कोल्हापूरच्या सलोख्याची इमारत एवढी तकलादू नाही!

पाच पंचवीस दगड पडले म्हणून खिळखिळी होईल एवढी तकलादू कोल्हापूरची सलोख्याची इमारत नाही. राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी या इमारतीची वीट रचली आहे. सत्यशोधक समाजाच्या विचारधारेने ही इमारत भक्‍कम बनवली आहे आणि अगदी अलीकडच्या काळापर्यंत कॉ. संतराम पाटील, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. एन. डी. पाटील यांच्यासारख्या पुरोगामी नेतृत्वाने या भूमीची मशागत केली आहे.

स्वातंत्र्यानंतरच्याम काळाचा विचार केला, तरी लक्षात येते की, कोल्हापूर हा डाव्या पक्षांचा बालेकिल्ला आहे. १९९० नंतरची तीस वर्षे कोल्हापूर शहरातून शिवसेनेचा आमदार निवडून येत असला, तरी या शहराचा तोंडवळा पुरोगामी आणि प्रगतिशीलच राहिला. राजर्षी शाहू महाराजांच्या ‘कोल्हापूरने पुरोगामी महाराष्ट्राची राजधानी असा. लौकिक मिळवला. 

निवडणुका आल्या की दंगली घडवायचा फॉर्म्युला

कोल्हापूरच्या या पुरोगामित्वाचा ठसा पुसण्याचे प्रयत्न अनेकवेळा करण्यात आले. विशेषतः, अलीकडच्या काळात निवडणुकीच्या तोंडावर असे प्रयत्न जाणीवपूर्वक झाले. मिरजेत २००९ मधे दंगल झाली होती. कोल्हापुरात २०१४मधे दंगल झाली होती. आता पुन्हा कोल्हापूर दंगलीत होरपळले. या तिन्ही दंगलींना निवडणुकीची पार्श्वभूमी आहे, हे साम्यही लक्षात घ्यावे लागेल, 

आता काळ बदलला आहे आणि लोकांना भडकावण्याची माध्यमेही बदलली आहेत. तंत्रज्ञान हे वरदान आहे तसेच तो शाप म्हणण्याजोगीही परिस्थिती आहे. प्रत्येकाच्या हातात असलेला स्मार्टफोन हे जसे संवादाचे, मनोरंजनाचे प्रमुख साधन बनले आहे तसेच ते स्फोटक हत्यारही बनले आहे. मुर्खांच्या हातातला मोबाईल बॉम्बइतकाच घातक आहे, हे लक्षात घ्यायला हवे.

दंगल घडवायची, तर आता पुतळ्याची विटंबना करायला कुठे चौकात जाण्याचीही गरज उरलेली नाही. कुठेही बसून मोबाईलच्या माध्यमातून ते करणे शक्‍य झाले आहे. त्यामुळे आगामी काळात आपल्या भावना किती नाजूक ठेवायच्या आणि त्या दुखावल्या तर कशा पद्धतीने प्रतिक्रिया द्यायची, हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. 

प्रत्येकानं समाजभान राखायला हवं 

‘ती सध्या काय करते?’ याभोवतीच्या टुकार विनोदांवर टाईमपास करण्यापेक्षा आपला दिवटा ‘काय करतो? यावर पालकांनी लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण, काही गोष्टींचे भांडवल ‘करून राजकीय पोळी भाजून घेणारे आणि दुकानदारी चालवणारे घटक वाढले आहेत. या असल्या दुकानदारांना किती किंमत द्यायची, हे ठरवणं गरजेचं आणि तातडीचंही आहे.

कसलेही भान आणि समज नसलेल्या या मंडळींकडून शहाणपणाची अपेक्षा करणेही व्यर्थ आहे. पण ज्यांची डोकी ठिकाणावर आहेत, त्यांनी समाजभान राखायलाच हवं. व्हॉटस्‌अँपवरच्या छछोर गोष्टी फॉरवर्ड करण्यात शौर्य मानणार्‍या अल्पवयीन मुलांची माथी भडकावण्याचे उद्योग करणार्‍यांनी आपली दुकाने थाटली आहेत. त्याबद्दल सावध राहावं लागणार आहे. 

आंब्याच्या हंगामात जसे हापूस आंब्याचे स्टॉल लागतात तशी निवडणुकीच्या तोंडावर हिंसाचार पसरवणारी दुकाने तेजीत येतात. कुणी कुख्यात त्यागमूर्ती, विख्यात आध्यात्मिक पुरुष किंवा जगण्याची कला शिकवणारी गुरुजी मंडळी गल्ल्यावर बसून हिंसाचाराची दुकाने चालवतात. त्यामुळे कालच्या तुलनेत आजच्या काळात समाजविघातक गोष्टी खूप सोप्या बनल्या आहेत. 

कोल्हापूरचा इतिहास लक्षात घ्या

कोल्हापूर शहरात समाजकंटकांनी जो काही उच्छाद मांडला, त्यात हीच दुकानदारी दिसतेय. हे सगळे घडत असताना प्रारंभी चिथावणी देऊन भडकावणारी नेतेमंडळी ‘हळूच पलायन करतात आणि कारवाईपासून सुरक्षित राहतात. बिथरलेले तरुण गर्दीत मिसळून माथेफिरूपणा करून गुन्हेगारीचा शिक्का मारून घेतात. कुणाच्या तरी चिथावणीला बळी पडून चूक केलेल्या अशा अनेक तरुणांच्या भविष्यापुढे मोठे प्रश्‍नचिन्ह लागले आहे.

अशा घटकांमुळे कोल्हापूरची सामाजिक समतेची वीण उसवेल, असे संबंधितांना वाटत असते आणि त्यांचाही तसाच प्रयत्न असतो. परंतु, अशा घटना एखाद्या वादळासारख्या असतात. वादळ अचानक येऊन सगळे उद्‌ध्वस्त करून जाते. परंतु, वादळानंतर सगळे पुन्हा उभे राहते. माणसे चिवटपणे पुन्हा उभी राहतात. नव्याने जगणे सुरू करतात. अशा सामाजिक वादळांनंतरही कोल्हापूरचे जनजीवन पुन्हा रुळावर येते. 

परवाही काही तासांत कोल्हापूरचे जनजीवन पुन्हा रुळांवर आले. जणू इथे काल काही घडलेच नाही, असे चित्र होते. सामाजिक सलोख्यासाठी आग्रही असणाऱ्या काही मंडळींनी अल्पसंख्य समुदायाच्या लोकांच्या भेटी घेऊन आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी ग्वाही दिली. कोल्हापूरची जी सामाजिक सलोख्याची परंपरा आहे ती पुढे सुरू ठेवण्यासाठी झालेले हे प्रयत्न हीच कोल्हापूरची खरी ओळख आहे आणि खरी ताकदही आहे.  

इस्लाम समजून घेतलेलं कोल्हापूर

कोल्हापूरची सलोख्याची ही परंपण आजची नाही. ती खूप जुनी आहे. शाहू महाराजांच्याही खूप आधीपासूनची. इसवी सनाच्या आठव्या शतकापासून सुफी संतांच्या येण्या-जाण्यामुळे कोल्हापूरला इस्लामचा परिचय आहे. हा इस्लाम समजून घेतल्यानं तो परका वाटलेला नाही. तो कायमच सोबतीनं, सलोख्यानं आणि भावाभावासारखा राहिलेला आहे.

प्रवेशद्वाराच्या कमानीवरच गणपतीची मूर्ती असलेला बाबुजमाल दर्गा हे कोल्हापूरच्या सामाजिक सलोख्याचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. कोल्हापूरची ओळख असलेल्या तालमींमधून मोहरमचे पंजे बसवले जातात आणि सर्वधर्मीय लोक उत्साहाने मोहरम साजरा करतात. त्याच उत्साहाने मुस्लिम लोक गणेशोत्सवात सहभागी होत असतात. 

मुस्लिम शिक्षणावर भर देणारे शाहू महाराज

शाहू महाराजांच्या काळात मुस्लिम समाजातील अगदी बोटावर मोजण्याइतपत मुले शाळेला जायची. अशा मुलांसाठी शाहू महाराजांना स्वतंत्र वसतिगृह उभारायचे होते. त्यांनी काही प्रतिष्ठित मुस्लिम नागरिकांची बैठक घेतली, त्यांच्यासमोर ही संकल्पना मांडली.  मुस्लिम नागरिकांनी यासाठी काही करण्याची इच्छा व्यक्‍त केली. तेव्हा महाराजांनी त्यांना किमान ३,००० रुपये जमा करण्यास सांगितले. उरलेले पैसे दरबाराच्या वतीने देण्याची ग्वाही दिली. 

उपस्थितांनी ४,००० रुपये जमा केले, शाहू महाराजांनीही देणगीचे आश्‍वासन दिले. या बेठकीनंतर मोहमेडन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. शाहू महाराज या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष झाले. शाहू महाराजांचे गुरू सर फ्रेझर यांनी १९२० मधे कोल्हापूरला भेट दिली, तेव्हा त्यांच्याच हस्ते मुस्लिम बो्डिंगच्या इमारतीची पायाभरणी करण्यात आली. शाहू महाराजांनी रोख देणगी देत २५ हजार चौरस फूट मोकळी जागाही दिली.

शाहू महाराजांची दूरदृष्टी आपण विसरायची?

मुस्लिम समाजातील नागरिकांनी त्यांचा कुराण हा धर्मग्रंथ अरबीत असल्याने वाचता येत नसल्याचे
बोलून दाखवल्यानंतर शाहू महाराजांनी स्वतः २५ हजार रुपयांची देणगी दिली आणि कुराण ग्रंथ मराठीत आणला, कोल्हापूर संस्थानातील अनेक ठिकाणच्या मशिदी आणि दर्गे यांचे बांधकाम तसेच दुरुस्तीसाठी शाहू छत्रपतींनी खास जागा व आर्थिक मदत केली आहे. 

१९०४ मधे शाहपुरीतील मशीद बांधण्यास जागा व मंजुरी दिल्याची नोंद आहे. हिंदू देवालयाचे उत्पन्न मशिदीच्या दुरुस्तीसाठी लावून दिल्याच्या ‘काही नोंदी मिळतात. पाटगाव येथील मशिदीसाठी मौनी महाराजांच्या मठाच्या उत्पन्नातून ३०० रुपयांची मदत केली होती. या सगळ्यामागे शाहू महाराजांची धार्मिक सलोख्याची दूरदृष्टी होती, , हे विसरून चालणार नाही.

खाँसाहेब अल्लादियाखां यांना कोल्हापूरला आणून कोल्हापूरला संगीत नगरी बनवले. चित्रकला तपस्वी आबालाल रेहमान यांच्याही पाठीशी महाराज उभे राहिले. आज कोल्हापूरातील कुस्तीची जी ओळख आहे, त्यापाठी शाहू महाराज आहेत, हे सर्वज्ञात आहे. पण या कुस्ती क्षेत्रात गामा, गुंगा, इमामबक्ष, भोला पंजाबी आदी अनेक मुस्लिम पैलवानांनाही त्यांनी आर्थिक प्रोत्साहन दिले आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणले.

पुरोगमी मुस्लिम विचारधारेचीही परंपरा

इथल्या मुस्लिम समाजानेही धर्म बाजूला ठेवून कोल्हापूरच्या पुरोगामी विचारधारेचा प्रवाह बळकट
करण्यात मोलाचे योगदान दिले. मराठा क्रांती मोचाविळी मोर्चा यशस्वी करण्यासाठी सगळीकडे मुस्लिम समाज सोबत होता. फक्त मराठा मोर्चाच्या वेळीच नव्हे, तर अनेक सामाजिक चळवळीत मुस्लिम समाज हा कोल्हापूरात कायमच सोबत राहिलेला आहे. 

कोरोना काळात सख्ख्या नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारांपासून लोक लांब पळत होते. मुलगा आई-बापाच्या अंत्यसंस्कारापासून दूर राहत होता. भाऊ भावाला ओळखत नव्हता. अशावेळी कोल्हापुरातील मुस्लिम समाजाने किती तरी हिंदूंच्या मृतदेहांवर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले. खर्‍या अर्थाने बंधुभाव जागवला. 

समाजात विखार पेरणारे काय करू शकतात याची चांगलीच कल्पना शाहू महाराजांना होती. त्यामुळे भविष्यात कधीही असे प्रसंग आले तरी शाहू महाराजांचा इतिहास माहिती असणारा माणूस अविवेकाने वागणार नाही. त्यासाठी समाजाच्या सगळ्याच क्षेत्रात शाहू महाराजांनी सलोख्याचे पूल बांधले आहेत, ते एवढे भक्‍कम आहेत की, कुणा हुल्लडबाजांच्या हुल्लडबाजीने ते खिळखिळे होणार नाहीत.

0 Shares:
You May Also Like
amphibians endangered
संपूर्ण लेख

उभयचर नष्ट होताहेत, उरलेल्या जीवसृष्टीवरही धोक्याची घंटा!

जगप्रसिद्ध ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान…
संपूर्ण लेख

‘लिव्ह इन’ की ‘लग्न’ यावर उत्तर कसं शोधणार?

‘लिव्ह इन’ अर्थात लग्नाशिवाय शारीरिक संबंधात राहण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या…
संपूर्ण लेख

सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य उलगणारा ‘बेन्नू’तील खजिना

पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘नासा’नं २०१६ मधे यान पाठवलं होतं. ते यान या लघुग्रहावजवळ…
संपूर्ण लेख

लॅटिन अमेरिका ही पर्यावरणपुरक जगासाठी नवी अर्थशक्ती

लॅटिन अमेरिकेत,  दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ३३ देशांचा समावेश होतो. लॅटिन हे नाव सर्वप्रथम फ्रान्सचे सर्वेसर्वा असलेल्या तिसऱ्या…
संपूर्ण लेख

फक्त ८० रुपयात ‘लिज्जत’ हा ब्रँड घडविणाऱ्या आज्जी गेल्या

ही गोष्ट आहे, १९५९ मधली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो भारावलेला काळ होता. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू देशाची नवी…
संपूर्ण लेख

सत्यशोधक पत्रकारितेचे विस्मृतीत गेलेले अतुलनीय योगदान

एकोणिसाव्या शतकातील नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा आणि आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले…