इंदूरच्या होळकरांकडे होती शाही मोहर्रमची परंपरा

दक्षिणेत हैदराबाद आणि उत्तरेत लखनऊ या ठिकाणी मोहर्रमची ऐतिहासिक परंपरा आहे. या दोन्ही ठिकाणी मोहर्रमचे स्वरूप शाही होते. येथील वेगवेगळ्या शाही परंपरा आजही पाळल्या जातात. या दोन शहरांव्यतिरिक्त होळकर घराण्याच्या इंदूरमधे शाही मोहर्रमची परंपरा होती. याविषयीची बरीच माहिती इतिहासाच्या साधनांमधे आढळते. 

२००६ मधे ‘भारतातील मोहर्रम’ या विषयावर एका इतिहास परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. इंदूरच्या इतिहासाचे अभ्यासक डॉ. जे. सी उपाध्याय यांनी या परिषदेत इंदौरच्या मोहर्रमवर एक शोधनिबंध सादर केला होता. त्यामधे इंदूरमधील मोहर्रमच्या अनेक अज्ञात पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला होता.

होळकरांनी देवळं बाधली, तसेच इमामवाडेही बांधले

इंदूरमधे काही शतकांपूर्वी होळकर राज्यकर्त्यांचे अनेक मजली, उंच-उंच चौकोन ताजिये संपूर्ण राज्यात लोकप्रिय होते. मोहर्रमच्या महिन्यात त्यांची मिरवणूक निघायची. ताजिये बनवण्यासाठी त्या काळी तीन हजार रुपये खर्च व्हायचे. नंतरच्या काळात त्यांची उंची कमी होत गेली. सुरुवातीला अकरा, नंतर नऊ आणि शेवटी सात मजली ताजिये बनवले जाऊ लागले. 

आताच्या काळात हे ताजिये फक्त एक मजली असतात. ताजीयांची उंची घटली असली तरी, त्याविषयीची श्रध्दा मात्र कमी झालेली नाही. आजही आहिल्यादेवी ट्रस्ट या खासगी संस्थेच्या वतीने ताजिया बनवण्यासाठी चागंली वर्गणीही देण्यात येते. 

होळकर घराणे धर्मादायी कार्यासाठी भारतात ओळखले जाते. अहिल्याबाई होळकर यांनी अनेक ठिकाणी धर्मशाळा, मंदिरे, बारव वगैरे बांधल्या आहेत. त्याच पध्दतीने त्यांनी होळकर राजघराण्याचे मोहर्रमचे इमामवाडेही बांधले. इमामवाडा म्हणजे शिया मुस्लीम एकत्र जमून ‘मजलिस’ किंवा सभा घेतात, नामस्मरण करतात ती जागा. 

शाही मोहर्रम हा सरकारी कार्यक्रम होता

होळकर सरकारच्या वतीने १९०८ मधे गोपाळ मंदीराजवळ १२ हजार रुपये खर्च करुन बांधण्यात आलेला इमामबाडा आजही दिमाखात उभा आहे. होळकर राज्यकर्त्यांच्या वतीने मोहर्रमच्या तयारीसाठी सर्व प्रशासकीय कार्यालयांना विशेष आदेश जारी केले जात असत. कुठे कोणती व्यवस्था कधी करायची यांविषयी या आदेशात सविस्तर सूचना केली जायची. 

सरकारी भविष्यवेत्ते पंचांग पाहून शुभ महुर्त काढायचे. त्यानंतर सर्व सरकारी विभागांना मोहर्रमच्या चंद्ररात्रीपासून १३ व्या रात्रीपर्यंतचे सर्वप्रकारच्या विधींविषयी आदेश दिले जात होते. शहर काझीला इमाम बाड्यात बोलावून चौकी वगैरे धुण्याची जबाबदारी सोपवली जायची. सरकारचे आधिकारी, मंत्री, इन्स्पेक्टर जनरल पोलीस आणि जिल्हा न्यायाधिशांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या जात होत्या. याविषयी अनेक फर्मान आजही आर्काईव्हजमधे उपलब्ध आहेत. 

मोहर्रममधे फकिरांना विशेष महत्व असे. काही फकीर राजवाड्यात येत. त्यांना ताजिया बनवण्यासाठी बांबू, सुत, उदबत्या, हार, फुल, नैवैद्य, दिवा प्रज्वलित करण्यासाठी त्याकाळी चार आणे दिले जायचे. विशेष रात्री सैन्याचे बँड देखील वाजवले जायचे. रात्री आठ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत कार्यक्रम आयोजित केले जात होते.

शोकसंगीत, ताजियाची सुरक्षा आणि फकिरी

मोहर्रमचे चंद्रदर्शन व्हायचे त्याला ‘चांदरात’ (चांद्ररात्र) म्हटले जाते. मोहर्रमचा पहिला दिवस या चांद्ररात्रीच्या दुसऱ्या दिवशी सुरु होत असे. चांद्ररात्री चंद्रदर्शन झाल्यानंतर शहर काझी आणि ताबूतचे फकीर एका लाकडाची चौकी सजवून त्यावर उदाचे तबक ठेवत. ते तबक शाही सेवकाच्या डोक्यावर ठेऊन इमामबाड्यापासून राजवाड्याजवळ नजरबागेजवळ आणले जात असे. 

नजरबागेत हे तबक ठेऊन फकीर दुरुद पठण करायचे. प्रसाद म्हणून बत्ताशे वाटले जायचे. त्यानंतर हे तबक इमामबाड्यात आणून ताजियाच्या समोर ठेवले जात असे. चांदरात्रीपासून कत्तलच्या (इमाम हुसैन यांच्या हौतात्म्याच्या) रात्रीपर्यंत इमाम बाड्यावर शोकसंगीत वाजवले जायचे. ताबूतच्या सुरक्षेसाठी एक सैनिक लष्कराच्या वतीने आणि एक विशेष बंदुकधारी शिपाई असे दोन शिपाई इमामबाड्यासमोर पहाऱ्यावर तैनात केले जायचे. 

मोहर्रमच्या पाचव्या दिवशी महाराजांच्यावतीने लष्कराच्या काही लोकांना फकिरी वस्त्रे दिली जात. फकिराच्या वेषात लष्कराच्या सेनापतीला रेशमी दुपट्टा आणि (फकिरी) कफनीसाठी कपडा दिला जायचा. इतरांना साधा दुपट्टा, रंगीत कफनी दिली जात होती. ताजियाच्या व्यवस्थेसाठी इमामबाड्यात पोलीसांचा बंदोबस्त ठेवला जात असे. 

चाळीस किलो पिठाच्या भाकऱ्या आणि मसूर डाळ

मोहर्रमच्या सातव्या आणि आठव्या दिवशी रंगवलेल्या डब्यावर एक कमानदार आडवा बांबू बांधून त्यावर तलवारी लटकावून त्याची मिरवणूक काढली जात असे. त्याला अलम म्हटले जायचे. सैन्याचे काही लोक, सैन्याच्या रिवाजानुसार हत्तीवर बसायचे तर काही पायी मिरवणूकीत सहभागी व्हायचे. हा जुलुस दोन दिवस निघत असे.

महाराजांच्या वतीने जी रक्कम मिळायची, तीत वाढही व्हायची. मोहर्रमच्या सातव्या दिवशी महाराजा होळकर सोने चांदीच्या दागिन्यांनी सजवलेल्या हत्तीवर अंबारीत बसून इमामबाड्यात येत. फातेहा, दुरुद आणि नमाजनंतर महाराज ताजिया बनवणाऱ्याला रोख इनाम देत असत. महाराज कमरट्ट्यासारखा पट्टा खास लोकांना वाटत असत. 

महाराज स्वतःदेखील हा पट्टा घालत. सातव्या रात्री चाळीस किलो पिठाच्या भाकऱ्या आणि पंधरा किलो मसूर डाळ बनवली जात असे. त्याला छांदा म्हटले जाई. ही दाळ आणि भाकर फकिर व ताबूतच्या हक्कदार लोकांमधे वाटले जात असे. आठव्या तारखेला गुळाचा सरबत बनवून तो लोकांमधे वाटला जात असे. 

सात मजली ताबूतावर होणारं वादन

मोहर्रमची नववी तारीख ही कत्तल की रात म्हणून ओळखली जाते. या दिवशी इमाम हुसैन यांची हत्या झालेली असल्यामुळे या रात्रीला विशेष महत्व आहे. त्या रात्री ताबूतच्या सातव्या माळ्यावर एक वाद्य ठेऊन ते वाजवले जायचे. त्यासाठी विशेषतः सकाळी नय्यर कारखान्याचे लोक आणि समितीचे आधिकारी इमामबाड्यावर येत. 

ताबूतचे सात माळे एकावर एक रचून हे वाद्य वाजवण्याची तयारी केली जायची. ताजियाच्या वरील भाग मजबूतीने बांधल्यानंतर त्याला उचलण्यासाठी एकेका बांबूवर नऊ भोई आणि एक नायक तैनात केला जात असे. रात्री साडे दहा वाजता ताजियाला लष्करी आणि शाही लवाजम्यासहन शोभायात्रेत आणले जात असे. 

जुलूस पाहायला देश-विदेशातील पाहुणे

महाराजा जुन्या वाड्यावरुन कत्तलच्या रात्रीचे जुलूस पाहत. जुन्या वाड्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर महाराजा होळकर आपले वजीर, सरदार आणि राजे रजवाड्यांसोबत बसायचे. हा जुलूस पाहण्यासाठी दिल्ली कॉलेजमधे शिकणारे सर्व राजपूत्र, विद्यार्थी, शिक्षक आणि युरोपियन आधिकारीदेखील उपस्थित असत. 

जुन्या राजवाड्याच्या तिन्ही बाजूंच्या झरोक्यांमधे शाही घराण्यातील स्त्रिया आणि अन्य आधिकाऱ्यांच्या परिवारातील स्त्रियादेखील बसत. ताजियाचा जुलूस राजवाड्याच्या मागून बिछडी देवडीच्या समोर दोन्ही राजवाड्यांच्या समोरील रस्त्यांवरुन गोपाळमंदिर, खजूरीबाजार, शक्करबाजार, बोहरा बाजार, बजाजखाना चौकातून पिपली बाजारात राजगुरू शाही वस्तादांच्या घरासमोरुन इमामबाड्यात येत असे. 

राजगुरूंच्या घरासमोर ताबूतचे जुलुस थांबायचे. राजगुरु ताबूतास रेवड्यांचे नैवेद्य आणि गुलाबाचे फुल अर्पण करत. त्यानंतर हा जुलुस पुढे निघायचा. या जुलुसमधे तृतियपंथी देखील सहभागी व्हायचे. ते चांदीचे घुंगरु जुलूस संपेपर्यंत वाजवत राहायचे.

होळकरांच्या हत्तीचीही ताजियाला सलामी

मोहर्रमची दहावी तारीख ही ताबूतला विसावा देण्याचा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी ताबूतसमोर दुरुद पठण करुन ठरलेल्या वेळी साडे चार वाजता करबला मैदानात मिरवणूकीने नेले जात असे. ताजियाचा जुलुस राजवाड्याच्या शाही दरवाज्यावर आणला जात असे. त्यानंतर राजवाड्याचे दोन फेरे लावून हा जुलुस अडा बाजार, पंढरीनाथ, हससिध्दीहून जुन्या मोती बंगल्याच्या समोरून करबला मैदानावर येई. तेथे बनवलेल्या एका कठड्यावर हा ताजीया ठेवला जाई. येथे ताजियेला सलामी देऊन शाही लवाजमा माघारी जात असे. 

मोहर्रमच्या प्रत्येक दिवसाला विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जायचे. प्रत्येक कार्यक्रमात सरकारी आधिकारी विशिष्ट शाही विधी पार पाडायचे. होळकरांचा शाही हत्तीदेखील एक दिवस ताजियाला सलामी द्यायचा. लखनऊ वगैरे भागातील कलाकार मंडळीदेखील इंदूरच्या मोहर्रममधे सहभागी होण्यासाठी येत असत. 

मोहर्रमच्या अखेरच्या दिवशी भोई, फकीर आणि मोहर्रम समितीचे आधिकारी करबलाच्या मैदानात येऊन ताजिया उघडत. त्याचा एक–एक मजला वेगळा करुन त्याचे अवशेष नदीत विसर्जित करत. त्याच्यावर लावलेले काच, लाकडी खांब वगैरे इमामबाड्यात आणून ठेवत. त्यानंतर इमामबाड्यात मोहर्रमच्या सुरुवातीपासून तैनात पहारेकऱ्यांना सुट्टी दिली जायची. त्यानंतर इमामबाडा बंद केला जात असे. या पध्दतीने होळकर राजवटीत मोहर्रमच्या उत्सवाचा समारोप होत असे.

(हा लेख आवाज द वॉइस डॉट इन वरून घेतला आहे. लेखक उर्दू साहित्य आणि दक्षिणेच्या मध्ययुगीन इतिहासाचे अभ्यासक असून गाजीउद्दीन रिसर्च सेंटरचे सदस्य आहेत.)

0 Shares:
You May Also Like
amphibians endangered
संपूर्ण लेख

उभयचर नष्ट होताहेत, उरलेल्या जीवसृष्टीवरही धोक्याची घंटा!

जगप्रसिद्ध ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान…
संपूर्ण लेख

‘लिव्ह इन’ की ‘लग्न’ यावर उत्तर कसं शोधणार?

‘लिव्ह इन’ अर्थात लग्नाशिवाय शारीरिक संबंधात राहण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या…
संपूर्ण लेख

सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य उलगणारा ‘बेन्नू’तील खजिना

पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘नासा’नं २०१६ मधे यान पाठवलं होतं. ते यान या लघुग्रहावजवळ…
संपूर्ण लेख

लॅटिन अमेरिका ही पर्यावरणपुरक जगासाठी नवी अर्थशक्ती

लॅटिन अमेरिकेत,  दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ३३ देशांचा समावेश होतो. लॅटिन हे नाव सर्वप्रथम फ्रान्सचे सर्वेसर्वा असलेल्या तिसऱ्या…
संपूर्ण लेख

फक्त ८० रुपयात ‘लिज्जत’ हा ब्रँड घडविणाऱ्या आज्जी गेल्या

ही गोष्ट आहे, १९५९ मधली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो भारावलेला काळ होता. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू देशाची नवी…
संपूर्ण लेख

सत्यशोधक पत्रकारितेचे विस्मृतीत गेलेले अतुलनीय योगदान

एकोणिसाव्या शतकातील नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा आणि आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले…