किनाऱ्यावर आदळलेल्या भयंकर लाटांचे वीडियो तुम्हाला सोशल मीडियावर आले असतील. बिपरजॉय वादळ गुजरातकडे गेल्याचे मेसेजही तुम्हाला आले असतील. आजवर क्वचित कधी तरी येणारी ही वादळं आता वारंवार येऊ लागलीत. गेल्या चाळीस वर्षात भारतावर आदळणाऱ्या वादळांची संख्या तब्बल ८० टक्क्यांनी वाढलीय. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि तुमच्याआमच्या जगण्यावर परिणाम होणार आहे.
दरवर्षी ५ जूनला पर्यावरण दिनांचं स्टेटस ठेवलं किंवा फार फार तर झाड लावण्याची एक पोस्ट शेअर केली, आपलं पर्यावरणाविषयीचं कर्तव्य संपतं. हे सगळं करणारेही जेमतेम शंभरातले पाच-दहा जण. बाकी उरलेले ९०-९५ जण हे फक्त ‘साला, काय उकडतंय’ एवढं बोलून एअर कंडिशनचं टेम्प्रेचर आणखी कमी करणाऱ्यातलेच.
हे सगळं सांगण्यामागचा हेतू एवढाच की, ते क्लायमेट चेंज वगैरे फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत असं अनेकजण बोलतात. क्लायमेट चेंज गांभीर्यानं न घेणाऱ्यांना आता हे सांगायला हवंय की, हवामानातला बदल आता दिसायला लागलाय.
अर्धा जून महिना संपला तरी पाऊस धड आलेला नाही. बिपरजॉय वादळ महाराष्ट्रात आलं नसलं, तरी ते काही शेवटचं वादळ नाही. भारतावर आदळणाऱ्या वादळांची संख्या वाढतेय. देशासाठी ही चिंतेची गोष्ट आहे, असं हवामान तज्ञांनी निक्षून सांगितलंय.
बिपरजॉय हे दीर्घकाळ घोंगावणारं वादळ
बिपरजॉय नावाचं वादळ आपल्या दिशेने येतंय, असं आपण गेले काही दिवस ऐकतोय. ६ जून रोजी हे चक्रीवादळ मध्यपूर्व अरबी समुद्रात तयार झालं. पुढच्या एक दोन दिवसात ते सौराष्ट्र-कच्छ किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या वादळाचा जीवनकाल हा आजवरच्या वादळापेक्षा सर्वाधिक असेल, अशी शक्यता वर्तवली जातेय. कारण हा जीवनकाल साधारणतः पाच ते सहा दिवसांचा असतो.
आजवर अरबी समुद्रात निर्माण झालेलं क्यार आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं गज या वादळांचा जीवनकाल नऊ दिवस १५ तास होता. आता बिपरजॉय काय करतं, हे पुढच्या एक-दोन दिवसांत स्पष्ट होईल. पण ग्लोबल वार्मिंगच्या प्रभावामुळे अरबी समुद्रावतली चक्रीवादळं अधिक वारंवार आणि तीव्र होत असल्याचं निरीक्षण हवामान खात्यानं नोंदवलंय.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी, २०२१ च्या माहितीप्रमाणे केलेल्या अभ्यासानुसार, गेल्या चार दशकांमधे अरबी समुद्रात चक्रीवादळांच्या कालावधीत ८० टक्के वाढ झालीय. तर, अतिशय तीव्र चक्रीवादळांचा कालावधी २६० टक्क्यांने वाढलाय ही माहिती रत्नागिरी शासकीय मत्स्य महाविद्यालयाच्या सागरी जीवशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ.स्वप्ना मोहिते यांनी दैनिक ‘पुढारी’ला दिलीय.
हेही वाचा: दिल क्यों पुकारे आरे आरे?
हवामान बदलतेय, वारंवार वादळं येतायत
वाढतं उन, नको झालेला उकाडा, कधीही पडणारा पाऊस, बदलत चाललेली थंडी या साध्यासाध्या गोष्टींमुळेही सामान्य माणसालाही कळतंय की, हवामानात मोठे बदल होतायत. पण शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात या पलीकडेही बरंच काही सांगितलंय. त्यांच्या म्हणण्यानुसार हवामान बदलाचे परिणाम समुद्रावर मोठ्या प्रमाणात दिसत असून, वाढती वादळं हा त्याचाच परिणाम आहे.
मान्सूनच्या आधीच्या कालावधीत अरबी समुद्रामधे तयार होणाऱ्या चक्रीवादळांच्या संख्येत ४० टक्क्यांनी, तर मान्सूनच्या नंतर होणाऱ्या वादळांची संख्या २० टक्क्यांनी वाढलीय. जून महिन्यात अरबी समुद्रात मान्सूनचे वारे सक्रीय होत असल्याने जूनमधे चक्रीवादळ होण्याचे प्रमाण नगण्य असतं. मात्र मान्सूस कमकुवत असतो आणि समुद्राचं तापमान वाढतं तेव्हा चक्रीवादळाचा धोका वाढतो.
१९६५ ते २०२२ या काळात जून महिन्यात अरबी समुद्रात एकूण १३ चक्रीवादळं तयार झाली. त्यातली दोन वादळं गुजरातच्या, एक महाराष्ट्राच्या, एक पाकिस्तानच्या तर तीन ओमानच्या किनाऱ्यावर आदळली. सहा चक्रीवादळं समुद्रातच क्षीण झाली. जूनमधली ही वाढती आकडेवारी हवामान बदलाचा परिणाम सिद्ध करण्यासाठी पुरेशी आहे.
उसळलेल्या लाटा किनारपट्टीला धोकादायक
चक्रीवादळाचा वारा सुरू होतो, त्यावेळी समुद्रातल्या लाटांची उंची हळूहळू वाढत जाते. लाटांच्या तरंगांची लांबी आणि कालावधी दोन्ही वाढत जातात. जसजसा वारा चालू राहतो किंवा त्याचा वेग वाढतो तसतसं पाणी आधी फेसाळ बनतं आणि लाटा फुटू लागतात. खोल सागरात या लाटा चक्रीवादळाच्या ऊर्जेमुळे तयार होतात.
पूर्ण विकसित समुद्रातल्या अशा लाटा, त्यांना निर्माण करणार्या वादळाला मागे टाकतात, प्रक्रियेत त्यांची उंची लांबते आणि कमी होते. यांना स्वेल वेव असं म्हटलं जातं. या लाटा जितक्या लांब असतील तितक्या वेगाने त्या प्रवास करतात. लाटा किनाऱ्याजवळ आल्यानंतर, तिथल्या तळाच्या उंचसखलतेमुळे त्यांच्या प्रवासाची दिशा बदलू शकते.
खोल पाण्यात त्यांची उंची कित्येक पटीने वाढते. किनाऱ्यावर समुद्राचा तळ उथळ असेल तर लाट अधिक मजबूत बनते आणि शेवटी या लाटा स्टॉर्म सर्ज म्हणून किनार्यावर फुटतात. गणपतीपुळे, मुरूड, अलिबागमधले जे वीडियो फिरले ते या अशाच लाटांचे होते, हे समजून घ्यायला हवं. या लाटांमुळे किनारपट्टीवर जनजीवन धोक्यात येऊ शकतं.
हेही वाचा: ‘आरे’ला कारे केल्याने मुंबईतली एक संस्कृती हरवणार आहे!
हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचं आव्हान
बिपरजॉय गुजरातच्या दिशेने चाललंय, हे कळताच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कामाला लागलीय. आतापर्यंत गुजरातच्या किनारी भागातून आठ हजाराहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. तसंच दीड ते दोन लाख लहानमोठे प्राणीही हलवण्यात आले. पोरबंदर, द्वारका, जामनगर, जुनागढ, मोरबीतल्या लोकांचा यात प्रामुख्याने समावेश आहे.
गुजरात किनारपट्टीरचे अनेक उद्योगधंदे बंद करण्यात आले असून, रेल्वेनेही आपली वाहतूक बदललीय. सर्व मोक्याच्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन केंद्रं, माहिती केंद्रं, मदत केंद्रं सज्ज ठेवण्यात आलीय. सर्व संपर्क यंत्रणा आणि औषधांची सर्व व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलीय. या वादळामुळे कमीत कमी नुकसान व्हावं, यासाठी गुजरातबाहेरही पर्यायी यंत्रणांना अलर्ट ठेवण्यात आलंय.
वादळासाठी ही अशी सज्जता ठेवणं, हे आता दरवर्षीचं काम बनलंय. भविष्यात वादळांची वारंवारता अशीच कायम राहिली, तर या भागातल्या जीवनमानावर त्याचा मोठा परिणाम होईल. किनारपट्टीचा प्रदेश हा आर्थिक आणि व्यापारी घडामोडींसाठी सर्वाधिक महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे किनारपट्टीवर झालेल्या या बदलांचा परिणाम पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होणार, हे विसरून चालणार नाही.
हवामान बदल हे मानवी स्थलांतरांचं मोठ कारण
आजवर जगभरात झालेल्या मानवी स्थलांतराच्या मागे हवामान बदल हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे या वाढणाऱ्या वादळांकडे आणि किनारपट्टीला सतत बसणाऱ्या फटक्यांकडे या दृष्टिकोनातूनही पाहणं आवश्यक आहे. हे स्थलांतर अचानक होत नसलं तरी त्याचं प्रमाण बदलत जातं आणि त्यामुळे इतर भागावरचा ताण वाढतो, हे समजून घ्यायला हवं.
इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन म्हणजे आयओएमच्या म्हणण्यानुसार, २०५०पर्यंत हवामान बदल आणि पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे अडीच कोटी ते एक अब्ज लोकांना आपलं घर सोडून दुसरीकडे जावं लागेल. दक्षिण आशियात हे प्रमाण मोठं आहे. एकट्या भारतातच २०५० पर्यंत हवामान बदलामुळे होणाऱ्या स्थलांतरितांची संख्या तिप्पट होईल.
एक गोष्ट इथे समजून घ्यायला हवी की श्रीमंत आणि उच्चवर्गीय लोकांसाठी स्वेच्छेने स्थलांतर करून दुसरीकडे जाणं शक्य असतं. पण जे गरीब आहेत त्यांना यात सर्वाधिक फटका बसतो. त्यांची रोजीरोटी तिथल्या स्थानिक गणिताशी जोडलेली असल्याने ते त्या भूभागावर अवलंबून असतात. अशा लोकांना तिथून बाहेर निघणं अधिक अवघड बनतं.
या सगळ्याचा साकल्याने विचार करता, आज होत असलेले हवामान बदल हा उद्याच्या भविष्यासाठी धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे वादळांची वाढती संख्या, वाढती क्षमता, सोशल मीडियावर पसरणारे वीडियो या सगळ्याकडे फक्त एक बातमी म्हणून पाहू नका. हवामान बदल रोखण्यासाठी आपण काय करू शकतो, याचा गांभीर्याने विचार करा आणि तशी पावलंही उचला.
हेही वाचा:
जंगलातून मेट्रो धावताना जंगल उरेलच कसं?
`आरे, ऐका ना` हा हॅशटॅग ट्रेंड होण्यामागे अशी गडबड सुरूय
कोल्हापूरसाठी धावणारे आपण गडचिरोलीच्या पुराकडे दुर्लक्ष का करतो?
अमेझॉनच्या जंगलातली आग विझवण्यासाठी ब्राझीलने चक्क मिलिट्री पाठवली