साईबाबांचं ऐकायचं की भिडेसारख्यांचं?

शिर्डीत साईबाबांची मूर्ती आहे आणि त्यापुढेच साईंची समाधी असलेली कबरही आहे. आज शिर्डीत दररोज लाखो लोक येताहेत. त्यातील काहीजण तर चक्क विमानानं येताहेत. साईबाबांना मानणारे करोडो जण असून ते जगभरात पसरलेले आहेत. जगभरात साईबाबांची हजारो मंदिरे असून साईभक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचं हे प्रतीक हिंदुत्ववाद्यांच्या नजरेत खुपतंय.

त्यांनी सुरुवातीला साईबाबांना हिंदू करण्याचा जमेल तेवढा प्रयत्न करून पाहिला. साईबाबा हिंदू होते की मुस्लिम यावर कुजबूज आघाडीतून संशय निर्माण करून, जमेल तेवढा संभ्रम उभा केला गेला. शिर्डीत साईबाबा येण्याआधीच्या आयुष्याबद्दल कुणालाच ठोस माहीत नसल्याने अनेक पतंग उडवून झाले. पण तरीही बाबांविषयी कोणताही संशय न वाटता, त्यांचा प्रेमाशीर्वाद घेणाऱ्यांची संख्या वाढतच गेली. त्यामुळे आता थेट बाबा मुस्लिम असल्याची मांडणी होऊ लागली आहे.

संभाजी भिडे साईबाबांवर काय बोलले?

लोकांच्या मनात ज्यांच्याविषयी कमालीचा आदर आहे अशा महात्मा फुले, महात्मा गांधी, साईबाबा या देवतासदृश व्यक्तींवर संभाजी भिडे यांनी केलेली अपमानास्पद विधानं आता जाहीर होऊ लागली आहेत. ही विधानं दिसताना संभाजी भिडे करत असले तरी, त्यांचा बोलविता धनी वेगळा आहे, असं अनेकांचं मत आहे. गेल्या काही दिवसात भिडेंची ही विधानं गाजताहेत. त्यांच्याविरोधात पोलीस तक्रारी, आंदोलनं होऊनही, भिडे अद्यापही बिनधास्त आहेत.

महात्मा गांधींचा अपमान करणारी विधानं केल्यानंतर चर्चा टीपेवर पोहचली असतानाच, सोशल मीडियावर संभाजी भिडे यांचा आणखी एक विडिओ व्हायरल झाला. त्यात त्यांनी साईबाबांचा अपमान केलाय. ते म्हणताहेत की, आपला हिंदू समाज साईबाबाला पुजतो, त्या साईबाबांची XXX  काय ते तपासा. सर्वप्रथम त्या साईबाबाला आपल्या घराघरातील देव्हाऱ्यातून बाहेर काढून फेका. 

अत्यंत खालच्या भाषेत केलेली ही विधानं आक्षेपार्ह आहेत. एका विशिष्ट धर्मातील असल्याचा आरोप ठेवून, हिंदूनी त्यांची पूजा करू नये, असा अपप्रचार केला जातोय. यामागे धर्माधर्मातील सलोखा नष्ट होऊन, ध्रुवीकरण व्हायला हवं हा स्वार्थी राजकीय डाव आहे. या सगळ्यातून दंगली पेटल्या तर याला कोण जबाबादार असेल, याचा विचार प्रत्येकानं गांभीर्यानं करायला हवाय.

साईबाबांचं भगवेकरण कसं सुरू झालं?

शिर्डीतील साईबाबा हे नक्की कोणत्या जातीचे, धर्माचे होते? त्यांचं मूळ नाव याबद्द्ल आज कुणालाच फारसं माहीत नाही. बाबांनी त्याविषयी कधीच ठोस भाष्य केलेलं नाही. पण बाबा मशिदीत राहायचे. दिवाळीत दिवे लावायचे. सबका मालिक एक है, हे त्यांचं तत्वज्ञान होतं. तेच ते स्वतः जगले आणि हेच त्यांनी जगालाही शिकवलं. त्यामुळेच बाबांची जात कोणती, धर्म कोणता याबद्दल खऱ्या साईभक्ताला काहीच पडलेलं नसतं.

पण गेली कित्येक वर्ष साईबाबांचं मोठेपण आणि सर्वधर्मीय सलोखा डोळ्यात खुपणाऱ्या अनेकांनी त्यांच्याविषयी अनेक अफवा पसरवल्या. काहींनी तेच नानासाहेब पेशवे असल्याचे सांगितले. काहींनी त्यांचं नाव हरिभाऊ भुसारी होतं असं काहीही पसरवलं. एवढंच नाही तर साईंच्या शिर्डीतल्या मंदिरातही त्यांचं भगवेकरण झाल्याचे लेख २०१७ मधे साई समाधीच्या शताब्दीनिमित्त प्रसिद्ध झालेत.

त्यात त्यावेळी द्वारकामाई मशिदीचे द्वारकामाई मंदिर कसे झाले, मंदिरातील फलक भगवे कसे झाले, त्यावेळी उभरलेल्या ध्वजावर ओम् हे चिन्ह कसे ठेवले गेले वगैेर अनेक मुद्दे चर्चिले गेले. एवढंच नाही तर शिर्डीचं महत्व कमी करण्यासाठी पाथर्डीला साईबाबांचं जन्मगाव पाथर्डी असल्याचं ठरवून त्याचा विकासही करण्यात आला. हे सगळं शिर्डीतील साईवर भगवे शिक्के मारण्यासाठीचे प्रयत्न असल्याचे दिसून आले होते.

शिर्डीतला सर्वधर्मसमभाव झाकोळला जातोय का? 

शिर्डीत साईबाबांची असलेली मूर्ती ही ७ ऑक्टोबर १९५४ प्रतिष्ठापित करण्यात आली. त्यापूर्वी तिथं फक्त साईबाबांची कबर रूपात असलेली साईंची समाधी होती. त्यापाठी एक साधा फोटो ठेवलेले फोटो इंटरनेटवर सापडतात. पण आज साईंची कबर ही सपाट करण्यात आली असून, मूर्ती ही पूजेचे मुख्य माध्यम झाले आहे. 

शिर्डीच्या साईमंदिरातील दिवसभरातील पूजाविधीचे वेळापत्रक त्यांच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. त्यातील सर्व पूजा ही हिंदू पद्धतीनं होत असून, त्यात कोणत्याही मुस्लिम पद्धतीच्या उपासनेचा उल्लेख दिसत नाही. पण काही स्थानिकांशी बोलल्यावर असे कळलं की, आजही गावातील काही मुस्लिम दररोज बाबांच्या समाधीवर फुलं अर्पण करतात. तो त्यांचा मान आजही जपला जातो. पण त्याचा उल्लेख नित्यपूजेच्या कार्यक्रमात कुठेच दिसत नाही.

शिर्डीतील रामनवमीचा उत्सव १९११ मधे स्वतः साईबाबांनी सुरू केला होता. आज हा उत्सव प्रचंड मोठा झाला असून, देशभरातून अनेक पालख्या शिर्डीमधे येतात. या उत्सवात मुस्लिम समाजाचा मोठा मान असतो.     द्वारकामाई मशिदीतून संदल मिरवणूक निघते आणि बाबांच्या समाधीवर चंदनाचे ठसे उमटवले जातात. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा हा सण बाबांनी सुरू करून दिला होता. पण आज या ऐक्याला नख लावण्याचा प्रयत्न होताना दिसतोय.

साईबाबा आणि लोकमान्यांचे संबंध होते

इतिहासाचे अभ्यासक हेमंत राजोपाध्ये यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्यात ते म्हणतात की, ”वऱ्हाडचे दादासाहेब खापर्डे हे लोकमान्य टिळकांचे कट्टर समर्थक आणि अत्यंत घनिष्ठ निकटवर्तीय होते.  ते साईबाबांचे भक्त भक्त होते. आपल्या आजारपणात शिर्डीत बाबांच्या सेवेत राहून त्यांनी लिहिलेल्या रोजनिशीमध्ये लोकमान्य आणि साईबाबा यांचे संबंध कसे होते, याची माहिती मिळते. 

बहुजन समाजात वैदिक धर्माचा प्रसार करणारे, संतगाथा लिहिणारे आधुनिक महिपती असं ज्यांना संबोधलं जातं, ते दासगणू महाराज हे साईबाबांचे निष्ठावंत शिष्य होते. अक्कलकोटनिवासी श्रीस्वामी समर्थ महाराजांचे शिष्याग्रणी असलेल्या आनंदनाथ महाराज वालावलकर यांचं साईबाबांच्या चरित्रात विशेष स्थान आहे. 

सांप्रदायिक श्रद्धेनुसार स्वतः श्रीस्वामी समर्थ महाराज व साईबाबा यांचे अनुबंध विशेष होते असंही दिसतं. साईबाबांना दत्तात्रेयांचे अवतार अशी सांप्रदायिक मान्यताही जगभर ज्ञात आहे.’’ असं सांगून आज दुर्दैवानं भिडेंसारख्या माणसांनं साईबाबांच्या केलेल्या अपमानाच्या वेळी अनेकजण मूग गिळून गप्प आहेत, अशी खंतही राजोपाध्ये आपल्या पोस्टमधे व्यक्त करतात.

श्रद्धा-सबुरीनं घ्यायचं की भिडेंचं ऐकायचं?

श्रद्धा आणि सबुरी या दोन शब्दात काय ताकद आहे, हे प्रत्येक साईभक्ताला माहीत आहे. त्यामुळेच आज साईबाबांच्या नावानं एवढा बाजार भरला असताना आणि त्यांच्याविरोधात द्वेषाचे मळे पिकवले जात असतानाही, साईबाबांवरची श्रद्धा तसूभरही कमी झालेली नाही. फक्त या श्रद्धेला विवेकाचं बळ मिळावं आणि बाबांची सर्वांच्या बद्दल असलेली प्रेमाची शिकवण आपण शिकायला हवी.

बाबा असतानाही, त्यांच्याविषयी वाईट बोलणारे काही कमी नव्हते. साईबाबांचे चरित्र पाहिले, त्यांच्यावर आलेले सिनेमे पाहिले तरी ते स्पष्टपणे दिसतं. पण बाबांनी आपला प्रेमाचा मार्ग कधीच सोडला नाही. त्यामुळे कुणी शंकराचार्य, कुणी बागेश्वर बाबा, कुणी संभाजी भिडे वगैरे वाट्टेल ते बोलले, तर त्याला किती किंमत द्यायची हे सच्चा साईभक्ताला सांगायला लागू नये.

मुद्दा फक्त एवढाच की, काळ सोकावता कामा नये. त्यामुळे साईभक्तांनी याबद्दल आक्षेप घेतला आहे. तसंच शिर्डीच्या साईबाबा संस्थानानंही पोलीस ठाण्यात भिडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या सगळ्याचं पुढे काय होईल माहीत नाही. पण साईबाबांनी दिलेली ‘सबका मालिक एक’ ही सर्वांना एकत्र करणारी शिकवण विस्मृतीत जाईल, असं होऊ देता कामा नये.

0 Shares:
You May Also Like
amphibians endangered
संपूर्ण लेख

उभयचर नष्ट होताहेत, उरलेल्या जीवसृष्टीवरही धोक्याची घंटा!

जगप्रसिद्ध ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान…
संपूर्ण लेख

‘लिव्ह इन’ की ‘लग्न’ यावर उत्तर कसं शोधणार?

‘लिव्ह इन’ अर्थात लग्नाशिवाय शारीरिक संबंधात राहण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या…
संपूर्ण लेख

सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य उलगणारा ‘बेन्नू’तील खजिना

पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘नासा’नं २०१६ मधे यान पाठवलं होतं. ते यान या लघुग्रहावजवळ…
संपूर्ण लेख

लॅटिन अमेरिका ही पर्यावरणपुरक जगासाठी नवी अर्थशक्ती

लॅटिन अमेरिकेत,  दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ३३ देशांचा समावेश होतो. लॅटिन हे नाव सर्वप्रथम फ्रान्सचे सर्वेसर्वा असलेल्या तिसऱ्या…
संपूर्ण लेख

फक्त ८० रुपयात ‘लिज्जत’ हा ब्रँड घडविणाऱ्या आज्जी गेल्या

ही गोष्ट आहे, १९५९ मधली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो भारावलेला काळ होता. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू देशाची नवी…
संपूर्ण लेख

सत्यशोधक पत्रकारितेचे विस्मृतीत गेलेले अतुलनीय योगदान

एकोणिसाव्या शतकातील नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा आणि आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले…