भारताचं समुद्रयान घेणार ‘ब्ल्यू इकॉनॉमी’चा शोध

भारताला एकूण सात हजार ५१७ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. समुद्रकिनाऱ्यावर असलेली नऊ राज्ये आणि लहानमोठी १३८२ बेटे आहेत. या समुद्रात खोलवर सापडणारी खनिजे, वायू  अशी नैसर्गिक संसाधने मिळाली तर ही ‘ब्लू इकॉनॉमी’ देशाच्या अर्थकारणाला नवी ऊर्जा देऊ शकेल. म्हणूनच या संसाधनांच्या शोधासाठी भारतानं मिशन समुद्रयान सुरू केलंय.

पुढील वर्षी मार्च महिन्यात या मोहिमेसाठी वापरल्या जाणाऱ्या पाणबुडीची पहिला टप्पा प्रत्यक्षात येणार आहे. नुकताच टायटन या पाणबुडीला झालेल्या अपघातामुळे समुद्राखालील संशोधनक्षेत्राला धक्का बसलाय. त्यामुळे भारताच्या या महात्वाकांक्षी मोहिमेत अशी कोणतीही दुर्घटना घडू नये, म्हणून विशेष काळजी घेण्यात येणार आहे.

कसं असणार हे मिशन समुद्रयान?

चेन्नई येथे असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी (एनआयओटी) ही या मोहिमेसाठीची मुख्य संस्था आहे. या मोहिमेसाठी मत्स्य ६००० या नावाची विशेष पाणबुडी विकसित केली असून, यातून तीन तज्ज्ञांची टीम सहा हजार मीटर खोल समुद्रात उतरून संशोधन करेल. पहिल्या टप्प्यात पाचशे मीटरवर आणि दुसऱ्या टप्प्यात सहा हजार मीटर खोलवर ही पाणबुडी उतरणार आहे.

पहिल्या टप्प्याची चाचणी पुढील वर्षी २०२४च्या मार्चपर्यंत सुरू येईल. तर दुसरा टप्पा २०२५ मधे प्रत्यक्षात येईल. २०२६ पर्यंत हे संपूर्ण मोहीम फत्ते व्हायला हवी, अशी माहिती नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. जी. ए. रामदास यांनी माध्यमांना दिली. 

ही मोहीम यशस्वी झाल्यास अमेरिका, चीन, रशिया, जपान आणि फ्रान्स या बिकसित देशांच्या पंक्तीत भारताला स्थान मिळणार आहे. मत्स्य पालन आणि जलकृषी यासोबतच समुद्रात असलेले विविध उपयुक्त वायू, पॉलिमेटेलिक, मॅगनीज, हाडड्रोथर्मल सल्फाइड आणि कोबाल्ट क्रस्ट खनिजे शोधण्याचा प्रयत्न याद्वारे होणार आहे.

भारतासाठी ही मोहीम महत्त्वाची

जगाचा ७० टक्के भाग व्यापणारे महासागर आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. आतापर्यंत फक्त पाच टक्केच समुद्र आपल्याला कळलेला असून, उर्वरित ९५ टक्के समुद्र माणसासाठी अज्ञात आहे. भारताला प्रचंड मोठा समुद्रकिनारा लाभलेला असून, देशातील ३० टक्के लोकसंख्या या किनाऱ्यालगत राहते आहे. 

या किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांसाठी मत्स्यपालन, पर्यटन आणि बंदरावरून होणारा व्यापार हे उपजीवीकेची साधने आहेत. देशातील मोठमोठी शहरे किनाऱ्यालगत आहेत. तसंच या किनाऱ्यावर भारताकडे सुसज्ज बंदरे उपलब्ध आहेत. त्यामुळे भारतीय समुद्रात जर आपल्याला ही संसाधने सापडली, तर अर्थव्यवस्थेला मोठी झेप घेता येईल.

समुद्र हा अनेक अर्थानं खजिना असून, त्यातील अनेक गोष्टींचा अद्याप शोधही लागलेला नाही. त्यामुळे सागरी संशोधन हा भविष्यातील फार मोठा भाग असणार आहे. ऊर्जा, गोडं पाणी, जैवविविधता या सगळ्याचा अभ्यास करताना समुद्रातील संशोधन हे मूलगामी ठरणार आहे. या सगळ्यासाठी मोठी किनापट्टी असणं हे भारताचं बलस्थान ठरणार आहे.

अशी असेल मत्स्य ६००० ही पाणबुडी

समुद्रातील अत्याधुनिक संशोधनाचा उपयोग करून मत्स्य ६००० ही पाणबुडी बनविण्यात येत असून, तिच्यात सुरक्षिततेची सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे. टाइटेनियमपासून बनवलेली ही अत्याधुनिक पाणबुडी असून, यातील ६० टक्के भाग स्वदेशी बनावटीचा आहे. या पाणबुडीचं व्यास २.१ मीटर आहे. या पाणबुडीला लावलेल्या १२ कॅमेराच्या माध्यमातून ती समुद्राच्या तळाचा वेध घेईल.

तीन सागरी संशोधकांना पाण्यात खोल नेणाऱ्या या पाणबुडीत सेन्सर्स आणि खोल महासागर शोधासाठी लागणारी उपकरणे आहेत. साधारणतः ही पाणबुडी एका वेळी १२ तास पाण्याखाली राहू शकते, पण आपत्कालीन परिस्थितीत ती ९६ तासांपर्यंत पाण्याखाली राहण्यासही ती सज्ज असेल. तसंच अत्याधुनिक   संपर्क यंत्रणा यात उपलब्ध असून, मदर शिप सतत या पाणबुडीच्या जवळ राहील. 

जूनमध्ये टायटन पाणबुडी दुर्घटनाग्रस्त होऊन पाच अब्जाधीशांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे आम्ही आमच्या पाणबुडीच्या तांत्रिक बाबींची नव्याने पाहणी केल्याचेही रामदास यांनी सांगितले. इमर्जन्सी रिकव्हरी सिस्टीम नव्याने अभ्यासण्यात आली असून, त्यात अनेक चाचण्यांद्वारे अतिरिक्त काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे ही फक्त महत्त्वाकांक्षी मोहीम नसून, ती सुरक्षित मोहीम ठरेल याचा पूर्ण प्रयत्न केला आहे.

ही मोहीम यशस्वी व्हायलाच हवी

भारतानं याआधी ५०० मीटर खोल जाणारी पाणबुडी बनवून तिची बंगालच्या खाडीत सागरनिधी जहाजातून त्याची चाचणी घेतली. या यशस्वी चाचणीनंतर २०२१ मधे या समुद्रयान मोहिमेला ग्रीन सिग्नल मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या मोहिमेचा स्वातंत्र्यदिनाच्या भाषणामधे उल्लेख केला होता.

केंद्र सरकारने ‘समुद्रयान’ मोहीमेसाठी एकूण ४ हजार ७७ कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर केला आहे. २०२० ते २०२६ या पाच वर्षाच्या कालावधीसाठी हा निधी देण्यात आला आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात अंदाजित दोन हजार कोटींच्यावर खर्च होण्याची शक्यता आहे.

ब्लू इकॉनॉमीमुळे अर्थव्यवस्था, रोजगार आणि आंतरराष्ट्रीय संबंध या सर्वच क्षेत्रात भारताला नवी दालने उघडण्याची शक्यता आहे. तसंच डीप ओशन टेक्नोलॉजीमधे भारताला जे कौशल्य मिळेल, त्याचा उपयोग जगातील इतर देशांसाठीही होऊ शकेल. या सगळ्याच अर्थानं समुद्रयान ही मोहीम यशस्वी होणं, भारतासाठी अभिमानास्पद ठरणार आहे.

0 Shares:
You May Also Like
amphibians endangered
संपूर्ण लेख

उभयचर नष्ट होताहेत, उरलेल्या जीवसृष्टीवरही धोक्याची घंटा!

जगप्रसिद्ध ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान…
संपूर्ण लेख

‘लिव्ह इन’ की ‘लग्न’ यावर उत्तर कसं शोधणार?

‘लिव्ह इन’ अर्थात लग्नाशिवाय शारीरिक संबंधात राहण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या…
संपूर्ण लेख

सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य उलगणारा ‘बेन्नू’तील खजिना

पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘नासा’नं २०१६ मधे यान पाठवलं होतं. ते यान या लघुग्रहावजवळ…
संपूर्ण लेख

लॅटिन अमेरिका ही पर्यावरणपुरक जगासाठी नवी अर्थशक्ती

लॅटिन अमेरिकेत,  दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ३३ देशांचा समावेश होतो. लॅटिन हे नाव सर्वप्रथम फ्रान्सचे सर्वेसर्वा असलेल्या तिसऱ्या…
संपूर्ण लेख

फक्त ८० रुपयात ‘लिज्जत’ हा ब्रँड घडविणाऱ्या आज्जी गेल्या

ही गोष्ट आहे, १९५९ मधली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो भारावलेला काळ होता. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू देशाची नवी…
संपूर्ण लेख

सत्यशोधक पत्रकारितेचे विस्मृतीत गेलेले अतुलनीय योगदान

एकोणिसाव्या शतकातील नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा आणि आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले…