‘आर्चीज’ कॉमिक्सची जादू भारतीय सिनेरसिकांवर चालणार का?

कॉमिक बुक आणि लहानपण हे समीकरण सर्वसामान्य भारतीयांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने आलं ते साठच्या दशकात. अर्थातच परदेशातल्या कॉमिकवेडचं ‘भाषांतरित’ लोण भारतात साठच्या दशकाआधी पोचलं असलं तरी ते काही मूठभर उच्चवर्गीयांपुरतंच मर्यादित होतं. १९६४मधे सुरू झालेल्या ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या ‘इंद्रजाल कॉमिक्स’ने भारतातल्या वाचकवर्गाला कॉमिक्सची ओळख करून दिली.

तिथून सुरू झालेला भारतीयांवरचा कॉमिकचा हा करिश्मा आजतागायत टिकून आहे. वेगवेगळ्या भाषांमधले आणि देशांमधले असंख्य कॉमिक आजही भारतीयांकडून वाचले जातात. त्यात अगदी मराठमोळ्या ‘चिंटू’सारख्या प्रादेशिक कॉमिकपासून ते जपानी ‘नरुटो’सारखं जागतिक प्रसिद्धी मिळवलेलं कॉमिकही येतं. ‘टिनटिन’, ‘सुपरमॅन’सारखे काही जगभर प्रसिद्ध झालेले कॉमिकही प्रदीर्घ काळापासून भारतीयांच्या वाचनात आहेत, त्यांपैकीच एक म्हणजे ‘आर्चीज’.

काय आहे हे ‘आर्चीज’?

‘रिवरडेल’ हे अमेरिकेतलं एक काल्पनिक, छोटंसं खेडेगाव. या गावातल्या किशोरवयीन पोराटोरांची कहाणी म्हणजे ‘आर्चीज’. तांबट केसांचा, देखणा, गिटार वाजवणारा आर्ची अँड्र्यूज हा या कॉमिकचा कथानायक. रिवरडेलमधले त्याचे सगळे मित्र ही खरी ‘आर्चीज’ गॅंग. निःस्वार्थी भावनेने सगळ्यांना मदत करणाऱ्या आर्चीला अभ्यासात फार गती नसली तरी प्रेमाच्या खेळातला तो मुरलेला खेळाडू आहे.

जगहेड जोन्स हा खादाड, मस्तमौला भिडू म्हणजे आर्चीचा जिवलग मित्र तर सतत कुरापती काढणारा रेजी मँटल हा आर्चीचा कट्टर प्रतिस्पर्धी. उच्चभ्रू, स्टायलिश राहणीमान असलेली वेरोनिका लॉज आणि गर्ल नेक्स्ट डोअरची प्रतिमा जपणारी हुशार बेटी कूपर या आर्चीच्या दोन क्रश. आर्चीच्या आयुष्यातला हा प्रेमत्रिकोण आणि इतर गंमतीजमतींचा आधार घेत ‘आर्चीज’चं कॉमिकविश्व उभं राहिलंय.

हेही वाचा: जुन्या इफ्फीच्या ताज्या आठवणी

असा झाला ‘आर्चीज’चा जन्म

दुसऱ्या महायुद्धापूर्वीच्या महामंदीत पत्रकारिता करणाऱ्या जॉन एल गोल्डवॉटरने न्यूयॉर्कमधे शिपिंग कंपनी सुरु केली. स्थानिक मासिकांचे जुने अंक स्वस्तात खरेदी करून परदेशात चढ्या भावात विकायची कल्पना त्याला यावेळी सुचली. पण यासाठी त्याला एक हक्काचा प्रकाशक हवा होता. त्यावेळी पल्प मॅगझीन्सच्या प्रकाशनांचा मोठा अनुभव गाठीशी असलेल्या लुईस सिल्बरक्लाईटशी हातमिळवणी करत त्याने आपला व्यवसाय सुरू केला.

लवकरच महायुद्ध सुरू झालं आणि हा व्यवसाय ठप्प झाला. दुसरीकडे ‘सुपरमॅन’च्या लोकप्रियतेमुळे सुपरहिरो कॉमिकचा खप प्रचंड वाढला होता. ही सुवर्णसंधी साधण्यासाठी गोल्डवॉटर आणि सिल्बरक्लाईट यांनी मॉरीस कॉयन या बिझनेस मॅनेजरला सोबत घेऊन आपल्या आद्याक्षरांवरून ‘एमएलजे मॅगझीन्स’ ही नवी प्रकाशन संस्था १९३९मधे स्थापन केली. त्यानंतर तीन महिन्यांत एमएलजेचे सुपरहिरो कॉमिक छापले आणि विकले जाऊ लागले.

त्यातलं शिल्ड या सुपरहिरोचं पेप कॉमिक प्रचंड लोकप्रिय झालं. १९४१मधे याच पेपच्या बाविसाव्या अंकात विक ब्लूमने लिहलेला आणि बॉब मॅन्टानाने रेखाटलेला आर्ची अँड्र्यूज हा जगहेड जोन्स आणि बेटी कूपर या आपल्या सवंगड्यांसोबत अवतरला. अमानवी शक्तींचं वरदान लाभलेल्या सुपरहिरोंच्या कॉमिकविश्वात आर्चीसारखी सामान्य व्यक्तिरेखा आणि रिवरडेलच्या करामती पोरांचे कारनामे अनपेक्षितपणे हिट ठरले.

आर्चीचं पात्र पेप कॉमिकमधे झळकू लागल्यावर पूर्वी मुखपृष्ठावर कायम पडीक असलेल्या शिल्डला हे पान त्याच्यासोबत वाटून घ्यावं लागलं. याला कारण म्हणजे आर्चीची लोकप्रियता. कालांतराने शिल्डचं मुखपृष्ठावरचं स्थान कधी आकाराने तर कधी मानाने लहान होऊ लागलं आणि आर्ची अधिकच मोठा, लोकप्रिय झाला. १९४६मधे शेवटी एमएलजे मॅगझीन्सचं बारसं ‘आर्ची कॉमिक पब्लिकेशन’ असं झालं आणि ‘आर्चीज’ चं कॉमिकविश्व खऱ्या अर्थाने एक ट्रेंडसेटर बनलं.

झोयाचा नवा प्रोजेक्ट

इंग्रजी कॉमिकविश्वात मानाचं पान मिळवणारं हे ‘आर्चीज’ भारतात आलं ते ऐंशी-नव्वदीच्या दशकात. तोवर ‘इंद्रजाल कॉमिक’पासून सुरू झालेलं भारतीयांचं कॉमिक वाचन ‘अमर चित्र कथा’, ‘टिंकल’, ‘चाचा चौधरी’ने आणखी समृद्ध केलं होतं. साहजिकच, ‘आर्चीज’ही अगदी कमी काळातच भारतात लोकप्रिय झालं. बिनधास्त, बेफिकीर, बेधडक तरुणाईची स्वप्नवत गोष्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाऊ लागलं.

भारतातला किशोरवयीन वाचकवर्ग ‘आर्चीज’च्या गँगमधे स्वतःला आणि आपल्या मित्रमंडळींना शोधतो. या कॉमिकमधल्या पात्रांना अमेरिकेतली उच्चभ्रू,  श्रीमंती थाटाची पार्श्वभूमी लाभलीय. त्यामुळेच ‘दिल तो पागल है’, ‘वेक अप सिड’, ‘स्टुडंट ऑफ द इयर’सारख्या उच्चवर्गीय पात्रांभोवती फिरणाऱ्या सिनेमांमधे ‘आर्चीज’चे पुसटसे संदर्भही दिसतात. अशावेळी बांद्र्याच्या उच्चभ्रू परिसरात वाढलेल्या झोया अख्तरला ‘द आर्चीज’ पडद्यावर साकारावं वाटणं साहजिकच आहे.

‘लक बाय चान्स’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ आणि ‘गली बॉय’सारख्या तरुणाईला भावणाऱ्या हिट सिनेमांचं दिग्दर्शन झोयाने केलंय. आता ‘द आर्चीज’मधून शाहरुख खान, बोनी कपूरसारख्या दिग्गजांची मुलं सिनेक्षेत्रात पदार्पण करतायत. त्यामुळे झोयावर नेपोटीझमचा आरोपही होतोय. अभिनेता सुशांत सिंगच्या आकस्मिक मृत्यूनंतर सिनेजगतात नेपोटीझमचा पेटलेला वाद अजूनही शांत झालेला नसतानाही झोयाने हे धाडस केलंय, ते निव्वळ ‘आर्चीज’च्या प्रेमापोटीच!

स्टारकिड्सचा भरणा असलेला हा श्रीमंत पोरांचा टीनेज ड्रामा सर्वसामान्य भारतीय प्रेक्षकांना कितपत आवडेल, याचं उत्तर अजून गुलदस्त्यात असलं तरी एका अर्थी हा सिनेमा बनणं महत्त्वाचं असणार आहे. एकेकाळी, ‘आर्चीज’ने सुपरहिरो कॉमिकविश्वात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. त्यामुळे ‘केजीएफ’, ‘पुष्पा’सारख्या मारधाडपटांची चलती असलेल्या आत्ताच्या काळात ‘द आर्चीज’ हा सिनेमा कॉमिकसारखाच काही चमत्कार घडवू शकतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हेही वाचा: 

ओटीटी प्लॅटफॉर्मना सेन्सॉर असायला हवा?

मनातला रावण काढायची ‘ऊर्मी’ देणारा स्वदेस

भानूताई सिनेमाच्या काळाचा अभ्यास करून वेशभूषा ठरवायच्या

जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा

0 Shares:
You May Also Like
संपूर्ण लेख

पर्यंटकांच्या गर्दीला युरोप नाही म्हणतंय, भारताचं काय?

कधी कधी स्वत:वर, तर कधी परिस्थितीवर रडावसं वाटतं. ज्या ठिकाणी आपण आनंद घेण्यासाठी जातो त्या सर्व ठिकाणांची आजची…
संपूर्ण लेख

शाहरुखचा ‘जवान’ हिट का झाला?

२०१७ मधे शाहरुखचा ‘रईस’ रिलीज झाला. एक चांगला ऍक्शन सिनेमा असूनही पायरसीचा फटका बसल्याने ‘रईस’ला म्हणावा तसा नफा…
संपूर्ण लेख

भारतांनं चंद्रमोहिमेतून नक्की काय साधलं?

भारताचं चांद्रयान-३ ठरलेल्या दिवशी, नियोजित वेळी आणि निश्चित केलेल्या जागी चंद्राच्या भूमीवर उतरलं आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं…
संपूर्ण लेख

आशा भोसले : फक्त ९० वर्षांचा हिरवागार स्वरऋतू!

कल्पना करा, तुम्ही कोणत्या तरी कारणानं अत्यंत अस्वस्थ आहात, बैचेन आहात. मन लागत नाही आणि तितक्यात एक गाणं…
संपूर्ण लेख

‘एआय’मुळे फेक कंटेंटवाल्यांचा बाजार जोरात!

जगभरातील माणसं काय विचार करतात हे त्यांना काय माहिती मिळते, त्यावर ठरतं. ते जो विचार करतात तशी खरेदी…
संपूर्ण लेख

गांधीजींच्या शेवटच्या माणसाचा शोध घेणारी दोन पुस्तकं!

१९४० च्या दशकात महात्मा गांधी यांनी वैयक्तिक सत्याग्रह मोहिमेसाठी विनोबा भावे यांची पहिला लढवय्या म्हणून निवड केली. दुसरे…