दंगली पेटल्या तर महाराष्ट्रहिताची राखरांगोळी होईल

क्रूरकर्मा औरंगजेबाने आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची हाल हाल करून निर्घृण हत्या केल्याचा संताप प्रत्येक मराठी माणसाला आजही असतोच असतो. मग जात धर्म कोणताही असो. त्यावेळीही तसंच होतं. आजवर तसंच होतं. मग अचानक औरंग्याला अभिमानानं मिरवणार्‍या प्रवृत्ती कुठून अचानक उपजल्या? हे आहेत तरी कोण? महाराष्ट्रात अशांतता निर्माण करणाऱ्या या प्रश्नांची उत्तरं शोधायला हवीत.

सद्य परिस्थितीत क्वचितच असा एखादा दिवस जात असेल की, जेव्हा काही भलतं-सलतं घडत नसेल. हिंदू-मुस्लिम तणाव आता उत्तरेतल्या काही राज्यांप्रमाणे महाराष्ट्राचीही ओळख बनू पाहतोय की काय अशी भीती भेडसावू लागलीय.

महाराष्ट्रानं जिहादी शक्तींना कधीच जुमानलं नाही. इतिहासापासून आजवर महाराष्ट्रानं अशा जिहादींना रोखलंय. पण, आता एक वेगळंच जिहाद अवघ्या महाराष्ट्राला अस्वस्थ करू लागलं आहे. हे जिहाद म्हटलं तर सामाजिक, म्हटलं तर राजकीय आहे. ते आहे लव जिहाद!

हेही वाचाः तुमचं जळकं हिंदुराष्ट्र नको, असं प्रबोधनकारांचा वारसदार का म्हणतोय?

लव जिहादचा मुद्दा तापतोय

गेले काही महिने देशाप्रमाणेच महाराष्ट्रातही लव जिहाद हा शब्द जास्तच चर्चेत आणला जात आहे. हिंदू तरुणींना मुस्लिम तरुण फुस लावतात. प्रेमाच्या जाळ्यात ओढतात, त्यातून पुढे धर्मांतर आणि निकाह. त्यालाच लव जिहाद संबोधलं गेलं. त्यातूनच लव जिहाद… लव जिहाद… असा घोषा तर खूप लावला गेला. जात आहे.

हिंदू तरूणी-मुस्लिम तरुण अशा लग्नाच्या घटना यापूर्वी घडत नव्हत्या असं नाही. त्यातून त्या-त्या वेळी स्थानिक पातळीवर तणाव निर्माण होत नसे, असंही नाही. आपल्या समाजातली स्त्री दुसर्‍या समाजात जाणं, हे अनेकदा पुरुषी मानसिकतेला खटकतच. त्यातून संघर्षही होत असे. नाही असं नाही. पण ते स्थानिक पातळीवर, तेवढ्यापुरतं असे. पण आता कुठंही असं काही घडलं की लगेच लव जिहादचा घोष सुरु होतो आणि मोर्चे काढण्याचं एक सत्रही सुरु होतं.

त्यातून पूर्वी स्थानिक पातळीवर असणारा विषय आता राज्यपातळीवरचा विषय बनतोय. नव्हे बनू लागलाय. राज्य पातळीवरील नेते आक्रमकतेने त्यावर बोलतात. त्यातून लव जिहादचा मुद्दा हा महाराष्ट्रभरात वातावरण तापवणारा ठरतो. लव जिहादविरोधी अशा मोर्चांमधूनच मग संघर्षही उफाळू लागतो. नगर जिल्ह्यात समनापूरमधला संघर्ष हा अशा मोर्चानंतरचाच! तसंच शेवगाव, संगमनेर आणि नगर शहरातही तणाव निर्माण होणार्‍या घटना घडल्या.

भंगतेय ती शांतताच!

महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येनं मराठा क्रांती मोर्चे निघालेत. तेही एक-दोन नाही, तर तब्बल ५७ ठिकाणी निघालेत. लाखोंची संख्या असायची. पण सकल मराठा समाजाच्या नावाने निघालेले हे मोर्चे प्रत्येक ठिकाणी शांतता आणि शिस्तीचा आदर्श घालून द्यायचे. त्याच महाराष्ट्रात सकल हिंदू समाजाच्या नावाने मोर्चे निघाले की शांतता बिघडण्याची भीती का निर्माण होते? त्यात मोर्चात सामील होणार्‍यांपेक्षा आगलावी वक्तव्य करणारे नेतेच जबाबदार असल्याचं म्हटलं जातं.

अर्थात हे एकाच बाजूनं होतं, असं नाही. नगरच्या संगमनेर तालुक्यातल्या समनापूरमधल्या तणावानंतर एका नेत्यांनी मोर्चेकरी परतताना काहींनी दगडफेक केली, त्यातून हिंसाचार झाल्याचा आरोप केला. दगडफेक करणार्‍यांनी आधीच दगड आणले होते, असाही आरोप त्यांनी केला. नेते सांगतात, तशी मोर्चेकर्‍यांवरची दगडफेक पूर्वनियोजित होती, तर पोलिसांनी आधीच खबरदारी का घेतली नव्हती असा प्रश्न निर्माण होतो.

कारण याआधीही नगरच्याच शेवगावमधे छत्रपती संभाजी महाराज मिरवणुकीच्यावेळी दगडफेकीच्या घटनांनी तणाव निर्माण झाला होता. त्यावेळीही एका समाजानं मिरवणुकीवर दगडफेकीचा आरोप झाला. पण, त्याचवेळी मिरवणुकीतून एका प्रार्थनास्थळावर दगडफेकीचा आरोपही झाला. दगड पहिला कुणीही मारलेला असो, भंगली ती मात्र शेवगावची शांतताच!

हेही वाचाः खुळी न जनता फसेल आता, पुरे करा हे ढोंग!

औरंग्या स्टेटसमधे आलाच कसा?

दिल्लीतून दख्खनेत आलेल्या परक्या मुघल बादशहा औरंगजेबाविषयी आपुलकी बाळगेल, असा या अवघ्या महाराष्ट्रात, आपल्या मातीत, आपला माणूस असूच कसा शकतो? क्रूरकर्मा औरंगजेबाने आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून त्यांची निर्घृण हत्या केल्याचा संताप प्रत्येक मराठी माणसाला आजही असतोच असतो. मग जात धर्म कोणताही असो.

त्यावेळीही तसंच होतं. आजवर तसंच होतं. मग अचानक औरंग्याला अभिमानानं मिरवणार्‍या प्रवृत्ती आता कुठून अचानक उपजल्या? हे आहेत तरी कोण? आजवर औरंग्याच्या समर्थनार्थ अ ही न उच्चारला जाणार्‍या ठिकाणीही एखाद्या कुनियोजित कटाप्रमाणे क्रूरकर्मा औरंगजेब फोटो, स्टेटसमधे कसा झळकू लागला?

छत्रपती संभाजीनगरचं पूर्वीचं नाव औरंगाबाद. तिथं काही रझाकारी प्रवृ्त्तींकडून द्वेष उफाळताना दिसतोही. आता मात्र थेट औरंगजेब मिरवत इतरांना चिथावण्याचे प्रकार सुरु झाले. तिथं झाले तर ते इतरत्रही घडलं. त्यानंतर कोल्हापुरात तसं घडलंच कसं? कारण कोल्हापुरात सर्व होऊ शकतं, पण हिंदू – मुस्लिम संघर्ष आणि त्यातून तणाव असं घडूच शकणार नाही, असं मानलं जात होतं. पण तिथंही औरंग्या मिरवण्यातून वातावरण तापवलं गेलं. पेटवलं गेलं. तेच मग इतर ठिकाणीही पसरलं.

आपल्याकडे अनेकदा धर्माच्या राजकारणावर मात करण्यासाठी जातीचा फॉर्म्युला सांगितला जातो. मंडल विरोधात कमंडल अशी आधीच्या मांडणीची आठवण करून दिली जाते. आजही तसं घडताना दिसतं. यावेळी मात्र महाराष्ट्राला अस्वस्थ करणार्‍या घटना एकाचवेळी धार्मिक तणावाच्या जशा आहेत, तशाच जातीय तणावाच्याही आहेत.

जातीय तणावाच्या घटना

नांदेडच्या बोंढार हवेलीत अक्षय भालेराव या तरुणाची हत्या झाली. गावात आंबेडकर जयंतीची मिरवणूक नको म्हणून अक्षयची हत्या एका गटाचा आरोप तर दुसर्‍यांचं म्हणणं तशी मिरवणूक नव्हतीच सांगत खून झालेल्या अक्षयवरच आरोप करणारा. इथंही कारण काहीही असलं तरी एका तरुणाची गावगुंडांकडून निर्घृण हत्या होणं, हे संतापजनकच आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावरही जातीय तणाव वायरल होऊ लागला. पण, जाणत्या नेटकर्‍यांनी वेळीच संयमाने तो टाळला.

एकीकडे नांदेडचं बोंढार हवेली, तर दुसरीकडे लातूरमधलं रेणापूर. तिथं गिरीधर तबकाळे यांनी सावकार लक्ष्मण मार्कंडकडून व्याजावर ३ हजार रुपये कर्ज घेतलं होतं. पण आर्थिक परिस्थितीमुळे ते फेडू शकले नाहीत. सावकार मार्कंड यांनी धमकावलं. त्यानंतर गिरीधर पोलिसांकडे गेला. ते कळताच सावकाराने त्याच्या डोळ्यांमधे मिरची बुक्की टाकत त्यांची निर्घृण हत्या केली. तिथंही ज्याने जीव गमावला तो दलित समाजातला आहे.

महाराष्ट्रात जातीय तणावाच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. पण, आता एकीकडे महाराष्ट्र धार्मिक तणावाच्या घटनांनी अस्वस्थतेनं खदखदत असताना जातीय तणावाच्या घटना अधिकच अस्वस्थ करणार्‍या आहेत.

हेही वाचाः कॅनडातला इराणी म्हणतो, जॉर्ज फर्नांडिस माझा बाप!

पोलीस काय करतायत?

औरंगजेब, लव जिहाद, जातीयवाद. मुद्दे कारणं काहीही असो. पण या सर्वच प्रकरणांमधे एक समान धागा आहे. तो आहे पोलिसांचा. लव जिहाद, औरंगजेब हे मुद्दे महाराष्ट्राला अस्वस्थ करू लागले आहेत. त्यासाठी काही प्रवृत्ती काम करू लागल्या आहेत.

हे पोलिसांना कळलंच नसेल? पोलिसांनी ते रोखण्यासाठी काहीच केलं नसेल? धार्मिक ताणतणावासाठी कारणीभूत असणार्‍यांना दयामाया दाखवूच नये. पण संभाजीनगरमधे ज्यांनी औरंगजेब नाचवला ते जामिनावर लगेच बाहेरही आले. असं कसं?

नगरमधे वातावरण तापतंय याची पोलिसांना कल्पना होती. तरीही मोर्चा, मिरवणूक काहीही असलं तरी पोलिसांनी दगडफेक होऊ नये, यासाठी खरंच योग्य काळजी घेतली का, असा प्रश्नच आहे. राजकारण्यांना दगडफेकीसाठी दगड आधीच आणून ठेवले होते, याची माहिती मिळते, तर पोलिसांना ती आधीच मिळवून दगडफेक टाळता आली नसती?

राजकारण्यांना परिस्थिती बिघडत असल्याचे संकेत लक्षात येत असतील, त्याची गंभीर दखल पोलीस का घेत नाहीत? तसं घडू नये, काही बिघडू नयेत, यासाठी आधीच काही दक्षत बाळगावी, पुरेशी तयारी करावी, असं पोलिसांनी काही केलं नसेल, तर तसंही का घडलं यावर विचार गरजेचा आहे.

तर महाराष्ट्रहिताची राखरांगोळी

विरोधक म्हणतात, त्याच भागात दंगल घडली, असं सत्ताधारी म्हणतात. पण हे सारं घडत असताना पोलिसांनी दंगल रोखण्यासाठी नेमकं काही केलं की नाही, याचीही चौकशी आता गरजेचीच आहे. तरच दंगलीचे खरे मास्टरमाईंड पकडले जातील.

सर्वात महत्वाचं, गेल्या काही महिन्यांमधल्या घटनांनी सत्ताधारी असो की विरोधक सार्‍यांनीच अस्वस्थ होण्याची गरज आहे. दंगली पेटवून मतांची उब मिळवण्याचं प्रयोग घातकच. या दंगली वणव्यासारख्या भडकल्या तर मात्र त्या महाराष्ट्रहिताची राखरांगोळीच करतील. त्यावेळी मात्र महाराष्ट्र कुणालाही माफ करणार नाही, एवढं निश्चित!

हेही वाचाः

चला सगळे मिळून संभ्रमित होऊया!

ऐन निवडणुकीत राष्ट्रवादाचा मुद्दा पेटवणं कुणाच्या हिताचं?

मोदींचा नवा भारत आणि आमचा नवा भारत वेगळा, कारण

इस्लामविषयी साध्यासोप्या मराठीत ए टू झेड माहिती देणारं पुस्तक बाजारात

0 Shares:
You May Also Like
amphibians endangered
संपूर्ण लेख

उभयचर नष्ट होताहेत, उरलेल्या जीवसृष्टीवरही धोक्याची घंटा!

जगप्रसिद्ध ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान…
संपूर्ण लेख

‘लिव्ह इन’ की ‘लग्न’ यावर उत्तर कसं शोधणार?

‘लिव्ह इन’ अर्थात लग्नाशिवाय शारीरिक संबंधात राहण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या…
संपूर्ण लेख

सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य उलगणारा ‘बेन्नू’तील खजिना

पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘नासा’नं २०१६ मधे यान पाठवलं होतं. ते यान या लघुग्रहावजवळ…
संपूर्ण लेख

लॅटिन अमेरिका ही पर्यावरणपुरक जगासाठी नवी अर्थशक्ती

लॅटिन अमेरिकेत,  दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ३३ देशांचा समावेश होतो. लॅटिन हे नाव सर्वप्रथम फ्रान्सचे सर्वेसर्वा असलेल्या तिसऱ्या…
संपूर्ण लेख

फक्त ८० रुपयात ‘लिज्जत’ हा ब्रँड घडविणाऱ्या आज्जी गेल्या

ही गोष्ट आहे, १९५९ मधली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो भारावलेला काळ होता. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू देशाची नवी…
संपूर्ण लेख

सत्यशोधक पत्रकारितेचे विस्मृतीत गेलेले अतुलनीय योगदान

एकोणिसाव्या शतकातील नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा आणि आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले…