मिलान कुंदेरा गेला. त्यानंतर काही वेळातच मराठीतला संवेदनशील कवी असलेल्या किशोर कदम म्हणजेच सौमित्रने एक फेसबूक पोस्ट लिहिलीय. ही पोस्ट म्हणजे खरं तर मुक्तछंदातील कविताच आहे. बरीच मोठी पोस्ट आहे. पण त्यातील काही ओळीत सौमित्र म्हणतो… ‘मला कळत नाही प्रत्येक पळून जाणाऱ्या कलावंताला पॅरिसच का आठवतं? पण जगातले खूप खूप श्रेष्ठ कलावंत पॅरिसमध्येच घडले हेही तितकंच खरं. पण परवा आक्ख पॅरिस जळत होतं तेंव्हा तुला काय वाटलं? की त्याचाच धसका घेतलास तू?
सौमित्रमधल्या एका संवेदनशील माणसाला जाणवलेला हा प्रश्न वैश्विक आहे. देश, भाषा, रंग वगैरे वगैरेच्या झूठ सीमारेषांना कुठच्या कुठे भिरकावून देणारा हा प्रश्न आहे. आज सगळं जग आमचं आणि तुमचं करण्याच्या नादात गुंतलेलं असताना, माणसातील जनावराच्या खुणा पुन्हा उफाळून वर येत असताना, कुंदेरा जाणं आणि त्याला असा प्रश्न विचारणं, हे सगळंच खूप खोल खोल अर्थपूर्ण आहे. कुंदेरा त्याच्या लेखनातून माणसाच्या माणूसपणातून मोकळं होण्याचा असाच काहीसा अर्थ शोधत होता का?
कोण होता मिलान कुंदेरा?
आजघडीच्या जगातील सर्वाधिक लोकप्रिय लेखकांमध्ये ज्यांचं नाव पहिल्या काही नावांमधे घेतलं जातं असं नाव म्हणजे मिलान कुंदेरा. कुंदेराला आयुष्यानं तब्बल ९४ वर्षं दिली. एवढ्या मोठ्या कालावधीत त्यानं खूप काही पाहिलं. दुसरं महायुद्ध झालं तेव्हा कुंदेरा दहा वर्षाचा होता. या महायुद्धात झालेला भीषण नरसंहार, जगभरातील राज्यकर्त्यांचे हिस्र चेहरे, सत्तेचा किळसवाणा खेळ आणि या सगळ्याला उत्तर शोधणारे तत्वज्ञ, कलाकार, साहित्यिक आणि काही राजकारणीही.
हे सगळं पाहत कुंदेरा मोठा होत होता. कुंदेराचं मरतानाचा वय ९४ असलं तरी त्याला अहोजाहो करणं योग्य वाटत नाही. त्यानं जे जग दाखवलंय, ते मित्र म्हणून दाखवलंय. त्याला अहोजाहो करून त्याच्या दोस्तीचा अपमान करावासा वाटत नाही. असो, कुंदेरा आपल्या साहित्यातून जे मांडतो ते थेट काळजाला भिडतं. कारण तो माणसाच्या माणूस असण्याचा शोध घेतो, माणूसपणाच्या मुखवट्यामागे लपलेल्या जनावराला उघड करतो. म्हणूनच तो त्याच्याच देशातील सत्ताधीशांना नकोसा होतो.
स्वतःला साम्यवादी म्हणवणाऱ्या सत्ताधीशांनी झेकोस्लॉव्हाकियात चालविलेल्या दमनशाहीविरोधात कुंदेरा लिहू लागतो. ज्या कम्युनिस्ट पक्षाचा तो सदस्य होता, त्यांनाच तो परका वाटू लागतो कारण तो त्यांचे दोष दाखवत होता. हाकलपट्टी झालेला कुंदेरा अखेर १९७५ साली शिक्षण सोडतो, देश सोडतो आणि मुक्त, स्वातंत्र्याचं कलेचं शहर असलेल्या पॅरीसमधे येतो.
‘जोक’ कळला नाही, पण बेड्या तुटल्या
प्रख्यात संगीतकार वडलांचा मुलगा असलेल्या मिलान कुंदेरानं सुरवात संगीत शिकण्यापासूनच केली होती. पण संगीताच्या सूरापेक्षा शब्दांच्या खेळात तो जास्त रमला. सुरुवातील प्रेम कविता, एकपात्री नाटिका, कम्युनिस्ट साहित्य असलं लेखन करणाऱ्या कुंदेराची उपरोधिक भाषा लोकांना जास्त आवडू लागली होती. त्याच्या या भाषेत तो अनेकदा सत्ताधीशांना चिमटेही काढत असे.
‘द जोक’ हे कुंदेराची पहिली गाजलेली कादंबरी. १९६७ मधे प्रकाशित झालेल्या या पुस्तकावर झेकोस्लोव्हाकियामधेच बंदी घालण्यात आली होती. सत्तेच्या कठोर चौकटीमधे घट्ट बसवलेल्या कम्युनिस्टांना हे असलं काही खपणारं नव्हतं. ‘द जोक’मधे एक नायक एका पोरीला पटवण्यासाठी जे काही खटाटोप करतो, त्यात तिला इंप्रेस करण्यासाठी सरकारविरोधात बोलतो.
विनोदी पद्धतीच्या या वाक्यांमधून कुंदेरा जे काही मांडतो, ते सरकरला झोंबतं. त्यावरून पुस्तकावर बंदी येतेच, पण कुंदेराच्या विरोधातही वातावरण तयार होतं. कुंदेरा तिथल्या भाषेत लिहीत होता. सत्तेच्या विरोधात लिहीत होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांना ते आवडत होतं. त्यामुळे शेवटी त्याचा परिणाम व्हायचा तोच होतो आणि अखेर कुंदेराला देश सोडावा लागला. पण कुंदेरासाठी ते नवं स्वातंत्र्य होतं.
अस्तित्वाला शब्दात पकडू पाहणारा लेखक
‘लाइफ इज एल्स्व्हेअर’ ही त्याची कादंबरीही अशीच गाजली. ही देखील त्यानं फ्रान्समधे येण्याआधी लिहिली होती. या सगळ्या कादंबऱ्यामधून कुंदेरानं सामान्य माणसाच्या आयुष्यातील छोट्याछोट्या घटनांमधून त्याची होणारी घालमेल दाखवली. व्यवस्थेकडून त्याचं होणारं शोषण दाखवलं. या सगळ्यामधून सरकारविरोधात चीड यावी, अशी परिस्थिती उभी केली.
त्यांच्या ‘द अनबेअरेबल लाइटनेस ऑफ बिइंग’ ने जागतिक अभिजात साहित्यामध्ये स्थान मिळविलं. तो स्टार झाला तो या कादंबरीमुळेच. १९८४ मधे प्रकाशित झालेली ही कादंबरी तत्वज्ञानाच्या अनंत अंतराळात घेऊन जाते. एक डॉक्टर, त्याची पत्नी, त्याच्यातील नातेसंबंध आणि त्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या राजकीय हालचाली मांडत कुंदेरा अस्तित्वाचे प्रश्न उभे करतो.
‘एखाद्या व्यक्तीला काय हवे आहे हे कळत नाही, कारण त्याचे फक्त एकच जीवन आहे आणि तो त्याची मागील जीवनाशी तुलना करू शकत नाही किंवा नंतरच्या जीवनात ते दुरुस्त करू शकत नाही.’ अशा आशायचे या कादंबरीतील विचार नंतर लोकप्रिय झाले. त्याच्या ‘इम्मॉर्टेलिटी’,‘स्लोनेस’,‘आयडेंटिटी’ आणि ‘द फेस्टिव्हल ऑफ इनसिग्निफिकन्स’ या त्यांच्या साहित्यकृती वाचकांना भावल्या आणि अनेक भाषांत त्यांचे अनुवादही झाले.
चौकटीला धक्के देत राहायला हवं
कुंदेराच्या आयुष्याची जडणघडण कम्युनिस्ट विचारातून झाली असली तरी, त्यानं कायमच व्यवस्थेला प्रश्न विचारले. त्यामुळे त्याच्या लेखनात माणसाविषयी असलेली जिज्ञासा दिसते, पण तिला चौकटीत बसवण्याचा अट्ट्हास त्यात नाही. त्यामुळेच तो कम्युनिझम, राजकारण याच्या पलिकडे जाऊन माणसाच्या अस्तित्वाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करतो. नित्शेच्या तत्वज्ञानाशी जवळीक सांगत तो माणसाला त्याच्या स्वरूपाबद्दल प्रामाणिक राहण्याचा आग्रह धरतो.
वैयक्तिक आयुष्यातही कुंदेरा एक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा, माणसाला स्वतःच शोध घेण्याचा अधिकार आहे असा मानणारा लेखक राहिला. या स्वातंत्र्याच्या आणि स्वतःशी प्रामाणिक राहण्याच्या नादात त्यानं अनेक वाद ओढावून घेतले. सरकारशी, व्यवस्थेशी पंगे घेतले. पण आपल्या लेखणीतून सत्याशी भिडण्याची ताकद असल्याने त्याला शेवटी जगाला स्वीकारावेच लागलं.
कुंदेराच्या लेखनावर आधारित काही सिनेमेही आले. त्यातील जोक, नोबडी विल लाफ या सोबत त्याच्या गाजलेल्या ‘द अनबेअरेबल लाइटनेस ऑफ बिइंग’ या वर देखील १९८८ मधे सिनेमा आला. फिलिफ कॉफमनने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमासाठी जीन-क्लॉड कॅरीरे आणि कॉफमॅन यांना पटकथेच्या ऑस्करचं नामांकन मिळालं होतं.
कुंदेराचं पॅरीस जळून जाऊ नये म्हणून
जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची शिकवण देणाऱ्या पॅरीसमधे कुंदेराच्या प्रतिभेला बहर आला. त्यानं त्या मोकळ्या हवेत जे श्वास घेतले, त्यातून त्याच्या लेखणीला आणखीच धार आली. एखाद्या पिंजऱ्यात अडकेल्या पक्षाला मोकळं आकाश मिळावं तसं त्याचं झालं. त्याच्या या यशानंतर आणि जागतिक स्थितीही बदलल्यानंतर झेक सरकारनं त्याला पुन्हा नागरिकत्व प्रदान केलं. पण तो पर्यंत तो देशकालाच्या सीमा ओलांडून गेला होता.
माणूस जन्माला येतो ते त्याच्या हातात नसतं, त्याच्यापुढे काय वाढून ठेवलंय हेही त्याच्या हातात नसतं. पण जे काही समोर आहे त्याचं काय करायचं याचा त्यांनं सतत शोध घेत राहायला हवं. फ्रान्सनं आणि एकंदरीतच आधुनिकतेनं हे जगाला दिलेलं स्वातंत्र्य आहे, हे माणसाला मिळालेलं सामर्थ्य आहे. त्यावर पुन्हापुन्हा संकुचिततावादी विचारांचे, चौकटी लादणाऱ्या प्रवृत्तीचे हल्ले होत राहणार आहेत. त्याला भिडण्यासाठी कुंदेरा समजून घेत राहायला हवा.
फ्रान्समधील निवडणुका आणि त्याच्या भोवतीचं राजकारण पाहून एकदा कुंदेरा म्हणाला होता की, ‘जरी राजकारण मला तमाशा म्हणून बरा वाटला तरी मला राजकीय जीवनात भाग घेणे आवडत नाही.’ आयुष्यभर राजकारण पाहिलेल्या कुंदेराचं हे वाटणं समजून घ्यायला हवं. बदलत जात असलेलं पॅरीस त्याला विषण्ण करत होतं.
सत्ता आणि माणूस यांच्यातील संघर्ष हा त्रिकालबाधित आहे. आज जे काही पॅरीसमधे होतंय, ते त्याच सत्तेच्या उन्मादातून होणारी प्रतिक्रिया आहे. स्वातंत्र्याचा उद्घोष करणाऱ्या पॅरीसमधे हे घडणं कुंदेराला कधीच आवडलं नसेल. कुंदेराची अनेक वाक्य ही सुविचारासारखी आहेत. असंच आणखी एके ठिकाणी तो म्हणतो, ‘आपण इतिहास विसरतो. माणसाचा सत्तेविरोधातील संघर्ष हा विस्मृतीविरोधात स्मृतींचा असलेला संघर्ष आहे.’
कुंदेराच्या स्मृती जिवंत ठेवायला हव्यात. कारण कुंदेरानं आपल्या शब्दात जपलेलं माणसाच्या स्वातंत्र्याचं पॅरीस जळून जाता कामा नये.