नागालँडमधे कुत्र्याच्या मांसविक्रीवरची बंदी का उठवली?

माणसानं काय खावं आणि काय खाऊ नये, यावरून जगभर वाद झालेले आहेत. त्यातलाच एक वाद नुकताच भारतात झाला. नागालँडमधे पिढ्यानपिढ्या असलेली कुत्र्याचं मांस खाण्याची पद्धत ही अमानवी ठरवून, त्यावर २०२० मधे बंदी आणली होती. हे प्रकरण कोर्टात गेलं. कोर्टानं ही बंदी उठवलीच पण यावेळी केलेलं भाष्य हे देशात खाण्यावरून भेदाभेद करणाऱ्यांसाठी मोठी चपराक ठरलाय.

खाण्यावरून भेदाभेद करण्याची सवय माणसाला फार पूर्वीपासून आहे. भारतात तर हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर राहिलंय. मांसाहार करतो म्हणून इमारतीत राहू न देण्यापासून एखाद्या प्राण्याचं मांस बाळगलं म्हणून झालेल्या हत्यांपर्यंतच्या अनेक घटना आपल्याकडे झाल्यात. या सगळ्या प्रकरणांसंदर्भात माणसाच्या आहारासंदर्भातला महत्त्वाचा खटला नुकताच गुवाहटी हायकोर्टात पूर्ण झाला.

कुत्र्याचं मांस खाणं हे भले देशातल्या अनेकांना पटणारी गोष्ट नसली, तरी देशातल्या एका भागात ते खाणं ही पद्धत आहे. हे स्वीकारता येणं शक्य आहे, असं सांगत कोर्टानं माणसाच्या आहारासंदर्भातल्या सवयींवर इतरांनी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्यावर ताशेरे ओढलेत. कोर्टाच्या या निर्णयामुळे एकीकडे नागालँडचा हा प्रश्न सुटला असं जरी वाटत असलं, तरी अन्न म्हणजे काय? या संदर्भात नवा वाद वाढण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

नक्की काय आहे हे प्रकरण?

कुत्र्याचं मांस खाणं हा नागालँडमधल्या आहारपद्धतीचा भाग आहे. तो आजचा नाही, कित्येक पिढ्यानपिढ्या कुत्र्याचं मांस खातात. नागालँडसह चीन, कोरिया, थायलंड इथंही कुत्र्यांचं मांस खाल्लं जातं. पण नागालँडचे मुख्य सचिव तेमजेन टॉय यांनी ४ जुलै २०२०ला अध्यादेश काढून कुत्र्याच्या मांसविक्रीवर, आयातीवर आणि व्यापारावर बंदी आणली.

कच्च्या किंवा शिजलेल्या कोणत्याही स्वरुपात कुत्र्याची मांस विक्री बेकायदेशीर ठरवण्यात आली. तिथल्या उपाहारगृहातही कुत्र्याचं मांस असलेले पदार्थ मेनूकार्डमधून काढून टाकायला सांगितलं गेलं. या आदेशाचं उल्लंघन केलं तर भारतीय दंड संहितेच्या ४२८ आणि ४२९ या कलमांद्वारे शिक्षा होईल, असं स्पष्ट करण्यात आलं. प्राण्यांविरोधातल्या क्रुरतेसंदर्भातल्या कायद्याचंही बंधन लागू करण्यात आलं.

या सगळ्यामागे प्राणीमित्र आणि संघटना होत्या. भारतात इतर कुठेही ही पद्धत नसल्यानं इथंही त्यावर बंदी घालावी अशी त्यांची मागणी होती. पण या निर्णयाला मांसविक्रेते आणि नागालँडमधल्या काही गटांचा आक्षेप होता. त्यांनी हे प्रकरण कोर्टापुढे मांडलं. या खटल्याचा निर्णय जून २०२३ मधे लागला. त्यात गुवाहटी हायकोर्टाने ही बंदी उठवलीय.

हेही वाचा: गुड फॅट आणि बॅड फॅट ही नेमकी भानगड काय?

हायकोर्टानं काय म्हटलंय?

अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २०११ नुसार मेंढी, शेळी, डुक्कर, गुरे, मासे या प्रजातींमधले आणि कु्क्कुटपालन या गटातले प्राणी यांच्या कत्तलीला परवानगी आहे. भारतात बहुसंख्य भागात खाल्ल्या जाणाऱ्या प्राण्यांत कुत्र्याचा समावेश नाही. त्यामुळे खाण्यायोग्य यादीत कुत्रा नाही, हे आश्चर्यकारक नाही. तरीही ईशान्य भारतातल्या काही भागात ही पद्धत आहे. इतर भागातल्या लोकांना ही कल्पना मान्य करणं अवघड आहे, अशी प्रतिक्रिया देत गुवाहटी कोर्टानं ही बंदी अवैध ठरवली.

नागालँडमधल्या या पद्धतीचे संदर्भ ब्रिटिश लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकातही सापडतात. ब्रिटिश लेखक जे. एच. हटन यांनी १९२१ला लिहिलेल्या ‘द अंगामी नागास, विथ सम नोट्स ऑन नेबरिंग ट्राइब्स’ या पुस्तकात तसंच जे.पी. मिल्स यांनी १९२६ आणि १९३७ला लिहिलेल्या ‘द रेंगमा नागास’ या पुस्तकात तसे संदर्भ आहेत. त्यामुळे ही पद्धत तिथं अस्तित्वात आहे, हे सिद्धही होतं.

अन्न सुरक्षा आणि मानक कायदा या अनुसार, अन्नाची व्याख्या ही कोणताही पदार्थ, मग तो प्रक्रिया केलेला असो, अंशतः प्रक्रिया केलेला असो किंवा प्रक्रिया न केलेला असो, जो मानवी वापरासाठी आहे अशी केलेली आहे. त्यामुळे कुत्र्याचं मांस समाविष्ट होऊ शकण्यासाठी ही व्याख्या ‘विस्तृत आणि उदारमतवादी’ असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय.

क्रौर्य, धारणा आणि बरंच काही

कुत्रा या प्राण्यावर होत असलेल्या अत्याचारासंदर्भात कोर्टापुढं अनेक प्राणीमित्र संघटनांनी पुरावे सादर केले. या कुत्र्यांच्या कत्तलीआधी त्यांच्यावर कसे अत्याचार होतात, हेही कोर्टापुढे मांडलं गेलं. पण या अशा घटनांवर भारतीय दंड विधान आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याद्वारे खटला भरता येऊ शकतो. पण हे पुरावे कुत्र्याचं मांस खाण्यासंदर्भातल्या बंदीसाठी वापरता येऊ शकत नाहीत, असं मत कोर्टानं व्यक्त केलं.

कोर्टाच्या या मतांमुळे काय खावं आणि काय खाऊ नये, हे ठरवण्याचा अधिकार कोणाला? या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट झालं आहे. तरीही भारताच्या कायद्याच्या चौकटीत प्राण्यांविषयीची क्रुरता, धार्मिक मान्यता आणि अन्नपदार्थांची व्याख्या याबद्दल स्पष्टता नाही. त्यामुळे कोर्टाच्या या निर्णयाची अमलबजावणी नागालँडमधे झाली, तरीही देशभर त्यावरून नवे वाद होऊ शकतात.

कोणत्याही प्राण्याची कत्तल कशी करावी, कधी करावी, कधी करू नये यावरूनही आपल्याकडे अनेक धार्मिक श्रद्धा आहेत. तसंच काही प्राण्यांबद्दल काही गटांच्या धारणाही जोडलेल्या आहे. त्यावरून देशात अनेकदा वादाच्या ठिणग्या पडत असतात. या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार केल्यास गुवाहटी हायकोर्टानं दिलेल्या या निर्णयानं पुढच्या खटल्यांसाठी नवं इंधन पुरवलं आहे, असंही म्हणता येऊ शकतं.

हेही वाचा: वेगन म्हणजे वेजिटेरीअन नाही, त्यापेक्षा बरंच काही

ईशान्य भारत आणि शेरेबाजी

ईशान्य भारताबद्दल आधीच आपल्या देशात काही प्रमाणात परकेपणाची भावना आहे, असं अनेकांनी नोंदवलेलं आहे. ईशान्य भारतातल्या नागरिकांकडूनही देशात त्यांना आपलेपणाची वागणूक मिळत नसल्याची तक्रार केली जाते. त्यामुळेच ईशान्य भारतातले अनेकजण देशाच्या इतर भागाला मेनलॅँड म्हणून ओळखतात.

ईशान्य भारतातल्या नागरिकांचं दिसणं, त्यांच्या आहारपद्धती यावर अनेकदा अयोग्य शेरेबाजी, टिकाटिप्पणी केली जाते. त्यामुळे तिथल्या नागरिकांनी आपला निषेधही नोंदवला आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातले आमदार बच्चू कडू यांनी कुत्र्याच्या मांसांसदर्भात केलेल्या विधानामुळे मोठा गदारोळ माजला होता.

राज्यातल्या भटक्या कुत्र्यांसंदर्भात बोलताना कडू यांनी, ‘राज्यातले भटके कुत्रे आसाममधे पाठवून द्यावेत. तिथं कुत्रे खातात’, असं विधान केलं होतं. त्यावर आसामच्या विधानसभेत गोंधळ झाला. ईशान्य भारताबद्दल अनेक भारतीयांच्या मनात असलेल्या परकेपणाचं हे द्योतक असल्याचे लेखही लिहिले गेले. शेवटी बच्चू कडू यांनी माफी मागितली आणि हे प्रकरण निवळलं.

ईशान्य भारताचं वेगळेपण आणि कोर्टाचा निकाल

नागालँडमधल्या कुत्र्याच्या मांसाला मिळालेली परवानगी हा ईशान्य भारताच्या वेगळेपणासंदर्भातला महत्त्वाचा निकाल ठरला आहे. भारतात विविध प्रकारचे आणि विविध आहारपद्धती असलेले लोक आहेत. त्या सर्वांना समावून घेणारी सर्वसमावेशकता घटनाकर्त्यांनी आपल्याला दिली आहे. त्या सर्वसमावेशकतेचा आदर करून आपण ईशान्य भारताचं वेगळेपण स्वीकारणार का? हा खरा प्रश्न आहे.

भारतात आहारासंदर्भात वाद वाढवायचे ठरवले तर कितीही काळ भांडता येऊ शकेल. आज शेजाऱ्याच्या घरात मांसाहार शिजतोय, त्याचा वास आला म्हणून भांडणारी लोक आहेत. तर त्याला उत्तर म्हणून मुद्दाम मांसाहार शिजवून भांडण उकरून काढणारी लोकही आहेत. प्रत्येकाला आपल्याला हवं ते खाऊ देणं. पण त्याचा किमान त्रास दुसऱ्याला होईल, याची काळजी घेणं, हे खरं सामंजस्य आहे. देशातल्या अनेक समुदायांनी हे सामंजस्य शतकानुशतकं दाखवलेलंही आहे.

तरीही काही वेळा राजकीय, धार्मिक किंवा समाजातील विघ्नसंतोषी लोकांकडून हे वाद ठरवून घडवले जातात. त्यात मग सामान्य माणसंही बळी पडतात, असा आजपर्यंतचा इतिहास आहे. आता ईशान्य भारतातल्या कुत्र्याच्या मांसांदर्भातही तेच होऊ नये, यासाठी प्रत्येक भारतीयानं प्रयत्न करायला हवा. आपल्याला ईशान्य भारत हवा आहे, तोही त्याच्या वैशिष्ट्यांसह हवा आहे, याचं भान प्रत्येकानं ठेवायला हवं.

हेही वाचा:

फरक पंजाब आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा

आपल्या ताटातल्या प्रत्येक घासामागे दडलंय पैशांचं गणित

आपल्या मुलांसाठी डाएट प्लॅन गरजेचा की हेल्दी लाईफ प्लॅन?

बॉटलबंद फ्रूट ज्यूस पिणं खरंच हेल्दी आहे की तब्येतीची वाट लागते?

0 Shares:
You May Also Like
amphibians endangered
संपूर्ण लेख

उभयचर नष्ट होताहेत, उरलेल्या जीवसृष्टीवरही धोक्याची घंटा!

जगप्रसिद्ध ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान…
संपूर्ण लेख

‘लिव्ह इन’ की ‘लग्न’ यावर उत्तर कसं शोधणार?

‘लिव्ह इन’ अर्थात लग्नाशिवाय शारीरिक संबंधात राहण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या…
संपूर्ण लेख

सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य उलगणारा ‘बेन्नू’तील खजिना

पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘नासा’नं २०१६ मधे यान पाठवलं होतं. ते यान या लघुग्रहावजवळ…
संपूर्ण लेख

लॅटिन अमेरिका ही पर्यावरणपुरक जगासाठी नवी अर्थशक्ती

लॅटिन अमेरिकेत,  दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ३३ देशांचा समावेश होतो. लॅटिन हे नाव सर्वप्रथम फ्रान्सचे सर्वेसर्वा असलेल्या तिसऱ्या…
संपूर्ण लेख

फक्त ८० रुपयात ‘लिज्जत’ हा ब्रँड घडविणाऱ्या आज्जी गेल्या

ही गोष्ट आहे, १९५९ मधली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो भारावलेला काळ होता. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू देशाची नवी…
संपूर्ण लेख

सत्यशोधक पत्रकारितेचे विस्मृतीत गेलेले अतुलनीय योगदान

एकोणिसाव्या शतकातील नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा आणि आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले…