टायटॅनिक पाहायले गेलेेले बुडले, यातून आपण काय शिकणार?

माणसाला सतत काहीतरी नवं पाहायचंय. त्याला ते करायचंच, जे इतरांनी केलेलं नाही. त्यासाठी तो नवनवी साहसे करण्यासाठी सतत धडपडतोय. त्यातून त्याच्या थ्रिल हवंय. या साहसांमधून मेंदुला मिळणारी किक त्याला स्वस्थ बसू देत नाहीए. आज विमानातून उड्या मारण्यापासून आकाशातील जेवणापर्यंतच्या अनेक साहसी गोष्टी या श्रीमंतापासून मध्यमवर्गापर्यंत झिरपताहेत.

या सगळ्या साहसामागे प्रत्येक गोष्टीचा बाजार करणाऱ्यांची चांदी होतेय. पण आज बुडलेली टायटॅनिक पाहायला गेलेल्या अब्जाधीशांचाही मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय. हे साहस त्यांच्या जीवावर बेतलंय. त्यासाठी आता नानाविध कारणं दिली जातील. पण प्रत्येक गोष्टीत किक शोधण्याच्या या माणसाच्या विचित्र स्वभावाचं आपण काय करणार आहोत? बाजार भुलवेल तसे आपण फसतच जाणार आहोत का? हा खरा प्रश्न आहे.

टायटॅनिक पाहायला गेलेल्यांचं नक्की काय झालं?

अटलांटिक महासागराच्या तळाशी असलेल्या टायटॅनिक या सुपर पॉप्युलर जहाजाचे अवशेष दाखविण्यासाठी पाणबुडीतून नेण्याचा व्यवसाय अमेरिकेत तेजीत आहे. या एका फेरीसाठी प्रतिमाणसी जवळपास दोन कोटी रुपयांचे तिकीट घेतले जाते. तर अशाच चार जणांना घेऊन टायटन या पाणबुडीचा पायलट गेला होता.

९६ तास पुरेल इतका प्राणवायूचा साठा घेऊन ही पाणबुडी रविवारी १८ जून रोजी समुद्रात गेली. पण काही तासात तिचा संपर्क तुटला. अमेरिकेसह कॅनडाच्या नौदलाने तसेच पाणबुडी ऑपरेट करणाऱ्या ओशनगेट कंपनीने ही पाणबुडी शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण अखेरीस या पाणबुडीचे अवशेष हाती लागले असून, पाचही जणांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आलंय.

या पाणबुडीत मृत पावलेल्यांमधे सर्वजण अब्जाधीश होते. ओशनगेटचे सीईओ स्टॉकटन रश, पाकिस्तानी उद्योगपती शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद, ब्रिटीश साहसवीर हामिश हार्डिंग आणि पायलट पॉल हेनरी नार्जियोलेट अशी त्यांची नावं आहेत. अद्यापही या दुर्घटनेचं कारण स्पष्ट झालं नसलं तरी, पाण्याच्या दबावामुळे या पाणबुडीचा स्फोट झाल्याचं सांगितलं जातंय.

कोट्यवधी रुपये खर्च करून साहस करायला गेलेल्या या सगळ्यांच्या मृत्युमुळे जगभर विविध चर्चा होत आहेत. श्रीमंत लोकांचे महागडे शौक, अशाही बाजूने बोलणारे काही कमी नाही. पण हे शौक माणसाच्या साहसी खेळाकडे आकर्षित होण्याच्या मानसिकतेतून जन्माला येतात. त्यामुळे साहसाच्या धोक्याला सामोरं जाण्यामागचा हा माइंडगेम आणि त्यावर उभा असलेला धंदा समजून घ्यायला हवा.

साहसी उद्योगाच्या पाठचं विज्ञान

माणूस स्वतःचा जीव धोक्यात घालून साहसी खेळ का खेळतो? या प्रश्नाचं उत्तर आता विज्ञानानं दिलेलं आहे. माणसाच्या शरीरात एड्रेनालाईन नावाचे एक हार्मोन असते, ते धोक्याच्या वेळी स्रवते. माणूल जेव्हा त्याला धोका वाटेल, थरार वाटेल अशा परिस्थितीला सामोरा जातो, तेव्हा या हार्मोन्सचा प्रभाव वाढू लागतो. त्यामुळे एका बाजूला भीती आणि दुसऱ्या बाजूला तिला सामोरे गेल्याचं सुख मिळत असतं.

जेव्हा माणूस अशा पद्धतीनं धोक्याला सामोरा जातो तेव्हा त्याच्या हृदयाची गती वाढते. रक्तवाहिन्यांचा आकार बदलतो आणि शरारीतील हवेचे मार्ग विस्तारतो. हे हार्मोन शरीरात असे बदल करतो की, त्यामुळे स्नायूंपर्यंत जाणारा रक्तप्रवाह आणि फुफ्फुसापर्यंत जाणारा ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. यामुळे तुमची आव्हानाला तोंड देण्याची क्षमता वाढते.

या वाढलेल्या क्षमतेमुळे, मज्जासंस्थेतील डोपामाईन हा सुखाची जाणीव करून देणारा हार्मोनही कार्यरत होता. त्यामुळे मजेची अनुभुती येते. या मजेच्या कीकसाठीच माणसं नवनव्या साहसी खेळांसाठी जीव धोक्यात घालतात. वॉटर पार्कमधीर राईडपासून समुद्रातील टायटॅनिकचा सांगाडा पाहण्यासाठी केलेला पाणबुडीचा प्रवास असो, हेे सगळं त्या ‘एड्रेनालाईन रश’साठीच केलं जातं.

‘एड्रेनालाईन रश’ देणं हा धंदा बनलाय

पॅरासेलिंग, पॅराग्लायडिंग, ट्रेकिंग, हॉट एअर बलूनिंग, हेली-स्कीइंग, रिव्हर राफ्टिंग, स्कूबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंग यासारखे अनेक खेळ आता फक्त श्रीमंतापुरते उरलेले नाहीत. एकेकाळी श्रीमंतांची मक्तेदारी असलेले हे खेळ आता मध्यमवर्गियांच्या खिशालाही परवडू लागले आहेत. त्यामुळे हे खेळ खेळण्यासाठी म्हणून स्वतंत्र पर्यटनस्थळे विकसित होत आहेत.

हा सगळा ‘एड्रेनालाईन रश’ देण्याचा धंदा आहे. यात खूप मोठ्या प्रमाणात धोका आहे. हा धोका कमी करण्यासाठी जीवनरक्षक उपकरणे आणि विविध सुरक्षा उपाय सुचविले गेले आहेत. अनेक व्यावसायिक कंपन्या या सूचना कसोशीने पाळतातही, पण स्पर्धेमुळे पैसे वाचविण्यासाठी अनेकदा या सुरक्षायंत्रणेकडे दुर्लक्ष होऊन दुर्घटना घडल्याची अनेक उदाहरणे आहेत.

कारचे अपघात होतात, म्हणून कोणी प्रवास करणं बंद करत नाही, हे लॉजिक देऊन हा व्यवसाय तसाच पुढे चालू राहतो. सरकार देखील अर्थव्यवस्थेला मिळत असलेल्या चालनेमुळे या खेळांकडे सकारात्मकदृष्ट्याच पाहत आहे. तरीही सुरक्षा व्यवस्था कशी सक्षम करण्यात येईल, यासंदर्भातील सूचना अनेकदा सरकारकडूनही येतात. पण सगळंच अति-सुरक्षित असंलं तर ‘एड्रेनालाईन रश’ कशी मिळणार, हा कळीचा मुद्दा आहे.

पूर्वी कोणी एव्हरेस्ट चढलं किंवा अगदी कळसूबाई सर केला तरीही कौतुक व्हायचं. आता हे नेहमीचं झालंय. आपल्या आसपासचे अनेकजण गेलाबाजार एव्हरेस्टच्या बेसकॅम्पपर्यंत गेल्याचे फोटो सोशल मीडियावर टाकत असतात. या सगळ्यामागे सतत नव्या साहसाला तोंड देत ‘एड्रेनालाईन रश’ मिळविण्यासाठी लागलेली स्पर्धा आहे, हे विसरून चालणार नाही.

साहसी उद्योगामुळे निसर्गाचंही नुकसान

माणसं निसर्गात साहस करायला जातात आणि नैसर्गिक संसांधनांचं आणि तिथल्या व्यवस्थेचं मोठं नुकसान करतात, अनेकदा पाहावयास मिळालं आहे. काजवा महोत्सवात काजवे पाहायला गर्दी वाढल्याने काजव्यांच्या संख्येवर परिणाम झालाय. वाघ पाहायला जाणाऱ्या तुफान गर्दीमुळे अनेक अभयारण्यात वाघांचं जगणं अवघड झालंय.

एव्हरेस्टच्या वाटेवर साहसवीरांची संख्या वाढल्याने तिथल्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळालीय. पण तिथल्या बर्फात साचलेल्या माणसांच्या कचऱ्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झालाय. अनेक साहसी खेळांसाठी   रस्ते बनविले जातात, रिसॉर्ट तयार केले जातात एवढंच नव्हे तर माणसाचे शौक पूर्ण करण्यासाठी जंगलातही बार बनविेले गेले आहेत.

या सगळ्यामुळे तिथल्या पर्यावरणाची मोठी हानी होते आहे. त्यामुळे या साहसी खेळांमुळे आर्थिक फायदे होत असले, तरी निसर्गाचं नुकसान होतंय अशीही एक बाजू आहे. आज शहरीकरणामुळे आणि कामाच्या बदलत्या स्वरुपामुळे प्रत्येक माणूस काहीतरी थ्रिल शोधतोय. पण या थ्रिलच्या शोधामुळे तो स्वतःला आणि निसर्गालाही अडचणीत आणतोय, याचं भान त्याला उरलेलं नाही.

टाटटनच्या अपघातात आपण काय शिकणार?

टाटटॅनिकचा सांगाडा पाहायला गेलेल्या टायटन या पाणबुडीला झालेल्या या अपघातामुळे साहसी खेळ काही थांबणार नाहीत. आजवर झालेल्या अनेक अपघातांनीही ते कधीच थांबले नव्हते. पण माणसानं आपल्या एड्रेनालाईन रशसाठी आसुसलेल्या मनाला थोडं आवारायला शिकलं पाहिजे. तसंच घ्यायचीच असेल ही मजा, तर किमान सुरक्षेची सगळी काळजी घेतलीय ना, याचा तरी गांभीर्याने विचार करायला हवा.

भारतातही असे खेळ आणि त्यावर आधारित पर्यटन वाढीस लागलेलं आहे. मागणी तशी पुरवठा हा बाजाराचा नियम आहे. त्यामुळे सरकारलाही यात फायदा दिसतोय, त्यातही वावगं असं काही नाही. सुरक्षेसाठी पर्यटन मंत्रालय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅव्हल अँड टुरिझम, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर वॉटर स्पोर्ट्स, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्कीइंग अँड माउंटेनियरिंग अशा संस्था प्रयत्न करत आहेतच. फक्त आपण जिथे साहसी खेळ खेळतोय, तिथे ही सुरक्षा पाळली जातेय का, त्याची काळजी आपली आपणच घ्यायची आहे.

खरं तर जेव्हा आपण धावती बस किंवा सुटलेली ट्रेन पकडण्यासाठी जे काही करतो त्यापाठीही एड्रेनालाईन रश आहेच. तसंच आयुष्यात कधीनाकधी धोकादायक परिस्थितीला सामोरं जावं लागतंच. त्यावेळी शरीराची क्षमता वाढावी, म्हणून निसर्गाने दिलेले हे एक वरदान आहे. त्याचा उपयोग प्रत्येकानं संयमाने केला, तर जीवावरचे धोके टाळता येतील. तसंच साहसी उद्योगामुळे होणारं निसर्गाचं नुकसानही टाळता येईल.
 

0 Shares:
You May Also Like
amphibians endangered
संपूर्ण लेख

उभयचर नष्ट होताहेत, उरलेल्या जीवसृष्टीवरही धोक्याची घंटा!

जगप्रसिद्ध ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान…
संपूर्ण लेख

‘लिव्ह इन’ की ‘लग्न’ यावर उत्तर कसं शोधणार?

‘लिव्ह इन’ अर्थात लग्नाशिवाय शारीरिक संबंधात राहण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या…
संपूर्ण लेख

सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य उलगणारा ‘बेन्नू’तील खजिना

पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘नासा’नं २०१६ मधे यान पाठवलं होतं. ते यान या लघुग्रहावजवळ…
संपूर्ण लेख

लॅटिन अमेरिका ही पर्यावरणपुरक जगासाठी नवी अर्थशक्ती

लॅटिन अमेरिकेत,  दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ३३ देशांचा समावेश होतो. लॅटिन हे नाव सर्वप्रथम फ्रान्सचे सर्वेसर्वा असलेल्या तिसऱ्या…
संपूर्ण लेख

फक्त ८० रुपयात ‘लिज्जत’ हा ब्रँड घडविणाऱ्या आज्जी गेल्या

ही गोष्ट आहे, १९५९ मधली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो भारावलेला काळ होता. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू देशाची नवी…
संपूर्ण लेख

सत्यशोधक पत्रकारितेचे विस्मृतीत गेलेले अतुलनीय योगदान

एकोणिसाव्या शतकातील नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा आणि आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले…