वर्षातील सर्वात मोठा दिवस असलेला २१ जून हा आता आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून ओळखला जातो. हा एक दिवस योग आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करायचा ठरले ते २०१५ पासून. पण योग त्याच्या शंभरेक वर्ष आधीच आंतरराष्ट्रीय झाला होता. फक्त त्याचे नामकरण आणि २१ जूनचा इवेंट हा गेल्या काही वर्षातील आहे.
योग हा आरोग्यासाठी आणि मनःस्वास्थ्यासाठी कसा महत्त्वाचा आहे, हे पटवून देण्यासाठी अनेक योगगुरूंनी आपलं आयुष्य वेचले आहे. त्यांनी उभ्या केलेल्या संस्था कधीच जगभर पोहचल्या होत्या. तसंच योग ही भारतानं जगाला दिलेली अमूल्य ठेव आहे, हेही सगळ्यांनी मान्य केले होते. त्यामुळे भारताला हा बहुमान देणाऱ्या योगगुरूंचं स्मरण आजच्या योग दिनी करणं जास्त सयुक्तिक आहे.
गुरुंचे गुरू असलेले टी. कृष्णमाचार्य
आधुनिक योगपरंपरेचे जनक म्हणून तिरुमलाई ऊर्फ टी. कृष्णमाचार्य यांना ओळखले जाते. त्यांचा जन्म १८ नोव्हेंबर १८८८ रोजी कर्नाटकात झाला. आयुर्वेद आणि योगविद्येचं ज्ञान त्यांनी गुरुपंरंपरेतून मिळविलं होतं. पारंपरिक हठयोगामध्ये श्वास आणि क्रियांचा मिलाफ घडवून त्यांनी ‘विन्यास योगा’ची पद्धत विकसित केली.
महर्षी पतंजलींच्या योगसूत्रांवर आधारित त्यांची शिकवण असे. त्यांनी देश-विदेशात अनेक निष्णात योगगुरू निर्माण केले. बीकेएस अयंगार, टीकेवी देसिकाचार, इंद्रा देवी हे पुढे विख्यात झालेले योगगुरू टी. कृष्णमाचार्यांचे शिष्य होते. या शिष्यांना त्यांनी योेगविद्येसोबत भारतीय वेदिक परंपरांचेही ज्ञान देऊन ते सर्वांसाठी खुले करण्यास शिकविले.
त्यांची योगसाधनेतील तपस्या एवढी मोठी होती की, हृदयाचे ठोके ते एक मिनिटाहून अधिक काळासाठी रोखत असत. मैसूरच्या महाराजांसह अनेक मान्यवरांनी त्यांनी योगविद्या शिकविली. मैसूरच्या महाराजांनी तर त्यांना राजाश्रय दिला आणि जगनमोहन पॅलेसमधे योगशाळा काढण्यास सहकार्य केले. ही योगशाळा दोन दशके सुरू होती.
वैद्यकीय डॉक्टर ते योगाचार्य स्वामी शिवानंद
तामिळनाडूमध्ये १८८७ मधे जन्मलेले स्वामी शिवानंद सरस्वती हे पूर्वाश्रमी एक प्रसिद्ध डॉक्टर होते. मलेशियातही त्यांनी वैद्यकीय सेवा केली होती. वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्यांनी डॉक्टरकीचा पेशा सोडून ऋषीकेश गाठले. तेथे योगविद्येचे शिक्षण घेतले. योग-ध्यान मार्गाने पारमार्थिक ध्येय गाठण्यासाठी त्यांनी साधना केली.
ऋषीकेशला त्यांनी डिवाइन लाइफ सोसायटीची म्हणजे शिवानंद आश्रमाची स्थापना केली. त्यांनी कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग आणि राजयोगाचा सुंदर मिलाफ घडवला. अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असून, त्याच्या आत्मज्ञानाच्या मार्गातील अडथळा आहे. त्यामुळेच माणसाने मी पणाच्या या रोगातून बाहेर पडण्यासाठी योगसाधनेचा वापर करावा, असा त्यांचा उपदेश असे.
या आश्रमात दिगंत ख्याती असलेले अनेक शिष्य घडले. चिन्मय मिशनचे संस्थापक स्वामी चिन्मयानंद, दक्षिण आफ्रिकेतील डिवाइन लाइफ सोसायटीचे अध्यक्ष स्वामी सहजानंद, बिहार योग विद्यालयाचे स्वामी सत्यानंद हे त्यांचेच शिष्य होते. या अशा अनेक शिष्यांनी नंतर योगविद्या जगभर नेली. स्वामी शिवानंदाची योगसाधनेसंदर्भात ३०० हून अधिक पुस्तके प्रसिद्ध आहेत.
गांधी-नेहरूंना योग शिकविणारे स्वामी कुवलयानंद
योगप्रशिक्षणासाठी सुप्रसिद्ध असलेल्या ‘कैवल्यधाम’ या संस्थेचे संस्थापक असलेल्या स्वामी कुवलयानंद यांचा जन्म ३० ऑगस्ट १८८३ रोजी गुजरातमधे झाला. योगविद्येला त्यांनी विज्ञानाशी जोडले. योगासनांचे शरीरावरील परिणाम ते वैज्ञानिक मार्गाने तपासून पाहत. त्यांनी या संशोधन कार्यासाठी ‘योग मिमांसा’ नावाचे नियतकालिकही सुरू केले.
योगविद्येच्या प्रशिक्षणासाठी आणि संशोधनासाठी त्यांनी लोणावळा आणि नंतर मुंबई येथे कैवल्यधाम स्वास्थ आणि योग संशोधन केंद्र स्थापन केले. तेथे आजही योगसंदर्भात विविध शास्त्रीय प्रयोग आणि संशोधन केले जाते. परदेशातही कैवल्यधामचे योगप्रशिक्षण होत असून, विविध क्षेत्रातील लोकांसाठी त्यांनी विशेष कार्यक्रमही केले आहेत.
स्वामी कुवलयानंद हे महात्मा गांधींचे आरोग्य सल्लागार होते. तसंच पंडित मोतीलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू, पंडित मदनमोहन मालवीय यांच्यासारख्या दिग्गजांना त्यांनी योगप्रशिक्षण दिले होते. जगभरातील अनेक जण त्यांच्या प्रभावामुळे योगमार्गाकडे वळले. आपले कार्य पुढे सुरू राहावे, यासाठी त्यांनी योगप्रशिक्षक घडविण्याचा अभ्यासक्रमही आखला.
अमेरिकेत पहिले योगकेंद्र काढणारे स्वामी योगेंद्र
मणीभाई हरिभाई देसाई या नावाने गुजरातेत १८ नोव्हेंबर १८९७ मधे जन्मलेले, स्वामी योगेंद्र यांनी ‘दी योग इन्स्टिट्यूट’ या जगप्रसिद्ध संस्थेचा पाया घातला. याच संस्थेने अमेरिकेतील हरिमन येथे १९२० येथे योग इन्स्टिट्यूट सुरू केली. भारताबाहेर योगविद्या शिकविण्याचा हा पहिलाच संस्थात्मक उपक्रम होता, असं या संस्थेेचं म्हणणं आहे.
मुंबईतील सेंट झेवियर्स शाळेत शिकलेल्या स्वामी योगेंद्र यांना अशा पुस्तकी शिक्षणात फार रुची वाटली नाही. ते बडोद्याजवळी मलसर येथे गेले आणि तेथे त्यांनी माधवदासजी यांच्या आश्रमात योगविद्येचे शिक्षण घेतले. योगविद्येचा उपयोग व्याधीतून मुक्ती मिळविण्यासाठी कसा करता येईल, यासाठीही त्यांनी प्रयोग केले.
१९१८ मधे ते मुंबईत परत आले. दादाभाई नोरोजी यांच्या वर्सोवा येथील घरी त्यांनी ‘दी योग इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली. ही सर्वात जुनी योग प्रशिक्षण संस्था असल्याचे सांगितले जाते. पुढल्या वर्षी स्वामी योगेंद्र अमेरिकेत गेले आणि तेथेही या संस्थेची शाखा सुरू केली. त्यांनी योगविषयक अनेक पुस्तके लिहीली असून आजही ही संस्था कार्यरत आहे.
जगाला ‘अयंगार योग’ शिकविणारे बीकेएस
बेल्लूर कृष्णमचारी सुंदरराज म्हणजेच बीकेएस अयंगार हे आधुनिक योगविद्येचे जनक टी. कृष्णमाचार्य यांचे शिष्य. खऱ्या अर्थाने जो योग जगभर पोहचला, त्या ‘अयंगार योग’चे हे संस्थापक. १४ डिसेंबर १९१८ रोजी त्यांचा जन्म कर्नाटकातील बेल्लूर येथे झाला. लहानपणी आजारामुळे शरीर अशक्त झाल्यावर, त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी योगमार्ग स्वीकारला.
टी. कृष्णमाचार्य हे त्यांचे जवळचे नातेबाईक होते. त्यामुळे हठयोगाला त्यांनी अधिकाधिक लोकांपर्यंत नेण्यासाठी त्यात संशोधन केले. त्यासाठी त्यांनी अयंगर मेमोरियल योग संस्थानाची स्थापना केली. योगविद्या लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी त्याचे प्रदर्शनही केले. पुण्यात मिरवणुकीच्या वेळी त्यांनी रस्त्यावरही योगाची प्रात्यक्षिके केली.
त्यांचं म्हणणं असं होतं की, योगविद्या ही सगळ्यांसाठी आहे. कुणी मुठभरांनी त्यावर मक्तेदारी सांगू नये. तसंच त्यांनी योगविद्येला उपचार म्हणूनही लोकांपर्यंत नेले. पन्नासच्या दशकात जर कोणी आपल्या आरोग्याचा प्रश्न घेऊन त्यांच्याकडे आला तर, ते त्यांच्या डोळ्याचा आणि त्वचेचा रंग पाहून, त्यावर योगोपचार करत असत. त्यांनी लोकप्रिय केलेला ‘अयंगार योग’ शिकविणाऱ्या आज जगभर शेकडो संस्था आहेत.
योग ही भारताची सॉफ्ट पॉवर
योग ही भारताची जगातील ओळख आहे, हे आज सर्वांनाच मान्य असलेले विधान आहे. पण ही ओळख निर्माण करण्यासाठी गेल्या शतकभरात वर उल्लेख केलेल्या आणि त्यांच्यासारख्या अनेक योगगुरूंनी मोठे काम केले आहे. त्यांनी उभ्या केलेल्या पायावर योगविद्येला आज संयुक्त राष्ट्रासह सर्वांनी गौरविले आहे.
या अशा योगगुरूंच्या कतृत्वामुळेच २१ जून हा योग दिन आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वीकारला गेला आहे, हे विसरून चालणार नाही. भारताला आपल्या या सामर्थ्यांची जाणीव कायमच होती. म्हणूनच १९९८ मध्ये मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ योगाची (MDNIY) स्थापना केली गेली. योग साधनेचा आणि तत्त्वज्ञानाचा देशभरात प्रसार हे या संस्थेचे उद्दीष्ट आहे.
योग या शब्दाचा अर्थ होतो, जोडणं. हे माणसाला माणसाशी, देशांना देशांशी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला आत्मशक्तीशी जोडणारी ही विद्या आहे. येथे द्वेषाला, मत्सराला आणि दिखावेगिरीला स्थान नाही. आज दुर्दैवानं स्वार्थीवृत्तीनं प्रत्येक गोष्टीचं बाजारीकरण करण्याची मानसिकता वाढताना दिसत आहे. अशा वेळी भारतातील या आधुनिक योगगुरूनी दाखविलेला प्रेमाचा योगमार्गच सर्वांना तारू शकेल.