हरवलेल्या कथेच्या शोधात : साध्या शब्दांत उग्र वास्तव मांडणारा कथासंग्रह

लेखक सीताराम सावंत यांचा ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा नवा कथासंग्रह गावातलं समाजवास्तव नव्याने सांगू पाहतोय. रयत शिक्षण संस्थेत शिक्षक असलेल्या सावंतांचा भाबडा स्वभाव या कथासंग्रहात दिसून येत नाही, हे त्यांच्यातल्या लेखकाचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्या लेखनशैलीचा आणि या नव्या कथासंग्रहाचा आढावा घेणारी श्रीकांत देशमुख यांची ही फेसबुक पोस्ट.

सीताराम सावंत यांची भेट नेमकी कशी झाली, हे सांगता येणार नसलं तरी अंधुकसं आठवतं की हा लेखक आपल्या पहिल्या कादंबरी प्रकाशनासाठी चाचपडत होता. त्याला प्रकाशक मिळत नव्हता. त्याचा माझा कुठलाही परिचय नसताना मला त्याने फोन केला, अडचण सांगितली. मी सहज श्रीकांत उमरीकर यांचं नाव सांगितलं, त्यांनाही बोललो.

त्यातही पुढे काही अडचणी आल्याच, तरी ‘देशोधडी’ ही सीतारामची कादंबरी डिसेंबर २०१० साली जनशक्ती कडून प्रकाशित झाली. त्यावेळी सावंत विट्याला शिक्षक म्हणून काम करत होते. या काळात लेखकाने मला काही मजकूर वाचण्यासाठी पाठवलेला. त्यातल्या अतिशय प्राथमिक गोष्टींमधे सुधारणा सुचवण्यासाठी मी त्याला सविस्तर पत्र लिहिलं होतं.

हेही वाचा: भ्रष्टाचारी माणूस चांगलं साहित्य लिहू शकत नाही : राजन गवस (भाग २)

शेतकरी, शिक्षक आणि लेखक

सावंत हे व्यवसायाने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक असले तरी ते मूळ अभियांत्रिकीचे पदवीधर. केवळ नाईलाजाने शिक्षकाची नोकरी करणारे सावंत एमसीवीसी नावाचा एक प्रकार कनिष्ठ महाविद्यालयात शिकवत होते. अतिशय शांतपणे आपली नोकरी आणि जमेल तसं लेखन वाचन करणारा हा लेखक. अकारण अशी हौस नाही की कुठला सोस. कायम निरागसपणे काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यासारखा हा लेखक.

शेत पुरात वाहून गेलं की अस्वस्थ होणारा, बखाड पडली की कोमेजून जाणारा, स्वतः बायकोला सोबत घेऊन उरल्या वेळात रानात राबणारा. यामुळेच खरं तर सीतारामला शेतीतल्या दुःखावर लिहिण्याचा विशेषाधिकार आहे. त्याच्या कुटुंबाचा रानातला सहवास अनेकांनी जवळून पाहिलाय.

भुई भुई ठाव दे

सावंत यांची दुसरी कादंबरी ‘भुई भुई ठाव दे’ २०१५ला प्रकाशित झाली. देशोधडी मुळे फारसा कोणाच्या लक्षात न आलेला हा लेखक ‘भुई भुई ठाव दे’मुळे एक महत्वाचा लेखक बनला. त्याच्या लेखनाच्या प्राथमिक अपरिपक्व खुणा या कादंबरीत नुसत्या मोडल्याच गेल्या असं नाही तर मराठी साहित्यात महत्वाची ठरावी अशी कादंबरी तो या निमित्ताने देऊन गेला.

एक परिपूर्ण, आशयघन कादंबरी म्हणून ‘भुई भुई ठाव दे’कडे पहावं लागतं. शहराला लागून असणाऱ्या खेड्याची ही कहाणी वाचताना वाचक एका आधुनिक परात्मतेच्या सखोल अनुभवातून जातो. मी स्वतः सीताराम सावंत यांच्या लेखनाकडे ‘देशोधडी’पर्यंत फारसं गंभीरपणे बघत नव्हतो, पण या कादंबरीतून माझे सगळे अंदाज सीतारामने मोडीत काढले. उत्साहाने एखाददुसरं पुस्तक लिहिणारे आपल्याकडे कमी नाहीत. सीताराम हा त्याला अपवाद ठरला.

हेही वाचा: जगण्यातूनच आली लिहिण्याची भूमिका : राजन गवस (भाग १)

नैसर्गिक जगणं जगणारा लेखक

सावंत हे रयत शिक्षण संस्थेत नोकरी करतात. सतत होणाऱ्या बदल्या. गाव आणि शेतीपासून दूर असणं हे कायम. त्यातही सावंत यांनी आपली शेती आणि लेखन उघड्यावर पडू दिलं नाही. दुष्काळी प्रदेश म्हणून परिचित असणाऱ्या मानदेशच्या भागातला हा लेखक. माडगूळकरांनी बनगरवाडी जो प्रदेश समोर ठेवून लिहिली त्याला लागूनच सावंत यांचं गाव आहे.

सुदूर पसरलेल्या गवताळ माळावर असणारं सावंत यांचं एकटं घर पाहिलं, अनुभवलं की याची प्रचिती येतं. अगदी नैसर्गिक जगणारा हा लेखक. कुठलीही पोझ नाही, अपेक्षा नाही, स्वतःविषयी बोलणं म्हणजे पाप वाटणारा हा विशुद्ध माणूस, नकळत आवडून जातो.

त्याने काही कथाही लिहिल्या होत्या. साधारण २००७ पासूनच्या या कथा. मी त्याला म्हणालेलो की लिहिल्याच आहेत तर काढून टाका. माझ्या या बोलण्यात, सावंत हे कथाकार म्हणून फार काही देणारे असतील असा विश्वास अर्थातच नव्हता. हे स्पष्टपणे सांगायला हवं. गेल्यावर्षी ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा सावंत यांचा कथासंग्रह लोकवाड्मयने प्रकाशित केला.

वर्णनात न रमणारा लेखक

सावंत यांची कथा वाचून वाचक म्हणून काही गोष्टी नोंदवणं आवश्यक आहेत. पहिली गोष्ट म्हणजे, मी समजत होतो तसा हा लेखक भाबडा वगैरे नाही. माणूस म्हणून असणारं त्याचं संपूर्ण भाबडेपण लेखक म्हणून पूर्णपणे गळून पडलेलं आहे.

याचा अर्थ तो माणूस म्हणून ‘कृतक भाबडा’ आहे असं मात्र मानता येणार नाही. भाबडे असण्यातली एक स्वच्छ अशी नैतिकता त्याच्या लेखनाच्या तळाशी आहेच पण त्याची कथा त्यातच अडकून न पडता किती किती शक्यतांचा शोध घेत जाते हे, ही कथा वाचल्यानंतर कळतं.

दुसरं असं की, अशा प्रकृतीचे लेखक प्राथमिक निवेदनातच अधिक रमतात. त्यात त्यांची कथा मग हरवून जाते. वर्णनपरता हाच लेखनाचा गुण ठरला तर तपशील महत्वाचे ठरतात आणि लेखकाला असं वर्णन करण्यासाठीच कथा लिहायची होती असं सप्रमाण वाटून जातं. अगदी माझे आवडते एक लेखक, माडगूळकरांचं बरंच लेखन अशा वर्णनात खूपदा रमून गेल्याचं दिसतं.

अशा लेखनातली दृश्यात्मकता खूप विलोभनीय वाटत असली तरी त्याचं उणेपणही कुठेतरी खुपत राहतं. सीताराम सावंत यांची ही कथा वाचत असताना, याला अपवाद असणारी कथा त्यांनी कशी लिहिली, असा प्रश्न मला पडणं हा माझ्यासाठी एक मोठा धक्का होता.

हेही वाचा: विष्णू खरे : कवी गेल्यावर सोबत काय राहिलं?

हरवलेल्या कथेच्या शोधात

‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ असं लांबलचक नाव असणाऱ्या या कथासंग्रहाने मुळात माझ्यावर वाचक म्हणून एक दडपण आलंय, हे मी सर्वप्रथम मान्य करायला हवं. तरच या कथेबद्दल काही बोलता येईल. १९२ पानांचा अकरा कथा असणारा हा संग्रह. म्हणजे सरासरीने सतरा अठरा पृष्ठाची एक कथा. बऱ्यापैकी दीर्घ वाटाव्यात अशा ह्या कथा आहेत.

अगदी साध्या सरळ निवेदनातून भयंकर, अकल्पित, संमिश्र जग ही कथा वाचकाला दाखवत नेते. नकळतपणे वाचक त्यात इतका अडकून पडतो की एक संपली की तो दुसरी वाचायला घेतो. असं पाठोपाठ होत राहतं. अगदी साध्या साध्या विषयातून एक प्रचंड असा अवकाश सीतारामची कथा मांडत जाते.

साध्या भाषेतलं उग्र वास्तव

अगदी पहिलीच कथा ही प्रवीण तुळशीदास बाबर या तरुणाची आहे. नोकरी न मिळाल्याने शेती आणि शेती न परवडल्याने जेसीबी भाड्याने देण्याचा व्यवसाय करणारा हा तरुण वर्तमान खेड्यातला आहे. पण ज्या रीतीने कथाकार त्याची गोष्ट सांगत जातो, ती अगदी भयंकर वाटावी अशी असते.

एका कथेतून असा शोकात्म नायक उभा करणं फार क्लिष्ट असतं. अगदी सुज्ञ वाचकाला थेट थोबाडून टाकणारी ही कथा. या कथेचा शेवट वाचताना तर माणूस भयचकित होतो. डायरीचा फार्म वापरुन लेखकाने ही कथा लिहिलीय, ही गोष्टही रुढ निवेदन शैलीला धक्का देणारी आहे.

सावंत यांची या संग्रहातली प्रत्येक कथा ही आपल्या भोवतालाला भोवंडून टाकणाऱ्या कोलाहलाबद्दल बोलत जाते. अतिशय उग्र असं वास्तव ती मांडत असली तरी तिच्या निवेदनात कुठलीही उग्रता नाही. अतिशय भयंकर असं काही ती तेवढ्याच साध्या भाषेत सांगत जाते.

हे सावंत यांचं कथाकार म्हणून सर्वात मोठे यश आहे. कुठल्याही रोमहर्षक प्रतिमा, उठवळ शैलीचा यासाठी लेखकाला आश्रय घेण्याची आवश्यकता वाटत नाही. हे या कथांचं असाधारण वैशिष्ट्य मानावं लागेल.

हेही वाचा: चर्चा तर होणारचः गुप्तेंच्या भयकथांमागचं उचलेगिरीचं गूढ

गावगाडा जिवंत करणाऱ्या कथा

‘वस्तरा चालवणारी बाय’ ही एक कथा. बाई आणि आपला समाज याचा एक उभा आडवा छेद समोर मांडणारी ही कथा. न्हावी काम करणाऱ्या एका माणसाची ही बायको, तो मेल्यानंतर धाडसाने वस्तरा हाती घेऊन पहिल्यांदा आपल्या तथाकथित पारंपारिक धारणांना सुरुंग लावते.

मराठी साहित्यात कौतिक, पारबती अशा आत्मनिवेदन करणाऱ्या नायिका आपण पाहिल्या आहेत. गुणा वारकाची बायको ज्या रीतीने बोलत जाते, ते वाचून अख्खा गावगाडा समोर येतो. ‘सगळ्या जगाची केसं काळी करुन दिली, पण मी माझ्या केसांना डाय-फिय लावत बसलो न्हाय. आता पोरांचीच काळजी.’ अशी ही गावगाड्यातून उगवून आलेली बलुतेदार समूहातली आई आहे.

‘ग्रामीण लेखक’ अशी पोरकट विशेषणं लावणाऱ्या सुमार समीक्षक, टीकाकारांनी आजवर अशा लेखकांचं वाटोळं केलंय. सीतारामसारखे लेखक अशा मर्यादित अवकाशात बसणारे लेखक नसतात हे आता तरी ध्यानात घेतलं पाहिजे. इथं प्रश्न एकट्या सावंतांचाही नसतो. कृषिजन संस्कृती ही ऐतखाऊ लोकांची संस्कृती नसून सर्वाहारांची जीवनशैली आहे. तिचं व्यापकत्व समजून घेणं हे कुठल्या मर्यादित विशेषणाचं काम नाही.

तपशिलाने वाचाव्यात अशा कथा

सावंत यांची एकेक कथा तपशिलाने विचारात घ्यावी, इतका तिचा परीघ मोठा आहे. ‘आमराईतील राणू’ ही अशीच एक चक्रावून टाकणारी कथा. वाक्याची शेवटून सुरवात करणं, हा प्रयोग कथाकाराने यात हेतुपूर्वक केलेला दिसतो. ‘दाखवल्या दोन वेगवेगळ्या जागा पानड्यांनी.’ असं एक वाक्य. असं पुढे खूपदा घडत जातं.

या संरचनेतून शेतीतल्या वर्तमानाची भयावह संरचना उलगडत जाते. एखादी शैली, भाषिक प्रयोग जेव्हा अनघड अनुभवाचा जैविक भाग बनतो तेव्हा काय होऊ शकतं याची प्रचिती आमराईतील राणू, हरवलेल्या कथेच्या शोधात या कथा वाचून कळते. संग्रहाची शीर्षक कथा तर सर्जनाच्या सगळ्या आंतरप्रवाहांना भिडून ओथंबून टाकणारी कथा आहे.

‘ठेवलेल्यांची क्षणचित्रे’ ही वसंता नामक झिरो वायरमनची गोष्ट. खेड्यातली तरुण पिढी आज ज्या एका भयावह काळातून जातेय त्याचं प्रातिनिधिक चित्रण करणारी ही कथा आहे. झिरो वायरमन हा शब्द खेड्यातल्या बेकारीने दिलेली देण आहे.

शेती पिकत नाही, भाव मिळत नाही, पोरांची लग्न होत नाहीत, शिकून नोकरी नाही अशा आवर्तात सापडलेली ही तरुणाई आहे. वाचताना अतिशय वेदना देणारी ही कथा. यातला चंदूच्या मृत्यूचा प्रसंग ज्या रीतीने लेखक वर्णन करतो, आपली आपल्याला लाज वाटते. लेखक म्हणून हे सावंत यांचं यश आहे.

हेही वाचा: गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, हे सांगणारा कवितासंग्रह

साचा मोडणारा कथासंग्रह

अल्लाह त्याला सद्गती देवो, न सांगायची गोष्ट, रोचक गोष्टींची सुरवात, गदिमांचं वर्तमान, त्या तिघी या सगळ्याच कथा आपल्या जगण्याच्या कडेवरच्या कथा आहेत. साध्या सरळ निवेदनातून ह्या कथा काहीतरी भन्नाट बोलत जातात. माणसांच्या जगण्याची कितीतरी रूपं ह्या कथा समोर ठेवत जातात त्या केवळ संहिता म्हणून नाही तर तो एक जिवंत असा ऐवज असतो.

सीताराम सावंत यांनी कृषी-ग्रामीण संवेदनेच्या रुढ लेखनातील सगळे साचे या संग्रहातून कालबाह्य ठरवले आहेत. ‘रोचक गोष्टीची सुरवात’ या कथेला तो निवडणूक किंवा ‘ठेवलेल्याची क्षणचित्रे’ या कथेला तो झीरो वायरमन असंही शीर्षक देऊ शकला असता.

निवेदन शैली असो की कथासूत्र. रंजकता वाढवावी म्हणून सावंत कुठेही वर्णनाच्या सुमारीकरणाचा आधार घेत नाहीत. यातल्या काही कथा वाचताना जयंत पवार यांच्या फिनिक्सची आठवण येते. त्यांनी ‘न सांगायची गोष्ट’मधे जी गोष्ट सांगितलीय ती तर विस्मयकारी कथा आहे.

गाव नव्याने समजावणाऱ्या कथा

कथासंग्रह म्हणून सीताराम यांचा हा पहिलाच संग्रह आहे. जवळपास दीड दशकात लिहिलेल्या त्यांच्या कथा यात आहेत. अतिशय सघन अशा ह्या कथा वाचकाला समृद्धी देणाऱ्या कथा आहेत. सावंतांच्या कुठल्याही औपचारिक अभिनंदनापलीकडची ही गोष्ट आहे.

सीताराम सावंत यांची माणूस म्हणून असणारी प्रकृती ध्यानात घेता त्यांनी स्वतःला फसवून ही कथा लिहिलीय असं माझ्यासारख्याला कायम वाटत जातं, हेच त्यांचं यश मानावं लागेल. नव्याने खेडी आणि आपलं समाजवास्तव समजू घेऊ, लिहू पाहणाऱ्या प्रत्येकाने वाचावी, समजून घ्यावी अशी ही समृद्ध कथा आहे.

कथासंग्रह : हरवलेल्या कथेच्या शोधात
लेखक : सीताराम सावंत
प्रकाशक : लोकवाड्मय गृह
किंमत : २५० रुपये

हेही वाचा:

तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध

‘लाल श्याम शाह’ हे पुस्तक मी का लिहिलं?

आगळ ही कादंबरी गाव आणि शहर यांच्यातला संवादसेतू

‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं

0 Shares:
You May Also Like
संपूर्ण लेख

आदिपुरुष : नव्या पिढीचं नवं रामायण

दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा नव्या पिढीला रामायण नव्याने सांगू पाहतोय. या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा कित्येकांनी…
संपूर्ण लेख

सावधान… भारतावर आदळणारी वादळं वाढतायत!

किनाऱ्यावर आदळलेल्या भयंकर लाटांचे वीडियो तुम्हाला सोशल मीडियावर आले असतील. बिपरजॉय वादळ गुजरातकडे गेल्याचे मेसेजही तुम्हाला आले असतील.…
संपूर्ण लेख

महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई हीच क्रिकेटची खरी लवस्टोरी

तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकला. त्याची एक झलक पाहण्यासाठी आजही तरुणाई अक्षरश: आपला जीव ओवाळून टाकते.…
संपूर्ण लेख

करियर करणाऱ्या पोरींसाठी एग फ्रीजिंग ठरतंय वरदान

अभिनेत्री प्रियांका चोप्राने मध्यंतरी आपण वयाच्या तिशीमधे एग फ्रीजिंग केल्याचा खुलासा केला होता. सुपरस्टार रामचरण आणि उद्योजिका असणारी…
संपूर्ण लेख

‘फायर इन द माऊंटन्स’ : सरकारी आश्वासनांचा फसलेला रोडमॅप

सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच ‘फायर इन द माऊंटन्स’ हा नवा सिनेमा रिलीज झालाय. वरवर पाहता, या…
संपूर्ण लेख

पर्यावरण रक्षणासाठी हवी प्लॅस्टिकचीच सर्जरी!

प्लॅस्टिकचं संकट इतकं गहिरं झालंय की, पाण्यामधे, अन्नामधे आणि मानवी रक्तामधेही प्लॅस्टिकचे अंश सापडतायत. संशोधकांनी याबद्दल वारंवार इशारे…