बंड फसलं तरी रशिया आता दलदलीत अडकलाय!

वॅगनर नावाच्या खासगी सैन्य कंपनीचा प्रमुख येवगिनी प्रिगोझीन याने रशियाच्या सरकारविरुद्ध केलेली बंडाळी २४ तासांच्या आत फसली असली, तरी त्याचे दुरगामी परिणाम संभवतात. प्रिगोझीन याचे बंडाचे निशाण प्रत्यक्षपणे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याविरुद्ध नव्हते; पण या बंडाळीमुळे पुतीन यांच्या राजकीय वर्चस्वाला तडे निश्‍चितच गेले आहेत. 

पुतीन यांनी नियुक्‍त केलेले रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू आणि रशियन लष्कराचे प्रमुख वॅलेरी गेरासीमोव्ह अशा दोन व्यक्तींविरुद्ध प्रिगोझीन याचे बंड होते. रशिया-युक्रेन युद्धात ‘वॅगनर’ गट सक्रियपणे रशियाच्या बाजूने लढतो आहे. ‘वॅगनर’ गटाच्या बहादुरीने रशियाने एप्रिल-मे महिन्यात युक्रेनच्या बखमुत शहरावर घनघोर लढाईनंतर ताबा मिळवला होता. 

लष्कर आणि वॅगनर यांच्यातील तणाव

रशिया-युक्रेन लढाईला तोंड फुटल्यानंतर उद्भवलेल्या, अनेक महिन्यांच्या ‘जैसे थे” स्थितीनंतर रशियाला मिळालेले हे पहिलेच मोठे यश होते. असे असूनदेखील रशियाच्या हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात वॅगनर गटाचे अनेक सैनिक ठार झाल्याचा आरोप करत प्रिगोझीन यांनी बंड पुकारले होते. 

रशियाचे संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुख यांच्या इशाऱ्यावरून हे हल्ले झाल्याचा प्रिगोझीन याला दाट संशय असल्याने त्याने दोघांनाही पदच्युत करण्याची मागणी करत मॉस्कोकडे कूच केली होती. रशियन हवाई दलाने ‘वॅगनर’ सैनिकांवर खरोखरच हल्ले केलेत का? याची खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. मात्र, प्रिगोझीन आणि रशियन लष्कर यांच्यातील संबंध केवळ ताणलेलेच नव्हते, तर त्यांच्यात प्रचंड
कटुता निर्माण झाली होती, हे नक्की! 

मे महिन्यात प्रिगोझीन याने ‘टेलिग्राम’ या समाजमाध्यमावर एक व्हिडिओ प्रसारित करत लष्करी नेतृत्वावर उघड टीका केली होती. त्यापूर्वीसुदधा त्याने रशियन लष्कराला कुचकामी ठरवणारी, विशेषत: लष्करी नेतृत्वाच्या निर्णयांना चुकीचे ठरवणारी वक्तव्ये केली होती.

वॅगनरच्या बंडानंतर पुतीन यांची गोची

प्रिगोझीनच्या मुख्यत: दोन तक्रारी होत्या; एक, ‘वॅगनर’ सैनिकांना आवश्यक असणाऱ्या युद्धसामग्रीचा पुरवठा करण्यात रशियन लष्कर अत्यंत दिरंगाई करत आहे. दोन, लष्करप्रमुखांनी काढलेल्या वटहुकुमानुसार ‘वॅगनर’ समूहाला रशियन लष्कराशी नव्याने करारमदार करावे लागणार आहेत, जे प्रिगोझीनला अजिबात रुचले नव्हते. 

‘वॅगनर’ हा एक खासगी सैन्य समूह असल्याने त्यावर रशियन लष्कराचे वर्चस्व स्वीकारण्यास प्रिगोझीन तयार नव्हता. दुसरीकडे रशियन लष्कराला नाकापेक्षा मोती जड नको होता. याबाबत, पुतीन यांची भूमिका स्पष्टीरित्या माहिती नसली, तरी राष्ट्राध्यक्ष या नात्याने त्यांचे मत रशियन लष्करापेक्षा वेगळे
नसणार, यात शंका नाही. 

त्यामुळेच, पुतीन यांनी प्रिगोझीनच्या मागण्यांना दाद तर दिली नाहीच; शिबाय राष्ट्राला दिलेल्या संदेशात आपण लष्कराला ही बंडाळी कठोरपणे मोडून काढायचे आदेश दिल्याचे ठणकावून सांगितले. पुतीन यांनी हे जाहीर बक्‍तव्य दिले असले, तरी प्रत्यक्षात प्रिगोझीनच्या आदेशाने मॉस्कोवर चाल करून येणार्‍या ‘वँगनर’ समूहाच्या सैनिकांना रशियन लष्कराने कुठेही अडवले नाही. 

पुतीन यांची सरशी वाटत असली तरी…

प्रिगोझीनने युक्रेन सीमेवरील दोन रशियन शहरे सहजपणे ताब्यात घेतली आणि आपल्या सशस्त्र सैनिकांसह रशियन राजधानीच्या दिशेने कित्येक मैल कूच केली, तरीसुद्धा त्यांना रशियन लष्कराने कुठेही आडकाठी घातली नाही. यामागे पुतीन व लष्करी नेतृत्वाची योजना स्पष्ट होती. एक तर, युक्रेन सीमेपासून प्रिगोझीन त्याच्या ‘वॅगनर’ सैनिकांसह जितका दूर जाणार, तेवढी त्याची शक्ती कमी होत जाणार, हे प्रिगोझीन व पुतीन या दोघांनाही ठाऊक होते. 

दोन, प्रिगोझीनचे बंड मोडून काढत हिंसाचार घडवण्यापेक्षा त्याला रशियातून विशेषत: लष्करातून, कुठलाही पाठिंबा नाही हे ठळकपणे जगाला व खुद्द प्रिगोझीनला दाखवणे पुतीन यांना अधिक श्रेयस्कर वाटले.  तीन, ‘वॅगनर’च्या भाडोत्री सैनिकांवर हल्ला करत त्या सर्वांना रशियाच्या विरुद्ध करण्याऐवजी त्यांच्यात फूट पाडत अनेकांना रशियन लष्करात भाडोत्री तत्त्वावर सहभागी करण्यात रशियाचे हित आहे, हे अनुभवी पुतीन यांना तत्काळ उमगले. 

परिणामी,पुतीन यांनी लष्कराची मदत न घेताच प्रिगोझीनचा उठाव हाणून पाडला. याचा अर्थ पुतीन यांच्यासाठी सर्व काही सुरळीत झाले आहे,  असे नाही. प्रिगोझीनच्या बंडाने पुतीन यांच्या राजकीय प्रभावावर निश्‍चितच प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

कालचा मित्र आणि आजचा वैरी

पुतीन आणि प्रिगोझीन यांचे सौख्य जगजाहीर होते. एकेकाळी प्रिगोझीन हा पुतीन यांचा ‘खानसामा’ म्हणून ओळखला जायचा; कारण ‘क्रेमलीन’मधील मेजवान्यांची कंत्राटे त्याला मिळायची. पुतीन यांच्या परवानगीनेच प्रिगोझीनने ‘वॅगनर’ समूहाचे सह-संस्थापक असल्याचे मान्य केले होते.

पुतीन यांच्या पाठिंब्याने आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये ‘वॅगनर’ समूहाला सशस्त्र संघर्षात कामे करण्याची कंत्राटे मिळवली होती. ‘वॅगनर’ समूहात काम करण्यासाठी (म्हणजे भाडोत्री तत्त्वावर लढण्यासाठी) रशियन
नागरिकांना प्रोत्साहित करणार्‍या मोठमोठ्या जाहिराती रशियात विविध भागांमध्ये लागलेल्या असतात, त्या रशियन सरकारचा या प्रकारच्या समूहाला पाठिंबा असल्याशिवाय शक्‍य नाही.

अगदी महिनाभरापूर्वी रशियाच्या संसदेने मंजूर केलेल्या निवेदनात रशियन लष्कर आणि युद्धात मदत
करणारे रशियन स्वयंसेवक यांच्यासह ‘वॅगनर’ समूहातर्फे रशियाच्या वाजून लढणार्‍या भाडोत्री सैनिकांचे विशेष कोतुक करण्यात आले होते. रशियातील शहरांतील रस्त्यांवरच्या दुकानांमध्ये पुतीन आणि लष्करी नेतृत्व यांच्यासह प्रिगोझीनच्या प्रतिमेचे मुखवटेसुद्धा उपलब्ध असायचे. 

आपलाच डाव रशियावर कसा उलटला?

असा हा प्रिगोझीन मागील काही आठवड्यांपासून उघडपणे लष्करी नेतृत्वाविरुद्ध बोलत असतानाच पुतीन यांनी त्याचे पंख का कापले नाहीत की, पुतीन यांनी ती क्षमताच गमावली आहे, असे प्रश्‍न रशियातील समाजमाध्यमांमध्ये उपस्थित होत आहेत. एक बाब स्पष्ट आहे की, ‘वॅगनर’ समूहाचा विस्तार व ताकद सातत्याने वाढत होती आणि त्याला लगाम लावण्याची आवश्यकता रशियन सरकारला तीव्रतेने
भासू लागली होती. 

त्यामुळेच, ‘वॅगनर’ आणि त्यासारख्या रशियाच्या बाजूने लढणार्‍या गटांनी १ जुलैपर्यंत रशियन लष्कराशी नव्याने करार करण्याचे फर्मान काढण्यात आले असणार, कोणतीही राज्यसंस्था हात-पाय पसरवत सशक्त होत जाणाऱया समूहांना पूर्णपणे आपल्या नियंत्रणात आणण्यासाठी सतत कार्यरत असणार, यात नवल ते नाही. 

इथे कळीचा मुद्दा हा वॅगनर समूहाच्या स्थापनेशी आणि त्यांच्या पैशांच्या स्रोतांशी संबंधित आहे. २७ जून रोजी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी मान्य केले की, मागील एक वर्षात रशियाने ‘वॅगनर’ समूहाला युक्रेन युद्धात मदत करण्यासाठी जबळपास १ बिलियन डॉलर दिले आहेत. खरे तर, रशियातील कायद्यानुसार खासगी सैन्य कंपन्या अवैध आहेत.

खासगी लष्कर नक्की काय करतं? 

अमेरिकेसह अनेक पाश्‍चिमात्य देशांमध्ये खासगी सैन्य कंपन्या कायदेशीर आहेत. अमेरिकेने अफगाणिस्तान आणि इराक युद्धात अशा खासमी सैन्यांना पुरेपूर कामे सोपवली होती. रशियात कायद्याने खासगी सैन्य उभारणीस बंदी असल्याने पुतीन यांना स्पष्टीकरण द्यावे लागले होते की, अशा खासगी सैन्य समूहांची रशियात स्थापना होऊ शकत नाही; पण अशा परकीय कंपन्या जर रशियात कायद्याचा भंग न करता कार्यरत असतील, तर त्यावर सरकार कारवाई करणार नाही. 

पुतीन आणि रशियन लष्कराने ‘वॅगनर’ समूहाला कंत्राटे देण्यासाठी शोधलेली ही पळवाट होती. ‘वॅगनर’ ही
कायदेशीररीत्या अर्जैटिनात स्थापन करण्यात आलेली आणि हाँगकाँग व रशियातील सेंट ‘पिटर्सबर्ग इथे उप-मुख्यालये असलेली कंपनी असल्याचे इंटरनेटवरील सूत्रांवरून कळते. प्रिगोझीन आणि दिमित्री उत्कीन या सैन्यातून निवृत्त झालेल्या अधिकार्‍याने सन २०१४ मध्ये ‘वॅगनर’ समूहाची स्थापना केली. 

हा दिमित्री उत्कीन नव-नाझी असल्याचे मानण्यात येते; कारण त्याने स्वतःच्या शरीरावर नाझी चिन्हे कोरून घेतली आहेत. सैन्यात कार्यरत असताना त्याने ‘वॅगनर’ हे टोपण नाव धारण केले होते. यामागे त्याची प्रेरणा हिटलरला आवडणारा १८ व्या शतकातील ‘वॅगनर’ हा जर्मन कवी होता. यावरूनच दिमित्री उत्कीनने त्याच्या खासगी सैन्य समूहाचे नामकरण ‘वॅगनर प्रायव्हेट मिलिटरी कंपनी’ असे केले होते.

वॅगनर म्हणजे नसून अडचण, असून खोळंबा

उत्कीन सध्या कुठे आहे आणि जिवंत तरी आहे का? याबाबत साशंकता आहे. दिमित्री उत्कीन हा नव- नाझी असला, तरी ‘वॅगनर’ समूहाची कोणतीही विचारधारा नाही. रशियन सरकारचे धन आणि रशियन लष्कराच्या प्रशिक्षण सुविधा यांच्या आधारे “वॅगनर’ समूहाने स्वत:चे साम्राज्य उभारले असल्याने रशियन हितसंबंधांची जगभर जोपासना करणे ही एकमात्र विचारधारा ‘वॅगनर’ समूहाची आहे. 

हा समूह युक्रेन, सुदान आणि सीरिया या देशांशिवाय उत्तर आफ्रिका आणि मध्य आफ्रिकेतील किमान १५ ते २० देशांतील संघर्षांमध्ये गुंतलेला आहे. या प्रत्येक देशात हा समूह रशियन सरकारशी सौख्य असलेल्या गटाकरिता कार्यरत आहे. साहजिकच, ‘वॅगनर’ व प्रिंगोझीन विरुद्ध कठोर कारवाई करणे पुतीन सरकारला शक्‍य नव्हते. 

दुसरीकडे, ‘वॅगनर’च्या एकंदरीत पार्श्वभूमीमुळे युक्रेन आणि पाश्‍चिमात्य देशांसाठी प्रिंगोझीनच्या बंडात आनंद मानण्यासारखे काही नव्हते. अमेरिकेसाठी प्रिगोझीन आणि दिमित्री उत्कीन हे दोघेही ‘मोस्ट बॉँटेड’ आहेत आणि त्यांच्या शिरावर लाखो डॉलरचे बक्षीस ठेवण्यात आलेले आहे. प्रिगोझीन आणि उत्कीन यांच्या नेतृत्वात ‘वॅगनर’च्या भाडोत्री सैनिकांनी युक्रेन आणि अनेक आफ्रिकी देशांमध्ये मानवाधिकारांचे व युद्ध नियमांचे निर्घृण उल्लंघन केल्याचे अनेक आरोप यापूर्वी पाश्‍चिमात्य देशांनी केले आहेत. 

दलदलीत अडकलेले रशिया

संयुक्‍त राष्ट्र संघटनेने (युनो) सुद्धा खासगी सैन्य कंपन्यांवरील आपल्या अहवालात ‘वॅगनर’च्या कार्यपद्धतीवर ठपका ठेवला होता. पाश्‍चिमात्य जगतात आधीच खलनायक ठरलेल्या प्रिगोझीनसाठी आता रशियातदेखील जागा उरलेली नाही. पुतीन यांनी प्रिगोझीनला जीवदान देत बेलारूसमध्ये सुरक्षितपणे जाण्याची परवानगी दिली आहे.

इथूनपुढे ‘वॅगनर’ समूहाची युक्रेन युद्धातील ‘पोकळी भरून काढणे आणि ‘वॅगनर’च्या आफ्रिकी देशांतील मोहिमांचे नेतृत्व विश्‍वासू व्यक्‍तीच्या हाती सोपवणे हे पुतीन यांच्यापुढील मोठे आव्हान असणार आहे. ‘वॅगनर’ प्रकरणाने साम्यवादानंतरचा पुतीन यांचा रशिया कशा प्रकारच्या दलदलीमध्ये अडकला आहे, हे रशियन जनतेला आणि बाहेरील जगाला कळाले आहे.

(लेखक एमआयटी, पुणे इथे कार्यरत आहेत.)

0 Shares:
You May Also Like
Rajsthan Election 2023
संपूर्ण लेख

राजस्थानात भाजपमधील बंडाळी काँग्रेसच्या पथ्यावर?

राजस्थानात आजवर कोणत्याही पक्षाला सलग दोन वेळा सरकार बनविण्याची संधी दिलेली नाही. त्यामुळे यावेळीही काँग्रेसच्या अशोक गेहलोत यांच्या…
Toll issue in Maharashtra
संपूर्ण लेख

रस्त्यावरील ‘टोलचा झोल’ किती दिवस चालणार?

सामान्य जनतेला रस्ते असो वा कोणतीही सुविधा असो मोफत नको आहे. पण टोलवसुलीच्या नावे चाललेली जनतेची लूट लोकांना…
संपूर्ण लेख

प्रादेशिक पक्षांना गारवा देतोय कर्नाटकातल्या बंडखोरीच्या वणवा

कर्नाटकात भाजपच्या महत्त्वाकांक्षेला मतभेदाचा आणि बंडखोरीचा फटका बसलाय. तिकीटापासून वंचित असलेल्या अनेक ज्येष्ठ आणि प्रभावशाली नेत्यांनी वेगवेगळी चूल…
संपूर्ण लेख

Point by Point: खलिस्तानचं मॅटर आणि भारत-कॅनडा पंगा

कॅनडा आणि एकंदरीतच पाश्चिमात्य देशात सुरू असलेल्या खलिस्तानी चळवळीच्या कारवाया आणि भारत आणि कॅनडा या दोन देशांतील ताणलेले…
संपूर्ण लेख

धनगर आरक्षणाच्या आंदोलनाआधी, फडणवीसांना जाब विचारा!

 मराठा आरक्षणाच्या जालन्यामधील लाठीमारापर्यंत गेलेल्या आंदोलनानंतर, ओबीसींनी आंदोलनाचा इशारा दिला. आता धनगरांना भडकवलं जातंय. हे नक्की कशासाठी चाललंय…
संपूर्ण लेख

भागवतांच्या पुरोगामी विधानांमागे दडलंय काय?

आरएसएस ही मातृसंस्था असलेल्या भारतीय जनता पक्षाची सत्ता २०१४ मधे आल्यानंतर वर्षभराच्या अंतरानं, आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी…