झोपडपट्टीतला पोरगा प्रा. हरी नरके झाला त्याची गोष्ट!

प्रा. हरी नरके यांच्या ब्लॉगवर २१ सप्टेंबर २०२० ची एक पोस्ट आहे. ही पोस्ट लिहिली त्याच्या बरोबर ३८ वर्षांपूर्वी याच दिवशी त्यांची ठाणे सेंट्रल जेलमधून सुटका झाली होती. नामांतर आंदोलन सत्याग्रहात सहभागी झाल्यामुळे त्यांना अटक झाली होती. सुमारे महिनाभर तुरूंगात राहिल्यानंतर २२ सप्टेंबर १९८२ ला रात्री १२ वाजता त्यांची सुटका झाली. 

ठाण्याच्या तुरूंग अधिकार्‍यांच्या सहीशिक्क्याचे मुंबई-पुणे प्रवासाचे २४ रुपये किमतीचं एसटीच्या लाल डब्याचे तिकिटाचा फोटोही त्यांनी यावेळी शेअर केलाय. मोठमोठ्या माणसांसोबत घडलेल्या या तुरुंगवासानं त्यांना घडवलं. पण त्याआधी त्यांचं झोपडपट्टीतील बालपण, कब्रस्तानातील नोकरी, बाबासाहेबांच्या नावामुळं मिळालेलं शिक्षण, आरक्षणाची चळवळ, नामांतराचं आंदोलन या सगळ्यातून पुढे ते प्राध्यापक झाले. विचारवंत म्हणून घडण्याची त्यांची ही प्रक्रिया त्यांच्याच शब्दात समजून घ्यायला हवी.

प्रा. हरी नरके आपल्या लेखात लिहितात….

बाबासायबांमुळे झोपडपट्टीतून शाळेत

माझा जन्म १ जून १९६३ रोजी निरक्षर शेतमजूर वडील आणि मोलकरीण आईच्या पोटी झोपडपट्टीत झाला. आमच्या झोपडपट्टीतली मुलं पुणे महानगर पालिकेच्या शाळेत जायची. आमच्या झोपडीत मात्र शिक्षणाची कोणतीही परंपरा नव्हती. माझ्या आईच्या एका मैत्रिणीने आईला सारखी भुणभूण लावली म्हणून आईनं मला शाळेत घातलं. या शांतामावशीमुळे मी शिकू शकलो. 

आई म्हणायची, “त्या शांताचा एक नातेवाईक हाये बाबासायब म्हणून. त्यो तिला म्हणतो, समद्या पोरास्नी साळंत घाला. आता शिकुन काय बालिस्टर होणारे का? नुसते वाया जायचे आइतखाऊ धंदे. पन जाऊ दे, ती म्हनते तर. नायतरी इकडं ते कबरस्तानातलं काम झालं की काय करणारे त्यो दिवसभर?  

कोरेगाव पार्कच्या सध्याच्या फाईव्ह स्टार हॉटेल ” वेस्ट इन” च्या शेजारच्या पारश्यांच्या कबरस्थानात वयाच्या पाचव्या वर्षापासून मी नोकरी करीत होतो. तेव्हा मला महिन्याला पाच रुपये पगार मिळायचा. कबरस्थान नावाला”, आहे खरी ती बागच. अतिशय सुंदर, शांत, टवटवीत. 

बाबासाहेबांचा फोटो घरात आला

पुणे मनपाच्या मुंढव्याच्या शाळेत जून १९६९ पासून मी जाऊ लागलो. मी १९७९ साली एस.एस.सी. झाल्यावर टेल्कोच्या होस्टेलमध्ये राहायला गेल्याने मला कबरस्तानातली नोकरी सोडावी लागली. मी अकरा वर्षांनी जेव्हा ही नोकरी सोडली तेव्हा माझा महिन्याचा पगार होता साठ रूपये. 

माझ्या शाळेच्या शेजारी सर्वोदय कॉलनी हा ” सेटलमेंट कॅंप” असल्याने माझ्या वर्गात ९५ टक्क्यांपेक्षा जास्त मुलं भटक्या-विमुक्तांची होती. राष्ट्र सेवा दल, डॉ. बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान, दलित पॅंथर यांच्याशी याच काळात मी जोडला गेलो. 

मला कांबळे गुरूजी नावाचे शिक्षक होते. त्यांच्या घरात मी बाबासाहेबांचा फोटो बघितला. या बाबासाहेबांमुळेच आपल्याला शांतामावशीच्या सांगण्यावरून आईने शाळेत घातले म्हणून मी माझ्या झोपडीत त्यांचा फोटो लावला. तेव्हा मी चौथीत होतो. आमच्या झोपडीत देवादिकांचे खंडीभर फोटो होते. बाबासाहेब आणि पुढे महात्मा फुले यांचे फोटो आले नी लवकरच देवादिकांच्या फोटोंना बाहेरचा रस्ता धरावा लागला.

फुले-आंबेडकरी चळवळीचा भाग झालो

जून १९७९ मध्ये मी सदाशिव पेठेतल्या महाराष्ट्र विद्यालयातून एसएससी परीक्षा पास झालो. त्यानंतर मी एफ.टी.ए. म्हणून टेल्कोत शिकायला गेलो. मी टेल्कोच्या (टाटा मोटर्स) वसतीगृहात १९७९ ते १९८१ अशी २ वर्षे राहिलोय. तिथल्या स्वावलंबी जीवनामुळे माझे असे मत बनले आहे की, प्रत्येक स्त्री-पुरूषाला शिक्षणाच्या काळात होस्टेलचा अनुभव असायलाच हवा. 

याकाळात मी फुले-आंबेडकरी चळवळीत जास्तच सक्रिय झालो. मोर्चे, निदर्शनं, भाषणं, सभा, संमेलनं, परिषदा यात रमून गेलो. मी महिला, भटके-विमुक्त, अनुसुचित जाती, जमाती, ओबीसी, अल्पसंख्यक चळवळीत काम करत राहिलो. 

१९८० साली गुजरातमध्ये राखीव जागाविरोधी हिंसाचार झाला. त्यावेळी पुण्यातल्या आमच्या ” दर्पण ग्रुपतर्फे” आम्ही राखीव जागांच्या बाजूने समाजप्रबोधनासाठी पुणे शहराच्या चौकाचौकात पोस्टर प्रदर्शनं आयोजित केली होती. मंदार, सचिन, श्रुती, संतोष, राजेंद्र, सुनंदन, वर्षा, वंदना, अनंत, शैलजा, नितीन, पट्या असे आम्ही विद्यार्थी दर्पणचं काम करायचो. 

सनातनी पुणेरी मंडळी राखीव जागांना कडवट विरोध करायची. टिपीकल पुणेकर विरोधात असूनही आमच्या ‘आरक्षणवादी पोस्टर प्रदर्शना’ ला चौकाचौकात तुफान गर्दी जमायची. मंदार आमचा नेता होता. आम्ही त्यावेळी पुणे शहरातील नामवंत शाळांमध्ये चालणारे गैरप्रकार यावर “अभिरूप न्यायालय” नावाचा नाट्यप्रयोग सादर केला होता. 

लिहायला लागलो ते छापूनही यायला लागलं

आम्ही सर्वजण पुण्यातल्या आघाडीच्या शाळांमध्ये शिकलेलो होतो. आम्ही सर्वजण त्या त्या शाळेतले प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी असल्याने या नाटकाने शाळांच्या व्यवस्थापनांची फार मोठी गोची झाली होती. त्याचकाळात आम्ही बलुतं, उपरा या दलित आत्मचरित्रांवर/फुले-आंबेडकरांच्या पुस्तकांवर चर्चा, वादविवाद, भाषणं करायचो. कडाक्याच्या चर्चा व्हायच्या. 

आम्ही दर्पणच्या मुलामुलींनी नव्या पेठेतील मनपाची शाळा दत्तक घेतलेली होती. तिथल्या झोपडपट्टीतील गरीब मुलामुलींसाठी मोफत कोचिंग क्लास चालवायचो. टेल्कोतील आमच्या सदिच्छा शिक्षण संस्थेतर्फे गरिब, गरजु, मागासवर्गीय मुलामुलींना वह्या, पुस्तके, इतर शालेय साहित्य आम्ही मोफत पुरवायचो. 

१९८० साली मी पुणे आकाशवाणी आणि मुंबई दूरदर्शनवर पहिल्यांदा राखीव जागांच्या बाजूने बोललो. आम्ही अगदी पेटून आरक्षण समर्थनपर पथनाट्याचे कार्यक्रम करायचो. “भटक्याविमुक्तांचा एल्गार येत आहे” हे पुस्तक मी स्वखर्चाने प्रकाशित केलं तेव्हा मी फक्त २० वर्षांचा होतो. त्या काळात मी लिहिलेले लेख साधना, घोषणा, स्त्री, किर्लोस्कर, मनोहर व इतर अनेक नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेले आहेत.

मी तेव्हा हडपसरच्या जवळ साडेसतरा नळीला भटक्यांच्या दांगट वस्ती या झोपडपट्टीत राहात होतो. तिथल्या शाळेत न जाणार्‍या मुलांसाठी मी बालवाडी चालवायचो. त्या कामावर प्रसिद्ध लेखक ह.मो.मराठे यांनी तेव्हा “किर्लोस्कर” मासिकात लिहिलेले होते. 

नामांतराच्या चळवळीचं रण पेटलं 

१९७८ साली मी इयत्ता नववीत शिकत होतो. तेव्हा औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याचा निर्णय पुलोद शासनाने घेतला. या निर्णयाला विरोध करण्यासाठी मराठवाड्यात सवर्णांकडून भीषण जाळपोळ आणि हिंसाचार केला गेला. त्यापुर्वी विद्यापीठ नामांतर आंदोलन फक्त मराठवाड्यापुरते मर्यादित होते. पण सवर्णांनी बौद्ध आणि अनुसुचित जातींची घरंदारं जाळल्यामुळे हा प्रश्न सगळ्या महाराष्ट्राचा-देशाचा बनला. 

त्यानंतर प्रत्येक नामांतरवादी मोर्च्यांमध्ये मी सहभागी होऊ लागलो. लॉन्गमार्चमध्येही मी सामील झालो होतो. माझी नामांतर आंदोलनाशी पक्की नाळ जुळली. त्यामागे एसेम जोशी, डॉ. बाबा आढाव, डॉ. नीलम गोर्‍हे आदींची प्रेरणा होती. निळूभाऊ फुले यांच्या प्रभावामुळे स्वजातीप्रेमापासून दूर राहायचं, आत्मटिका करायची, डिकास्ट व्हायचं, हे वळण अगदी लहान वयापासून पडलं. 

त्यामुळेच पुढे मी १९८६ साली जातीनिर्मुलनासाठी ठरवून आंतरजातीय विवाह केला. आंतरजातीय विवाहांना सतत प्रोत्साहन दिले. अशी काही लग्नं तर माझ्या घरातच लावली. अशा जोडप्यांना माझ्यापरीने सर्वतोपरी मदत केली. त्यामुळेच लहान वयात मी नामांतर सत्याग्रहात सामील झालो होतो. 

तुरुगांचंही विद्यापीठ झालं

१९८२ साली माझं वय जेमतेम १९ वर्षांचं होतं. मुंबईत झालेल्या नामांतर सत्याग्रहात मी पुण्याहून जाऊन सहभागी झालो होतो. ह्या नामांतर सत्याग्रहाचे नेतृत्व डॉ. माईसाहेब आंबेडकर, एस.एम. जोशी, कॉ. शरद पाटील, डॉ. बाबा आढाव, रामदास आठवले, प्रा. अरूण कांबळे आदींनी केलं होतं. आम्हाला अटक करून कोर्टात न नेता थेट ठाण्याच्या तुरूंगात नेण्यात आलं. 

ठाण्याचा तुरूंग तसेच मुंबईतले सगळे तुरूंग भरल्यावर मग काहींना येरवडा, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद अशा दुसर्‍या तुरूंगांमध्येही पाठवण्यात आले. आम्हाला मात्र ठाण्यात ठेवण्यात आलं. पहिल्याच दिवशी या सत्याग्रहात १६००० लोकांना अटक झालेली होती.  तुरूंगात जाण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. ( त्यानंतर तुरूंगात भाषणं करण्याची अनेक निमंत्रणे आल्याने, माझे बरेच तुरूंग बघून झाले.)

बॅ. बाबासाहेब भोसले तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. अजिबात जनाधार नसलेले, दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींच्या कृपेने मुख्यमंत्री झालेले. काहीसे विक्षिप्त आणि बोलभांड, वाचाळ. त्यांनी आम्हाला धडा शिकवण्यासाठी तुरुंगात ठेवले. हे दिवस माझ्या आयुष्यातील सर्वाधिक शिक्षणाचे दिवस ठरले. त्याच आंदोलनात निखिल वागळे, कपिल पाटील, सुनिल तांबे, नितीन वैद्य, प्रतिमा जोशी, सविता कुडतरकर, ज्योती नारकर ह्या मुंबईच्या ग्रुपशी माझी दोस्ती झाली.

थोरामोठ्यांचा सहवास आणि कौतुकही मिळालं

मी या सत्याग्रहातला वयाने सर्वात लहान सत्याग्रही होतो. त्यामुळे मला नेत्यांसाठी राखीव असलेल्या बराकीत ठेवण्यात आले होते. त्या बराकीत मी ज्यांचा आधीच उल्लेख केलाय त्या नेत्यांशिवाय डॉ. कुमार सप्तर्षी, अंकुश भालेकर, बाबूराव बागूल, डॉ. अनिल अवचट, डॉ. नरेंद्र दाभोलकर, गजानन खातू, दिनकर साक्रीकर, लक्ष्मण माने, पार्थ पोळके, अ‍ॅड. विजय मोरे, बापूराव नाईक आणि आणखी सुमारे ८० नेते होते.

या सर्वांचा २४ तास सहवास. दररोज झोपेचे ४/५ तास सोडले तर उरलेले १९/२० तास सतत चर्चा, वादविवाद, चळवळीची गाणी, नेत्यांची भाषणे, परिसंवाद. अतिशय सकस, समृद्ध, श्रीमंत आयुष्य. माझी बरीचशी सामाजिक जडणघडण त्या तुरुंगवासातच झाली. १९८२ च्या या नामांतर तुरूंगवासातले अनुभव अनेक मान्यवरांनी लिहून पुस्तकरुपाने प्रकाशित केलेले आहेत. त्यातल्या बहुतेकांनी माझा उल्लेख ठळकपणे केलेला आहे. 

युवक क्रांती दलाचे लढाऊ नेते, तुफानी वक्ते आणि संपादक-लेखक कुमार सप्तर्षी यांचे आत्मचरित्र २० वर्षांपुर्वी प्रकाशित झालेय. पुस्तकाचे नाव आहे, “येरवडा विद्यापीठातील दिवस”, पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाच्या या पुस्तकाच्या आजवर पाच आवृत्या निघालेल्या आहेत. या पुस्तकाच्या पृष्ठ क्र. ३९० ते ३९२ वर सप्तर्षींसरांनी माझ्यावर भरभरून लिहिलेले आहे.

कुमार सप्तर्षी म्हणतात, ” हरी नरके ( तुरूंगात ) सोबत होता. तो वयानं लहान. वागण्यात गोड. बोलण्यात चलाख. त्याची पथारी माझ्याशेजारी. तेव्हा हरी मला कुमारदादा म्हणायचा. गोड शब्दात लडीवाळ बोलायचं, अन उचकवणारे खोचक प्रश्न विचारायचे ही त्याची खाशीयत…” सप्तर्षींनी माझ्याबद्द्ल आणखीही बरंच काही लिहिलंय. 

जन्मानं नाही, विचारानं बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकरवादी

तुरूंगांत मला  माझ्या कुटुंबातलं कोणीही भेटायला येणं शक्यच नव्हतं. कारण त्यांचं हातावरचं पोट आणि माझं फुले-आंबेडकरी चळवळीत काम करणं त्यांना आवडतही नसावं. ज्या मुलाला चळवळीची कोणतीही कौटुंबिक पुर्वपरंपरा नव्हती अशा घरातला मी आहे. मी बाय बर्थ-जन्माने नाही, तर बाय चॉईस-विचाराने, बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकरवादी आहे.

ठाण्याच्या तुरूंगात मला प्रथम भेटायला आल्या त्या माझ्या सुहृद डॉ. नीलम गोर्‍हे. नीलमताई गेली अनेक वर्षे शिवसेनेच्या आमदार आहेत. नुकत्याच त्या विधान परिषदेच्या उपाध्यक्षही झाल्या. त्या उत्तम संघटक आहेत. त्यांचे वक्तृत्व आणि लेखन लक्षणीय असते. त्यांची माझी दोस्ती ४२ वर्षांची आहे.

तुरूंगाच्या लाऊडस्पीकरवरून भेटीची घोषणा झाली, ” हरी नरके, तुमची मुलाखत आली आहे.” हे ऎकून मला गंमतच वाटली. मुलाखत आली आहे, कुठल्या पेपरला? मग मी तुरूंगाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच्या भेटीच्या कक्षात गेलो. नीलमताई भेटल्या. खूप जिव्हाळ्याच्या गप्पा झाल्या. त्याकाळात त्या हडपसरगावात व सातववाडीलाला दवाखाना-क्लिनिक चालवायच्या. मी त्यांचा कार्यकर्ता. पुढे आमची घनिष्ट दोस्ती झाली.

तुरुंगातील दिवस आणि पत्रलेखन

त्यानंतर बरेच मित्र मला ठाणे तुरूंगात भेटायला येत असत. मी ठाणे जेलमधून पहिलं पत्र लिहिलं ते गारगोटीच्या माझ्या एका ज्येष्ठ प्राध्यापक मित्रांना. त्यांना मी लिहिलं होतं की, “तुरूंगात मी खूप मजेत आहे. ठाण्याच्या तुरूंगात आमची व्यवस्था एकदम उत्तम आहे. खाण्यापिण्याची व्यवस्था बरी आहे. मुख्य म्हणजे बौद्धिक मेजवानी अपुर्व, दणकट आणि जंक्शान आहे.” 

जेलमध्ये येणारे-जाणारे प्रत्येक पत्र सेंसॉर केले जाते. मला जेलर कार्यालयाकडून बोलावणे आले. त्यांनी मला दम दिला, ” व्यवस्था एकदम उत्तम आहे असे लिहिलेले चालणार नाही. हे जेलच्या नियमांविरूद्ध आहे. ते खोडा.” जेलरचे तसे फर्मानच निघाले. मग खोडले. काय करणार? जेलच्या व्यवस्थेला चांगले म्हटलेले चालत नाही, तसे नियमच आहेत म्हणे. 

जेलमध्ये आम्हाला प्रत्येकाला एक जर्मनचा मग दिलेला असायचा. तोच चहाला, कांजी, गंजी प्यायला, पाणी प्यायला आणि अंघोळीला वापरायचा. अर्थात शौचालयातही तोच. संडास अर्धे उघडे. जेवायला साधारणपणे कमाल कोळसा झालेल्या दोन भाकरी आणि पाण्यात हळद, मसाला, मीठ मिसळलेले, उकळलेले, सगळ्या झाडांचा पाला टाकलेले, पाणी असायचे. जेलच्या भाषेत त्याला “बावन्नपत्ती” म्हणतात. असा भन्नाट काढा की ज्याचा स्वाद केवळ थोर असतो. अर्थात त्याला तिकडे आमटी वगैरे म्हणतात. लिंबाएव्हढा भातही करपलेला, जाडाभरडा असायचा. घरी आपला जितका आहार असतो, साधारण त्याच्या निम्मा आहार जेलमध्ये प्रत्येकाला दिला जातो. त्यामागे कैद्याचे वजन वाढू नये असा सदहेतू असावा.

जगण्याची इयत्ता बदलून टाकणारा तुरुंगवास

दररोज पहाटे पाचला आमचा जीवनक्रम कांजीने/गंजीने सुरू व्हायचा. भाताची पेज. दुपारचे जेवन ११ वाजता तर रात्रीचे जेवन संध्याकाळी ५ वाजता दिले जायचे. अंधार पडायच्या आत बराकींना कुलुपे लावली जायची. जी दुसर्‍या दिवशी पहाटे उघडायची. या तुरूंगात अंडा सेलमधले खुंखार कैदी ते किरकोळ गुन्हे केलेले कच्चे कैदी अशा अनेकांना मी भेटलो. त्यांच्या कहाण्या चटका लावणार्‍या आहेत. विदारक आणि भयावह आहेत. माझ्याकडे तुरंगातल्या नोट्सच्या पाच वह्या भरलेल्या आहेत.

नामांतरातल्या तुरुंगवासामुळे प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याला जेलमध्ये जाऊन आल्याचा अनुभव असायला पाहिजे असे माझे मत बनले. तुरूंगातल्या शिक्षणाला कुमार सप्तर्षी “येरवडा विद्यापीठातील दिवस” असे म्हणतात. सामाजिक कार्यकर्त्यांनी आयुष्यात एकदातरी जेलचा असा अनुभव घ्यायला हवा.

जगण्याकडे बघण्याची आणि जगण्याचीही इयत्ताच त्यानं बदलून जाते. गरजा एकदम कमी होऊन जातात. मानापमानाच्या, इगोच्या वायफळ जगातून तुमची सुटका होते. खरा भारत आणि भारतीय माणसं यांचं उघढंवाघढं दर्शन होतं. जेलमध्ये जातानाचे तुम्ही आणि बाहेर पडणारे तुम्ही यात जमीन अस्मानाचं अंतर पडतं.

(https://harinarke.blogspot.com/ या प्रा. हरी नरके सरांच्या ब्लॉगवरून साभार)

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
amphibians endangered
संपूर्ण लेख

उभयचर नष्ट होताहेत, उरलेल्या जीवसृष्टीवरही धोक्याची घंटा!

जगप्रसिद्ध ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान…
संपूर्ण लेख

‘लिव्ह इन’ की ‘लग्न’ यावर उत्तर कसं शोधणार?

‘लिव्ह इन’ अर्थात लग्नाशिवाय शारीरिक संबंधात राहण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या…
संपूर्ण लेख

सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य उलगणारा ‘बेन्नू’तील खजिना

पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘नासा’नं २०१६ मधे यान पाठवलं होतं. ते यान या लघुग्रहावजवळ…
संपूर्ण लेख

लॅटिन अमेरिका ही पर्यावरणपुरक जगासाठी नवी अर्थशक्ती

लॅटिन अमेरिकेत,  दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ३३ देशांचा समावेश होतो. लॅटिन हे नाव सर्वप्रथम फ्रान्सचे सर्वेसर्वा असलेल्या तिसऱ्या…
संपूर्ण लेख

फक्त ८० रुपयात ‘लिज्जत’ हा ब्रँड घडविणाऱ्या आज्जी गेल्या

ही गोष्ट आहे, १९५९ मधली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो भारावलेला काळ होता. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू देशाची नवी…
संपूर्ण लेख

सत्यशोधक पत्रकारितेचे विस्मृतीत गेलेले अतुलनीय योगदान

एकोणिसाव्या शतकातील नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा आणि आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले…