नरके सरांच्या मृत्यूनंतर झालेली हेटाळणी नवी नाही!

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात सुरू केलेल्या स्त्रीशिक्षणाला पुण्यातील सनातन्यांनी किती विरोध केला, ते आपण सगळ्यांनी वाचलेलंच आहे. शेणाचे गोळे फेकण्यापासून त्यांच्यावर खोटेनाटे आरोप करण्यापर्यंत सर्व प्रयत्न त्यावेळच्या सनातन्यांनी केला. नंतर याच स्त्रीशिक्षणाचा फायदाही त्यांनीच आधी उचलला. 

तरीही, महात्मा फुले आणि सावित्रीबाईंची उपेक्षा त्यांच्या मरणानंतरही थांबली नाही. आजही पहिली मुलींची शाळा असलेला भिडेवाडा उध्वस्त अवस्थेत आहे आणि कुणीतरी स्वयंघोषित गुरुजी, महात्मा फुलेंवर गरळ ओकतोय. हीच परिस्थिती राजर्षी शाहू महाराजांच्या निधनानंतरही होती. हरी नरके यांच्या मृत्युनंतरही याच सनातन्यांच्या आलेल्या विकृत प्रतिक्रिया याच सनातन्यांच्या आहेत.

महात्मा फुलेंचा पुतळा आणि सनातनी

ही गोष्ट आहे १९२५ मधली. पुणे नगरपालिकेत महात्मा जोतिबा फुले यांचा पुतळा पुण्यात उभारण्यात यावा, यासाठी केशवराव जेधे यांनी तेंव्हाच्या पुणे नगरपालिकेत ठराव मांडला. पण तेव्हा पुण्यातील सनातनवाद्यांनी त्याला विरोध केला. सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधाला न जुमानता आपली बाजू लावून धरली.

त्यासठी सत्यशोधक चळवळीच्या कार्यकर्त्यांनी जाहीर भाषणं, व्याख्यानं, जलसे आणि पोवाडे या लोकमाध्यमांचा वापर केला. तर त्याच वेळी या सगळ्याला विरोध करण्यासाठी सनातनवाद्यांकडून ग. मा. नलावडे आणि वि. म. फुले यांनी महात्मा फुले यांची बदनामी करणारं ‘सत्यशोधक की ख्रिस्तीसेवक’ या नावाचं पुस्तक लिहिलं गेलं.

महात्मा फुलेंच्या पुतळ्याला होणारा हा विरोध करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी जेधे–जवळकरांनी ‘देशाचे दुष्मन’ हे पुस्तक लिहिलं. पण तरीही ‘सत्यशोधक की ख्रिस्तीसेवक’ या पुस्तकाला प्रतिवाद म्हणून सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर चळवळीतील कार्यकर्त्यांना महात्मा फुले यांच्या विषयीचे एक चरित्र असावं असं वाटत होतं. तसं चरित्र लिहिण्याचं दिनकर जवळकरांनी जाहीर केलं होतं. पण त्यांच्या हातून ते काम पूर्ण झालं नाही. 

महात्मा फुलेंच्या चरित्राची पायाभरणी

पुढे पं. सि. पाटील यांनी इ.स. १९२७ मध्ये म. फुले यांचे चरित्र लिहून लोकांसमोर फुल्यांचं जीवनपट उभा केला. महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात सत्यशोधक कार्यकर्त्यांनी काही कालावधीतच हे चरित्र लोकांपर्यंत पोहोचवलं. नलावडे आणि फुले या जोडगोळीला सत्यशोधकांनी म. फुले ख्रिस्तीसेवक होते याचा पुरावा देण्याचे आवाहन केले. पण ते दोघे एकही पुरावा देऊ शकले नाही. 
         
त्यानंतर १९८८ मधे पुन्हा एकदा महात्मा फुलेंच्या बदनामीचा प्रयत्न झाला. ग. वा. बेहरे यांच्या ‘सोबत’ नावाच्या साप्ताहिकात बाळ गांगल यांनी महात्मा फुलेंना बदनाम करणारे दोन लेख लिहिले. हे लेख वाचून नरके सरांनी त्याला ठोस प्रतिवाद केला. त्यासाठी त्यांनी गांगल यांना चूक ठरविणारे संदर्भासहीत लेख लिहिले. हे लेख त्या वेळच्या वर्तमानपत्रात छापून आले.

पु. ल. देशपांडे यांनी हे लेख वाचून नरके सरांना त्या लेखांचं पुस्तक करण्याचं सांगितले. त्याप्रमाणे सरांनी ‘महात्मा फुले यांची बदनामी: एक सत्यशोधन’ या नावाचं पुस्तक लिहिले. डॉ. य. दि. फडके यांनी त्याला प्रस्तावना लिहिली. त्यात त्यांनी नरके सरांच्या मतांना दुजोरा दिला. या पुस्तकानंतरही बाळ गांगल त्यांनी फुले यांच्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे देऊ शकले नाहीत.

फुलेंचा विचार नरके सरांनी पुढे नेला

१९२५ मधे जेव्हा महात्मा फुले यांची बदनामी करणारं लेखन झालं, त्यावेळी सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर चळवळ शिखरावर होती. त्या लेखनाला प्रतिवाद करण्यासाठी अनेक कार्यकर्ते समोर आले होते. पण जेव्हा बाळ गांगल यांनी म. फुले यांच्या विषयी बदनामपर लेख लिहिले, यावेळी सत्यशोधक चळवळ हे अमूर्त स्वरूपात होतं. तेव्हा त्याविरोधी नरके सरांनी केलेलं लेखन हे उल्लेखनीय आहे.  

यानंतर नरके सरांनी ‘महात्मा फुले शोधाच्या नव्या वाटा’ या नावाचं ग्रंथ लिहिला. त्यांनी अलिकडे प्रकाशित झालेलं ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले हे छोटसं पुस्तकही महत्त्वाचं आहे. गंमत म्हणजे ते पुस्तक हळदी कुंकवाच्या कर्यक्रमात जमलेल्या महिला एकमेकांना भेट म्हणून देऊ लागल्या आहेत. अशी एकूण जवळ जवळ ५४ पुस्तके त्यांनी संपादीत केली. याशिवाय शेकडो लेख लिहिले आणि भाषणे दिली. 

महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन इ. समितीवर अनेक वर्षे त्यांनी सचिव म्हणून काम पहिले. तसेच प्राच्यविद्या भांडारकर संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अभ्यास करणं हा त्यांचा ध्यास होता. त्यांनी आपलं वाचन आणि संशोधन हे प्रबोधनपर व्याख्यानाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडले. 

सामाजिक न्यायासाठी सदैव सत्यकथन

अनुसुचित जाती, जमाती आणि ओबीसी आरक्षण आणि ओबीसी जनगणनाविषयीचे प्रबोधन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम सरांनी केली. ते आपल्या व्याख्यानातून नेहमी ‘आरक्षण म्हणजे खिरापत वाटपाचा किंवा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही’ असे म्हणत. समता परिषदेच्या माध्यमातून  त्यांनी महात्मा फुलेंची समता आणि डॉ. बाबसाहेब आंबेडकरांची सामाजिक न्यायाची भूमिका लोकांमध्ये रुजविण्याचे काम त्यांनी अखेरपर्यंत केले. 

औरंगाबाद विद्यापीठ नामांतर चळवळीत ते तुरुंगात गेले होते. पुणे विद्यापीठाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे नामविस्तार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. तसेच विद्यापीठाच्या आवारात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पूर्णाकृती पुतळा बसविण्यात त्यांचा सहभाग होता.
ते फरडे वक्ते होते.

त्याची भाषा ओघवती असल्याने आपले विचाराने समोर बसलेल्या श्रोत्यांचे मत आणि मन परिवर्तन करीत असत. ते सत्याला सत्य म्हणताना कधीच धजावले नाहीत. ते मुळातच मराठी विषयाचे विद्यार्थी होते. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न मराठी भाषेच्या इतिहासात उल्लेखनीय राहिलेत. महाराष्ट्र आणि भारतभर त्यांनी संशोधन आणि व्याख्यानासाठी भ्रमंती केली. 

सत्यशोधनाची परंपरा कायम ठेवूया

सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते आणि साहित्यिक कृष्णराव भालेकर नेहमी म्हणायचे, ‘मरण ते ठावे कशाला कुचमत मरावे’. याप्रमाणेच नरके सरांनी आपलं मरण जवळ आहे, हे जाणलं होतं. तरीही ते घरी बसून न राहता, सत्यशोधक मतांचे विचार आपल्या लेखन आणि व्याख्यानाच्या माध्यमातून समाजातील तळागाळापर्यंत पोहचविले.  

‘मरणान्ति वैराणी’ म्हणजे मरणानंतर वैर संपते अस म्हणायचं, पण प्रत्यक्षात कृती मात्र त्याउलट करायची हेच आजवर सनातन्यांकडून दिसलं आहे. महात्मा फुले आणि शाहू महाराजांच्या मृत्यू पश्चातही अशीच परिस्थिती दिसून आली होती. नरके सरांच्या मृत्यूनंतर समाजमाध्यमावरील चर्चेत दिसून आली, त्या निंदनीय विकृतीचा शेवट व्हायलाच पाहिजे. 

नरके सरांनी आपलं आयुष्य पुरोगामी चळवळीला वाहिलं. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते महाराष्ट्रातील जनतेचे प्रबोधन करीत होते. त्याचं हे ऋण आपण कधीच विसरू शकत नाही. ते अनेक प्रसिद्ध साहित्यिकांचे आणि नेत्यांचे आठवणी सांगत. आज त्यांची आठवण आपल्याला जपायची आहे. ते कायम आपल्या आठवणीत राहतील. सातत्यानं सत्य मांडत राहण, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. सत्यशोधक नरके सरांना सत्यशोधकी सत्य मेव जयते!

(बापूराव घुंगरगांवकर हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इतिहासाचे संशोधक विद्यार्थी आहेत.)

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
amphibians endangered
संपूर्ण लेख

उभयचर नष्ट होताहेत, उरलेल्या जीवसृष्टीवरही धोक्याची घंटा!

जगप्रसिद्ध ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान…
संपूर्ण लेख

‘लिव्ह इन’ की ‘लग्न’ यावर उत्तर कसं शोधणार?

‘लिव्ह इन’ अर्थात लग्नाशिवाय शारीरिक संबंधात राहण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या…
संपूर्ण लेख

सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य उलगणारा ‘बेन्नू’तील खजिना

पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘नासा’नं २०१६ मधे यान पाठवलं होतं. ते यान या लघुग्रहावजवळ…
संपूर्ण लेख

लॅटिन अमेरिका ही पर्यावरणपुरक जगासाठी नवी अर्थशक्ती

लॅटिन अमेरिकेत,  दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ३३ देशांचा समावेश होतो. लॅटिन हे नाव सर्वप्रथम फ्रान्सचे सर्वेसर्वा असलेल्या तिसऱ्या…
संपूर्ण लेख

फक्त ८० रुपयात ‘लिज्जत’ हा ब्रँड घडविणाऱ्या आज्जी गेल्या

ही गोष्ट आहे, १९५९ मधली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो भारावलेला काळ होता. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू देशाची नवी…
संपूर्ण लेख

सत्यशोधक पत्रकारितेचे विस्मृतीत गेलेले अतुलनीय योगदान

एकोणिसाव्या शतकातील नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा आणि आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले…