‘बाईपण भारी देवा’ बॉक्स ऑफिसवर भारी का ठरला?

मराठी सिनेमात दम नाही, मराठी सिनेमाला स्क्रीन नाहीत, मराठी सिनेमाला प्रेक्षकच नाहीत, अशा एक ना अनेक तक्रारी नेहमीच ऐकण्यात येतात. पण ‘बाईपण भारी देवा’साठी मल्टिप्लेक्समधे स्क्रीन अपुऱ्या पडतायत. बचतगट, भिशी गृपमधल्या महिलांच्या घोळक्याने थियेटर गजबजतायत.

एकाचवेळी २०-२० तिकिटे खरेदी करणाऱ्या महिला पूर्ण स्क्रीनच बुक करतायत. गेल्या २० दिवसांत ५० कोटींहून अधिक कमाई या सिनेमाने केलीय. एका दिवसात सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा अशी विक्रमी नोंद या सिनेमाच्या नावावर झालीय.

तिकीटबारीवरची हिट मंगळागौर

‘महाराष्ट्र शाहीर’ नंतर दिग्दर्शक केदार शिंदे यांचा हा यावर्षीचा दुसरा हिट ठरलेला सिनेमा आहे. रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा परब यांनी यात मध्यवर्ती नायिकांची म्हणजेच सहा बहिणींची भूमिका साकारलीय. मंगळागौर स्पर्धेच्या निमित्ताने या सहाजणी एकत्र येतात आणि सिनेमाची कथा आकार घेते.

महिलांसाठी हा सिनेमा त्यांच्या रोजच्या जगण्याचा एक आरसाच आहे. त्यामुळे हा इतका रिलेटेबल सिनेमा बघायला महिलांची गर्दी होणं साहजिकच आहे. ही गर्दीच रोज तिकीटबारीवर नवनवे विक्रम रचण्यात या सिनेमाला मदत करतेय. ‘बाईपण भारी देवा’च्या या यशामुळे स्त्रीप्रधान सिनेमांना होणाऱ्या गर्दीची कारणं शोधणं महत्त्वाचं ठरतं.

ठरलेला प्रेक्षकवर्ग, ठरलेला कंटेंट

लॉकडाऊननंतर सुपरडुपर हिट झालेल्या सिनेमांवर एक नजर टाकली, तर त्यात ‘आरआरआर’, ‘केजीएफ’, ‘पठाण’, ‘पुष्पा’सारख्या मारधाडपटांची नावं समोर येतात. त्याखालोखाल ‘काश्मीर फाईल्स’ आणि ‘केरला स्टोरी’सारख्या वादग्रस्त सिनेमांचाही सहभाग आहे. मराठीबद्दल बोलायचं झालं तर हाच प्रवास ‘झिम्मा’पासून सुरू होऊन आता ‘बाईपण भारी देवा’पर्यंत आलाय. हे दोन्ही सिनेमा स्त्रीप्रधान आहेत हे विशेष!

यांच्या जोडीनेच ‘धर्मवीर’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘वेड’, ‘महाराष्ट्र शाहीर’सारख्या सिनेमांनीही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केलीय. यातल्या बहुतांश सिनेमांचा प्रेक्षक हा एकतर पुरुषवर्ग आहे तर काही सिनेमा हे सहकुटुंब सहपरिवार बघावेत असेच आहेत. यांच्या तुलनेत खास महिलांसाठी बनवलेल्या सिनेमांची संख्या फारच कमी आहे. पण त्या सिनेमांना महिलावर्गाकडून मिळालेला प्रतिसाद मात्र थक्क करणारा आहे.

‘झिम्मा’ला तर ‘८३’, ‘पुष्पा’, ‘द स्पायडरमॅन’ अशा बिग बजेट सिनेमांचा सामना करावा लागला होता, पण महाराष्ट्रातल्या महिलांनी तो सिनेमा आपला सिनेमा म्हणून उचलून धरला आणि थियेटरमधे पन्नास दिवसांहून अधिक काळ टिकवलाही. खास महिलावर्गाला टार्गेट करून बनवलेला हा सिनेमा जसा हिट झाला, तशीच जादू आता ‘बाईपण भारी देवा’च्या निमित्ताने दिसतेय.

ओटीटीची आकडेवारी महत्त्वाची

लॉकडाऊनमधे थियेटर बंद असताना प्रेक्षकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार घेतला. खरं तर, घरकामामुळे आणि घरात टीवी असल्यामुळे साधारणतः महिला मोबाईलवर कंटेंट पाहणं टाळतात असा आपला एक गोड गैरसमज असतो. पण ‘स्टॅटिस्टा’ या संस्थेने केलेल्या पाहणीनुसार, इथंही महिलांनी बाजी मारल्याचं दिसून आलंय.

या रिपोर्टनुसार, सर्वच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पुरुषांपेक्षा महिला प्रेक्षकांची गर्दी जास्त असल्याचं ठळकपणे जाणवतंय. हा महिलांचा एवढा मोठा आणि हक्काचा प्रेक्षकवर्ग हातातून सोडण्याची चूक कोणताही हुशार निर्माता किंवा दिग्दर्शक करणार नाही. त्यामुळे महिलांना छोट्या स्क्रीनवरून मोठ्या स्क्रीनवर आणण्यात ‘बाईपण भारी देवा’ यशस्वी ठरलाय. 

महिलांना भावणारा सिनेआशय

मंगळागौर स्पर्धा हा या सिनेमाच्या कथेचा केंद्रबिंदू आहे. श्रावणातल्या या सणावर महिलांचाच हक्क असतो. या सिनेमातल्या सहाही नायिकांनी याआधी अनेक टीव्ही मालिका गाजवलेल्या आहेत. त्यातील काहीजणी अजूनही वेगवेगळ्या मालिकांमधे रोज टीवीवर दिसत असतात. त्यामुळे या सहाही कलाकारांशी महिलांचं नातं जास्त जवळचं आहे.

या सहा जणी सख्ख्या बहिणी असल्याने त्यांचे हेवेदावे, रुसवेफुगवे हे सगळं ओघाओघाने आलंच. या फॅमिली मेलोड्रामासोबतच स्पोर्ट्स ब्रा, मेनोपॉज अशा सहसा चारचौघात न बोलल्या जाणाऱ्या विषयांचाही उल्लेख या सिनेमात येतो. त्यामुळे महिलांना हा सिनेमा म्हणजे त्यांच्या रोजच्या जगण्याचं प्रतिबिंब वाटू लागतं. म्हणूनच एकदा हा सिनेमा बघूनही दुसऱ्यांदा पुन्हा गृपसोबत बघणाऱ्या महिलांचं प्रमाण वाढलेलं दिसतं.

याचबरोबर यातला लोकसंस्कृतीचा मुद्दाही विसरून चालणार नाही. मंगळागौरीचे खेळ हे विशेषतः ब्राम्हण परिवारांमधे खेळले जातात. इतर बहुजन परिवार गौरायांच्या वेळी हेच खेळ नव्या गाण्यांसोबत खेळतात. पण शहरातल्या बहुमिश्र संस्कृतीचा परिणाम म्हणा, मंगळागौरीला टीव्ही मालिकांमुळे असलेलं ग्लॅमर म्हणा किंवा आणखी काही. पण महिलांना मंगळागौरीच्या या प्रथेचं आकर्षण आहे, हे काही लपून राहिलेलं नाही.

बाईपणाची दुखरी नस

‘आदर्श भारतीय नारी’ या चौकटीत राहण्यासाठी कित्येक महिला आपल्या इच्छांना वेळोवेळी मुरड घालत असतात. नकळत पुरुषप्रधान संस्कृतीचं वहन करत असतात. घरातल्या कर्त्या पुरुषाला विचारल्याशिवाय स्वतःवर एक रुपयाही खर्च न करू शकणाऱ्या अशा असंख्य महिला आपल्या आजूबाजूला सापडतील. दरवेळी त्यांना आपल्यावर अधिकार गाजवू पाहणाऱ्या पुरुषाची संमती हवीच असते.

बाईपणाची ही दुखरी नस मराठी दिग्दर्शकांनी व्यवस्थित पकडलीय असं झिम्मा आणि बाईपण भारी देवाच्या यशानंतर म्हणता येतं. लॉकडाऊनमधे घरात बसून कंटाळलेल्या महिलांना लंडनला जाणाऱ्या महिलांचा झिम्मा बघायला मिळतो म्हणून तो हिट होतो. त्यांना आपलासा वाटतो. माहेरी जाण्यासाठी ज्यांना परवानगी मिळत नाही, त्यांना या सिनेमातली सहा बहिणींनी एकत्र येऊन साजरी केलेली मंगळागौर आवडणं साहजिकच आहे.

सिनेमा बघून का होईना त्यांना या क्षणिक स्वातंत्र्याचा उपभोग घेता येतोय. त्या स्वातंत्र्याची जाणीव होतेय. अर्थात, या सिनेमांमधून स्त्रीवाद, स्रीस्वातंत्र्याचा अगदीच विद्रोही थाटात पुरस्कार होत नसला, तरी थोड्याफार प्रमाणात का होईना त्याला साद घातली जातेय, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. या सगळ्याच गोष्टींमुळे महिलांना असा सिनेमा आपलासा आणि हवाहवासा वाटू लागलाय.

तगड्या मार्केटिंगची कमाल

सिनेमाचे ट्रेलर, टीझर आणि इतर प्रोमोज हा प्रेक्षकांपर्यंत पोचण्यासाठीचा फंडा आता जुना झालाय. पूर्वी व्यापक स्तरावर केलं जाणारं हे प्रमोशन आणखी व्यक्तिगत व्हावं यासाठी आता सोशल मीडियाचा वापर होतोय. त्यात इंस्टाग्राम आणि फेसबुकवरचे रील, शॉर्ट आणि स्टोरी हे तर झालंच.

त्याहून महत्त्वाचं ठरलंय ते वॉट्सॅप मार्केटिंग. महिला बचत गट, गृहोद्योग, भिशीमंडळांच्या वॉट्सॅप गृपवरही या सिनेमाची जोरदार चर्चा असल्याचं दिसून आलंय. नववारी साड्या नेसून, गॉगल लावून थियेटरमधे जमणाऱ्या महिलांची गर्दी ही यामुळेच साध्य झालीय.

या सिनेमाच्या लाटेत बॉलीवूड आणि हॉलीवूडच्या अनेक बड्या सिनेमांनी महाराष्ट्रात मान टाकलीय. क्लासेस नाही तर मासेस सिनेमाचं भवितव्य ठरवतात हे या सिनेमाने पुन्हा एकदा सिद्ध केलंय. सिनेमा हिट होण्यासाठी हिरोचीच गरज असते हे मत या सिनेमाने खोटं ठरवलंय. दमदार कथानकाच्या जोडीला तगडं मार्केटिंग असेल तर मराठी सिनेमा थियेटर गाजवू शकतो हे ‘बाईपण भारी देवा’ने दाखवून दिलंय.

0 Shares:
You May Also Like
संपूर्ण लेख

पर्यंटकांच्या गर्दीला युरोप नाही म्हणतंय, भारताचं काय?

कधी कधी स्वत:वर, तर कधी परिस्थितीवर रडावसं वाटतं. ज्या ठिकाणी आपण आनंद घेण्यासाठी जातो त्या सर्व ठिकाणांची आजची…
संपूर्ण लेख

शाहरुखचा ‘जवान’ हिट का झाला?

२०१७ मधे शाहरुखचा ‘रईस’ रिलीज झाला. एक चांगला ऍक्शन सिनेमा असूनही पायरसीचा फटका बसल्याने ‘रईस’ला म्हणावा तसा नफा…
संपूर्ण लेख

भारतांनं चंद्रमोहिमेतून नक्की काय साधलं?

भारताचं चांद्रयान-३ ठरलेल्या दिवशी, नियोजित वेळी आणि निश्चित केलेल्या जागी चंद्राच्या भूमीवर उतरलं आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं…
संपूर्ण लेख

आशा भोसले : फक्त ९० वर्षांचा हिरवागार स्वरऋतू!

कल्पना करा, तुम्ही कोणत्या तरी कारणानं अत्यंत अस्वस्थ आहात, बैचेन आहात. मन लागत नाही आणि तितक्यात एक गाणं…
संपूर्ण लेख

‘एआय’मुळे फेक कंटेंटवाल्यांचा बाजार जोरात!

जगभरातील माणसं काय विचार करतात हे त्यांना काय माहिती मिळते, त्यावर ठरतं. ते जो विचार करतात तशी खरेदी…
संपूर्ण लेख

गांधीजींच्या शेवटच्या माणसाचा शोध घेणारी दोन पुस्तकं!

१९४० च्या दशकात महात्मा गांधी यांनी वैयक्तिक सत्याग्रह मोहिमेसाठी विनोबा भावे यांची पहिला लढवय्या म्हणून निवड केली. दुसरे…