रॉबिन तामांग : रॉक म्युझिकच्या तालावर नेपाळला नाचवणारा अवलिया

काळ्या रंगाची स्टायलिश जीन्स पॅण्ट. कधीकाळी पिळदार असावा अशी खूण सांगणारा उघडा देह. स्टेजवरच्या झगमगाटातही आपली वेगळी चमक दाखवणारं टक्कल. खुरट्या दाढीतून डोकावणारी केसांची चांदी. डाव्या खांद्यावर आपल्या लाडक्या फेंडर टेलिकास्टर गिटारीचा पट्टा. उजव्या हाताने त्या गिटारची तार छेडत हा म्हातारा माईकसमोर येतो आणि आख्खं पब्लिक खुळावून जातं.

रॉबिन तामांग. हा साठीतला म्हातारा अगदी आत्ताआत्तापर्यंत नेपाळला आपल्या तालावर नाचवत होता. मिसरूडही न फुटलेल्या पोराटोरांना आपल्या ‘हार्ड रॉक’च्या सांगीतिक जादूने भुलवत होता. आपल्या आजोबाच्या वयाचा माणूस आपल्याला ‘रॉक ऍण्ड रोल’ करायला शिकवतोय, याने तरुणाईला भान हरपायला होत होतं. पण नियतीने ही मैफिल मोडली. रॉबिन आता गेला तो कायमचाच.

कॉलेजमधेच उघडला बॅण्ड

रॉबिनचा जन्म १७ एप्रिल १९६३चा. बाप गुरखा रायफलमधे ब्रिटीश सैन्याची चाकरी करत होता. त्यामुळे सतत इकडून तिकडे पोस्टिंग ठरलेलंच. पाच भावंडांपैकी सगळ्यात लहान असलेला हा रॉबिन आपली जन्मभूमी असलेल्या सिंगापूरमधेच शालेय शिक्षण घेत होता. तिथंच त्याची कानओळख ‘डीप पर्पल’ आणि गिटारीस्ट जिमी हेन्रीक्ससोबत झाली आणि रॉक नावाचा संगीतप्रकार त्याचा श्वास बनला.

उण्यापुऱ्या चार वर्षांच्या कारकिर्दीत आपल्या गिटार कौशल्याने रॉक-पॉप संगीतविश्वावर प्रचंड प्रभाव पाडणाऱ्या जिमीचा आदर्श रॉबिनच्या डोळ्यासमोर होता. ‘डीप पर्पल’ हा रॉक बॅण्ड नुकताच सुरू झाला असला तरी हार्ड रॉक या संगीतप्रकाराला त्यांनी चढवलेला आधुनिकतेचा साज सगळ्यांनाच भुलवत होता. त्याला रॉबिन तरी कसा अपवाद असेल? हार्ड रॉकच्या वेडाने तो आणखीनच झपाटून गेला.

ऐंशीच्या दशकाच्या पूर्वार्धात रॉबिन कॉलेजसाठी कॅनडाला गेला. उत्तर अमेरिकेतलं तेव्हाचं वातावरण रॉक संगीतविश्वाने भारलेलं होतं. ‘एरोस्मिथ’, ‘एसी/डीसी’, ‘जर्नी’सारखे हार्ड रॉक बॅण्ड, ‘स्लेयर’, ‘मेटालिका’सारखे थ्रॅश मेटल बॅण्ड आणि ‘द पोलीस’, ‘टॉकिंग हेड्स’सारख्या नवख्या बॅण्डची प्रचंड क्रेझ होती. रॉबिननेही ‘तामांग’ नावाचा आपला नवा बॅण्ड बनवला आणि वेगवेगळ्या ठिकाणी शो करू लागला.

नेपाळमधली अफाट प्रसिद्धी

१९९६. यादवी युद्धाच्या आगीत नेपाळ होरपळून निघत होतं. माओवाद्यांनी सरकारविरोधात सशस्त्र बंड पुकारलं होतं. १९९४मधे नावारूपास आलेला ‘१९७४ एडी’ हा रॉक बॅण्ड तेव्हा नेपाळच्या रॉक संगीतविश्वात आपला दबदबा राखून होता. नेपाळी तरुणाई या संगीतप्रकाराकडे नावीन्य, सर्जनशीलता, अभिव्यक्ती आणि विद्रोहाचं प्रतीक म्हणून पाहू लागली होती. अशातच रॉबिन नेपाळमधल्या पोखरा या आपल्या वडलांच्या गावी परतला.

काठमांडूतल्या ‘लूझा’ या रॉक बॅण्डसोबत हातमिळवणी करत रॉबिनने ‘रॉबिन एन् लूझा’ या नव्या रॉक बॅण्डची स्थापना केली. त्यावेळी रॉबिनने गायलेलं ‘भूल मा भुल्यो’ हे गाणं सुपरहिट ठरलं आणि रॉबिनचं नाव रॉक ऐकणाऱ्या प्रत्येक नेपाळी श्रोत्याच्या मनात कोरलं गेलं. हे गाणं पुढे इतकं लोकप्रिय झालं की रॉबिनचा प्रत्येक शो या गाण्याच्या सादरीकरणाशिवाय अपुरा वाटू लागला.

‘भूल मा भुल्यो’चं यश

वरवर बघायला गेलं तर ‘भूल मा भुल्यो’ हे गीत म्हणजे नेपाळ फिरायला निघालेल्या व्यक्तीचं प्रवासवर्णन असावं असं त्यात येणाऱ्या प्रेक्षणीय स्थळांच्या उल्लेखांवरून वाटू शकतं. पण खरं तर हे गीत त्यावेळी देशात उफाळलेल्या माओवादी हिंसाचार आणि अनागोंदीला उद्देशून बनवलं गेलं होतं. माओवादी आणि नेपाळी लष्करातल्या सततच्या धुमश्चक्रीत भरडल्या जाणाऱ्या सामान्य नेपाळी जनतेची उद्विग्नता यातून अधोरेखित केली गेली होती.

या गाण्यात पशुपतीनाथ या नेपाळमधल्या प्रख्यात शिवमंदिराचा तसंच लुंबिनी या तथागत गौतम बुद्धांच्या जन्मस्थळाचा उल्लेख आहे. देशातल्या भयावह परिस्थितीत साक्षात देवांचीही दुरवस्था झाल्याने सामान्य जनता हतबल झाल्याचं रॉबिन या गाण्यात सांगतो. नेपाळी जनतेच्या आधीच्या चुकांमुळे त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित राहत असल्याची भीती रॉबिन या गाण्यात व्यक्त करतो.

एक कलाकार म्हणून कलेसोबतच भवतालच्या सामाजिक स्थितीबद्दल असलेली ही जाणीव रॉबिनचं नेपाळी जनमानसातलं महत्त्व वाढवणारी ठरली. हे गाणं तरुणाईच्या गळ्यातलं ताईत बनलं. पुढे ‘रॉबिन एन् लूझा’ हा बॅण्ड बरखास्त झाल्यानंतरही रॉबिनच्या प्रत्येक शोमधे हे गाणं वाजवण्याचा प्रघात कायम राहिला. रॉबिनच्या मृत्यूनंतरही वेगवेगळ्या बॅण्डनी त्यांच्या शोची सुरवात ‘भूल मा भुल्यो’ने करत आपल्या लाडक्या रॉकस्टारला अनोखी श्रद्धांजली वाहिली.

मनोरंजनातून समाजकारण

‘रॉबिन एन् लूझा’ बरखास्त झाल्यावर रॉबिनने ‘रॉबिन ऍण्ड द न्यू रिवॉल्युशन’ हा नवा बॅण्ड सुरू केला. त्याची ‘शाईन ऑन मी’, ‘केता केती’, ‘चिसो चिसो हवामा’सारखी गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली. या नेपाळी आणि इंग्लिश गाण्यांसोबतच रॉबिन हिंदी गाणीही सादर करायचा. रॉबिनच्या खास शैलीतलं ‘दम मारो दम’ हे आशा भोसलेंनी गायलेलं मूळ गाणं हे त्यांपैकीच एक.

समाजाबद्दल कणव असणारे, त्यांच्या भूमिका मांडणारे कलावंत ‘साधी राहणी, उच्च विचारसरणी’ या ब्रीदाला अनुसरूनच जगायला हवेत, हा समज रॉबिनने मोडीत काढला. राजकीय, सामाजिक परिस्थितीवर वेळोवेळी आपल्या दणकेबाज गाण्यांमधून ताशेरे ओढतानाही तो त्याच्या रॉकस्टार छबीला कायम जपत राहिला. चंदेरी पडद्यावरही चमकत राहिला. त्याच्या या स्टायलिश राहणीमानामुळेच तो नेपाळी तरुणाईला कायम आपलासा वाटत आला.

नेपाळच्या दुर्गम, डोंगराळ रस्त्यांवरून रॉयल एनफिल्ड बुलेटचं महाकाय धूड घेऊन रॉबिनची स्वारी गावोगावी भटकायची. लहान, तरुण मुलांनी रॉक हा संगीतप्रकार जवळ करावा, त्यांनी आपली अभिव्यक्ती जपावी यासाठी रॉबिन कसोशीने धडपडायचा. बाहेर जरी तो देशातला मोठा रॉकस्टार असला तरी लहान मुलांच्या गराड्यात तो त्यांचा लाडका काका कम शिक्षक होऊन अगदी सहजतेने वावरायचा.

रॉबिन जितका रॉक शोच्या झगमगाटात रमायचा, तितक्याच आत्मीयतेने तो काठमांडूतल्या अनाथाश्रमात कच्च्याबच्च्यांना रॉक शिकवत बसायचा. त्याच्या हार्ड रॉकच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजापेक्षाही त्याच्या अंतर्मनातला नाद कितीतरी स्पष्ट आणि मोठा होता. हा नादच त्याला या वयातही नेपाळमधे रॉक संगीतविश्व फुलवण्याची उर्मी देत राहायचा. तीच धगधगती उर्मी नव्या पिढीच्या उरात पेरून हा नेपाळचा लाडका रॉकस्टार आता कायमचा विसावलाय.

0 Shares:
You May Also Like
संपूर्ण लेख

पर्यंटकांच्या गर्दीला युरोप नाही म्हणतंय, भारताचं काय?

कधी कधी स्वत:वर, तर कधी परिस्थितीवर रडावसं वाटतं. ज्या ठिकाणी आपण आनंद घेण्यासाठी जातो त्या सर्व ठिकाणांची आजची…
संपूर्ण लेख

शाहरुखचा ‘जवान’ हिट का झाला?

२०१७ मधे शाहरुखचा ‘रईस’ रिलीज झाला. एक चांगला ऍक्शन सिनेमा असूनही पायरसीचा फटका बसल्याने ‘रईस’ला म्हणावा तसा नफा…
संपूर्ण लेख

भारतांनं चंद्रमोहिमेतून नक्की काय साधलं?

भारताचं चांद्रयान-३ ठरलेल्या दिवशी, नियोजित वेळी आणि निश्चित केलेल्या जागी चंद्राच्या भूमीवर उतरलं आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं…
संपूर्ण लेख

आशा भोसले : फक्त ९० वर्षांचा हिरवागार स्वरऋतू!

कल्पना करा, तुम्ही कोणत्या तरी कारणानं अत्यंत अस्वस्थ आहात, बैचेन आहात. मन लागत नाही आणि तितक्यात एक गाणं…
संपूर्ण लेख

‘एआय’मुळे फेक कंटेंटवाल्यांचा बाजार जोरात!

जगभरातील माणसं काय विचार करतात हे त्यांना काय माहिती मिळते, त्यावर ठरतं. ते जो विचार करतात तशी खरेदी…
संपूर्ण लेख

गांधीजींच्या शेवटच्या माणसाचा शोध घेणारी दोन पुस्तकं!

१९४० च्या दशकात महात्मा गांधी यांनी वैयक्तिक सत्याग्रह मोहिमेसाठी विनोबा भावे यांची पहिला लढवय्या म्हणून निवड केली. दुसरे…