जागतिकीकरणाने आपल्या भोवतीचे दरवाजे खुले केले. व्यापार खुला झाला. नवं तंत्रज्ञान आलेलं होतं. त्यात वाढ होत गेली. उत्पादनाला गती मिळाली. उत्पादनाचं क्षेत्र व्यापक झालं. उत्पादनाचं केंद्र केंद्रित झालं. भांडवली केंद्राने उत्पादनावर ताबा मिळवला. त्याची बाजारपेठ वाढली आणि उत्पादनाचं आंतरराष्ट्रीयीकरण झपाट्याने झालं.
जिथं उत्पादन मर्यादित आणि लोकसंख्येचं प्रमाण अधिक तिथल्या बाजारपेठा भांडवली शक्तीने ताब्यात घेण्याची स्पर्धाच सुरू झाली. व्यापार म्हणून जग जवळ आलं. यातून जगाची बहुसांस्कृतिकता संवर्धित होण्याऐवजी आर्थिक विखंडाने सांस्कृतिक विखंडन सुरू झालं. परिणामी सांस्कृतिक अस्मितेचा विषयज्वर वाढला. तंत्रज्ञानाने माणसाचा मेंदूसह ताबा घेतला. त्यामुळे माणसांचा तांत्रिक संवाद वाढला आणि भावनिक ओल असलेला संवाद संपत गेला.
माणसं मूळ स्वभावाने बदलली. अनौपचारिक बंधाची जागा कोरड्या भावबंधाने घेतली. माणसाचे जीवनाकडे पाहण्याचे दृष्टिकोन बदलले. आर्थिक लाभाचा अधिक विचार व्हायला लागला. माणूस आपलं माणूसपणाचं नैसर्गिक स्वत्व हरवून बसला. तुटलेपणाची, एकाकीपणाची जाणीव वाढतच गेली. जीवनाचा अवकाश मर्यादित झाला. या संकोचामुळे त्याच्या भावभावनांची कोंडी झाली. नव्या नीतीमुळे प्रत्येक देशातल्या सरकारचे दृष्टिकोन बदलले. अस्मिताच सरकारी धोरणावर प्रभाव टाकणारी ठरली.
संभ्रम निर्माण करणारा ‘काळ’
‘कल्याणकारी’ भूमिका संपल्या आणि आधुनिक मूल्यांचं व्यापक भान धूसर झालं. भांडवलीवृत्तीने सरकारं प्रभावित झाली. जगभर त्यांच्या प्रभावाने धोरण आखलं गेलं. त्यातून मानवी कल्याणाच्या मूल्यांचा उद्घोष आणि खासगीकरणाचा कहर वाढत गेला. भांडवलदार आणि उद्योगपती यांनी आर्थिक लाभासाठी विवेकहीन व्यवहार तात्विकतेचा मुलामा देत वाढवलं. गेल्या तीस वर्षात हे घडतंय आणि झपाट्याने भूमिकाहीनत्व वाढतंय. असा हा ‘काळ’ आपल्या जगण्याभोवतीच फास आवळतो आहे. सामान्य माणसाच्या मनात संभ्रम निर्माण करणारा काळ आहे.
समतेचा, न्यायाचा आणि स्वतंत्र्याचा आग्रह धरणारी व्यापक भूमिका खरी आहे की, भांडवली व्यवस्था आणते आहे ती मूल्यहीन आर्थिक लूट करणारी बाजारू वृत्ती खरी आहे? धर्म, जात, वंश, लिंग भेद, भ्रामक असल्याची भूमिका की धर्म, जात, वंश, लिंग महत्त्वाचे समजून येणारा उन्माद खरा? सर्वसमावेशक बहुसांस्कृतिकतेचा सन्मान की सांस्कृतिक दबावाने बहुसांस्कृतिकता संपवणारी नीती खरी?
सर्व प्रकारच्या धर्म, पंथ, संप्रदायांचा सन्मान की एकाच धर्म, पंथ, संपदाय याची उन्मादी दहशत खरी? सर्व संस्कृती-उपसंस्कृतीचा आदर की सत्ता सांगेल त्याच संस्कृती-उपसंस्कृतीचा आसुरी उन्माद खरा? या आणि अशा स्वरूपाचे संभ्रम समाजात निर्माण केले. त्यातून मोठ्या प्रमाणात जगभराच्या माणसामाणसांमधे विखंड झाले. गेल्या तीस वर्षांच्या काळाने हे सारं घडवून आणलं. परिणामी माणूस हतबल, अगतिक, असह्य झाला. त्यातूनच माणूस म्हणून त्याचं तुटलेपण, एकाकीपण वाढलं.
सामान्यांच्या मनात भीतीचं वातावरण
जीवनातले नित्याचे संघर्ष वाढवण्यात खासगीकरण कारण ठरलं. या संघर्षात माणसं एकाकी झाल्यामुळे लढण्यात अपयशी ठरत गेली. सामूहिक एकात्मभावना संपल्याने खचलेली माणसं नित्याच्या संघर्षात पराभूत मानसिकतेनं जगण्याच्या लढाईत माणसं पराभूत झाली. सामूहिकतेने लढायला बळ देणार्या चळवळी मंद होत गेल्या. संवेदन हरवलं. इतरांसह जगण्याचं भान हरवलं. सहृदयता, सहानुभूती आणि करुणा या जगण्यातील अर्थपूर्ण अनुभूतीचे अर्थ कोरडे झाले. मरण येत नाही म्हणून उसनं अवसान आणून जगण्याचे रहाटगाडगे सुरू आहेत. अशा जगण्यात माणसं अस्वस्थ, बेचैन झाली.
मानसिक स्वास्थ गेलं आणि हिंस्त्रता वाढली. सभ्यतेच्या आणि संस्कृतीच्या मर्यादाच संपल्या. त्यामुळे हिस्त्रतेनं सामान्यांच्या मनात भय निर्माण केलं. सामान्यांच्या निर्भय जगण्याचा अवकाश संपल्यामुळे सार्यांनाच असुरक्षित जगावं लागतंय. या सगळ्याला जबाबदार कोण? याची कारणं सहस्त्रावधी पाऊलवाटांनी अंगावर यायला लागलीत. त्यामुळे सामान्य माणसाचा जगण्यावरचा विश्वास उडाला. त्याच्या दृष्टीने जगण्यात विश्वास ठेवावा असं काहीही राहिलं नाही. त्याला फसवणारे आणि जगण्याला बळ देणारे नेमके कोण? संभ्रम निर्माण झाले. हीच मोठी फसवणूक ठरली.
माणसावर प्रभावी ‘कोरोना’ काळ
आपल्याला काहीतरी मिळेल म्हणून सामान्य, शोषित, पीडित, वंचित माणूस धर्माच्या, जातीच्या चकव्यात अडकत गेला. ही जाणीव गेल्या तीन दशकापासून जगभराच्या माणसांच्या जगण्याचा अभिन्न भाग झाली आहे. भारतीय समाजात या जाणिवेनं माणसं पार एकाकी झाली आहेत. पण या जाणिवेचं स्वरूप विखुरलेलं आहे. खासगीकरणाने मानवी मनाचं पार उद्ध्वस्तीकरण झालंय. यात वेगवेगळ्या घटनांचा परिणाम खोलवर झाला आहे. काळच असा आहे की माणसं हतबल झाली, असह्य झाली, एकाकी झाली. आतल्याआत कुढणारी मनोवस्था सार्वत्रिक झाली. त्याचे सर्वाधिक परिणाम ‘कोरोना’ काळात दृश्यमान झाले.
कोरोनाने सगळ्या जगाला वेढलं आणि जगभर माणसं घराघरात कोंडल्याने बेजार झाली. मानवी मनात तणावाचं विस्मयकारक वातावरण निर्माण झालं. सारे भयभीत झालेले चेहरे अवतीभवती दिसायला लागले. सगळीकडे कोरोनाचा कहर झाल्याच्या बातम्या आकडेवारीसह मानवी मनावर क्षणाक्षणाला आदळत राहिल्या. कोरोनो पेशंटचे आकडे आणि कोरोनाने मृत्यू झालेल्यांचे आकडे जग, देश, राज्य, शहर, खेडे यांच्या नावासह प्रसारित झाले.
जमावबंदी आणि संचारबंदी लादल्यामुळे माणसं घरातच बंदिस्त झाली. पोटावर हात असलेली माणसं, त्यांची उपासमार, रोजगार गमावलेली, उदास माणसं, घरात कोंडली गेलेली निराश-हताश सुखी माणसं सार्यांचंच एक उदास जग तणावाखाली आलं. या तणावानं माणसं चिंतेत गेली. आजचं हे वर्तमान तर उद्याचं काय? ही काळजी माणसांना, मानवी समूहांना घेरणारी होती. घराघरात चिंतेचं वातावरण होतं. ‘काळ’ प्रभावी झाला होता.
सोशल मीडियात काळाचं प्रतिबिंब
कोरोनानं घरात कोंडल्याच्या जाणिवेनं माणसं तणावात होती. तणावमुक्तीसाठी माणसानं आपल्या मुक्तीचे वेगवेगळे मार्ग अवलंबले. आपलं मन वेगवेगळ्या कारणांनी गुंतवून ठेवणं अढळ झालं. समूहापासून तुटल्याची जाणीव तीव्र झालेली होती. नित्याच्या जीवनातले व्यवहार आणि व्यवहाराच्या निमित्तानं भेटणारी माणसं भेटू शकत नाहीत.
भेटण्याची इच्छा असली तरी कोरोना वायरस भेटू देत नाही. इतरांना कोरोना असेल आणि संपर्काने आपल्याला संसर्ग झाला तर ही भयंकर भीती मनात होती. यासाठी टीवी बघत बसावं तर किती आणि काय बघावं? घरातली कामं करावीत तर तेही किती वेळ? यातून सोपा मार्ग म्हणजे इंटरनेचा वापर करणं.
सामाजिक माध्यम म्हणून हेच प्रभावी ठरलं. त्याचा विविध रुपात वापर जगभर झाला. संवादाचं प्रभावी माध्यम इंटरनेटनं आणलेल्या विविध अॅपचा वापर सहजतेनं सुरू झाला. तंत्रज्ञान माणसाच्या हाती आलं आणि माणसाचा मेंदू, त्याचं मन, डोळे आणि हात त्यातच गुंतले. लाईव मनोरंजनाचं हे साधन तणावमुक्त करणारं ठरलं. त्यातही ‘काळ’चे प्रतिबिंब पडणार हे नक्कीच. माणसाचं वर्तन आणि माणसाचा स्वभाव यावर घडणार्या घटनांचा परिणाम होत होता. भोवती घडणार्या घटनांमुळे मानवी वर्तन आणि स्वभाव यात बदल घडत गेले. ‘काळ’च प्रभावी ठरत गेला.
कोरोनाची पार्श्वभूमी लाभलेली कादंबरी
इंटरनेटचा वापर काळाने आणि कोरोनाने प्रभावित केला. ही सगळी पार्श्वभूमी विचारात घेऊन डॉ. बाळासाहेब लबडे यांनी ‘काळमेकर लाइव्ह’ या निराळ्या घाटाची आणि शैलीची कादंबरी लिहिली. यापूर्वी ‘पिपिलिका मुक्तिधाम’ या वैशिष्ट्यपूर्ण कादंबरीने मराठी कादंबरीविश्वाला नवा आयाम देत भर टाकली. वेगळ्या लेखनशैलीने, भाषाशैलीने आणि रचनाबंधाने त्यांनी हे लेखन केलं आहे.
त्यांची शेवटची लाओग्राफिया ही दुसरी कादंबरी मराठीत पहिल्या रांगेतल्या मँजिकल रिअँलिजम आणि अँब्सर्ड फिक्शनची मराठीतली आगळी वेगळी कादंबरी. त्या दोन कादंबऱ्यांनंतर तिसरी कोरोनाची पूर्णपणे पार्श्वभूमी लाभलेली ‘काळमेकर लाईव्ह’ ही कादंबरी आहे. कोरोना काळातल्या माणसाचं वर्तन, त्यांच्या वृत्ती, प्रवृत्ती यांचं त्यांच्या हावभावातून, प्रतिक्रियेतून, विविध घटनांमधून साकार केलंय.
काळमेकर लाईव्ह हे एक अॅप आहे. हे अॅप रात्रंदिवस चालू असतं. सगळेच अॅप व्यवसाय म्हणून आलेत. त्यांची उलाढाल कोट्यवधीत आहे हे सर्वांना माहीत आहे. या आभासींची एक वेगळी दुनिया आहे. कोणतंही अॅप सुरू झालं की बाहेरच्या जगाचा आपल्याला विसर पडतो. आपण दोन-चार मित्रांसोबत बसलो आहोत. त्यांच्याशी काही बोलायचं आहे हे भान आभासी दुनियेत आपण हरवून जातो. या अॅपमधून सारं जगच ऑनलाइन असतं.
आपल्या मनात जे चाललेलं असतं. त्याचं प्रगटीकरण करण्याचं माध्यम म्हणजे हे अॅप आहेत. तिथं वेगवेगळे समूह तयार झालेत. वेगवेगळ्या नावांचे हे समूह आपापल्या मनातले विचार आणि विकारही इथं मांडत राहतात. प्रत्यक्ष समोरासमोर संवादी होतात. वेगवेगळ्या विषयावर वर्तमानाशी, भूतकाळाशी आणि भविष्याशी संबंधित आपल्या भावना प्रगट करतात, चर्चा करतात. त्याच गांभीर्य असतं. तर कधी क्षणिक प्रतिक्रिया असते. ‘काळमेकर लाईव्ह’ मधून या सार्यांचा मनोज्ञ आविष्कार झाला आहे.
वेगवेगळ्या वृत्ती-प्रवृत्तीचं दर्शन
प्रत्यक्ष जीवनातल्या सभ्यतेच्या संकोचानं मनातले सगळे भाव प्रगट करता येत नाहीत आणि ते शक्यही नसतं. पण या आभासी माध्यमावर ते शक्य होतं. मानवी मनातल्या अप्रगट भाव-भावनांचं आविष्करण साहित्यातून होतं. आपल्या जीवनातल्या सुख-दु:खाच्या, भावभावनांच्या, स्वप्नांच्या, मनाच्या आतल्या अव्यक्त क्रिया-प्रतिक्रियांच्या प्रगटीकरणाचा अवकाश साहित्यातून शक्य असतो. आभासी माध्यम त्यासाठी उपयुक्त ठरवून ‘काळमेकर लाईव्ह’ ही साकार झाली आहे.
नाट्यांसह येणारे मनोरंजनात्मक संवाद आणि दृश्य स्वरूपातले लाईव्ह यात आले आहेत. काळमेकर अॅप आपल्याशी संवाद करतं. या संवादातून जगभरातल्या माणसाच्या मनातले तरंग-अंतरंग अचूकपणे वास्तवाला भिडतात.
यात आलेली वेगवेगळ्या स्वरूपातली पात्र प्रत्यक्ष जीवनातली आहेत. त्यात कलावंत आहेत आणि कलासक्त माणसंही आहेत, गरीब आहेत आणि श्रीमंत आहेत, प्रत्प्रवृत्त आहे आणि दुष्प्रवृत्त आहेत, चरसी-गांजाडू व्यसनी आहेत आणि पूर्णत: निर्व्यसनी आहेत, विकृत मनोवृत्तीचे आहेत आणि छंदिष्टही आहेत. अशा नानाविध वृत्ती-प्रवृत्तीचं दर्शन यातून सहज संवादातून आणि वीडियो दृश्यातून होत राहातं.
सारं जग समोर येतं तेव्हा…
यात येणारे समूह एका देशातल्या किंवा एका देशाच्या राज्यातले नाहीत. विविध देशातले लोक जमेल तशी भाषा, विविध भाषेतली गाणी यातून संवादी संपर्कात आहेत. त्यांचं प्रत्यक्ष भेटणं या आभासीत्वाने शक्य झालंय. यात अफगाणिस्तान, पाकिस्तान, रशिया, इंडोनेशिया, थायलंड, चीन, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अमेरिका यांसह विविध देशातल्या आणि भारतातल्या आसाम, पंजाब, तामिळनाडू, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल या राज्यातले लोक ‘कनेक्ट’ झालेत.
त्यांच्या भाषा, त्यांच्या लकबी, त्यांच्या सामाजिक-सांस्कृतिक संदर्भासह इथं आकाराला आलेत. पंजाबी, आसामी, बंगाली, राजस्थानी, उत्तर प्रदेशी, भोजपुरी, तेलुगू, हिंदी, उर्दू आणि मधेच येणारी इंग्रजी या सर्वच भाषांचा संवादी भाषिक कोलाज सुंदर साधलाय. सामाजिक माध्यमातून वापरली जाणारी नित्याची संवादी भाषा मूळ रूपात कादंबरीतून आली आहे. त्यामुळे वातावरणात जिवंतपणा निर्माण झाला आहे.
सामाजिक माध्यमांवर सतत लाईव्ह असणं आणि आभासी असतानाही प्रत्यक्ष सोबत असल्याच्या जाणिवेचा फिल असणं यातून संवाद खुलत जातो. आभासी असण्याच्या ऐवजी प्रत्यक्ष असल्याचं समजणं हेच सामाजिक माध्यमांचं रूप-स्वरूप आहे. असं असलं तरी समाजाच्या वर्तमान वास्तवाचे अंतरंग आणि एकूणच बदलत्या सामाजिक मानसिकतेचे रंग प्रगट होतात.
जगभरातल्या माणसाच्या मनातले, अंतर्मनातले सगळे विकार-अविकार यांचं अचूक दर्शन घडत जातं. त्यामुळे मानवी मनाचा तळ नेमकेपणाने उलगडला जातो. त्यातूनच साऱ्या जगाचं प्रातिनिधिक स्वरूपात समोर येते. त्यात नानाविध वृत्ती-प्रवृत्ती येत राहतात. या लाईव्ह असणार्या विविध समूहांमधे सत्प्रवृत आणि दुष्प्रवृत्त, श्रीमंत आणि गरीब, गांजाडू आणि निर्व्यसनी, छंदिष्ट आणि नादिष्ट, असामान्य आणि अगदीच सामान्य, कलासक्त रसिक आणि पूर्णत: अरसिक अशा नाना तर्हेची माणसं ‘काळमेकर लाईव्ह’ने साकार केली आहेत.
‘काळ’ आपला ठसा उमटवतोय
सध्या सामाजिक माध्यमाचा वापर आपली प्रतिमा अधिकाधिक उजळ बनवण्यासाठी इतरांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सतत होतो. इतरांच्या बदनामीसाठी चारित्र्यहननाचा आणि खोटं सत्य असल्याचं भासवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात होतो आहे. विशेषत: राजकारणी लोक याचा वापर करतात. सांस्कृतिक क्षेत्रातही याची लागण झाली आहे. याचं वास्तवच बाळासाहेब लबडे यांनी त्यांच्या खास शैलीने मांडलंय. यात समोर एक नाट्य आणि आभासी दुनियेत सामील झालेल्यांचे एक नाट्य अशा दुहेरी नाट्यातून कादंबरीचं आशयधनत्व गतिमान झालंय.
‘काळ’ इथं केंद्रस्थानी आहे. सामाजिक माध्यमांवर काळाचा प्रभाव असणारच आणि आहेच. जगभरातल्या वर्तमान वास्तवावर, माणसाच्या वर्तमानावर, राजकीय दांभिकतेवर भाष्य करत ‘काळ’ पुढे सरकत जातो. वाटस्अॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम, झूम, गुगल मीट, फेसबुक यासारखी माध्यमं हाताशी आल्यामुळे मानवी मन अधिक स्वैरपणे संवादी बनलं.
प्रत्यक्षात न बोलता येणारे माध्यमावर मुक्तपणे, स्वच्छंदीपणे प्रगट होणारी माणसं आणि त्याची प्रवृत्ती अधोरेखित झाली. कोरोना काळातली होमासिकनेक आणि एकाकीपण आलेली माणसं आपल्या विकारांसह व्यक्त झाली. चेहरा नसलेली माणसं आपण या समूहात कोणीतरी आहेत याचा ठसा उमटवण्यासाठी धडपडत राहतात. यात ‘काळ’च आपला ठसा उमटवून जातो.
‘काळपुरुषाची गोष्ट’ गणगौळणीच्या रूपात
‘काळमेकर लाईव्ह’मधे येणारी, असणारी शेकडो माणसं बिनचेहर्याची आणि मनोविकाराची आहेत. त्यामुळे कादंबरीत अप्रत्यक्ष येणारा ‘काळ’च कादंबरीचा नायक ठरतो. नाट्याचा घाट लाभलेल्या कादंबरीच्या आरंभीच ‘काळपुरुषाची गोष्ट’ गणगौळणीच्या रूपात स्थिती-गतीवर सहज भाष्य या ‘गोष्ट’मधून येते. हा दीर्घ एकांकिकेचा एक तुकडा असा आहे…
प्रियकर म्हणा की प्रेयसी
मित्र म्हणा की मैत्री
फुग्यावर फुगे सात
त्यावर वोटींग मशीन
गण झाला आता गब्बर देवासाठी गौळण तो तंबू टाकून बसलाय बडी कटेली नचानिया म्हणत.
मृद मधुर मधुर वाजवितो वेणू । गब्बरू नंदनू विकासाचा ॥१॥
तेणे विरोधक वेधले । पात्र झाला ब्रह्मसुखा ॥२॥
रंजविल्या विनोदवचनी । हास्य करूनी कवी हासवीतू ॥३॥
बहोत नाईन्साफी त्यांचिया गळा । चकरा वेळोवेळा एटीएमपल्लवा ॥४॥
सगळे :
पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम । भारतीय राज्यघटना की जय
आता मंडळींना ती गवळण निघाली आहे.
एक : कुठे निघाली आहे.
दुसरा : हेच गब्बरच्या अड्ड्यावर
तिसरा : काय?
दुसरा : ते म्हणजे हेच डिजिटल बाजारात
सगळे : ‘चला चला दिल्लीला जाऊ या’
डोळे भरूनी शाहीन बाग पाहूया
चला चला दिल्लीला जाऊ या गब्बरला पाहू या
गब्बरची एन्ट्री होते …
गब्बर : जब पचास कोस दूर कोई बच्चा रोता है … पेंध्या काय रे हे ?
गौळणी अजून कशा आल्या नाहीत?
पेंध्या : गब्बरदेवा बहुतेक जिओचा फुकटचा पॅक संपला असावा.
गब्बर : रामगडकेवासियो … कान खोल के सुनलो … हे असंच आहे .. पहिली सवय लावायची आणि मग काढून घ्यायची आऽऽ
“थू । बहोत नाइनसाफी है ये.”
देवाधिदेवा गब्बर देवा तो पाहा गौळणींचा जथा येत आहे. तलाक आदेश घेऊन … अबब पेंध्या हा एवढा लोंढा अचानक कसा काय? महाराजनंदना आपल्याकडे मेगाभरती चालू आहे. तिकडेच त्या चालल्यात आपल्या आपल्या नवर्यांना बेजार करायला .. आ थू ऽऽ
इसटाप इसटाप इसटाप
थांबा थांबा थांबा
एक : तुझं नाव काय?
दुसरा : देवा जरा बिलिंदर नाव आहे.
चौघी : तो आमच्याबरोबर हाय आमच्या आयटी सेलचा प्रमुख.
पेंध्या : म्हणजे आयटीचा पक्षी हाय …
गौळण : आताच पक्षांतर करून आलाय.
पेंध्या : श्रीकृष्ण देवा यांची चौकशी आपण केली. घाबरून त्या आपल्या मधुरेच्या बाजारात सामील झाल्यात.
गब्बर : गौळणींनो आपल्याला श्रींचे राज्य आणायचे आहे. जे ब्लॅक आहे, ते व्हाईट करायचे आहे.
पेंध्या : तू काय आणलं गं?
गौळण : माझ्याकडं एक लाख व्हाटस्अॅप ग्रुप हायतं दहीदुध पसरायला.
पेंध्या : तू काय आणलं गं …
गौळण : मी फेसबुकवर हल्ला करणारी तुमची भक्त हाय …
पेंध्या : तू काय आणलं गं …
गौळण : मी फुगे तयार करायचं काम करते.
पेंध्या : तू काय आणलं गं …
गौळण : माझ्याकडं ट्रोलर्सची गँग हाय.’
माणसांचं होत जाणारं उद्ध्वस्तीकरण
‘काळपुरुषाची गोष्ट’ विस्ताराने उद्घृत केली आहे. यातून एकूण आशयाचं, कथानकाचं, लेखनशैलीचं आणि भाषेचं स्वरूप ध्यानात येतं. भोवतालच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिकतेसह सार्या वास्तवाची गुंतवळ प्रगट झाली आहे. सामाजिक माध्यमांवर चालणारे ‘डावपेच आणि त्यातून होणारे संभ्रम पैदा करणारे दुष्टावे यातून सूचित केलेत. हेच कादंबरीतून चित्रित झालंय.
राजकीय सत्तेची भलावण करणारे भक्त सामाजिक माध्यमावर ‘सत्य’ सांगणार्यावर तुटून पडतात. ही भक्तीच वास्तव बोलणार्यांना अत्यंत घृणास्पद टिप्पणी करून ट्रोल करते. ट्रोल करण्याचा हेतू आवाज बंद करण्याचा असतो. त्यासोबतच संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्नही असतो.
हे सगळं करताना नव्या नव्या आयडीवरून नवं नवं नाव धारण करून हे खोटारडे उद्योग चाललेले आहेत. हे दुष्टावे समाज नासवण्याचे ‘अनंत चाले’ मोबाईलवर निरंतर चालतच राहतात. आपलंच होणारं उद्ध्वस्तीकरण माणसं टकमक पहात राहतात.
‘मार्केटिंग’चा भुलभूलैया
खासगीकरणाचा कहर मातलेला असताना माणसं हतबल झालीत. खासगीकरण महत्त्वाचं असल्याचं पटवण्यात खासगीकरणाच्या समर्थकांनी आपली सगळी ‘कला’ दाखवली आहे. सगळ्या कंपन्यांनी ‘वॉर रुम’मधून मार्केटिंगचा ‘बाजार’ मांडला आहे. सध्या ‘मार्केटिंग’च्या भुलभूलैयाने उच्छाद चालवला आहे.
अनलिमिटेड डेटा लिमिटेड पिरियडचा घोष दुसरीकडेच होतो आहे. त्यात सामील झालेले तरुण, म्हातारे यांसह सारेच त्यांच्या ‘लुबाडण्याच्या’ रीतीमधे पत असेल त्यानुसार सामील होता. ‘कालभैरवा’चा शोख जारी आहे. या सार्या प्रकारच्या मार्केटिंगमधे आपण अडकतो. या विचित्र अवस्थेचं सत्य नेमकेपणाने बाळासाहेब लबडे यांनी शब्दबद्ध केलंय.
सगळं निरर्थक असल्याची जाणीव
‘मनातल्या मनात आपण बोलत राहतो. मनातल्या मनात आपण सोलत राहतो.’ ही ‘खाउजा’ आल्यानंतरची आपली स्थिती आहे. ‘मनी’ केंद्र झाल्यानं माणसाच्या मनात ‘पैसा’च घर करून बसला आहे. त्यामुळे माणसामाणसात ‘तुटलेपण’ आहे. माणूसच आतून उसवला आहे, मनातून सोलून निघाला आहे. तरीही माणसं लाईव्ह येतात, गिफ्टींग करतात, टास्क पूर्ण करतात, गाणी गातात, गप्पा करतात, वेगवेगळ्या स्वरूपाचे चॅटिंग चालतं. असं असलं तरी सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळत असतात असं नाही.
प्रत्येकाचं आयुष्य हे ज्याने, त्याने घातलेलं एक कोडं आहे. हे कोडं सुटतंच असं नाही. प्रश्न मात्र शिल्लक राहतात. प्रश्नांमागून प्रश्न येतच राहतात. ही मालिका जन्मापासून माणसाच्या मृत्यूपर्यंत अविरतपणे चालू असते. आपण फक्त आकाशाकडे पाहत असतो. हतबल असतो. त्याशिवाय आपण दुसरं करणार तरी काय?’ ही अवस्था असते.
हा अॅप … तो अॅप आणि पाच हजार मित्रांचा आभासी खेळ उसणा उत्साहात चाललेलाच असते. एकाच वेळी अनेकांशी अनेक प्रकाराने अनेक स्वरूपात आभासी संवाद सुरू असतो. त्याच प्रेमाची साद असते, रमीचा खेळ असतो, दिलेला टास्क असतो. असं बरंच चाललेलं असतं. हे सगळं निरर्थक असल्याची जाणीव हरवून जाते.
चर्चा कोरोनातल्या तुटलेपणाची
आभासी धुंदी-नशा येत जाते. त्यातही वास्तवाची चर्चा होत राहते. ‘काळमेकर लाईव्ह’मधून कोरोनासह विविध देश पातळीवरच्या समस्यांचं चिंतन येतं. आपल्या भोवतीच्या वास्तवासंबंधी आभासी संवादातून नेमकं भाष्य केलंय.
कधी नाही ते कोरोना काळात भारत सरकारने देशाच्या आरोग्याची काळजी करण्याचं ठरवलं आहे असं वाटलं. टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, लाईट बंद करा, पुन्हा सुरू करा असं आवाहन करण्यात आलं. रोज कोरोनाच्या बातम्या सुरू झाल्या. कोरोनाचीच चर्चा. सामाजिक माध्यमांवर ही कोरोनाचीच चर्चा चाललेली होती. हॉस्पिटलमधे दाखल झालेल्या कोरोना झालेल्यांच्या अनुभवाचे वीडियो सामाजिक माध्यमांवर शेअर केले गेले. त्यातून कोरोना स्थितीचं विदार वास्तव डॉ.बाळासाहेब लबडे यांनी अधोरेखित केलंय.
आरोग्य यंत्रणेचं काही ठिकाणी अपयश तर काही ठिकाणी पूर्ण काळजी घेणारी यंत्रणा चित्रित झाली आहे. ‘हा आजार मिडिया आणि सरकारने इतका गंभीर केला की लोकांना वाटतं आपण मरणार.’ ही संपूर्ण समाजाची मानसिकता झालेली होती. ठिकठिकाणच्या हॉस्पिटलची स्थिती, तिथली औषधी, ऑक्सिजन, सॅनीटायझिंग, पेशंटना दिलं जाणारं जेवण, तिथं पुरवलं जाणारं पाणी, आरोग्यसेवेसाठी वापरलेले शिक्षक-प्राध्यापक सारेच माणसाची स्थिती वाईट करणारीच असल्याचं चित्र सार्वत्रिक होतं.
आरोग्य कर्मचार्यांचं पेशंटशी असलेलं वर्तन चिंताजनकच होतं. या काळात शाळा, कॉलेज बंद केली. त्यांच्या परीक्षा न घेताच आणि नंतर जुजबी परीक्षा घेत त्यांना पुढच्या वर्गात बढती दिली गेली. परीक्षेचा आणि नंतर पुढच्या अध्यापनाचा सगळीकडे संभ्रम निर्माण झालेला दिसला. शासन, शाळा. कॉलेज यांच्याकडे निश्चित धोरण नाही. आर्थिक आघाडीवर शासन पूर्णत: अपयशी ठरलं. उद्योग बंद ठेवले. बाजार बंद केले. नोटाबंदीप्रमाणे याही बंदमुळे अनेकांचे रोजगार गेले. सामान्यांचे खाण्या-पिण्यापासून अनेक बाबतीत हाल झाले.
आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी शासनाने दारूची दुकानं सुरू केली. मोठ्या खंडानंतरही दुकानं उघडल्याने तळीरामांनी रांगा लावल्या. गर्दी रोखणं कठीण झाल्यावर तिथं शिक्षक-प्राध्यापकांवर शिस्त लावण्याची जबाबदारी दिली. सगळंच उलट-सुलट घडत होतं. कोरोनात काही कुटुंबातली कर्ती माणसं गेली, काही कुटुंबातले तरुण दगावले. तुटलेपणाच्या जाणिवेनं पेशंटनी आत्महत्या केली. हे सगळं घडताना देशात हिंदू-मुस्लिमांच्या भेदाची आणि त्यांच्यात विद्वेष वाढवण्याची चर्चा कर्णोपकर्णी पसरवली जात होती. परदेशात असणारे भारतीय परत आले आणि काही काळाने परत गेले.
सरकारी धोरणावर कडवट भाष्य
कोरोना काळाची सगळी भयप्रद वास्तव स्थिती वेगवेगळ्या घटना-प्रसंगातून या कादंबरीने चित्रित केली आहे. कोरोना काळातल्या विदारक वास्तवासह इतर घडामोडींचं चित्रण आलंय. या घडामोडींचं देशातलं राजकारण नाही तर जनजीवन ढवळून निघालं. कृषी उत्पन्न बाजार समित्या ज्या कायद्याने अस्तित्वात आल्या तो कायदा रद्दबातल ठरवण्यात आला. त्याऐवजी भांडवलदारांच्या हितासाठी नवे तीन कृषी कायदे वटहुकूमाने जारी केले. नंतर तेच कायदे संसदेनं चर्चा न करता मान्य केले. त्याची संतप्त प्रतिक्रिया देशभर उमटली. कृषी कायद्याच्या विरोधात शेतकर्यांनी वर्षभर आंदोलन केलं.
‘लिरीकल भंडाफोड’ या ‘लाईव्ह सोळा’ मधून नाट्य रूपात आलंय. सरकारचा हा सुंदर फुगवलेला फुगा कायदे मागे घेतल्याने फुटला. यावर भाष्य करताना बाळासाहेब लबडे यांनी म्हटलंय की, ‘किती सुंदर दिसतात हे फुगे, शेतीक्षेत्राच्या खरेदी विक्रीवरील सर्व बंधने उठविणे, शेतकर्यांच्या शेतीमालास अधिक किंमत मिळेल, तेथे विकण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देणे, लुबाडणार्या दलालांना आळा घालणे आणि अखेर शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करणे. किती हिताचे फुगे सरकार तयार करते आहे.’ त्याचं विश्लेषण या प्रवेशात आलंय. ‘हा एक फुगलेला सुंदर फुगा’ यातूनच उपहास-उपरोध प्रगट झाला आहे. लाईव्ह होणार्या सामाजिक माध्यमांवरच्या चर्चा सरकारी धोरणावर कडवट भाष्य करते.
शेतकर्यांनी वर्षभर आंदोलन केलं. सातशे शेतकर्यांना या आंदोलनात हौतात्म्य पत्करावं लागलं. या तीन कृषी कायद्याचा अर्थ एवढाच आहे की, ‘ही सार्वजनिक वितरण व्यवस्था मोडकळीस आणायची आहे. हे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नष्ट करायचं आहे. हे अनुदान बंद करायचं आहे. एक देश, एक बाजारपेठ हे फसवं धोरण आहे. १९६५ पासून असलेलं हमी किमतीचं धोरण रद्द करायचं आहे.
कोणतं धोरण चालू ठेवायचं की नाही हे सरकार कायद्यानुसार आपल्या हाती घेत आहे. किमान हमी भाव नष्ट होईल. पुढे या शेतीत खाजगी कंपन्या उतरतील. आधी त्या भरपूर भाव देतील. त्यामुळे बाजार समित्या ओस पडतील. नंतर मोठ्या कंपन्या देतील त्या भावाने शेतकर्यांना विक्री करावी लागेल. शेतकर्यांना स्वातंत्र्यापेक्षा हमी महत्त्वाची वाटते आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था कोसळली की सगळं कोसळेल. या काळ्या बाजाराचं आणि कृत्रिम टंचाईचं तुम्ही काय करणार आहात?’ असे शेती आणि शेतकरी यांच्या मुळावर घाव घालणारे हे कायदे भांडवली नीतीचा भाग म्हणून आले आहे.
दिल्ली बॉर्डरवरच्या देशभरातल्या शेतकर्यांच्या आंदोलनाने सरकारला माघार घ्यावी लागली. सरकारला हे अपयश अनपेक्षित होतं. पण लोकशाहीमधे अपेक्षित होतं.
लाईव्ह राहण्याची झिंग
या विदारक वास्तवासह सरकारची भांडवलदार धार्जिणी नवी नीती, सरकारी उपक्रमांचं खाजगीकरण, इतिहासाचं विकृतीकरण, तिथले गणेशोत्सव, नवरात्री उत्सव, आंबेडकर जयंती उत्सव, सभोवतीचं जातवास्तव, शहरी-ग्रामीण दलित वस्तीतलं वास्तव, कोरोनाच्या लॉकडाऊन काळातली सामान्यांची स्थिती, विविध पंथीयातलं लोकांचं वर्तन, ग्रामीण भागातल्या शेती-बिगरशेती धारकांचं जगणं, प्रत्येक कुटुंबाचं बंद काळातलं जगणं, वैयक्तिक जगण्यातल्या भावनांचा कोंडमारा, सामाजिक माध्यमांवर स्त्रियांशी पुरुषांचं संभाषण या वास्तवातून समाजाचं अध:पतन चित्रित झालंय.
साहित्य आणि नाटकातल्या विविध प्रकारांची रचनाबंधाची आणि आशयाची चर्चा यात मूलगामी स्वरूपात आली आहे. नाटक, लोकनाट्य, कविता, गाणं यांच्या सादरीकरणातून आलेली लाईव्ह राहण्याची झिंग वास्तवासह येत राहते.
कादंबरीत अगणित सामान्य माणसं
आभासी वाटणारं माध्यम कादंबरीमधून वास्तव सांगण्यासाठी येतं आणि आपल्या जीवनाबद्दल अंतर्मुख व्हायला भाग पाडतं. आपल्या जीवनाला आपल्याच वर्तनानं वाळवी लागल्याची जाणीव ‘लाईव्ह फिलॉसॉफिकल’ थाटासह कादंबरीच्या सर्वच भागातून आपणाला आतून पोखरून टाकते. त्यासाठी कवितेचा वापर केला आहे.
दुभंगात अडकलेली संभ्रमी अवस्था भास आणि आभासामधून प्रगट होते. ठायीठायी होणारे याच काळातले वेबिनार म्हणजे काळाचे तुकडे जोडण्याचे प्रयत्न आहेत. हे प्रयत्न ज्ञान वाढवणारे असल्याचा भास प्रत्यक्षात अज्ञानाचं प्रगटीकरणच असतं. त्यामुळे इथला अंधार मेणबत्त्या लावूनही संपत नाही. उलट नव्या पद्धतीने जीवनाला लागणारी वाळवीच आपण पाळतो आहोत हे चिंतन वर्तमानाच्या संदर्भात मोलाचं आहे.
कादंबरीची नेहमीची चौकट इथं नाही. कथानक, उपकथानक, नायक-नायिका, त्यांच्या भोवतीचा समाज, समाजातल्या घटना, प्रसंग याची चौकट या कादंबरीला नाही. कोरोना काळातल्या बिनचेहर्याची, चेहरा हरवलेली, एकाकीपणाने अस्तित्व हरवलेली आणि अशाच अगणित सामान्य माणसांचं प्रतिनिधित्व करणारी माणसं इथं आहेत.
‘काळ’ हाच कादंबरीचा नायक
माणसं प्रत्यक्ष एकमेकांना सामाजिक माध्यमांवरच भेटतात. त्यांच्या कृती-उक्तीतून, त्यांच्या भाषिक वर्तनातून, प्रतिक्रियात्मक संवादातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वासह साकार होतात. यात कुणीच नायक-नायिका किंवा मुख्य म्हणून ठळक होत नाहीत. कोरोना काळात चाललेल्या जगभरातल्या क्रिया-प्रतिक्रियांची स्पंदनं अक्षरांतून उमटत राहतात. आपल्या अनुभवांचं सामान्यीकरण त्यांच्या कृती-उक्तीतून होत जातं.
त्यात कँडी ऊर्फ काळू, रेहमान, चंप्त्या, कुलकर्णी, पांड्या हे सगळे लाईव्ह येतात आणि आपला परफॉर्म करतात. बाकीचे त्यावर प्रतिक्रिया देतात. त्यात प्रा. डॉ. डफले, प्रा. आनंद कांबळे, डॉ. मोहन, रूप, बाबा, अक्षय, आरव, वी के, वी एम., शिक, गण्या, मोहन पटेल, इंगोले, रमेश जाधव, सुमंतसिंग, संत्या, संज्या, कोकीळ साहेब, अब्बा, फुगेवाला, नैना, ललित, जीनी, स्वीटी, दिपिका स्टार, फुगेवाली, सायराबानू, डॉक्टर, नर्सेस, प्रेक्षक यांच्यासह अगणित माणसं ‘काळमेकर लाईव्ह’ मधून त्यांच्या व्यक्तिमत्त्वासह आली आहेत.
आजचा काळ, समाजाची स्थिती-गती, सामाजिक माध्यमे आणि वर्तमान वास्तव यावर भाष्य करणारं, निराळे आविष्करण घडतं. यात ‘काळ’चा नायक होऊन येतो. ‘काळ’ केंद्रस्थानी घेऊन कादंबरीलेखन कठीण असतं. पण डॉ.बाळासाहेब लबडे यांनी हे सहजसाध्य केलंय.
मूल्यांचा ऱ्हास आणि मूल्यभानाची प्रचिती
समकालीन सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक वास्तवाचं आणि या क्षेत्रातल्या मूल्य र्हासाचं जगच नव्या प्रयोगशीलतेनं इथं आविष्कृत झालंय. काळाचं नेमकं भान कवितेतून आणि बहुरुपीच्या संवादातून आलंय. वर्तमानाचं नवं चिंतन आणि नवं मंथन घेऊनच कादंबरीनं नवं कोलाज मांडलंय. आजच्या जगण्याची गिचमीळ, भाविक सरमिसळ, स्वप्नविफलतेतून आलेली भूमिकाहीन संभ्रमता म्हणजे ‘काळ मेकर लाईव्ह’ आहे.
माणसाच्या जगण्याचा बिघडलेला आडवा-उभा पोत कादंबरीकाराने सत्याचा आपलाच होऊ न देता मांडला आहे. वर्तमानाचीच नाही तर प्राचीन काळापासूनची जगण्याची रीत आणि तत्कालीन वास्तव सर्व संदर्भासह ‘काळ’ बोलत राहतो. या कादंबरीतला म्हातारा एक अजब रसायन आहे. म्हातारा जी स्वगतं या कादंबरीचं सामर्थ्य आहे. त्यातूनच मूल्य र्हासाची वास्तवता आणि मूल्यभान प्रगट झालंय.
रूपकात्मक स्वरूपाच्या ‘पिपिलिका मुक्तिधाम’ या कादंबरीने प्रयोगशील कादंबरीकार म्हणून बाळासाहेब लबडे यांची दखल घेतली गेली. आता ‘काळमेकर लाईव्ह’ या नव्या कादंबरीच्या नावीन्यपूर्ण प्रयोगिकतेनं त्यांनी आपल्या लेखनाचं वेगळेपण सिद्ध केलंय.
कादंबरी : काळमेकर लाइव्ह
लेखक : बाळासाहेब लबडे
प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठ : प्रमोदकुमार अणेराव, भंडारा
पहिली आवृत्ती : १०एप्रिल २०२३
पानं : २९६ किंमत : ५५०
(लेखक ज्येष्ठ समीक्षक आहेत.)