‘शत प्रतिशत भाजप’ ऐवजी ‘शत प्रतिशत फोडाफोडी’!

खातेवाटप जाहीर झालं असून, अजित पवार अर्थमंत्री झाले आहेत. यातून अजित पवार यांचं बंड कशासाठी होतं, ते आता स्पष्ट होऊ लागलं आहे. अजित पवारांच्या बंडाचे तीन स्पष्ट अर्थ आहेत. एक- शरद पवार नावाचे जे गारूड महाराष्ट्राच्या राजकारणावर गेली पन्नास साठ वर्षे टिकून आहे ते त्यांचेच डाव टाकून उतरवले. उस्तादाचे डाव वापरून उस्तादालाच भर आखाड्यात अस्मान दाखवले. 

दोन- विश्वगुरू होण्यास निघालेल्या महाशक्तीची, भारतीय जनता पक्षाची कमजोरी जगजाहीर झाली. ‘शत प्रतिशत भाजप’ या स्वप्नाला तिलांजली देत शत प्रतिशत फोडाफोडी हा नवा मंत्र महाशक्तीने निवडला. आणि तीन – इतकी बंडाळी माजली की, महाराष्ट्रावर यापुढे कुठल्या विचारांचे राजकीय पक्ष नव्हे तर या ना त्या पक्षातून फुटून निर्माण झालेल्या राजकीय टोळ्या राज्य करतील. 

महाराष्ट्र भाजपला का हवाय?

जग भारताकडे आशेने बघत आहे. भारत हाच आपला भाग्यविधाता असे अमेरिकेसह सर्वच आजी-माजी महासत्तांना आणि छोट्या  देशांनाही वाटते. भारत हा विश्वगुरुपदी पोहोचला असून प्रत्येक देश गंडा बांधून घेत या विश्वगुरूचे शिष्यत्व पत्करू पाहात आहे. भारताची अर्थव्यवस्था लवकरच पहिल्या तीन अर्थव्यवस्थांच्या रांगेत मानाच्या पानावर बसेल, असं भाजपची महाशक्ती सातत्यानं सांगत आहे. 

गेल्या नऊ वर्षात ही उत्तुंग कामगिरी करणाऱ्या या महाशक्तीच्या हाती सत्ता सोपवण्यास महाराष्ट्र मात्र तयार नाही. त्यात महाविकास आघाडीचा प्रयोग इतका प्रभावी ठरला की या आघाडीचे सरकार पाडून देखील २०२४ च्या निवडणुकीत आघाडीचेच पारडे जड दिसू लागले. 

केंद्रात पुन्हा मजबुतीने सत्ता राखायची असेल तर उत्तर प्रदेश नंतर सर्वाधिक ४८ खासदार निवडून देणारा महाराष्ट्र सोबत लागेल. तो एक हाती जिंकण्याची ताकद भाजपकडे नाही. आधी शिवसेना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस फोडून भाजपने ही कबुली दिली.
    
सत्तेचे वाटेकरी वाढले

अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाऊ शकतात अशी चर्चा सुरु झाली. तसे झाले तर महाराष्ट्रात सत्ता भाजपची, मुख्यमंत्री शिंदेसेनेचा आणि उपमुख्यमंत्री फुटीर राष्ट्रवादी काँग्रेसचा, असे विचित्र चित्र निर्माण होईल. आताही सरकारात सर्वात मोठा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आणि आपापले पक्ष फोडून बाहेर पडलेल्या दोन राजकीय टोळ्या पहिल्या-दुसऱ्या क्रमांकावर.

भाजपनं हा सत्तेचा अवमान गोड मानून घेतला कारण महाराष्ट्र जिंकणं सोपं नाही आणि महाराष्ट्र जिंकला तर देश जिंकला! या राजकीय सक्तीपुढे महाशक्तीने माघार घेतली. शत प्रतिशत भाजपचे स्वप्न बाजूला ठेवले. निवडणुकांच्याच मैदानातून होणाऱ्या पक्षविस्ताराला आलेल्या मर्यादा स्वीकारल्या. 

लोकसभा आणि विधानसभेच्याही जागा वाटपात आता तीन चार वाटे करावे लागतील. भाजपचे म्हणून सहा सात मित्र पक्ष आहेत. ते त्यांच्या जागा मागतील. शिंदे सेना आणि फुटीर राष्ट्रवादी आधीच आपले संख्याबळ बाळगून आहेत. पण ते तेव्हढ्याच जागा लढवतील असे नाही. सत्तेतले तीन पक्ष विरूद्ध विरोधातील तीन पक्ष असा घनघोर संघर्ष आता महाराष्ट्राच्या कुरुक्षेत्रात लढवला जाईल. 

पवारांचं बंड आणि चुकू शकतील असे अंदाज

अजित पवार यांच्या बंडाने अनेक लक्ष्मण रेषा भाजपसाठीच ओढल्या गेल्या आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आठ मतदार संघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत झाली. त्यापैकी बारामतीची एक जागा वगळता बाकी सर्व सात जागा भाजपने जिंकल्या. त्याचवेळी झालेल्या विधानसभा निवडणुकांत २८८ पैकी ५६ जागांवर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत झाली. त्यापैकी ३४ भाजपने तर २२ राष्ट्रवादीने जिंकल्या. 

अजित पवार सरकारात आल्याने या जागांमध्ये कुणाची संख्या वाढण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आहे तीच संख्या राखण्याचे आव्हान भाजप-अजित पवारांसमोर असेल. त्यात काँग्रेसच्या जागांवर डोळा ठेवून आपला आकडा वाढवण्याचे स्वप्न अजित पवार बाळगून आहेत. पण गाठ केवळ महाविकास आघाडीशी नाही, तरुण तुर्क काका शरद पवारांशीही आहे. राष्ट्रवादीचे एकूण ५६ आमदार आहेत. त्यातले ३३ अजित पवारांसोबत गेले. 

त्यापैकी बारामतीत अजित पवारांविरुद्ध शरद पवार उमेदवार उभा करणार नाहीत, असे रोहित पवार यांनी आता जाहीर केले. अजित समर्थक अन्य ३२ आमदारांविरुद्ध शरद पवार उमेदवार उभे करणार असा त्याचा अर्थ. तसे झाले नाही तर मग मात्र काका पुतणे आतून एक होते आणि भाजपला गंडवण्यासाठीच हे तोतयाचे बंड घडवले गेले असा त्याचा अर्थ होईल. शरद पवार आपला अंदाज कधीच येऊ देत नाहीत. त्यांच्याबद्दलचे सारेच अंदाज म्हणूनच चुकत असावेत. 

भाजप कार्यकर्त्यांंना कुंथायलाही बंदी

आमदारसंख्या खुंटणार की घटणार याची चिंता मात्र भाजप आज करत नाही. आपले लक्ष्य लोकसभा २०२४! हा एकच निरोप भाजप परिवारात कानोकानी पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाविजय स्वबळावर शक्य नाही तिथे विरोधी पक्ष फोडा, त्यांना सत्तेत घ्या, मोठी पदे द्या, असे फर्मानच दिल्लीतून सुटले. 

विरोधी पक्षांना फोडून फुटीरांना  सत्तेच्या मखरात बसवण्याचे निर्णय खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा घेत आहेत. त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा प्रचार करायचा का, या प्रश्नावर खासगीत कुंथायलाही भाजपमध्ये बंदी आहे.महाराष्ट्रात स्वबळावर महाविजय अशक्य म्हणूनच आधी शिवसेनेची आणि आता राष्ट्रवादीची दोन शकले भाजपने केली. 

अजित पवार शिंदेंची कोंडी करू शकतात

एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊन महाराष्ट्रातील सर्व ४८ जागा जिंकण्यासाठी भाजपने लढाईच बदलली.  शिंदे यांना फोडून शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत सुरु झालीच आहे. पण मुख्यमंत्रीपदाची ताकद देऊनही शिंदे उद्धव ठाकरेंना गारद करू शकणार नाहीत, हा अंदाज आल्याने भाजपने पवार विरुद्ध पवार ही काका-पुतण्याची झुंज लावून दिली. ही झुंज मात्र गर्दी खेचणार. 

एखाद्या मूर्तीवर भक्तगणांनी वर्षानुवर्षे चढवलेल्या शेंदराची पुटे आघात होताच गळून पडावीत तशी शरद पवारांच्या व्यक्तित्वाला चिकटवलेली प्रभावांची पुटे अजित पवारांच्या पहिल्याच भाषणाने खरवडून उतरवली.  २०१४, २०१७ आणि २०१९ असे तीन वेळा शरद पवारांनी भाजपशी वाटाघाटी केल्या आणि ऐनवेळी हूल देत अजित पवारांना बदनाम केले. 

मला व्हिलन का ठरवले? या अजित पवारांच्या प्रश्नाचे उत्तर शरद पवारांकडे नाही. शिंदे यांना वर्षभरात उद्धव ठाकरे यांचा शेंदूर काढता आला नाही. तो पराक्रम पहिल्याच भाषणात करून दाखवत अजित पवारांनी भाजपची निवड सार्थ ठरवली. भाजपच्या कल्पनेतले हे मूर्तिभंजन करताना अजित पवार सरकारातही शांत बसतील असे नव्हे! राज्याचा मुख्यमंत्री नेमका कोण, असा प्रश्न महाराष्ट्राला पडावा, अशी परिस्थिती ते मुख्यमंत्री शिंदे यांच्या भोवती निर्माण करू शकतात.

पूर्व प्रसिद्धी : दैनिक पुढारी

0 Shares:
You May Also Like
Rajsthan Election 2023
संपूर्ण लेख

राजस्थानात भाजपमधील बंडाळी काँग्रेसच्या पथ्यावर?

राजस्थानात आजवर कोणत्याही पक्षाला सलग दोन वेळा सरकार बनविण्याची संधी दिलेली नाही. त्यामुळे यावेळीही काँग्रेसच्या अशोक गेहलोत यांच्या…
Toll issue in Maharashtra
संपूर्ण लेख

रस्त्यावरील ‘टोलचा झोल’ किती दिवस चालणार?

सामान्य जनतेला रस्ते असो वा कोणतीही सुविधा असो मोफत नको आहे. पण टोलवसुलीच्या नावे चाललेली जनतेची लूट लोकांना…
संपूर्ण लेख

प्रादेशिक पक्षांना गारवा देतोय कर्नाटकातल्या बंडखोरीच्या वणवा

कर्नाटकात भाजपच्या महत्त्वाकांक्षेला मतभेदाचा आणि बंडखोरीचा फटका बसलाय. तिकीटापासून वंचित असलेल्या अनेक ज्येष्ठ आणि प्रभावशाली नेत्यांनी वेगवेगळी चूल…
संपूर्ण लेख

Point by Point: खलिस्तानचं मॅटर आणि भारत-कॅनडा पंगा

कॅनडा आणि एकंदरीतच पाश्चिमात्य देशात सुरू असलेल्या खलिस्तानी चळवळीच्या कारवाया आणि भारत आणि कॅनडा या दोन देशांतील ताणलेले…
संपूर्ण लेख

धनगर आरक्षणाच्या आंदोलनाआधी, फडणवीसांना जाब विचारा!

 मराठा आरक्षणाच्या जालन्यामधील लाठीमारापर्यंत गेलेल्या आंदोलनानंतर, ओबीसींनी आंदोलनाचा इशारा दिला. आता धनगरांना भडकवलं जातंय. हे नक्की कशासाठी चाललंय…
संपूर्ण लेख

भागवतांच्या पुरोगामी विधानांमागे दडलंय काय?

आरएसएस ही मातृसंस्था असलेल्या भारतीय जनता पक्षाची सत्ता २०१४ मधे आल्यानंतर वर्षभराच्या अंतरानं, आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी…