक लवस्टोरीच! म्हणतात ना, ‘सूर्याने मावळावे, सूर्यफुलाने वळावे, या भक्तीतले प्रेम कसे कोणाला कळावे’! तसंच धोनीचं आणि चेन्नईचं आहे.

क्रिकेटमधला निष्णात ब्रेन म्हणून ओळखल्या जाणार्‍या धोनीसाठी ही शेवटची आयपीएल ठरु शकते, असा होरा असल्याने या आयपीएल स्पर्धेच्या निमित्ताने जिथं जिथं चेन्नईचे सामने झाले, तिथं तिथं अक्षरश: रस्त्यारस्त्यावर पिवळा समुद्रच अवतरला. डोक्यावर बर्फ असेल, असं प्रचंड संयमी व्यक्तिमत्व आणि जिभेवर साखर असेल अशी वाणी, ही धोनीची जणू कवचकुंडलं आणि क्रिकेटिंग ब्रेनबद्दल तर काही प्रश्नच नाही.

पंचांच्या एखाद्या निर्णयाबद्दल साशंकता असेल किंवा त्यावर दाद मागायची असेल तर डीआरएस घेता येतो. डीसिजन रिव्यू सिस्टीम हा त्याचा सोपा अर्थ. पण, धोनी यातही इतका निष्णात होता की, या डीआरएसला डीसिजन रिव्यू सिस्टीमऐवजी धोनी रिव्यू सिस्टीम असं संबोधलं जायचं. धोनीने रिव्यू घेतला म्हणजे बॅट्समन बाद असणारच, हे ओघानेच यायचं.

धोनीची ब्रँड वॅल्यू

याच हातोटीमुळे धोनीला स्टारडम प्राप्त झालं. त्याची ब्रँड वॅल्यू उत्तरोत्तर वाढत गेली आणि अशा सर्वोच्च शिखरावरुन उतरणंही तितकं सोपं नसतं. धोनीने रागरंग पाहून घोषणा केली, ‘शरीराने साथ दिली तर पुढची आयपीएल मी निश्चितपणाने खेळेन’! मागच्या दोन महिन्यांत जिथं जिथं धोनी गेला, तिथं तिथं त्याचे चाहते हमखास पोचले.

आता धोनी यात किती धावा करतो की नाही, ही गोष्ट तिथं अजिबात महत्वाची नव्हती. इथं महत्वाची होती ती त्याची हजेरी, त्याच्या चेहर्‍यावरचं स्मित हास्य आणि अर्थातच, त्याचा मिडास टच! २००८पासून चालत आलेला त्याचा करिष्मा आजही कायम आहे, हेच यंदाची आयपीएल स्पर्धा शिकवून गेली.

आता धोनीचे चाहते सर्व वयोगटात आहेत. अबालही आहेत आणि वयोवृद्धही. ना त्याला भाषेचा अडसर, ना धर्माची अडचण. धोनी खेळतो ती शैली अगदी अपारंपरिक. पण, त्याने आपलं जे प्रतिबिंब या सार्‍या वर्षांच्या प्रवासात उमटवलं, त्याला तोड नाही.

धोनीच्या साधेपणाची चर्चा

धोनी मैदानात साधा आणि मैदानाबाहेरही साधा. काही खेळाडू थोड्याशा यशानेही हुरळून जातात. पण, सर्वोच्च यश प्राप्त केल्यानंतरही धोनीचे पाय मातीवरच राहिले, ही सर्वात महत्वाची गोष्ट. एखादी वाईन जसजशी जुनी होत जाते, तसतशी ती अधिकच मधुर होत जाते. धोनीचंही तसंच असावं कदाचित. तो जितका जुना होतोय, तितका तो मधुर होतोय, हवाहवासा वाटतोय.

अगदी अलीकडचंच उदाहरण घेऊयात. चेन्नई सुपरकिंग्स चेन्नईतल्या क्राऊन प्लाझा हॉटेलमधे उतरली होती. धोनीने रुम सर्विसला फोन करुन कटलरी मागवली होती. पण, त्यांच्याकडून थोडासा उशीर झाला आणि भीडभाड न बाळगता दस्तुरखुद्द धोनी स्वत: खाली आला.

त्याला सर्विस सेक्शन कुठं आहे, याची कल्पना होती. त्याने आपल्याला जे हवं होतं, ते घेतलं आणि स्मित हास्याने धन्यवाद देत आपल्या रुमकडे निघाला. क्रिकेटच्या सर्वोच्च शिखरावर पोचणारी एखादी व्यक्ती इतकी साधीसुधी असू शकते, याचा दाखला धोनीच्या साधेपणातून मिळतो.

आयपीएलमधला प्रवास

१५ वर्षांपूर्वी आयपीएल सुरु झाली, त्यावेळी धोनीच चेन्नईचा कर्णधार होता. या स्पर्धेतल्या उद्घाटनाच्या वर्षात राजस्थान रॉयल्सने जेतेपद मिळवलं, त्यावेळी त्या टीमचा कर्णधार शेन वॉर्नची मुक्त कंठाने प्रशंसा झाली आणि ते साहजिकही होतं. वॉर्नकडे कसे नेतृत्व गुण आहेत, यावर बरीच चर्चा रंगली. ऑस्ट्रेलियन व्यवस्थापनाला ही गोष्ट कशी हेरता आली नाही, यावरही किस्से झडले.

पण, याच वॉर्नला तोडीस तोड उत्तर देऊ शकेल, असा आणखी एक कल्पक खेळाडू धोनीच्या रुपाने घडतोय, याची क्वचितच कोणाला कल्पना आली असेल. पहिल्या वर्षी आयपीएल जिंकल्यानंतर वॉर्न आणखी खेळला. पण, त्याला पहिल्या वर्षाच्या जादूची पुनरावृत्ती करता आली नाही.

धोनी नामक कल्पक खेळाडूने मात्र क्रिकेटमधे नवनवी शिखरं गाठली. राजस्थानसाठी २००८मधे जे वॉर्नने करुन दाखवलं, त्याची प्रचिती धोनीने त्यानंतर सातत्याने दिली. यंदा आयपीएलमधे पाचव्या जेतेपदाची पुनरावृत्ती करत धोनीने आपला करिष्मा पुन्हा एकदा प्रत्यक्षात साकारुन दाखवला.

खरा हक्कदार धोनीच!

नेतृत्व साकारत असताना शांत राहायचं असतं, याचा धोनीने अनेकदा दाखला दिला. दीपक चहलने शुभमन गिलचा झेल सोडला, त्यावेळी धोनी शांतपणे मागे आला आणि बॉलरला गुड बॉलचा निर्देश केला. पोस्ट मॉर्टेम सामन्यात नाही तर सामन्यानंतर करायचे असतात, यावर त्याचा सातत्याने विश्वास राहिला.

चेन्नईने पहिलं आयपीएल जिंकलं, त्यावेळी धोनी २८ वर्षांचा होता. आश्चर्य म्हणजे ३५व्या वर्षानंतर त्याने चेन्नईला तीन आयपीएलमधे विजयश्री मिळवून दिली. उत्तम कर्णधार साध्या खेळाडूंच्या टीमलाही विजयाच्या किनाऱ्यापर्यंत घेऊन जाऊ शकतात, याचं नितांतसुंदर उदाहरण म्हणजे यंदाची आयपीएल!

साहजिकच, शेवटच्या २ बॉलमधे १० धावांची आतषबाजी करत आयपीएल जेतेपदावर मोहोर उमटवून देणार्या रविंद्र जडेजाने सहकाऱ्यांसोबत आनंद साजरा करत असताना सर्वप्रथम अत्यानंदाने उचलून धरलं ते धोनीलाच! कारण त्याला पक्कं ठाऊक होतं, या विजयाचा खरा हक्कदार धोनीच आहे. धोनी आहे म्हणून सीएसके आहे आणि सीएसके आहे म्हणूनच धोनी आहे, असं म्हणायचं ते यासाठीच!

0 Shares:
You May Also Like
संपूर्ण लेख

आदिपुरुष : नव्या पिढीचं नवं रामायण

दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा नव्या पिढीला रामायण नव्याने सांगू पाहतोय. या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा कित्येकांनी…
संपूर्ण लेख

सावधान… भारतावर आदळणारी वादळं वाढतायत!

किनाऱ्यावर आदळलेल्या भयंकर लाटांचे वीडियो तुम्हाला सोशल मीडियावर आले असतील. बिपरजॉय वादळ गुजरातकडे गेल्याचे मेसेजही तुम्हाला आले असतील.…
संपूर्ण लेख

हरवलेल्या कथेच्या शोधात : साध्या शब्दांत उग्र वास्तव मांडणारा कथासंग्रह

लेखक सीताराम सावंत यांचा ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा नवा कथासंग्रह गावातलं समाजवास्तव नव्याने सांगू पाहतोय. रयत शिक्षण संस्थेत…
संपूर्ण लेख

करियर करणाऱ्या पोरींसाठी एग फ्रीजिंग ठरतंय वरदान

अभिनेत्री प्रियांका चोप्राने मध्यंतरी आपण वयाच्या तिशीमधे एग फ्रीजिंग केल्याचा खुलासा केला होता. सुपरस्टार रामचरण आणि उद्योजिका असणारी…
संपूर्ण लेख

‘फायर इन द माऊंटन्स’ : सरकारी आश्वासनांचा फसलेला रोडमॅप

सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच ‘फायर इन द माऊंटन्स’ हा नवा सिनेमा रिलीज झालाय. वरवर पाहता, या…
संपूर्ण लेख

पर्यावरण रक्षणासाठी हवी प्लॅस्टिकचीच सर्जरी!

प्लॅस्टिकचं संकट इतकं गहिरं झालंय की, पाण्यामधे, अन्नामधे आणि मानवी रक्तामधेही प्लॅस्टिकचे अंश सापडतायत. संशोधकांनी याबद्दल वारंवार इशारे…