हजारोंना वाचविणाऱ्या या ‘डॉक्टर’ला मुंबईनं कधीच विसरू नये

मुंबईच्या इतिहासाचं कोणतंही पुस्तक हे १८९६ मधे आलेल्या प्लेगची साथीच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. या साथीमधे दहा हजाराहून अधिक जण दगावले होते. या साथीनं मुंबईचा फक्त इतिहासच नाही तर भूगोलही बदलला. कारण, या साथीनंतर या शहराच्या नगरनियोजनात आमुलाग्र बदल करण्यात आले. रस्त्यांच्या दिशा, इमारती, रुग्णालये आणि बरच काही या एका साथीमुळे बदललं.

हे सगळं खरं असलं, तरीही या संकटातून मुंबईला तारणारा हिरो होते ते म्हणजे डॉ. व्हेगास. डॉ. अकासियो ग्रॅब्रिएल व्हेगास असं त्यांचं पूर्ण नाव.  मुळचे गोवेकर असलेल्या या डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे त्यांनी या साथीचा पहिला रुग्ण ओळखला, लसीकरणासाठी काबाडकष्ट घेतले. यापुढे जाऊन त्यांनी नंतर या शहराच्या उभारणीतही मोठा वाटा उचलला. त्यामुळे मुंबईवर आणि मानवतेवर त्यांचे अनंत उपकार आहेत.

डॉक्टरकीला सेवा मानणारे डॉ. व्हेगास

डॉ. व्हेगास यांचा जन्म गोव्यातील हडफडे (अर्पोरा) गावचा. १ एप्रिल १८५६ रोजी जन्मलेल्या अकासियो यांनी आपलं प्राथमिक शिक्षण गोव्यातच पूर्ण केलं. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते मुंबईतील सेंट झेवियर्स शाळेत दाखल झाले. ते त्यांनी १८७४ मधे मॅट्रिकचं शिक्षण पूर्ण केले. नंतर त्यांनी ग्रँट मेडिकल कॉलेज या नामांकित संस्थेतून आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं.

डॉक्टर झाल्यानंतर आपली प्रॅक्टीस करण्यासाठी त्यांनी मांडवीमधील पोर्ट ट्रस्ट इस्टेटमधे दवाखाना सुरू केला. हा अत्यंत अरुंद, गजबजलेल्या गल्ल्यांचा आणि गरीब लोकवस्तीचा भाग होता. दाटीवाटीने असलेल्या इमारती आणि त्याच्यामधे साचलेली घाण ही तेथील भयंकर परिस्थिती होती. या अस्वच्छतेमुळे त्या भागात रोगराईचं प्रमाणही अधिक होतं.

त्यांनी निवडलेल्या या जागेमागे त्यांचा सेवाभावी विचार सहजपणे दिसून येतो. त्याकाळी मोठमोठ्या रुग्णालयांमधे किंवा उच्चभ्रू वस्तीमधे वैद्यकीय सेवा देण्याऐवजी त्यांनी मांडवीसारखा भाग निवडला. तेथे त्यांनी आपल्याकडे आलेल्या पेशंटमधे गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता, वैद्यकीय उपचार केले. या अशा उपचारांदरम्यानच त्यांना पहिला प्लेगचा पेशंट सापडला.

अशी झाली प्लेगच्या साथीची ओळख

१८ सप्टेंर १८९६ चा ती दुपार मुंबईच्या इतिहासात काळ्याकुट्ट प्रकरणाची सुरुवात होती. डॉ. वेगास यांना एका पेशंटला तपासण्यासाठी घरी बोलावण्यात आलं होतं. लुक्मीबाई असं तिचं नाव होतं. ती गेले तीन दिवस झोपली नव्हती. तिला उठता येत नव्हतं आणि तिच्या शरीरावर संत्र्याच्या आकाराची सूज आली होती. तिच्या शरिरातील तापही १०४ होता.

डॉक्टरांनी तिला औषध दिलं. पण, त्याचा फारसा परिणाम झाला नाही. संध्याकाळी तिची प्रकृती अधिक बिघडली. दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला. जेव्हा डॉक्टर तिला पाहायला आले, तेव्हा त्यांना या सगळ्या प्रकरणाबद्दल वेगळीच शंका आली. पुढे या प्रकारचे पेशंट वाढू लागले. त्यांनी या सगळ्या मृत्यूच्या कारणांचा शोध लावण्यास सुरूवात केली.

हा नेहमीचा आजार नसून ही साथ आहे, एवढं स्पष्ट होऊ लागलं. या सर्व पेशंटच्या जवळ जाणंही त्यावेळी घातक होतं. पण डॉ. व्हेगास यांनी ते धाडस दाखवलं आणि या पेशंटना उपचार पुरविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. उंदीर हा या आजाराचा वाहक असल्याची त्यांनी खात्री पटली. त्यांनी तसं संशोधन मांडलं आणि या साथीची ओळख बुबोनिक प्लेग म्हणून पटली. त्यांच्या या कामामुळे पुढील उपचाराला दिशा मिळाली.

प्लेगचा हाहाःकाराने मुंबई भेदरली

डॉ. व्हेगास यांच्या निष्कर्षाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी सरकारने चार तज्ज्ञांची नेमणूक केली. त्यांनी अभ्यासांती डॉ. व्हेगास यांच्या संशोधनलाला मान्यता दिली आणि उंदरांमधून माणसाला हे संक्रमण होत असल्याचेही स्पष्ट केले. रोगाचं निदान झालं, त्याचे कारणही सापडलं पण आता आव्हान होते त्यावर औषध शोधण्याचं.

एका बाजूला शहराची स्वच्छता, उंदीर मारण्याचा कार्यक्रम, शहरातील अनेक जागांचे निर्जंतुकीकरण, वैद्यकीय सुविधांसाठी तात्पुरती रुग्णालये, डॉक्टर-परिचारिका यांची जमवाजमव हे सगळं सुरू असताना या साथीवर लस शोधणंही आवश्यक होते. त्यावेळची परिस्थिती एवढी भयंकर होती की, दर आठवड्याला जवळपास १९०० लोक मरत होते. 

एकीकडे माणसे मरताहेत, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणत लोकसंख्या शहर सोडू लागली. शहरातील या मृत्यू आणि स्थलांतरामुळे शहराच्या लोकसंख्येमधे मोठ्या प्रमाणात घट झाली. १८९१ च्या जनगणनेमधे ८,२०,००० एवढी असलेली मुंबईची लोकसंख्या १९०१ च्या जनगणनेमधे ७,८०,००० एवढी घसरली. यावरून या साथीची भीषणता लक्षात येते. 

डॉ. हाफकीन यांना बोलावलं गेलं

प्लेगचा हाहाःकार पाहता, यावर लस तयार करणं हाच एकमेव उपाय आहे, हे सरकारच्या लक्षात आलं. त्यामुळे मुंबईच्या गव्हर्नर यांनी कॉलराची लस शोधलेल्या ज्यू-रशियन बॅक्टेरियोलॉजिस्ट डब्लू. एम. हाफकीन यांना या कामासाठी मुंबईत बोलावलं. त्याच्यापुढील आव्हान खूपच कठीण होते. ग्रँट मेडिकल कॉलेजच्या परिसरामधे तात्पुरती प्रयोगशाळा उभारण्यात आली. 

हे काम अत्यंत जोखमीचं आणि थकवून टाकणारं होतं. या कामादरम्यान त्यांच्या एका सहायकाला नर्व्हस ब्रेकडाऊनचा अनुभव आला, तर आणखी दोघांनी काम सोडलं. यावरून हे काम किती अवघड होते, याचा अंदाज येईल. तरीही न थांबता काम करून, अखेर १० जानेवारी १८९७ रोजी ही लस तयार झाल्याचं जाहीर करण्यात आलं.

सर्वात प्रथम डॉ. हाफकीन यांनी स्वतः ही लस घेऊन, ती माणसासाठी सुरक्षित असल्याचे साधार सिद्ध केले. त्यानंतर भायखळा कारागृहातील स्वयंसेवकांवर त्याचा प्रयोग करण्यात आला. काही दुष्परिणाम होत असले, तरीही ही लस उपयुक्त ठरत होती. सुरुवातीच्या प्रयोगामधे ५० टक्के धोका रोखण्यात यश आलं. त्यावेळचा हाहाःकार पाहता हे देखील मोठं यश होतं. नंतर त्यावर आणखी संशोधनही झालं.

ही लस लोकांपर्यंत नेणारे डॉ. व्हेगास

हाफकीन यांनी शोधलेली ही लस लोकांपर्यंत पोहचविणं हे आणखी मोठे आव्हान होतं. डॉ. व्हेगास यांनी या कामात मोठे योगदान दिलं. त्यांनी शहरात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविली. त्यांनी स्वतः  जवळपास १८००० लोकांचं लसीकरण केलं, अशा नोंदी सापडतात. प्लेग रोखण्यासाठी फक्त लसीकरण करून भागणार नाही, हे ओळखून त्यांनी शहर नियोजनात भाग घेतला.

मुंबईची स्थायी समिती आणि बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचे सदस्य म्हणून त्यांनी शहरातील झोपडपट्टी सुधारणा, स्वच्छतेसाठी सातत्यानं प्रयत्न केले. १९०६ मधे ते शहराचे महापौर म्हणून निवडले गेले. महापौर म्हणून त्यांनी शहरातील नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी अनेक प्रयत्न केले. सार्वजनिक वाहतूकीचे भा़डे, विेजेचा दर कमी केले. मोफत दाई सेवा आणि मोफत प्राथमिक शिक्षणासाठी प्रयत्न केले.

डॉ. व्हेगास हे बॉम्बे युनिव्हर्सिटी सिंडिकेटचे सदस्य होते. वैद्यकीय तंत्रज्ञान, पोर्तुगीज भाषेच्या शिक्षणासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. गरीब, वंचित आणि महिला यांच्या विकासासाठी त्यांनी कायम नवनवे उपक्रम राबविले. महालांसाठी विशेष महाविद्यालय असावे असा त्यांचा आग्रह होता. ते कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जनचे फाउंडेशन-फेलो देखील होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे डॉक्टरांनी एक नवी पिढी पुढे तयार झाली. २१ फेब्रुवारी १९३३ रोजी वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

मुंबईला डॉ. व्हेगास यांचं विस्मरण झालंय का?

डॉ. व्हेगास यांच्या या अतुलनीय कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून मुंबईतील नागरिकांना त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला. आजही वासुदेव बळवंत फडके चौकातील मेट्रो सिनेमासमोरच्या कावसजी जहाँगीर सभागृहाच्या आवारात हा पुतळा उभा आहे. २४ एप्रिल १९५६ रोजी तत्कालीन राज्यपालांनी त्यांचं अनावरण केलं होतं.

तसंच, त्याच्या थोडं पुढे जगन्नाथ शंकरशेट रोडवर चिराबाजारजवळ डॉ. व्हेगास यांचे नाव एका गल्लीला दिले आहे. मेट्रोसमोरच्या त्या पुतळ्याखाली किमान इंग्रजीत त्यांची थोडी तरी माहिती लिहिली आहे. पण डॉ. व्हेगास स्ट्रीटमधे कुणालाही डॉ. व्हेगास कोण? असं विचारलं तर ९९ टक्के लोकांना त्याचं उत्तर देता येणार नाही. ज्या माणसानं हे शहर जगवलं, त्यांचं विस्मरण झालंय का? याचा विचार प्रत्येक मुंबईकरानं करायला हवा.

आज वैद्यकीय पेशा हा पैसे कमावायचा आणि रुग्णांना लुटणारा व्यवसाय झाला आहे. सरकारी रुग्णालयांची अवस्था बिकट झालीय, तर खासगी रुग्णालये श्रीमंतांखेरीज कोणालाही परवडणारी उरली नाहीत. अशा वेळी गोरगरीबांसाठी झ़टणाऱ्या डॉ. व्हेगास यांच्यासारख्या सेवाभावी डॉक्टरांचं कार्य आठवणं हे अनेक अर्थानं महत्त्वाचं आहे.  डॉक्टर्स डेच्या निमित्तानं मुंबईला वाचविणाऱ्या डॉ. व्हेगास यांना विनम्र अभिवादन!

0 Shares:
You May Also Like
amphibians endangered
संपूर्ण लेख

उभयचर नष्ट होताहेत, उरलेल्या जीवसृष्टीवरही धोक्याची घंटा!

जगप्रसिद्ध ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान…
संपूर्ण लेख

‘लिव्ह इन’ की ‘लग्न’ यावर उत्तर कसं शोधणार?

‘लिव्ह इन’ अर्थात लग्नाशिवाय शारीरिक संबंधात राहण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या…
संपूर्ण लेख

सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य उलगणारा ‘बेन्नू’तील खजिना

पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘नासा’नं २०१६ मधे यान पाठवलं होतं. ते यान या लघुग्रहावजवळ…
संपूर्ण लेख

लॅटिन अमेरिका ही पर्यावरणपुरक जगासाठी नवी अर्थशक्ती

लॅटिन अमेरिकेत,  दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ३३ देशांचा समावेश होतो. लॅटिन हे नाव सर्वप्रथम फ्रान्सचे सर्वेसर्वा असलेल्या तिसऱ्या…
संपूर्ण लेख

फक्त ८० रुपयात ‘लिज्जत’ हा ब्रँड घडविणाऱ्या आज्जी गेल्या

ही गोष्ट आहे, १९५९ मधली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो भारावलेला काळ होता. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू देशाची नवी…
संपूर्ण लेख

सत्यशोधक पत्रकारितेचे विस्मृतीत गेलेले अतुलनीय योगदान

एकोणिसाव्या शतकातील नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा आणि आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले…