अमेरिकेतल्या गेल ऑम्वेटना महात्मा फुले समजतात, पण…

भारतातील कष्टकऱ्यांच्या, वंचितांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी आपलं आयुष्य वेचलेल्या गेल ऑम्वेट उर्फ शलाका भारत पाटणकर यांची आज जयंती. अमेरिकेत जन्माला आलेल्या गेल या अभ्यासासाठी भारतात आल्या, भारताच्याच होऊन गेल्या. आपल्या आयुष्यातील ८१ वर्षांपैकी ५८ वर्षे त्यांनी भारतात घालवली. महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळ आणि ब्राह्मणेतर संस्कृतीसंघर्ष हा त्यांच्या पीएचडीचा विषय होता.

१९९० मधे जोतिबा फुले यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त त्यांचं एक पुस्तक लोकवाड्मय गृहानं प्रकाशित केलंय. त्याचं नाव आहे, जोतीबा फुले आणि स्त्री – मुक्तीचा विचार. या पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात, गेल ऑम्वेट ‘फुल्यांचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन’ स्पष्ट करतात. फुले यांचा काळ आणि त्यातील त्यांच्या कार्याचं महत्त्व, जे ऑम्वेट यांना कळलं, ते आपल्याला आजही कळलंय का? असा प्रश्न सध्याची परिस्थिती पाहता पडतो.

गेल ऑम्वेट यांच्या या पुस्तकातील या प्रकरणातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे…

महात्मा फुले यांचा काळ समजून घ्यायला हवा

सर्वात आधी जोतीबांच्या काळाचे वैशिष्ट्य ध्यानात घेतले पाहिजे. ज्या वेळी कार्ल मार्क्स आणि जोतीबा फुले आपला विचार घेऊन उदयाला आले त्या वेळी जागतिक भांडवली व्यवस्थेचे औद्योगिक आणि साम्राज्यशाही स्वरूप उदयाला आले. युरोपमधे नवीन गिरण्या-कारखाने उभे राहिले, आफ्रिकेतून गुलामांचा व्यापार सुरू होऊन त्यांच्या श्रमावर ऊस-मळे आणि दारूचा उद्योग उभा राहिला. 

भारतातून कापूस, अफू, नीळ, रेशीम निर्यात होऊ लागले. या गोष्टी शेती विभागातून आणून निर्यात करण्यासाठी जंगल तोडून रेल्वे यंत्रणा उभी राहू लागली. पण या जागतिक भांडवली व्यवस्थेत वेगवेगळ्या देशांच्या स्थानांमधे फरक होता. इंग्लंड हे कारखाने-उद्योगांचे केंद्र आणि भांडवलदार-मजूर अशा सार्वत्रिक संबंधांचे क्षेत्र बनले होते. 

भारत मात्र कच्चा माल पुरवणारा, शेतीप्रधान, सरंजामी संबंध व जातिव्यवस्था सर्वदूर अस्तित्वात्त असलेला देश होता. इंग्रज भांडवलदारांनी भारताचा कब्जा घेतल्यानंतरसुद्धा भारतातली बहुसंख्य जनता शेतीवर अवलंबून होती. इंग्रजी औद्योगिक कापडामुळे आणि दडपशाहीमुळे कारागिरांचे धंदे बंद पडून तेसुद्धा अर्धपोटी जीवन जगू लागले. 

मार्क्सला न दिसलेले वास्तव फुलेंनी पाहिलं

शेतकऱ्यांच्या कष्टातून तयार झालेले वरकड मूल्य लुटण्यासाठी व त्यांना पीक बाजारात विकायला लावण्यासाठी जबरदस्त जमीन कर लावले गेले होते. या करावर ब्रिटिशांचे राज्य, या राज्याच्या सर्व खात्यांची नोकरशाही आणि राज्याचे संरक्षण करणारी यंत्रणा पोसली जात होती. यामुळे कार्ल मार्क्सपेक्षा फुल्यांसमोर अगदी वेगळा समाज आणि त्यातले संबंध उभे होते. 

भांडवलशाहीच्या केंद्रात राहिल्यामुळे मार्क्सला औद्योगिक भांडवलशाहीची वाढ, पगारी कामगारांच्या श्रमातून भांडवलदारांनी वरकड मूल्य ओरबाडून घेण्याची प्रक्रिया या गोष्टी स्पष्ट दिसत होत्या. या केंद्राच्या बाहेर चालणारे शेतकऱ्यांचे शोषण, गुलामांच्या व्यापारातून होणारी महाभयंकर दडपणूक, सरंजामी व्यवस्थेचा भांडवल संचयासाठी होणारा वापर या गोष्टींची नोंद मार्क्सने घेतली असली तरी त्या प्रक्रिया त्याला अगदी स्पष्टपणे दिसत नव्हत्या.

गावातले सवर्ण मजूर आणि गावाबाहेर राहणारे दलित मजूर एकाच व्यवस्थेमधे राहून काही बाबतीत वेगळ्या प्रकारचे शोषण सहन करतात. एका विभागावर लादला जाणारा जातीय छळ आणि वेठबिगारी या गोष्टी दुसऱ्या विभागाला सरळ सरळ जाणवत नाहीत. त्याचप्रमाणे युरोप-अमेरिकेतील औद्योगिक कामगार, शेतकरी, मजूर इत्यादी आणि आशिया-आफ्रिकेतील शेतकरी, बाराबलुतेदार, दलित, गुलाम एकाच व्यवस्थेत शोषणाच्या वेगवेगळ्या परिस्थितीत जगत होते. पण आशिया-आफ्रिकेतील शोषण व दडपणुकीच्या प्रक्रियेचे विश्लेषण सविस्तर आणि फारसे खोलात जाऊन होऊ शकले नव्हते.

सरकारी भट-कामगार करत असलेली पिळवणूक

खासगी मालमत्तेच्या आधारावर होणारी शोषणाची प्रक्रिया जोतीबांना फारशी महत्त्वाची वाटत नव्हती असे दिसते. त्याऐवजी शासन यंत्रणेचा वापर करून जमिनीवर कर बसवण्यातून होणारे शोषण आणि शेतकऱ्याची लूट करून आरामात जगणारी नोकरशाही यंत्रणा आणि अन्य सामाजिक थर त्यांना स्पष्ट दिसत होते. 

राज्य ब्रिटिशांचे होते पण या राज्याच्या नोकरशाहीमधे ब्राह्मण जातीयांचा भरणा होता. कोर्ट-कचेऱ्या इत्यादी ठिकाणी विविध स्थानांवर असणारे ‘सरकारी भट-कामगार’ (कर्मचारी-अधिकारी) शेतकऱ्यांची पिळवणूक करतात, अशी त्यांची मांडणी होती.

उत्पादनसाधनांच्या मालकीच्या जोरावर ब्रिटिशांनी राजकीय सत्ता हस्तगत करण्याऐवजी शस्त्राच्या जोरावर राजा-महाराजांचा पराभव करून ती हस्तगत केली असा त्यांचा समज दिसतो. ब्रिटिशांच्या आधी मुस्लीम राज्यकर्त्यांचे आक्रमण, त्यांच्या आधी अगदी प्राचीन काळात आर्यांचे आक्रमण असे भारताच्या इतिहासाबाबतचे चित्र जोतीबांच्या डोळ्यांसमोर होते.

स्थानिकांची लूट करणारे बाहेरचे कोण? 

सुरुवातीपासून बाहेरच्या लोकांनी देशावर स्वाऱ्या केल्या आणि स्थानिक शेतकऱ्यांची लूट करून जबरदस्तीने शासन बसवले. या सर्वांमधे सर्वात भयंकर पद्धतीने लुटणारे व फसवणारे म्हणजे पहिले आक्रमक आर्य-ब्राह्मण असे विश्लेषण फुल्यांच्या मनात ठाम होते. 

त्यांच्या इतिहासाच्या चित्रानुसार अगदी प्राचीन काळात मूळ भारतीय रहिवाशांमधे गरीब- श्रीमंत भेद नव्हते, जातिभेद नव्हते, फक्त या जनतेवर कल्याणकारी राजा असलेल्या बळीराजाचे राज्य होते. जोतीबा, खंडोबा इत्यादी. या बळीराजाचे सुभे सांभाळणारे सुभेदार होते. 

बाकी सर्व शेतकरी व सर्वच लढणारे ‘क्षत्रिय’सुद्धा होते. आर्यांचे आक्रमण झाल्यावर त्यांनी या क्षत्रियांमधे जातिभेद पाडले. सर्वांत निर्धाराने आणि अखेरच्या क्षणापर्यंत लढणाऱ्यांना आर्य-ब्राह्मणांनी महा-अरी (महार), मांग इत्यादी म्हणून अस्पृश्य ठरवून सर्वात खालच्या जातीत ‘गावाबाहेर’ ढकलले. इतरांना शेतकरी आणि बलुतेदार केले. 

स्त्रियांना नवऱ्यांच्या अधिकाराखाली गुलामगिरीत टाकले. या सर्वांवर शिरजोर म्हणून स्वत: धूर्त आर्य धर्माचा खोटा आधार सांगून श्रेष्ठ ब्राह्मण बनले. असा थोडक्यात जोतीबांचा भारताच्या इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन होता.

पितृसत्ताक समाज आणि स्त्रियांची दडपणूक

भारताच्या इतिहासाचा अर्थ लावण्यात ज्या काळात ‘आर्य-अनार्य’ सिद्धान्त महत्त्वाचा होता, त्या काळात जोतीबांनी या प्रकारे विचार केला आहे, त्याचबरोबर समाजातल्या परंपरा आणि ब्राह्मणी परंपरा यांच्यातील त्यांना दिसलेल्या अंतर्विरोधांचा आधारही जोतीबांनी घेतला आहे. जोतीबांच्या या दृष्टिकोनातल्या मर्यादा आणि उणिवा जागतिक ऐतिहासिक पराभव’ हा खाजगी मालमत्तेच्या उदयातून निर्माण झालेल्या दुय्यम शोषणाची बाब मानली आहे. 

यातच स्त्रियांच्या दडपणुकीविषयीच्या विश्लेषणाचा कमकुवतपणा स्पष्ट होतो. एंगल्सने पितृसत्ताक कुटुंबव्यवस्था बदलण्याची आवश्यकता जरूर मांडली आहे. पण खाजगी मालमत्ता नष्ट करून समाजवादाची प्रस्थापना केल्यावर हे जवळ जवळ आपोआप घडेल असे त्याला वाटत असल्याचेच दिसते. त्याच्या दृष्टीने कामगारवर्गीय कुटुंबात पुरुषप्रधानतेचा प्रश्‍न जवळ जवळ नसल्यातच जमा होता.

याउलट फुल्यांनी पुरुषप्रधानता आणि पितृसत्ताकतेवर प्रकाशझोत टाकला आहे. आणि अगदी शोषित बहुजन समाज कुटुंबातसुद्धा स्त्रियांची दडपणूक हा अगदी ठोस महत्त्वाचा प्रश्‍न असल्याची मांडणी केली आहे. ज्यांचे स्वत:चेच जातिव्यवस्थेतून शोषण होते तेच शूद्रातिशूद्र पुरुष स्त्रियांचे मात्र स्वत: शोषण करतात हे त्यांच्या विचारात स्पष्ट आहे. 

स्त्रियांची समता महत्त्वाची मानणारे फुले

सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक विचारसरणीविषयी नवी पर्यायी मांडणी करताना त्यांनी स्त्रियांची समता हा एक महत्त्वाचा मुद्दा बनवला आहे. असे असूनही शेवटी एक महत्त्वाची नोंद घेतली पाहिजे ती ही की फुले या प्रकारचे विचार त्यांच्या अखेरच्या आयुष्यात मांडू लागले. त्या काळात निर्माण होत असलेल्या स्रियांच्या परखड विचार-व्यवहाराच्या अनुभवानंतर मांडू लागले.

लूट, हिंसाचार, स्वाऱ्या, उत्पादन, शोषण यांच्या मानवी इतिहासाकडे तिहेरी पिळवणूक होणाऱ्या दलित-बहुजन कष्टकरी जातींमधील स्त्रियांच्या दृष्टिकोनातून पाहण्याची योजना ते कशीतरी सुरू करू शकले एवढेच म्हणता येईल. शोषक आणि शोषित यांच्यातला संघर्ष, भांडवलदार व कामगारवर्गातला संघर्ष आणि वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनांची (घरातले जेवण बनवणे धरून) भांडवली व्यवस्थेच्या संदर्भातली भूमिका या सर्वांची नव्याने व्याख्या करण्याकडे ही शोधाची दिशा आपल्याला घेऊन जाते.

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
amphibians endangered
संपूर्ण लेख

उभयचर नष्ट होताहेत, उरलेल्या जीवसृष्टीवरही धोक्याची घंटा!

जगप्रसिद्ध ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान…
संपूर्ण लेख

‘लिव्ह इन’ की ‘लग्न’ यावर उत्तर कसं शोधणार?

‘लिव्ह इन’ अर्थात लग्नाशिवाय शारीरिक संबंधात राहण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या…
संपूर्ण लेख

सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य उलगणारा ‘बेन्नू’तील खजिना

पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘नासा’नं २०१६ मधे यान पाठवलं होतं. ते यान या लघुग्रहावजवळ…
संपूर्ण लेख

लॅटिन अमेरिका ही पर्यावरणपुरक जगासाठी नवी अर्थशक्ती

लॅटिन अमेरिकेत,  दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ३३ देशांचा समावेश होतो. लॅटिन हे नाव सर्वप्रथम फ्रान्सचे सर्वेसर्वा असलेल्या तिसऱ्या…
संपूर्ण लेख

फक्त ८० रुपयात ‘लिज्जत’ हा ब्रँड घडविणाऱ्या आज्जी गेल्या

ही गोष्ट आहे, १९५९ मधली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो भारावलेला काळ होता. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू देशाची नवी…
संपूर्ण लेख

सत्यशोधक पत्रकारितेचे विस्मृतीत गेलेले अतुलनीय योगदान

एकोणिसाव्या शतकातील नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा आणि आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले…