कमलाबाई शेडगे : ज्यांनी पोटातल्या पोरापेक्षा देश मोठा मानला

एकोणिसशे बेचाळीसच्या आधीची ही गोष्ट. कमलाबाईंचे यजमान बापूराव भूमिगत होते. कमलाबाई माहेरी आलेल्या. बापूरावांच्या मागावर असलेले दंडुकाधारी पोलीस अचानक माहेरच्या दारात उभे राहिले. पोलीस आलं, पोलीस आलं अशी सगळीकडे बोंब झाली.  तेव्हा भूमिगत असलेल्यांच्या घरच्यांना धारेवर धरलं जायचं. मग नाक दाबलं की तोंड उघडतं आणि बंडखोर ताब्यात येतो, हे इंग्रजांचं धोरण होतं.

पण, कमलाबाईंच्या घरात असं काहीच झालं नाही. पोलिसांनी कमलाबाईंच्या वडलांना, तुकाराम पाटलांना दरडावलं, ‘जावई कुठाय?’ त्या वेळी ‘गोऱ्या सोजिरांना भ्याचं न्हाय, कुणाची भिडभाड बाळगायची न्हाय’ ही आजीची शिकवण इथं कमलाबाईंच्या कामी आली. त्या आपणहून पुढे आल्या. पोलिसांना म्हणाल्या, “माज्या बापाच्या अंगाला हात तर लाव.”

पोलीस उद्गारला, ‘तुला येवढा पुळका येतुया, तर तू चल.’ कमलाबाईंनी बाणेदारपणं उत्तर दिलं, “आरं चल, आरं, जंगलात फिरणारं वाघ धरा. आमच्यासारख्या शेळ्या का धरता?” बाईंचा चढलेला आवाज ऐकून पोलिसाची भाषा बदलली, तो म्हणाला की, “ओऽ बाई, तुमी ह्ये पातळाच्या जीवावर बोलताय.” पण, कमलाईंचा आवाज तसाच होता. त्या म्हणाला, “त्ये कायबी असू दे. ह्ये काय तुज्या बानं घिऊन दिल्यालं न्हाय. आमी डरत न्ह्याय. देशासाठी मरायला तयार हाय.”

कमलाईबाईंना अटक झाली आणि…

या प्रसंगानंतर कमलाबाईंना अटक झाली. सोबतीला होता चार वर्षांचा यशवंत, वृद्ध सासू-सासरे आणि पोटात होता सात महिन्यांचा गोळा! तेव्हा अशाच स्थितीत मेढ्याच्या तुरुंगात त्यांनी मुलाला जन्म दिला. फार हाल. ही हकिकत जेलरला समजली. तेव्हा वृद्ध सासू-सासरे आणि यशवंतला तुरुंगातून सोडण्यात आले. कमलाबाईंना दहाव्या दिवशी मेढ्याहून येरवड्याला हलविण्यात आले. 

येरवड्याच्या तुरुंगातही काही सुविधा नव्हत्या. जेवणाची आबाळ झाली आणि या साऱ्यांचा परिणाम व्हायचा तोच झाला. तो गोंडस बाळ काळाने हिरावून नेला. त्या वेळी कमलाबाईंना महिला राजकैद्यांनी धीर दिला. प्रामुख्याने प्रेमाताई कंटक, सरोजिनी बाबर यांच्यासह ३५० क्रांतिवीरांगना होत्या. शंकरराव देव होते. अन्य पुढारी होते. 

या सर्वांसमवेत मुल गेल्याचं दुःख पाठीवर टाकत कमलाबाई सावरल्या. नंतर सहीपुरत्या शिकल्या. सूतकताई, सायंप्रार्थना शिकल्या. पुढे सर्वत्र ऑगस्ट क्रांतीचा हिलाल पेटला. कमलाबाईंचे यजमान तेव्हाही भूमिगतच होते. मोठा मुलगा यशवंत पायानं अधू होता. या सगळ्या आतडं पिळवटून टाकणाऱ्या प्रसंगताही, देश आणि देशाचं स्वातंत्र्य, हा त्यांच्या जगण्याचा श्वास बनला होता.

मी शंभरी गाठणार

मी कमलाबाईंना पहिल्यांदा भेटायला गेलो होतो, तेव्हा त्या ९६ वर्षे वयाच्या होत्या. ‘मी शंभरी गाठणार’ असे त्यावेळी मला म्हणाल्या होत्या. त्यांचा बोल खरा ठरला. त्याहून अधिक काळ त्यांनी पाहिला. या काळात खूप काही घडलं होतं. त्यांच्या तोंडून त्यांनी पाहिलेला इतिहास समजून घ्यायचा होता. त्यासाठी त्यांच्या शंभरीनंतर पुन्हा एकदा त्यांच्याकडं गेलो होतो.

कमलाबाईंना मी भेटायला गेलो तेव्हा डोक्यावर ऊन मी मी म्हणत होते. त्या तापत्या उनात मी नानींना भेटायला त्यांच्या घरी गेलो तेव्हा घरात कुणीसे होते. आशा स्वयंसेविका बसल्या होत्या. दारात कोणीएक उभाय, हे त्यांच्या लक्षात आलं. तशा त्या उठल्या. ‘आत जावा’ म्हणत निघाल्या. तसं मी पुन्हा म्हणालो, “नानी हायता का घरात?”

तर अगोदर नानीच मला ‘आत या’ म्हणाल्या. हा सबंध ‘मेणी खोरा’ त्यांना ‘सरकारीण नानी’ म्हणून ओळखतो. मी ‘का आलोय’ हे सांगायच्या आतच त्या म्हणाल्या, “उन्हातनं आलायसा, पारवर बसा न् मग बोला.” असं म्हणंम्हणंतच त्यांनी जाग्यावर बसून हात वर केला. ‘ऱ्हाव दे ऱ्हाव दे, नानी’ म्हणेस्तोवर पंखा लावला. मग आपणहून म्हणाल्या, “का आलायसा?”

त्यांना म्हटलं, या घरी मी याही आधी येऊन गेलो आहे. मला या घरी पुनःपुन्हा यावंसं वाटतं. तुमच्यापुढं नतमस्तक व्हावंसं वाटतं. ‘का आलोय? ते सांगितलं. तशा नानी आपल्या खणखणीत आवाजात म्हणाल्या की, “मी स्वातंत्र्यसैनिक कमलाबाई बापूराव शेडगे, वय वरसं शंभर…” मग वयाच्या मनानं जसा आठवेल तसा इतिहास त्यांनी साक्षात केला. सहभाग घेतल्या रोमांचक अशा क्रांतिकाळाचा… आजवरच्या आयुष्याचा… इतिहास!

जन्म, लग्न आणि शिराळ्यातला कायदेभंग

कमलाबाई शेडगे यांचा जन्म शिराळा तालुक्यातल्या ‘मोहरे’ गावी ऑक्टोबर १९१८ सालचा. वडील शेतकरी. भाऊ ‘बाळू तुकाराम पाटील’ हे मुलकी पाटील. शेतकरी कुटुंब. रानमळ्यात काम करण्यात बालपण सरत होतं. त्या काळी लग्नं कमी वयात होत असत. ‘मोहरे’ लगतच्याच ‘नाठवडे’ येथील ‘बापूराव सोमाजी शेडगे’ या स्वातंत्र्यप्रीतीच्या ध्येयवेड्याशी लग्न झालं. 

ते वर्ष होतं १९३०. १९३० हे वर्ष तर ऐन रणसंग्रामाची भेरी वाजवणारं. देशात सविनय कायदेभंगाला सुरुवात झाली होती. महात्मा गांधीजींच्या हाकेला ‘ओ’ देऊन ‘आमी डरत न्हाय, देशासाठी मरायला तयार हाय!’ असा निग्रह ज्याच्या त्याच्या उरात होता आणि याच महापुरात नुकतंच लग्न झालेल्या बापूरावांनी उडी घेतली. 

या चळवळीचा सर्वात मोठा असर तत्कालीन दक्षिण सातारा जिल्ह्यात झाला. उभा वणवा पेटलेला. त्यातल्या त्यात शिराळा म्हणजे नागाचा फणा! शिराळा पेट्यात हे लोण पोहोचले. वारणाकाठच्या ‘बिळाशी’त १८ जुलै ते ५ सप्टेंबर १९३० असा ‘पन्नास दिवस’ चरखाछाप तिरंगा अभिमानाने लहरत राहिला! याच झेंड्याला साक्षी ठेवून ‘जंगल सत्याग्रह’ झाला. ज्याची नोंद ब्रिटिश पार्लमेंटमध्ये घेतली गेली.

बापूरावाच्या घरातच होता स्वातंत्र्याचा लढा

या कायदेभंगाची ‘टाइम्स’ ने तर ‘दक्षिण शेतकऱ्यांचे बंड’ म्हणून स्वतंत्र बातमी केली. सरकारी अपप्रचारातून ‘बिळाशीचे बंड’ असे नाव दिले गेले. या बंडात बापूराव सोमाजी शेडगे होते. नुसते हजेरी लावायपुरते हजर होते, असे नव्हे, तर सक्रिय होते. सातवी पास झालेले हे उमदे नेतृत्व होते. क्रांतिगुरुजी बर्डे मास्तरांचे ते विद्यार्थी होते. 

बापूराव सरकारी नोकरीकडे वळले नाहीत. त्यांनी मोटनाडाही सोडला. तिरंगा हाती घेतला. १९३२ ला आंबोळा येथील जंगल सत्याग्रह असो अगर प्रचितगडावर झेंडा फडकवायचा असो. बापूराव शेडगे अग्रभागी असत. सरकारने त्यांना वेळोवेळी अटक केली. त्यांची उमेदीची वर्षे गजाआड गेली. त्यांची खासगी मालमत्ता जप्त केली. तरीही बापूरावांची राष्ट्रनिष्ठा तसूभरही ढळली नाही. 

पुढे १९४२ च्या चळवळीत माजोरी तलाठ्याचे नाक कापल्याचे प्रकरण सबंध सातारा जिल्ह्यात गाजले. ब्रिटिश पोलिसांना धडकी भरवणारे ठरले. ही ‘नाक’ कापण्याची वेगळी कल्पना बापूराव शेडगे यांचीच होती. असे बापूराव! शेडगे कुटुंबातील हे एकटेच राष्ट्रभक्तीत नव्हते. तर बापूरावांचे वडील (सोमाजी शेडगे) व आई (मुक्ताबाई) या दोघांचाही पोलिसांचा छळवाद सोसला होता. 

प्रसंगी करावासही भोगला होता. असे असूनही त्यांनी भूमिगतांना साहाय्य केले होते. वेळी-अवेळी आश्रय दिला होता. निरोप पोहोचवले होते. भूकेल्यास घासमुटका दिला. आपण कोंड्याचा मांडा करून खाल्ला. या अशा देशकार्याने भारलेल्या घरात कमलाबाईंचा प्रवेश झाला आणि त्यांच्या मूळच्या बंडखोरपणाला अधिकचे खतपाणी मिळाले.

कमलाबाईंना अटक आणि यशवंताचं आजारपण

बापूसाहेबांनी तर घरादाराकडे पाठ केली होती. ते भूमिगत होते. त्यांना पकडायला आले असताना, कमलाबाईंनी पोलिसांशी केलेल्या प्रतिकारामुळे त्यांनाही अटक झाली. तुरुंगवासातच पोटातलं मूल गेलं. तरीही न खचता कमलाबाई लढत राहिल्या. त्यांच्या मोठ्या मुलाचे, यशवंत याचे दोन्ही पायांचे चंपे जन्मतःच वाकडे होते. मुलगा बुद्धिमान होता; परंतु त्याच्या पायांवर उपचार करणे आवश्यक होते.

त्यासाठी त्याला घेऊन कमलाबाई मुंबईला गेल्या. मुंबईत बऱ्याच ठिकाणी उपचारासाठी प्रयत्न केले, पण काहीही फारसे होत नव्हते. ते वर्ष होते १९४४. धामधुमी कमी नव्हती. त्या वेळी महात्मा गांधीजींच्या उपस्थितीत विलेपार्ले-वांद्रेला सायंप्रार्थना चालायची. त्या प्रार्थनेसाठी कमलाबाईंच्या सोबत महादेव जोशी (जोशीकाकांचे भाऊ) होते. 

सायंप्रार्थनेनंतर बापूजींनी हरिजन सेवक संघाच्या फंडासाठी मदतीचे आवाहन केले आणि मदतीचा ओघ सुरू झाला. तो वार शुक्रवार होता. गांधीजी त्यावेळी सकाळी एक लिंबू आणि संध्याकाळी एक लिंबू एवढाच आहार घेत असत. या शुक्रवारी त्यांचा उपवास आणि मौनही होते. त्या वेळी कमलाबाईंनी यशवंताच्या हातात स्वतःजवळचे दहा रुपये दिले. 

स्वतः गांधीजींनी यशवंतसाठी चिठ्ठी लिहिली

यशवंतला चालत येताना गांधीजींनी पाहिले. त्यानं मदतपेटीत दहा रुपये दान केल्याचे पाहिले होते. त्या वेळी पूज्य बापूजींनी त्यास जवळ बोलावून घेतले. तेवढ्यात यशवंत जोशी पुढे झाले. ते महात्माजींना म्हणाले, “या मुलाचे वडील आपल्या चळवळीत असून, सध्या भूमिगत आहेत. त्याची आई इथं उपचारासाठी आलेली आहे.”

हे जोशींचे म्हणणे ऐकल्यावर शांतिमहात्म्याने एक केले. त्यांचं मौन सुरू होते. त्यांनी जवळची पेन्सील व कागद घेतला. त्यावर मुंबई हॉस्पिटलचे नामांकित डॉक्टर बालिगा वाडिया यांना पत्र लिहिले. जवळच्या करंडीतील एक हापूस आंबा उचलून स्वतःच्या हाताने यशवंताला दिला. स्वतः गांधीजींनी लिहिलेले पत्र डॉ. वाडिया यांनी तीनवेळा वाचले. स्वतः कॉट ओढून यशवंताला ऍडमीट करून घेतले. 

पायांवर दोन शस्त्रक्रिया केल्या. तेरा महिने व्यवस्थित उपचार केले. पाय व्यवस्थित झाले. पुढे यशवंत यांनी शिक्षण घेतले. ‘शेडगे सरकार’ अशी त्यांची ओळख होती. ते ‘केसरी’चे वार्ताहर होते. पुढे त्यांचे लग्न झाले. सर्व काही व्यवस्थित झाल्यावर यशवंत शेडगे सरकार यांचे २०११ साली निधन झाले. त्यांच्या आठवणीने कमलाबाई गदगदल्या.

“दांडगं बुद्धीचं कोटं माजं भयंकर हुशार… सांगली जिल्ह्यातल्या शिकलेल्या शेणकाकांना त्यानं मागं टाकलं. शेणकाका थोरच होते. पण त्याला त्येंच्याहून म्होरं शिकीवलं. या मेणी खोऱ्यातली लोकं अर्ज लिवाय इतं यायचीतं.” या एकुलत्या एका मुलाच्या निधनानंतर कमलाबाई व्यथित झाल्या आणि त्यांनी त्याची आठवण म्हणून कायमचा मांसाहार वर्ज्य केला.

स्वातंत्र्याच्या आनंदाची निशाणी जपली

स्वातंत्र्यलढ्याच्या त्या ऐन धामधुमीच्या काळात भूमिगतांना नानींनी साहाय्य केले. जीवावर बेतणाऱ्या प्रसंगीही आश्रय दिला. स्वतः सहा महिन्यांचा कारावास भोगला. ‘ये जालीम सरकार नहीं रखनी… नहीं रखनी’ म्हणत प्रभातफेऱ्या काढल्या. सतीचे वाण जपल्याप्रमाणे देशसेवेचे व्रत अंगीकारले. पुढे देश स्वतंत्र झाला, त्या वेळची एक भारी आठवण त्यांच्याच शब्दात समजून घ्यायला हवी.

त्या म्हणाल्या, मं. आता मिळीवलं की ह्ये! राज्य मिळालं राज्य!! 
सातारा तवा जिल्हा. माझ्या वाटंगावच्या लेकीला नव दिस झालं हुतं. 
येळाणे डाक्टर हुता शित्तूरचा. त्यो म्हनला, ‘कशाला मान्सं जमल्यातंय?’
माजं कारभारी म्हन्लतं, ‘मालकण बाळातीण झाल्या. नाव ठेवलं.’, 
‘काय नाव ठेवलं?’, ‘अमर संगीन.’ ‘न्हाय त्ये स्वांग, अमृत संगी नाव ठेवलं. देशाला आपल्या ‘विजय’ मिळाला विजय! ‘विजया’ नाव ठेवायचं! विजया आज हाय, तिला धा नातुंडं हायतं.

नव्या जन्मलेल्या नातीचं नाव विजया ठेवून त्यांनी स्वातंत्र्याचा विजय पिढ्यानपिढ्यांसाठी नोंदवून ठेवला.

माणसं निघून गेली, आठवणी राहिल्या

हे सगळं सांगताना त्या काळाचा पट त्यांच्या नजरसमोर उभा ऱ्हायला! त्याचवेळी त्या बिळाशी बंडाच्या आठवणीने. वाटेगावच्या बर्डे गुरुजी, कत्ते गुरुजींपासून ते क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, बाबूरावदादा चरणकर, दत्तात्रय लोहार, बापूभाई मुलाणी, शेखकाका, नागनाथअण्णा नायकवडी, आनंदरावतात्या नाईक, मैनाबाई यमगर, मुक्ताबाई साठे, राजूबाई कदम यांच्या आठवणीनं. ‘आता यातलं आता कुणी कुणी ऱ्हायलं न्हाय…’ म्हणून बोलता बोलता त्या सद्गतित झाल्या.

हे उरातले दुःख तर आजचा भोवताल पाहून अधिकच गडद झाल्याचे त्यांच्या भावनेतून समजत होतं. कारण, तेव्हाचा काळ हा फार भयंकर. कठीण. कारण तेव्हाचा एक रुपायासुद्धा त्या काळी गाडीच्या चाकाएवढा मोठ्ठा वाटायचा. सायकलसुद्धा त्या काळात दुर्मीळ! ती असणंच हे प्रतिष्ठेचे लक्षण. तीसुद्धा अशी क्वचित बघायला मिळायची.

अशा परिस्थितीत, घरी दोन वेळची चूल पेटायची भ्रांत असताना अनेकांनी, विशेषतः वाघाच्या काळजाच्या कमलाबाईंसारख्या अनेक क्रांतिवीरांगनांनी अतुलनीय कार्य केले आणि देश स्वातंत्र्य झाला. आज कमलाबाई आपल्यात नाहीत. शिराळा पेट्यातील ही अखेरची स्फूर्तिज्योत २९ जुलै २०२३ रोजी शांत झाली. सरकारी नानी म्हणून ख्यात असलेल्या या ‘मेणी खोऱ्यातील वाघिणी’ला शतशः वंदन!

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
amphibians endangered
संपूर्ण लेख

उभयचर नष्ट होताहेत, उरलेल्या जीवसृष्टीवरही धोक्याची घंटा!

जगप्रसिद्ध ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान…
संपूर्ण लेख

‘लिव्ह इन’ की ‘लग्न’ यावर उत्तर कसं शोधणार?

‘लिव्ह इन’ अर्थात लग्नाशिवाय शारीरिक संबंधात राहण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या…
संपूर्ण लेख

सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य उलगणारा ‘बेन्नू’तील खजिना

पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘नासा’नं २०१६ मधे यान पाठवलं होतं. ते यान या लघुग्रहावजवळ…
संपूर्ण लेख

लॅटिन अमेरिका ही पर्यावरणपुरक जगासाठी नवी अर्थशक्ती

लॅटिन अमेरिकेत,  दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ३३ देशांचा समावेश होतो. लॅटिन हे नाव सर्वप्रथम फ्रान्सचे सर्वेसर्वा असलेल्या तिसऱ्या…
संपूर्ण लेख

फक्त ८० रुपयात ‘लिज्जत’ हा ब्रँड घडविणाऱ्या आज्जी गेल्या

ही गोष्ट आहे, १९५९ मधली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो भारावलेला काळ होता. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू देशाची नवी…
संपूर्ण लेख

सत्यशोधक पत्रकारितेचे विस्मृतीत गेलेले अतुलनीय योगदान

एकोणिसाव्या शतकातील नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा आणि आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले…