शिरीष कणेकरांचे अखेरचे खिन्न दिवस आणि लताबाई!

आपल्या ८० वर्षांच्या कारकीर्दीत कणेकरांनी धो धो लेखन केलं. त्या लेखनामधून आणि त्यांच्या खुमासदार कार्यक्रमांमधून त्यांनी लोकांना तुफान हसवलं. क्रिकेट, सिनेमा, संगीत यातील अनेक खाचाखोचा माहिती असलेला हा सिद्धहस्त लेखक फक्त माहिती सांगत नसे. त्या माहितीच्या पल्याड असलेल्या आणि सहसा न दिसणाऱ्या जागाही तो दाखवत असेत. 

अनेकांनी त्यांच्या हा हसण्याहसविण्याचे किस्से सोशल मीडियावर शेअर केलेत. त्यातून हा माणूस किती रसभरीत आयुष्य जगला असं वाटतं. पण सर्कशीतला विदुषक लोकांसमोर कितीही हसत असला तरी आतमधे त्याच्या आयुष्याला जी कारुण्याची किनार असते ती कोणालाच दिसत नाही. कणेकरांच्या आयुष्यातही अशा करुण जागा होत्या. आयुष्याच्या अखेरीस ते या जागांमुळे खिन्न झाले होते. 

त्यांचे स्नेही जयश्री देसाई आणि मंदार भारदे यांच्या फेसबूक पोस्टमधून जाणवलेले वेगळे कणेकर समजून घेण्याचा हा प्रयत्न… 

जयश्री देसाई आपल्या पोस्टमधे लिहितात…

जीवनाला कंटाळलेला एक उमदा लेखक मृत्यूला मिठी मारून आपल्यातून निघून गेला. त्यांनी आपल्याला कायमच हसवलं. अगदी शेवटपर्यंत ते लिहीत होते. शेवटपर्यंत हसवत होते. मात्र ते स्वतः अंतर्यामी उदास होते. त्यांची दोन्ही मुलं परदेशात स्थायिक झाल्यानं त्यांना एकाकी वाटत होतं. त्यांची आई फार लवकर गेली होती. त्या आईला ते आयुष्यभर शोधत राहिले आणि म्हातारपणी तर तिची त्यांना फारच आठवण येत होती.त्यांचा तो शोध, तो स्मृतींचा जागरही आता संपला!

त्यांची-माझी पहिली भेट झाली ती लोकप्रभामधे. कारण ते माझा सहकारी अभिजीत देसाई यांच्याकडे सतत यायचे. त्या दोघांच्या गप्पा हा एक धमाल प्रकार होता. त्या ऐकून सुद्धा दिवस खूप छान जायचा. नंतर मी लोकप्रभा सोडलं. त्यांच्याशी संपर्क संपला. मात्र काही वर्षापूर्वी अजब प्रकाशनने लेखकांचं एक मिनी गेट-टुगेदर प्रभादेवीला आयोजित केलं होतं. तिथे त्यांचा माझा पुन्हा संपर्क प्रस्थापित झाला. 

तोवर त्यांनी मी घेतलेल्या लतादीदींच्या मुलाखती वाचल्या होत्या आणि लतादीदी हा त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्याने आमच्या गप्पा त्यानंतर ‘लतादीदी’, ‘ त्यांचं गाणं ‘या विषयावरच व्हायला लागल्या. पण त्या काळात त्यांचा आणि लतादीदींचा संपर्क तुटला होता. तो सुरू करून देण्यात मला यश आलं आणि त्याचा मला खूप आनंद आहे.

झालं असं होतं की, मी गेली काही वर्ष रोज त्यांना गुड मॉर्निंग मेसेज पाठवायची. पण एक दिवस ते मला म्हणाले, मला नका पाठवत जाऊ हे गुड मॉर्निंग मेसेज. माझी मॉर्निंग आता गुड कधीच नसते. ते ऐकल्यावर मला पोटात गलबल्यासारखं झालं आणि मी तेव्हापासून त्यांना गुड मॉर्निंग मेसेज पाठवणं बंद केलं. 

हे मी लतादीदीनाही सांगितलं. कणेकरांनी त्यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला होता हे त्यांना कळलं नव्हतं. पण कणेकरांच्या मनाची ही अवस्था कळल्यावर दीदींनी मला त्यांना तर त्यांचा नंबर द्यायला सांगितला.  त्यांचं मोठेपण हे की, त्या स्वतः कणेकरांना फोन करून, त्यांच्याशी गप्पा मारून त्यांना प्रसन्न करायचा प्रयत्न करत असत.

त्या नंतर हे असे गुड मॉर्निंग मेसेज थांबले तरी कणेकरांबरोबर बाकी मेसेजेस, लेखांचं आदान-प्रदान चालू होतं. मात्र एक दिवस हे रोजचं आदान-प्रदानही थांबलं आणि त्याला कारण झालं वाणी जयराम यांच्या मृत्यूचं. वाणी जयराम यांचा मृतदेह घरी सापडला ही बातमी मी त्यांना कळवली. ते आधीच हळवे झालेले होतेच. या बातमीने ते आणखी विकल झाले आणि त्यांनी अशा काही बातम्या किंवा रोज काही पोस्ट न पाठवण्याची विनंती केली. मला आता कशातही रस राहिलेला नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. त्यामुळे तेही थांबलं.

त्यांना फक्त एकाच गोष्टीत रस उरला होता आणि तो म्हणजे लतादीदींचं गाणं. ते गाणं म्हणजे त्यांचा श्वास होता. आणि लतादीदींशी गप्पा हा विरंगुळा. पण दीदीही गेल्यावर्षी गेल्या. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातला हा विरंगुळा ही संपला होता. त्यांची गाणी ते ऐकत असत, पण त्यांच्या गप्पांमधे खंड पडला होता. दीदी गेल्या वर्षी गेल्या. आज कणेकर गेले. आता स्वर्गात त्यांच्या गप्पांचा फोड रंगेल हे नक्की!कणेकरांना भावपूर्ण श्रद्धांजली!

मंदार भारदे आपल्या पोस्टमधे लिहितात…

शिरीष कणेकर सरांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. दंगामस्ती करत हा माणूस आयुष्यभर जगला आणि जगतांना जे आणि जसे जग वाट्याला आले ते आणि तसे त्याने कोणताही आविर्भाव न आणता आपल्या लिखाणातून मांडले. जगभरातल्या वाट्याला आलेल्या दांभिकतेला ह्या माणसाने आपल्या वक्रोत्तीने उघडे-वागडे केले आणि हे करत असताना जगण्याच्या आस्वादाची लय कधीही बिघडू दिली नाही.

बहुतांश वेळेला अत्यंत उपरोधिक लागणारा काणेकरांचा सूर आपल्या वडिलांचा उल्लेख करतांना अत्यंत हळवा लागायचा. आपल्या वडलांच्या कीर्तीला साजेसे काहीच आपल्या हातून झाले नाही, अशी काहीतरी बोच त्यांना आयुष्यभर सलत असावी. कोणत्यातरी चित्रपटाच्या चिंध्या करतांना खळखळून हसवून डोळ्यात पाणी काढणारे कणेकर वडलांबद्दल हळवेपणाने लिहायला लागले की, पण वाचकांच्या डोळ्यातून पाणी काढायचे. ही अद्भूत रेंज आहे. 

मला या माणसाची क्रेझ होती. खूप प्रयत्न करून त्यांच्याशी ओळख वाढवली. त्यांच्या बरोबर खूप थोडे पण अगदी श्रीमंत क्षण अनुभवायला मिळाले. मी उपहासाच्या पायावर उभे असे काही लिहायचा प्रयत्न करीत असतो तेंव्हा कणेकरांची आपण कॉपी करतो आहोत, असे होऊ नये असा सतत प्रयत्न करीत राहतो. त्यांच्या लिखाणाच्या प्रभावातून बाहेर राहून लिहायचा प्रयत्न करायची एक मोठीच दहशत लिहिताना असते. 

कणेकरांनी आयुष्यात आणलेल्या जिवंत, रसरसत्या क्षणांची फार मोठी उधारी आयुष्यावर बाकी आहे.

0 Shares:
You May Also Like
संपूर्ण लेख

पर्यंटकांच्या गर्दीला युरोप नाही म्हणतंय, भारताचं काय?

कधी कधी स्वत:वर, तर कधी परिस्थितीवर रडावसं वाटतं. ज्या ठिकाणी आपण आनंद घेण्यासाठी जातो त्या सर्व ठिकाणांची आजची…
संपूर्ण लेख

शाहरुखचा ‘जवान’ हिट का झाला?

२०१७ मधे शाहरुखचा ‘रईस’ रिलीज झाला. एक चांगला ऍक्शन सिनेमा असूनही पायरसीचा फटका बसल्याने ‘रईस’ला म्हणावा तसा नफा…
संपूर्ण लेख

भारतांनं चंद्रमोहिमेतून नक्की काय साधलं?

भारताचं चांद्रयान-३ ठरलेल्या दिवशी, नियोजित वेळी आणि निश्चित केलेल्या जागी चंद्राच्या भूमीवर उतरलं आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं…
संपूर्ण लेख

आशा भोसले : फक्त ९० वर्षांचा हिरवागार स्वरऋतू!

कल्पना करा, तुम्ही कोणत्या तरी कारणानं अत्यंत अस्वस्थ आहात, बैचेन आहात. मन लागत नाही आणि तितक्यात एक गाणं…
संपूर्ण लेख

‘एआय’मुळे फेक कंटेंटवाल्यांचा बाजार जोरात!

जगभरातील माणसं काय विचार करतात हे त्यांना काय माहिती मिळते, त्यावर ठरतं. ते जो विचार करतात तशी खरेदी…
संपूर्ण लेख

गांधीजींच्या शेवटच्या माणसाचा शोध घेणारी दोन पुस्तकं!

१९४० च्या दशकात महात्मा गांधी यांनी वैयक्तिक सत्याग्रह मोहिमेसाठी विनोबा भावे यांची पहिला लढवय्या म्हणून निवड केली. दुसरे…