मुंबईकरांनो, तुमची-आमची घाण साफ करताना जगवीर मेला

कांदिवलीत झालेल्या अपघाताबद्दल गेले अनेक दिवस कुठेच काही चर्चा नव्हती. घटनेला आठवडा उलटून गेल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं आणि सोशल मीडियावर व्हायरल झालं. त्यानंतर सगळ्यांना जाग आली आणि या घटनेचं गांभीर्य कळलं. सफाई कामगाराचा मृत्यू ही खरं तर आजवर अनेकदा येऊन गेलेली बातमी. पण या घटनेतील विदारक अशा अपघाताच्या सीसीटीव्ही फुटेजमुळे मोठी गोष्ट ठरली.

हा अपघात अनेक अर्थानं प्रतीकात्मकदृष्ट्या का होईना, पण शहराची मानसिकता सांगणारा आपघात आहे. या शहरात राहणाऱ्यांनीच केलेला कचरा साफ करण्यासाठी जी माणसं घाणीचं आयुष्य जगताहेत, त्यांना हे गाडीतून फिरणारं शहर काय किंमत देतं, याचं हे प्रतीक आहे. आज त्या अपघातात मृत्युमुखी पडलेला जगवीर पुन्हा येणार नाही, पण अशी घटना पुन्हा कधीच घडू नये म्हणून, आजवर अनेकदा मांडून झालेला हा विषय पुन्हापुन्हा मांडत राहावा लागणार आहे.

नक्की काय घडलं कांदिवलीत?

कांदिवलीच्या डहाणूकर वाडीत ११ जून रोजी ड्रेनेज लाइन साफ करण्यासाठी ३७ वर्षाचा जगवीर यादवर मेनहोलमधे उतरला. त्या मेनहोलमधील मैला तो वर असलेल्या दुसऱ्या माणसाला देई आणि तो दुसरा माणूस रस्त्याच्या कडेला तो नेऊन टाकत होता. 

एका फेरीत त्यानं मैल्याचं घमेलं त्या दुसऱ्या सहकाऱ्याकडे दिलं. तो रस्त्याच्या कडेला गेला. हा पुन्हा वाकला, बाहेर आला आणि तोच त्याला भरधाव येणाऱ्या गाडीनं उडवलं. त्याला लगेच डॉ. आंबेडकर रुग्णालयात नेण्यात आले. पण २६ जून रोजी त्याची झुंज संपली आणि तो मरण पावला. या संदर्भात घटनास्थळाचं सीसीटीव्ही फुटेज सापडलं.

या फुटेजमुळे या घटनेचं गांभीर्य अधिक लोकांपर्यंत पोहचलं. बेदरकारपणे गाडी चालविल्याबद्दल कारचालक विनोद उधवानी आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता न पुरविल्याबद्दल कंत्राटदार अर्जुनप्रसाद शुक्ला यांना अटक झाली आहे. पण हा काही पहिला असा अपघात नाही. आजवर असे अनेक सफाई कामगार सफाई करत असताना मृत्युमुखी पडले आहेत.

का चालू आहे हा माणसांच्या जीवाशी खेळ?

मलनिःसारणाचा मैला आणि पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी मुंबईत इंग्रजांच्या काळापासून असेलेले भूमिगत जाळे आहे. या जाळ्यामधे उतरण्यासाठी शहरभर पसरलेले हजारो मेनहोल आहेत. या मेनहोलमधे उतरून सफाई कामगार सफाई करत. वर्षानुवर्षे हे काम माणसांकडून होतं. पण या मेनहोलमधे असलेल्या विषारी वायूमुळे अनेक जण मृत्युमुखी पडतात.

या पद्धतीवर कोर्टकचेऱ्या, कामगारांच्या हक्कासंदर्भात आंदोलनं वगैरे झाल्यानंतर, हे प्रकरण कोर्टात गेलं. २००३ मधे मुंबई हायकोर्टानं सफाईच्या या अमानवी पद्धतीवर बंदी घातली. आणि यांत्रिकी पद्धतीने सफाई करण्याचे आदेश महापालिकेला दिले. मग प्रशासनाने सक्शन यंत्रे वापरून सफाई करण्यास सुरुवात केली. तरीही अनेक ठिकाणी मशीन पोहचत नसल्याने तेथे माणसांचा वापर होते.

त्यासाठी कंत्राटदारांना कंत्राट दिले जाते आणि ते खासगी सफाई कामगारांचा वापर करून ही सफाई करतात. हे काम करणाऱ्या अनेकांना टीबी, त्वचारोग आणि विविध श्वसन विकार झाले आहेत. त्यामुळे त्यांचे मृत्यूही ओढवले आहेत. पण किमान जे कर्मचारी महापालिकेच्या सेवेत आहेत, त्यांचा किमान रेकॉर्ड तरी ठेवला जातो. पण, कंत्राटदाराकडे काम करणाऱ्यां माणसांना कोणीच वाली नाही, अशी अवस्था आहे. 

कोर्टाने सुनावले, तरी ऐकणार कोण?

मुंबईतील मेनहोलवरील झाकणं हा सध्या चर्चेचा विषय आहे. कारण सध्या हायकोर्टात या मेनहोलवरील झाकणचोरीचे प्रकरण सुनावणीला आहे. ही लोखंडी झाकणे चोरीला जातात, मेनहोल उघडे पडते आणि त्यात अनेकदा मुंबईकरांचा बळी जातो. या संदर्भात दाखल झालेल्या याचिकेवरून हायकोर्टाने महापालिकेला धारेवर धरले आहे. 

आता याच मेनहोलमध्ये कंत्राटदार कामगारांना उतरवतो आणि त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत त्यांना कोणतेही संरक्षण देत नाही. याची दखल कोण घेणार? हे कामगार पालिकेचे कर्मचारी नसतात. मग अशा बळी गेलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना भरपाई कोण देणार, असे प्रश्‍न या निमित्ताने पुन्हा उभे ठाकले आहेत. 

मुंबईत तीन दिवसांपूर्वीच पाऊस सुरू झाला. या तीन दिवसांत बळी गेलेल्या सहा जणांमध्ये निम्मे म्हणजे तिघे मेनहोलमध्ये उतरल्यामुळेच बळी गेले. याआधी २४ जूनला गोवंडीतील शिवाजीनगर येथे मलवाहिनी साफ करताना, दोन कामगारांचा मृत्यू झालाय. या दोन्ही आत्ताच्या घटना आहेत, पण अशा मृत्यूंच्या हजारो घटना देशभर घडलेल्या आहेत.

शहरीकरणाची जीवघेणी बाजू

या अशा घटनांबद्दल आजवर अनेकदा चर्चा झालीय. राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगानंही यात लक्ष घातलंय. कोर्टात अनेकदा या प्रकरणी सुनावण्या झाल्यात. पण या सगळ्याबद्दल प्रत्यक्षात परिणाम दिसत नाहीत, असंच चित्र आहे. हातानं मैला हातळणं, यावर कायद्यानं बंदी असूनही याला पर्याय शोधता आलेला नाही. देशातील शहरीकरणाची ही जीवघेणी समस्या बनली आहे.

मुळात कचरा आणि मैला यांच्या व्यवस्थापनाकडे शहरीकरणाच्या प्रक्रियेत गांभीर्याने पाहिले जात नाही. स्वच्छ भारत अभियान वगैरे कितीही गोष्टी झाल्या तरी बॅनरबाजीच्या पलिकडे त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. आजही शहरातील स्वच्छतागृहे, डंपिंग ग्राऊंड, मलनिःसारण वाहिन्या, कचऱ्याची विभागणी हे सगळे प्रश्न आणि वाढती लोकसंख्या यांची सांगड कुणालाच घालता आलेली नाही.

त्यामुळे कुणीही कितीही दावे केले तरी मुंबईसारख्या शहरात हे प्रश्न गंभीर होत चालले आहेत. एकीकडे टॉवर अधिकाधिक उंच होत चालले आहेत. त्यामुळे या वाढत्या लोकसंख्येमुळे शेकडो वर्ष जुन्या स्वच्छता व्यवस्थेवर अतिताण येत आहे. तरीही फक्त नफ्याकडे बघून, फक्त कंत्राटांची गणितं बांधून ही  शहरे हाकली जात आहेत. या सगळ्या व्यवस्थेत सफाई कामगार हा दुर्लक्षित घटक बनून राहिला आहे.

सफाई कामगाराला माणूस समजणार की नाही?

शहरांमधील व्यवस्था कशी काम करते हे प्रामाणिकपणे पाहिले तर, फक्त पैसेवाल्यांना सुविधा पुरविण्यासाठी या व्यवस्था आहेत का? अशी शंका येते. कारण एकीकडे मेट्रो, कोस्टल रोड, वाढत्या गाड्या, टॉवर हे सगळे होत असताना, सफाई कामगारांच्या समस्या वर्षानुवर्षे तशाच आहेत. त्यातही जे संघटीत आहेत, ते किमान भांडू तरी शकताहेत. पण जे असंघटीत आहेत, त्यांचे हाल हे विचारू नये असे आहेत.

या सफाई कामगारांचे झालेले मृत्यूही अभ्यासले तरी कळतील की, किती भीषण पद्धतीत ही माणसं काम करताहेत. कुणी विजेच्या तारांच्या शॉकने मेलेत, तर कुणी आतमधील गॅसमुळे गुदमरून मेलेत. या सगळ्या कामाच्या पद्धती या अमानवी असून, त्याला पर्याय शोधणं अत्यंत तातडीने करायला हवंय. त्यासाठी कायदा किंवा नियमांपेक्षाही माणुसकीची अधिक गरज आहे.

आज याच माणुसकीचा अभाव, व्यवस्थापनामधे दिसतोय. त्यामुळेच कांदिवलीत मेनहोलमधे उतरलेल्या जगवीरला वाचविण्यासाठी साधं बॅरिकेड लावणंही, कंत्राटदाराला गरजेचं वाटलं नाही. ही घटना फक्त अपघात म्हणून न पाहता, माणुसकीच्या अस्तित्वाची लढाई म्हणून पाहायला हवी. शेवटी आपण माणसाला आपल्यासारखा माणूस समजणार आहोत की गुलाम, हा प्रश्न पुन्हा एकदा विचारावा लागणार आहे.

0 Shares:
You May Also Like
amphibians endangered
संपूर्ण लेख

उभयचर नष्ट होताहेत, उरलेल्या जीवसृष्टीवरही धोक्याची घंटा!

जगप्रसिद्ध ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान…
संपूर्ण लेख

‘लिव्ह इन’ की ‘लग्न’ यावर उत्तर कसं शोधणार?

‘लिव्ह इन’ अर्थात लग्नाशिवाय शारीरिक संबंधात राहण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या…
संपूर्ण लेख

सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य उलगणारा ‘बेन्नू’तील खजिना

पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘नासा’नं २०१६ मधे यान पाठवलं होतं. ते यान या लघुग्रहावजवळ…
संपूर्ण लेख

लॅटिन अमेरिका ही पर्यावरणपुरक जगासाठी नवी अर्थशक्ती

लॅटिन अमेरिकेत,  दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ३३ देशांचा समावेश होतो. लॅटिन हे नाव सर्वप्रथम फ्रान्सचे सर्वेसर्वा असलेल्या तिसऱ्या…
संपूर्ण लेख

फक्त ८० रुपयात ‘लिज्जत’ हा ब्रँड घडविणाऱ्या आज्जी गेल्या

ही गोष्ट आहे, १९५९ मधली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो भारावलेला काळ होता. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू देशाची नवी…
संपूर्ण लेख

सत्यशोधक पत्रकारितेचे विस्मृतीत गेलेले अतुलनीय योगदान

एकोणिसाव्या शतकातील नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा आणि आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले…