समुद्राचा रंग बदलतोय, हा धोक्याचा इशारा आहे!

संपूर्ण विश्वातील पृथ्वी नामक एकमेव ग्रहावर जीवनसृष्टी असून, त्याचा ७० टक्क्यांहून अधिक भाग समुद्रानं व्यापलेला आहे. चंद्रावर गुरुत्वाकर्षण कमी असल्यामुळे आणि समुद्राच्या पाण्याची वाफ झाल्यावर ती धरण्याइतकी क्षमता नसल्यामुळे तिथे समुद्र नाहीत. याउलट पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण अधिक असल्यामुळे तापमान कमी असल्यामुळे या ग्रहावर समुद्र टिकून राहिलाय.

पण माणसाच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि त्यासाठी होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासाचे परिणाम आता समुद्रावरही दिसू लागले आहेत. समुद्रातील घटकांवर त्याचा परिणाम होऊ लागला असून, दृश्यरुपात तो आजा जाणवू लागला आहे. पृथ्वीवरील माणसाचे हे उद्योग पुढील पिढ्यांसाठी धोकादायक असून, त्यसाठी माणसानं वेळीच सावध होणं गरजेचं आहे.

समुद्राचं महत्त्व समजून घ्यायला हवं

आजवरच्या अवकाश विज्ञान संशोधनांमधून वापरण्याजोगं द्रवस्वरूप वाहतं पाणी विश्वाच्या अफाट रचनेमधे फक्त पृथ्वी या ग्रहावरच आढळलंय. खारट पाणी असणाऱ्या समुद्राचा तळ क्षार, गंधक, वायू आणि अगणित प्रकारची खनिजं यांचा भला मोठा साठा आहे. शिवाय माशांसह अनेक सागरी जीवांच्या रूपाने समुद्र मानवी समूहांना अन्नपुरवठाही करतो. 

पृथ्वीवरील सुमारे ९७ टक्के पाणी महासागरात आढळतं. महासागर हा पृथ्वीवरील अतिविशाल खाऱ्या पाण्याचा साठा आहे. पृथ्वीच्या पाठीवर ५ महासागर आहेत. या महासागरांनी पृथ्वीवरील ७१ टकके पृष्ठभाग व्यापला आहे. प्रत्येक महासागर अनेक समुद्र, उपसमुद्र, आखात इत्यादींमधे विभागला आहे. महासागरामधील लहान जीव जगातील अर्ध्याहून अधिक ऑक्सिजन तयार करतात.

महासागर आणि त्यातील जीवन आपण वातावरणात सोडत असलेल्या कार्बनडाय ऑक्साईडच्या चतुर्थांश भाग शोषून घेते. आपल्या पौराणिक कथांमधे समुद्राचा उल्लेख आढळून येतो. विष्णुपुराणात समुद्रमंथनाची कथा सविस्तरपणे सांगितली आहे. अध्यात्म, पौराणिक कथा, विज्ञान, मानवशास्त्र आणि एकंदर जीवसृष्टी अशा सर्वव्याप्त विषयांमधे असणारे समुद्राचे स्थान लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व लक्षात येते. 

समुद्राचा रंग का बदलतोय?

वर्षानुवर्षांपासून आपण समुद्राच्या पाण्याचा रंग निळा असल्याचे पाहात आलो आहोत. परंतु जगातील अर्ध्याहून अधिक महासागरांच्या पाण्याचा रंग बदलत असल्याची माहिती पुढे आली आहे. याची कारणे मानवनिर्मित ग्लोबल वॉर्मिंगशी संबंधित असल्याचे पर्यावरणवाद्यांचे ठाम मत आहे. या कारणांचा खोलात जाऊन अभ्यास होत आहे.

पण महासागराचा रंग हे त्या पाण्यातील जीवन आणि अन्य घटकांवर आधारित असते. सध्या दिसणारा रंगातील हा फरक मानवी नजरेसाठी अत्यंत सूक्ष्म असला तरी, मागील दोन दशकांत जगभरातील तब्बल ५६ टक्क्यांहून अधिक महासागरांचा रंग लक्षणीयरीत्या बदलला आहे, असे स्पष्ट होतं आहे. 

दरवर्षी होणारे नैसर्गिक बदल एवढेच याचे कारण नाही, याकडे अमेरिकेतील संशोधकांनी लक्ष वेधले आहे. विषुववृत्ताजवळील समुद्रात या पाण्याचा रंग हळू हळू अधिक हिरवट होत आहे. महासागराच्या पृष्ठभागाजवळील परिसंस्थेतील बदलांचे हे चिन्ह असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी समुद्राच्या पाण्यावर तरंगणाऱ्या प्लवकांमुळे किंवा अन्य कार्बनिक पदार्थ आढळून आले असून त्यातून या बदलांवर प्रकाश पडण्यास मदत होत आहे.

समुद्रावर तरंगताहेत अनेक प्रश्न

हिरवे बनत चाललेल्या समुद्रांच्या पृष्ठभागावर आता अनेक प्रश्‍न तरंगू लागले आहेत. ‘नेचर’ या विज्ञानपत्रिकेत याबाबतचे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. राष्ट्रीय समुद्रविज्ञान केंद्रातील संशोधक बी. बी. कैल आणि त्यांच्या चमूने २००२ ते २०२२ या २० वर्षात उपग्रहांनी टिपलेल्या निरीक्षणातून पृथ्वीवरील महासागरांच्या रंगांचे संख्यात्मक विश्लेषण केलंय.

एका वर्षात त्यांच्यात प्रादेशिकदृष्ट्या कसा बदल होतो, हे पाहून त्यांनी सुरुवातीला रंगांच्या नैसर्गिक फरकांचा अभ्यास केला. नंतर दोन दशकांमधे वार्षिक तफावतीत कसा फरक पडला, याचा अभ्यास केला. त्यानुसार विषुववृत्ताजवळील प्रदेशात हा रंग हळूहळू हिरवा झाल्याचे दिसून आले आहे.

अभ्यासकांच्या मते, अंतराळातून दिसणार्‍या समुद्राच्या पाण्याच्या रंगावरून समुद्राच्या वरच्या थरात काय चालले आहे, याचे चित्र स्पष्ट होते. समुद्राचा रंग दाट निळा दिसतो, तेव्हा पृष्ठभागावर फार जीवसृष्टी नसल्याचे मानले जाते. पण जेव्हा पाण्याचा रंग हिरवा झालेला दिसतो, तेव्हा पृष्ठभागावर बऱ्याच घडामोडी चालल्याचा अंदाज काढला जातो. विशेषत: समुद्रातील जिवाणूंची प्रकाशसंश्लेषण क्रिया सुरू असल्याचे यातून दिसते.

ज्याप्रमाणे वनस्पतींच्या पानांमधे सूर्यप्रकाश शोषण्यासाठी हरित द्रव्य असते, त्याच प्रकारचे हरित द्रव्य या जिवाणूंमधे दिसते. महासागराच्या पाण्याचा हिरवा रंग ‘फायटोप्लँक्टन’ या वनस्पतीसारख्या सूक्ष्म जीवांत असलेल्या ‘क्लोरोफिल’ या हिरव्या रंगद्रव्यामुळे होतो. त्यामुळे शास्त्रज्ञ ‘फायटोप्लॅक्टन’चा हवामान बदलाला मिळणारा प्रतिसाद पाहण्यासाठी त्यांचे निरीक्षण करण्यास उत्सुक आहेत.

प्लास्टिक उठलंय सागरी जीवांच्या मुळावर 

हवामान बदलाचा कल लक्षात येण्यापूर्वी ,’क्लोरोफिल’मधील बदलांचा मागोवा घेण्यासाठी सुमारे तीन दशकांचा कालावधी लागेल, असे संशोधकांनी यापूर्वीच्या संशोधनाच्या आधारे सांगितलं. कारण ‘क्लोरोफिल’मधील नैसर्गिक, वार्षिक बदल हे जनजीवनावर प्रभाव टाकतील, असं या अभ्यासकांचं म्हणणं आहे. 

अन्य महासागरांमधे, जिथे वार्षिक बदल क्लोरोफिलमधील बदलांपेक्षा कमी आहेत, तिथे हवामानबदलाचे परिणाम २० वर्षांतच दिसून येऊ शकतात. महासागरांमधे प्रत्यक्षात होत असलेले हे बदल आश्‍चर्यकारक नाहीत. मात्र, ते भयावह आहेत. गेल्या काही वर्षांमधे जगभरातील सर्व समुद्रांना प्रदूषणानं ग्रासलं आहे. दुसरीकडे समुद्रामधे टाकण्यात येणार्‍या कचर्‍यातील प्लास्टिक सागरी जीवांच्या मुळावर उठलं आहे.

आपल्या संस्कृतीत समुद्राचे पूजन केले जाते. कोकण किनारपट्टीच्या भागात आजही समुद्रपूजनाची परंपरा पाळली जाते. समुद्राशिवाय निसर्गाची कल्पना अशक्‍य आहे. पण आज प्रदूषण, जागतिक तापमानवाढ, हवामान बदल यामुळे एकीकडे ग्लेशियर्स वितळून समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून किनाऱ्यावरील महानगरं, देश बुडण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे; तर दुसरीकडे आता समुद्राच्या पाण्याचा रंग बदलत असल्यालं समोर आलं आहे.

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
amphibians endangered
संपूर्ण लेख

उभयचर नष्ट होताहेत, उरलेल्या जीवसृष्टीवरही धोक्याची घंटा!

जगप्रसिद्ध ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान…
संपूर्ण लेख

‘लिव्ह इन’ की ‘लग्न’ यावर उत्तर कसं शोधणार?

‘लिव्ह इन’ अर्थात लग्नाशिवाय शारीरिक संबंधात राहण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या…
संपूर्ण लेख

सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य उलगणारा ‘बेन्नू’तील खजिना

पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘नासा’नं २०१६ मधे यान पाठवलं होतं. ते यान या लघुग्रहावजवळ…
संपूर्ण लेख

लॅटिन अमेरिका ही पर्यावरणपुरक जगासाठी नवी अर्थशक्ती

लॅटिन अमेरिकेत,  दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ३३ देशांचा समावेश होतो. लॅटिन हे नाव सर्वप्रथम फ्रान्सचे सर्वेसर्वा असलेल्या तिसऱ्या…
संपूर्ण लेख

फक्त ८० रुपयात ‘लिज्जत’ हा ब्रँड घडविणाऱ्या आज्जी गेल्या

ही गोष्ट आहे, १९५९ मधली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो भारावलेला काळ होता. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू देशाची नवी…
संपूर्ण लेख

सत्यशोधक पत्रकारितेचे विस्मृतीत गेलेले अतुलनीय योगदान

एकोणिसाव्या शतकातील नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा आणि आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले…