औरंगजेब, उत्तर पेशवाई आणि त्यावेळच्या सनातनी गोष्टी याविषयी आजवर अनेक नाटकं, कादंबऱ्या असं खूप काही प्रसिद्ध झालेलं आहे. इतिहास म्हणावा तर अनेक देशी-विदेशी इतिहासकारांनी संदर्भासहीत अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. पण आपल्या अस्मितांना धक्का लागला म्हणून अनेक शूरवीर गेले दोन दिवस सोशल मीडियावर ज्ञानपीठविजेत्या भालचंद्र नेमांडेसारख्या लेखकाला ज्ञान पाजताहेत.
नेमाडे जे काही बोलले आहेत, ते पूर्ण सत्य आहे असाही दावा कोणी करू नये. ती खरीच मानायला हवीत, असा स्वतः नेमाडेंचाही आग्रह नाही. कोणी काही बोलतो ते खरं मानू नका, हे सांगण्याचाच प्रयत्न ते आपल्या जवळपास पंचवीस मिनिटांच्या भाषणात करताहेत. वेगवेगळी पुस्तकं खरंखोटं काय ते सांगतात. ती वाचून आपली मतं बनवण्याची गरज आहे, हाच त्यांच्या भाषणाचा मथितार्थ आहे.
नेमाडेंच्या बोलण्याचा सूर काय?
भालचंद्र नेमाडे हे महान लेखक म्हणून ख्यात असले, तरी वक्ते म्हणून ते फारसे ख्यात नाहीत. त्यामुळे ते एखाद्या पट्टीच्या वक्त्यासारखे ते मुद्देसूद, गोळीबंद वगैरे बोलत नाहीत. ते त्यांच्या पद्धतीनं, विखुरलेल्या स्वरूपाची विधानं करत करत आपले मुद्दे मांडतात. पण त्यांच्या विधानांवर विचार केल्यावर त्यातून ते काही तरी ठोस सांगू पाहताहेत, हे श्रोत्यांना नीट कळतं. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहलायच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते जे काही बोलले ते असंच होतं.
ग्रंथसंग्रहालयाचा सोहळा आहे, या निमित्ताने नेमाडे यांनी खरं तर वाचन, वाचनसंस्कृती, ग्रंथांचं महत्त्व आणि त्यासाठी ग्रंथालये यांचं योगदान याविषयी मुख्य भाष्य केलं आहे. पण हे सगळं वाचन का करायचं? तर आपल्याला खरं काय ते कळायला हवं, यासाठी प्रत्येकानी स्वतः वाचन करायला हवं, असा त्यांचा आग्रह आहे. तोच आग्रह ते सातत्याने या भाषणात अधोरेखित करताहेत.
आज कुणीही उठतो, काहीही सांगतो आणि लोक त्यावर विश्वास ठेवतात. आपण जो काही इतिहास समजतो तो खरा नाही. खरा इतिहास हा पुस्तकं वाचल्यावरच कळतो. आपल्या देशात पुस्तकं न वाचल्यामुळे खोटं पसरवलं गेलं आहे. काही पुस्तकं खरं सांगतात तर काही खोटं सांगतात. त्यातील तारतम्य वाचकालाच कळत जातं. म्हणून प्रत्येकानं वाचन करायला हवं, हे त्यांच्या भाषणाचं सार आहे.
या ग्रंथ महात्म्याच्या भाषणात ते देशात झालेली इतिहासाची मांडणी, उत्तर पेशवाईतील स्त्रियांना मिळणारी वागणूक, हिंदू-मुस्लिम द्वेषाचं राजकारण, देशातील प्राचीन ज्ञानपरंपरा, इंग्रजांनी या ज्ञानपंरंपरांचं केलेलं खच्चीकरण आणि सर्वात शेवटी सत्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन कसे वेगवेगळे असतात, यावर ते बोलतात. पण त्यांची ही विधानं अनेकांच्या अस्मितांना ठेच पोहचवणारी ठरली आणि त्यांच्याविरोधात ट्रोलिंग सुरू झालं.
नक्की काय आहेत नेमांडेंची विधानं?
नेमाडे यांनी आपल्या भाषणात मांडलेली विधानं अशी आहेत.
> आपण जो काही इतिहास समजतो तो खरा नाही.
> दुसरा बाजीराव हा मोठा माणूस होता. त्याने पेशव्यांच्या तावडीतून महाराष्ट्राला वाचवलं आणि इंग्रजांकडे सोपवलं. पेशवे दुष्ट आणि नीच वृत्तीचे होते.
> पुस्तक वाचल्याशिवाय काहीही बोलता येणं कठीण आहे. खरं काय ते आपल्याला पुस्तकातून कळतं.
> नानासाहेब पेशवे स्वारीवर असताना पुढच्या टप्प्यावर पत्र लिहून ठेवायचे की, दोन शुद्ध, सुंदर आठ ते दहा वर्षाच्या मुली तयार ठेवाव्यात. या मुलींना मारुन टाकायचे का काय माहिती नाही.
> दुसऱ्या बाजीरावाच्या काळात होणाऱ्या बदमाशीमुळे इंग्रज जिंकले.
> त्यावेळी हिदू-मुसलमान भेद नव्हता. शहाजहानची आई हिंदूच होती. औरंगजेबाच्या दोन राण्या काशी-विश्वेश्वराला गेल्या होत्या. त्या परत आल्याच नाहीत. तिथले पंड्ये तरुण बायकांना भ्रष्ट करायचे. हे कळल्याने त्यावेळी औरंगजेबाने पंड्यांना मारले. ग्यानवापीचं काम त्यावेळचं आहे. औरंगजेबाची नोंद इतिहासकारांनी हिंदुद्वेष्टा म्हणून घेतली.
> खरं जे आहे पुस्तकं वाचूनच कळतं. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयासारख्या जागा या क्षुद्र वृत्तीच्या माहासागरातील बेटं आहेत. तु्म्हाला इथं खरं काय ते कळेल.
> ऐकलेलं सोडून द्या. खरं काय ते वाचा.
> शिवाजीचा मुख्य सेनापती मुसलमान होता. शिवाजीचा शेवटपर्यंत ज्याचा विश्वास होता, तो मदारी होता.
> सतीची चाल पहिल्यांदा बंद करणारा औरंगजेब होता.
> नैतिकदृष्ट्या तुमचं स्खलन झालं तर तुम्हाला काहीही वाचवू शकत नाही.
> आमची पिढी मूर्ख होती. पण नव्या पिढीने हे सगळं ऐकू नये. ग्रंथांचं महत्व यासाठीच आहे.
> ग्रंथ खूप असतात. खोटं सांगणारे ग्रंथ असतात. खरं सांगणारे ग्रंथ असतात. कायम स्वरूपाचं सांगणारेही ग्रंथ असतात. कोण खरं बोलतं, कोण खोटं बोलतं, हे वाचकाला आपोआप कळत जातं.
> माझा प्रवास हे पुस्तक महत्वाचं आहे. यात अलिबाग पेणकडला भिक्षूक माणूस यज्ञ करण्यासाठी जातानाची गोष्ट आहे. त्यात झाशीच्या राणीच्या दरबारात काय चाललं होतं? हे ही कळतं.
> आपल्याला जे ज्ञात होतं, ते आपल्यापुरतंच असतं. पुस्तकातून ते जग पाहायला मिळतं, जे आपल्याला कधीही पाहणं शक्य नसतं.
> ग्रंथांचं मुद्रण सुरु झालं आणि एकाचा अनुभव दुसऱ्याला कळायला लागला. मग जग कसं आहे हे आपोआप कळायला लागलं.
> नाना फडणवीस यांच्याकडे एकानं पृथ्वीचा गोल आणला. तर त्याला प्रश्न विचारला की, पृथ्वी गोल आहे तर माणूस पडत नाही का? हे आपलं त्यावेळचं ज्ञान होतं.
> बंदुकी, अॅटम बॉम्ब, चंद्रावर जाणं यानं माणूस सुधारत नाही. तर तो ज्ञानानं सुधारतो.
> युनेस्कोचे आकडे सांगतात की, युरोपातील १३ टक्के लोक ६० टक्के पुस्तकं वाचतात. ग्रंथालयांबाबतीत युरोपाची बरोबरी करू शकू अशी आपली परिस्थिती आजही नाही.
> म्हणून आजही आपण भ्रामक गोष्टींवर विश्वास ठेवतो. हे नाव बदला ते नाव बदला. नको त्या गोष्टी. कारण दुसरं काही येत नसल्यानं असं चालतं.
> खरं काय ज्ञान आहे ते मिळवा. त्याच्यात तुमचं आयुष्य गेलं तरी चालतं. आम्ही वाचलंय. म्हणून आम्ही युरोपातील लोकांनाही ठणकावून सांगू शकतो.
> पूर्वी गावात शाळा होत्या. पंतोजी होता. शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध होतं. ही परिस्थिती इंग्रजांनी बिघडवली. सगळे लोक हळूहळू ख्रिश्चन करण्यासाठी आपली पद्धत दिली पाहिजे, असं इंग्रजांना वाटत होतं.
> आपल्याकडे एकाधिकारशाही येते. एकाधिकारशाहीला आव्हान देणारं एकच तंत्र जगात आहे. क्रांती ही पुस्तकांमुळेच घडते.
> बायकांवर अत्याचार होणाऱ्या देशाचा अभिमान कशाला बाळगायचा? खरा अभिमान आणि खोटा अभिमान याचा शोध नव्या पिढीनं पुस्तकातून घेतला पाहिजे.
> आपल्या देशात २५ विद्यापीठं होती. वाराणसीपासून चौल राज्यापर्यंत. ते काय शिकवत होते? कशामुळे ते नष्ट झालं? याचा नव्या पिढीनं शोध घेतला पाहिजे.
> नवीन काही तरी शिकत राहाल तरच हे बदलेल आणि ते पुस्तकातूनच बदलेल.
> साक्षर आणि निरक्षरांच्या मधे एक तृतियपंथी गट आहे. जो वाचता येतं पण वाचत नाही.
> आठवड्याला किमान एक पुस्तक वाचा. नाहीच जमलं तर नियोजन करुन जगातील दहा महत्त्वाची पुस्तकं तरी वाचा.
> प्रत्येकानी वाचलं पाहिजे. माझा प्रवास, लीळाचरित्र, तुकाराम, बायबल हे वाचलंच पाहिजे. चांगल्या पुस्तकांचं जतन आणि संवर्धन केलं पाहिजे.
> १८ व्या शतकापर्यंत युरोपात बायका लिहीत नव्हत्या. गाधा सप्तशतीमधे बायकांनी लिहिलेले सातशे श्लोक आहेत.
> फक्त माझा पॉइंट ऑफ व्यू खरा आहे. तोच मानला पाहिजे किंवा कोणतरी सांगतो तेच खरं असं मानायची गरज नाही. ते प्रत्यक्ष मला पहायचंय. ते खरं असेल तर मला मान्य आहे. जितकी पुस्तकं वाचाल तेवढा तुमचा दृष्टिकोन बदलत जातो. अनेक पुस्तकं म्हणजे अनेक दृष्टिकोन. मग तुम्ही खरे लोकशाहीवादी होता. विचारांचा प्लुरलिझम. हे खरं आहे, ते खरं आहे, याच्यातही खरं असेल, त्याच्यातही खरं असेल हे सगळं महत्त्वाचं आहे.
> अल बेरुनी जेव्हा हिंदुस्तानात आला. तेव्हा त्याला एकच गोष्ट आवडली. यांच्याकडे एका गोष्टीवर कोणी विश्वास ठेवत नाही. अनेक पंथ, हे वेगळे ते वेगळे, याचं खरं त्यांचं खरं, धर्म तर त्यावेळी नव्हता. वेगवेगळे पंथ होते.
> आज ४० टक्के खर्च डिफेन्सवर होतो. यात दोन्ही देशातील गरीब लोक मरताहेत. आपलेच लोक मरताहेत त्याचं काय करायचं? पुढच्या पिढीनं हे बंद करायला हवं.
> जगात टिकून राहण्यासाठी जनमताला ‘हो’ म्हणणं ठिकाय. पण प्रत्यक्षात तुमच्या मनात हे ‘नाही’ असंच घेऊन चाला. आणखीही शूर असाल तर जाहीरपणेही नाही म्हणायला शिका.
नेमाडेंच्या या विधानांचं काय करायचं?
आज देशात कुणीतरी स्टेटस ठेवलं, कुणीतरी काही तरी बोललं म्हणून दंगे होतात अशी परिस्थिती आहे. मणिपूरमधे काय चाललंय ते आपण सगळेच पाहतो आहोत. या सगळ्या परस्थितीमधे नेमाडेंसारखा लेखक उद्विग्नपणे जे बोलतोय, त्याचा भावार्थ समजून घ्यायला हवा. त्यांची प्रत्येक विधानं ही सत्य असतील असे बिलकूल समजायचे कारण नाही. चुकीच्या विधानांचा साधार प्रतिवाद व्हायलाच हवा.
आपला देश हा खंडन-मंडनाच्या पद्धतीचा देश आहे. इथली ज्या महान ज्ञानपरंपरेचा आपण अभिमान सांगतो, त्यात असे वाद-प्रतिवाद नवे नाहीत. पण जो माणूस, ज्याला या देशानंच विद्वान म्हणून ज्ञानपीठ पुरस्कार दिलाय तो अप्रिय बोलतो म्हणून लगेच त्यांच्यावर हीन भाषेत टीका करायची, ही नक्कीच आपली परंपरा नाही.
एकीकडे नेमाडेंच्या विधानांमुळे ज्यांना आनंद झालाय, त्यांनीही हे लक्षात घ्यायला हवे की, त्यांनी केलेली अनेक विधाने ही चुकीची ठरू शकतात. पण ज्यांच्या अस्मितांना ठेच पोहचून, नेमाडेंना गेमाडे वगैरे भाषेत जे लिहिताहेत, त्यांनी सर्वात आधी त्यांच्या ज्ञानाचा आदर राखावा. जर त्यांची विधानं मान्य नसतील तर त्यावर प्रतिवाद करावा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेमाडे म्हणतात तेच की सत्य हे बहुपेडी असते. कुणी एक सांगतो म्हणून ते अंतिम नसतं.
लोकशाहीच्या या मुलभूत विचाराचे चिंतन आणि त्यासाठी आवश्यक ते वाचन प्रत्येकानं करावं आणि मगच वाद घालावा.