पूर्वीच्या काळात एकेका घरात अनेक माणसं राहत असत. कारण एका घरात अधिक माणसं असणं ही शेतीसाठी मोठी ताकद होती. पण औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि जागतिकीकरणानंतर सगळं गणित बदललंय. मोठमोठ्या शहरातील घरांमधे आता एकेकटी राहणारी माणसं आहेत. एवढंच नाही तर अनेक घरे रिकामी पडलेली आहेत.
जगाच्या लोकसंख्येचं गणित सतत बदलतंय. एकीकडे झोपड्यांमधे आणि कच्च्या घरांमधे माणसं दाटीवाटीनं राहाताहेत, तर दुसरीकडे मोठमोठी घरे ओस पडलेली आहेत. भारतासारख्या देशात एवढी मोठी तरुण लोकसंख्या असूनही त्यांच्यातील अनेकांकडे रोजगार नाही. तर दुसरीकडे जगातील अनेक देशांमधे काम करायला माणसंच नाहीत. लोकसंख्येचं हे बदलणारं गणित कळल्याशिवाय आपल्याला हे प्रश्न कधीच समजणार नाहीत.
१. २०८० पर्यंत जगाची लोकसंख्या दहा अब्ज
पुढील ३० वर्षात जगाची लोकसंख्या सुमारे २ अब्जांनी वाढण्याची शक्यता असून, २०५० मधे ती ९.७ अब्ज एवढी होईल. हे जरी खरं असलं तरी जगातील लोकसंख्या वाढीचा दर कमी होत आहे. त्यामुळे जगाची लोकसंख्या सात अब्ज ते आठ अब्ज होण्यासाठी १२ वर्ष लागली. पण आता ती नऊ अब्ज होण्यासाठी १५ वर्षाहून अधिक काळ लागेल. कोणतंही मोठं संकट आलं नाही, तर २०८० पर्यंत जगातील लोकसंख्या १०.४ अब्ज एवढी असेल.
२. सर्वाधिक लोकसंख्यावाढ ही आफ्रिकेत होतेय
जगातील ६१ देशांमधे लोकसंख्या वाढ नकारात्मक असून तेथे लोकसंख्या कमी होत आहे. चीन हा भारतापाठोपाठ जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देशही या घटत्या लोकसंख्येचा देश आहे. या उलट आफ्रिकेतील लोकसंख्येची वाढ सर्वाधिक असून, पुढील काळात आफ्रिकेतील लोकसंख्या वाढण्याची शक्यता आहे. भारतातही लोकसंख्या वाढ होत असली तरीही वाढीचा अधिक दर हा आफ्रिकन देशात राहील.
३. भारतातील तरुणाईचा फायदा २०५५-५६ पर्यंत
सध्या भारतातील लोकसंख्येमधे अर्ध्याहून अधिक तरुण लोकसंख्या आहे. त्यामुळे काम करू शकणाऱ्या लोकसंख्येचा हा आकडा देशासाठी फार मोठी संधी आहे. यालाच तांत्रिक भाषेत डेमोग्राफिक डिविडेंट असे म्हणतात. हा डेमोग्रॅफीक डिविडेंट २०४१ ला सर्वाधिक असेल. त्यावेळी देशातील १०० मधील ५९ माणसं काम करू शकतील म्हणजे २० ते ५९ या वयामधे असतील. पण हा फायदा २०५५-५६ नंतर संपेल. त्यानंतर वृद्धत्वाकडे झुकणारी लोकसंख्या वाढू लागेल. वाढती वृद्धांची संख्या हा प्रश्न जो आज जगाला भेडसावतोय, त्याला भारतालाही सामोरं जावं लागेल.
४. श्रीमंताकडे येणारा पैसा गरिबांपर्यंत कसा पोहचणार?
लोकसंख्या वाढीचा वेग पाहता आपल्या पृथ्वीला प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करणं शक्य आहे का, हा मुद्दा या मागच्या अनेक दशकांपासून सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.जगात ४० टक्के लोकसंख्येकडे जितकी संपत्ती आहे तितकी संपत्ती आज जगातल्या आघाडीच्या १० उद्योगपतींकडे असल्याचं ऑक्सफॅमचा रिपोर्ट सांगतो. जगातील १११ देशांमधे १२० कोटीहून अधिक लोक दारिद्ररेषेखालचं आयुष्य जगत आहेत. शिक्षण, आरोग्य, कुपोषण, बेरोजगारी हे प्रश्न वाढत्या लोकसंख्येबरोबर वाढणार असून, त्याचं उत्तर श्रीमंताकडे जमणारा पैसा गरिबापर्यंत कसा पोहचणार? यात आहे.
५. भारतात देवळे जास्त, रुग्णालये कमी
देशात साडेसात लाख मंदिरे असून लोकसंख्येच्या तुलनेत एका मंदिरामागे भाविकांची संख्या १८८६ आहे. दुसरीकडे देशाचे आरोग्य सांभाळणार्या रुग्णालयांची संख्या ६९ हजार २६४ आहेत. एका रुग्णालयामागे १ लाख ८७ हजार ६९७ रुग्ण आहेत. महाराष्ट्रात ७७,२८३ मंदिरे असून एका मंदिरामागे भाविकांची संख्या १६१२ एवढी आहे, आयआयटी पवईच्या एका टीमने केलेल्या अभ्यासातून समोर आले. ही आकडेवारी मार्च २०२२ पर्यंतची आहे.
६. विकसित देशांमधे लोकसंख्या घटतेय
आज जगातील अनेक देशांमधे विकसित देशांमधे लोकसंख्या वाढीचा दर कमी होत असताना दिसतोय. साधारणतः विकसित देशांमधे शिक्षण, आर्थिक संपन्नता आणि जगण्याची उद्दिष्ट्ये अधिक असल्याने कुटुंब वाढवणे ही प्राथमिकता ठरत नाही. त्यामुळे अनेक जोडपी एका अपत्यानंतर थांबतात. लोकसंख्या शास्त्रानुसार हा दर नकारात्मक आहे. कारण जर एका जोडप्यानं फक्त एकच मूल जन्माला घातलं तर भविष्यात लोकसंख्या कमी होऊ लागते. आज चीनमधे हा प्रश्न सर्वाधिक भेडसावत असून, जगभरातील अनेक देश या प्रकारच्या प्रश्नाला सामोरे जाताहेत.
७, हवामान बदलाचा परिणाम लोकसंख्येवर
वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी निसर्गाचा अनिर्बंध ऱ्हास केला जात आहे. एकीकडे बाजार नावाची व्यवस्था माणसाच्या सुखसोयी वाढविण्यासाठी नवनवी संशोधने करत आहे आणि त्यातून नव्या गरजांची निर्मिती केली जात आहे. यासाठी अतिरेकी ऊर्जेचा वापर होत असून, शेवटी या सगळ्याचा परिणाम निसर्गावर होत आहे. ११ मिनिटांच्या प्रायव्हेट जेटमधील प्रवासात जेवढं कार्बन उत्सर्जन होतं, तेवढं एक गरीब माणूस त्यांच्या संपूर्ण आयुष्यात करतो. यावरून आपल्याला विकासासाठी लागणाऱ्या ऊर्जेचं गणित कळेल. या सगळ्यामुळे तापमान वाढ, प्रदुषण, संसाधनांची टंचाई असे प्रश्न वाढत आहेत. दुसरीकडे निसर्गचक्र बिघडल्याने जगभरात विविध ठिकाणी नैसर्गिक संकटांची संख्या वाढली आहे. या संकटांमुळे जगातील मोठी लोकसंख्या धोक्याला सामोरी जाते आहे.
८. महिलांची भूमिका निर्णायक ठरेल
लोकसंख्येतील बदलामुळे उद्भवणाऱ्या समस्यांचा सर्वाधिक फटका हा महिलांना बसतो. आज जगातील अनेक देशांमधे महिलांना दुय्यम स्थान दिलं जातं. त्यामुळे निर्णयक्षमता त्यांच्या हातात नसते. त्यामुळे त्या शोषण आणि अन्यायाच्या बळी पडतात. शिक्षण, आरोग्य, आहार इथपासून कुटुंबाची जबाबदारी या सगळ्यामुळे होणाऱ्या स्त्रियांवरील अन्यायाबद्दल आजवर अनेक अहवाल लिहिले गेले आहेत. लोकसंख्येच्या नियंत्रणामधेही महिला आणि त्यांच्याकडे असलेली निर्णयक्षमता हा महत्त्वाचा घटक ठरतो. ज्या भागात महिलांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे, तिथं लोकसंख्या मर्यादीत राहिल्याचे आढळले आहे. त्यामुळे भविष्यात अधिकाधिक महिलांना सक्षम आणि समर्थ बनववण्यात जगाच कल्याण आहे.
९. शहरं ठरवतील माणसांची जीवनदशा
लोकसंख्याशास्त्रीय आकडेवारी सांगते की, २०५० पर्यंत जगातील एकूण लोकसंख्येपैकी दोन तृतियांश लोकसंख्या ही शहरांमधे रात असेल त्यामुळे शहरांमधील जीवनाचा दर्जा भविष्यातील मानवी जीवनाची गुणवत्ता निश्चित करणार आहे. आज जगभरातील आणि देशातील शहरे पाहिली तर तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात विषमता आणि साधनांची लूट दिसते आहे. ही शहरे पर्यावरणपूरक कशी बनतील, हे यापुढील मोठं आव्हान आहे. तसंच या शहरांसाठी लागणारं, नगरनियोजन, नागरी प्रशासन आणि त्यात होणारी गुंतवणूक या गोष्टी भविष्यातील मानवी जीवनाची दशा ठरवणार आहेत.
१०. स्थलांतर आणि लोकसंख्येचं गणित
विकसित देशातील कामगारांची कमतरता आणि गरीब-विकसनशील देशातील बेरोजगारी यामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असून, ते यापुढेही सुरू राहील. त्यातील काही स्थलांतर हे कायदेशीररित्या होईल, तर काही बेकायदेशीररित्या. पण स्थलांतर हा लोकसंख्येच्या समतोलाचा एक मोठा प्रवाह राहणार आहे. यामुळे अनेक सामाजिक, आर्थिक समस्या निर्माण होत आहेत. पण ही अटळ गोष्ट असून, परस्पर सौहार्द कसा टिकवता येईल, या दिशेने धोरणं आखणं गरजेचं आहे. स्थलांतराची दिशा कशी असेल आणि त्यातून नक्की काय होईल हे आज कोणालाच सांगता येणं अवघड आहे. पण, याच स्थलांतरामुळे आजवर पृथ्वीवर माणूस विखुरलाय, हेही विसरून चालणार नाही.