मुंबईचं आझाद मैदान हे आद्य स्वातंत्र्यतीर्थ

आझाद मैदान या नावावरूनच या जागेचा संबंध स्वातंत्र्याशी असावा असं वाटतं. पण आझाद मैदानाचं आणि स्वातंत्र्याचं नातं काय? हे अनेकांना माहीत नसतं. त्यामुळेच हा इतिहास हा सर्वांना ज्ञात व्हायला हवा यासाठी तिथं एक स्मृतिउद्यान तयार करण्यात आलं. पण खाऊगल्लीच्या गोंधळात आणि सीएसमटीच्या लायटिंगचे फोटो काढण्याच्या नादात हे उद्यान आजही उपेक्षित राहिलंय.

आपण इतिहास जपला नाही, तर तो इतिहास पुढल्या पिढ्यांनाही कळत नाही. त्यामुळेच आझाद मैदानावरील आझादीची पहिली जंग पुन्हापुन्हा सांगत राहावी लागणार आहे. देशभर स्वातंत्र्याचा वणवा पेटण्याआधी स्वातंत्र्याचं हे बंड मुंबईतही झालं होतं. १८५७ मधे झालेलं हे बंड भारतीय स्वातंत्र्यलढ्याची सुरुवात म्हणून ओळखलं जातं. त्या बंडातील एक महत्त्वाचा अध्याय आझाद मैदानावर घडलाय.

१८५७ चं बंड आणि मुंबई

१९५७ मधे उत्तरेत इंग्रज सरकार विरोधात बंडाला सुरुवात झाली होती. त्याचं लोण मुंबईत पोहचू नये, याची शक्यतो सर्व काळजी इंग्रजांचं कंपनी सरकारमधील अधिकारी घेत होते. लॉर्ड एल्फिस्टन त्यावेळी मुंबईचे गव्हर्नर होचे. त्यांना मुंबईतील काही मान्यवरांवर संशय होता. मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाना शंकरशेठ यांनाही त्यामुळे चौकशीचा त्रास सहन करावा लागला होता.

हे सगळं चौकशीचं, तपासाचं काम त्यावेळचा धू्र्त पोलीस अधिकारी चार्ल्स फोर्जेट यांच्याकडे होतं. फोर्जेट अँग्लो इंडियन होता. त्यामुळे तो भारतीयांमधे मिसळून जात असे आणि लोकांना त्याचा संशयही येत नसे. वेशांतर करण्यात आणि खबऱ्या काढण्यास पटाईत अशी त्याची ख्याती होती. मुंबईत कुठे बंडांची शक्यता असेल, तर त्याचा छडा लावण्यासाठी तो अहोरात्र झटत होता.

१८५७ च्या मोहरमच्या काळात मुंबईत काहीतरी घडणार याची कुणकुण इंग्रजांना होती. दरवर्षी या महिन्यात धार्मिक दंगली होऊन तणाव निर्माण व्हायचा. फोर्जेटने या महिन्यात शहरातील व्यवस्था अधिकच कडक केली होती. अशातच फोर्जेटला एक मोठी खबर लागली. मुंबईतील काही शिपाई एकत्र येऊन काही तरी ठरवताहेत, असं त्याला कळलं होतं. मुंबईतल्या बंडाची ही सुरुवात होती.

आणि बंडाचं नियोजन इंग्रजांपर्यंत पोहचलं

मोहरमच्या काळात निर्माण झालेला धार्मिक तणावर फोर्जेटना निस्तारला तरी अद्यापही काहीतरी सुरू असल्याचं त्याच्या कानवर येत होतं. बॉम्बे पोलीस फोर्समधील सुभेदार मोहम्मद बूडेन यांच्याकडे काम करणाऱ्या एका हेराने त्याला एक महत्वाची टीप दिली. गंगाप्रसाद नावाच्या एका देवदेवस्की करून अंगारेधुपारे देणाऱ्या माणसाकडे काही तरी शिजतंय, शिपाई तिथं सतत येताहेत अशी ती बातमी होती.

फोर्जेटनं तातडीनं कारवाई केली. त्यांनी गंगाप्रसादला पकडून आणलं. गंगाप्रसादला ताब्यात घेऊन सापळा रचला. त्याच्या खोलीत फोर्जेटनं भिंतीला भोकं पाडली. तिथून तो त्या बंडवाल्या शिपायांच्या चर्चा ऐकू लागला. हे सगळे शिपाई कोण आहेत आणि ते कंपनीविरोधात काय रचताहेत हे ऐकून त्यांनी त्यांच्याविरोधात पुरावे जमतील, याची काळजी घेतली.

त्यासाठी एक युरोपीयन सहकारी एडिंग्टन आणि एका नेटिव्ह पोलिसाची मदत घेतली. शेवटी त्यानं मरिन बटालियनचे अधिकारी मेजर बॅरोलाच तिथं नेलं. बॅरोने जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी हे पाहिलं तेव्हा तो उडालाच आणि फोर्जेटला म्हणाला, माय गॉड!माय ओन मेन! इज इट पॉसिबल! झालं, मुंबईतील शिपायाचं बंड उध्वस्थ करण्यासाठी इंग्रजांना आयतं कोलित मिळालं.

आझाद मैदानावरील होतात्म्य 

मुंबईतलं बंड कसं फोडलं याचं वर्णन स्वतः फोर्जेटनं १८७८ मधे लिहिलेल्या ‘अवर रिअल डेंजर इन इंडिया’ या पुस्तकात केलंय. फोर्जेटच्या हाती बंडांचे पुरावे लागले होते. त्यानं चौकशीला सुरुवात केली. त्यातून त्याला कळलं की, १८५७ च्या मोहरमच्या शेवटच्या रात्रीच मुंबईतील रेजिमेंटसनी उठाव करण्याचं ठरवले होते. पण त्या दिवशीच्या बंदोबस्तामुळे मोहरमच्या रात्रीचा कट फसला. मोहरमचा कट निष्फळ झाल्याने आता दिवाळीत मुंबईत उठाव करण्याचं घाटत आहे.

या शिपायांच्या कटात सामिल असणाऱ्या गंगा केडिया आणि सय्यद हुसेन यांना तात्काळ अटक करण्यात आली. त्यांचं कोर्ट मार्शल करण्यात आलं. त्या दोघांना अशी शिक्षा करायची की सैन्यातील इतर शिपायांना आणि मुंबईतल्या लोकांनाही जरब बसावी असं ठरविण्यात आलं. इंग्रज सत्तेशी द्रोह करणाऱ्यांचं काय होतं, हे सर्वांना कळावं म्हणून त्यावेळच्या एक्स्प्लनेड मैदानात या दोघांना तोफेच्या तोंडी देण्याचं ठरलं. 

तो दिवस होता १५ ऑक्टोबर १८५७.  सूर्यास्ताच्या वेळी केडिया आणि हुसेन यांना एस्प्लनेड मैदानाजवळ आणण्यात आलं. त्या दोघांना तोफेच्या तोंडी बांधून संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी तोफेला बत्ती देण्यात आली. क्षणार्धात त्यांच्या चिंधड्या झाल्या. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यातील पहिल्या लढाईतलं हे बलिदान पुढे स्वातंत्र्याच्या लढाईचं प्रेरणास्थान ठरलं. याच मैदानावर पुढे स्वातंत्र्य लढ्यातील आंदोलनं होत राहिली. 

आझाद मैदानावर तिरंगा फडकवण्यात आला.

याच आझाद मैदानावरचं आणखी एक महत्त्वाचं आंदोलन १९३० मधे झालं. त्यावेळी देशात देशात तिरंगा फडकवण्यास बंदी होती. या आदेशाला न जुमानता २६ ऑक्टोंबर १९३० रोजी अवंतिकाबाई गोखले यांनी आझाद मैदानावर महिलांचा मोर्चा आणला. एवढंच नाही, तर तिथं पोलीस कमिशनरचा आदेश झुगारून त्यांनी तिरंगा फडकवला.

स्वातंत्र्य चळवळीच्या अनेक मोठ्या सभा आझाद मैदानावर झाल्या आहेत. उषा ठक्कर आणि संध्या राव मेहता यांनी लिहिलेल्या ‘गांधी इन बॉम्बे’ या पुस्तकात १९३१ मधील गांधीजींच्या ऐतिहासिक सभेविषयी नोंद आढळते. त्यात त्या लिहितात की,  २८ डिसेंबर १९३१ रोजी गांधीजींनी आझाद मैदानावर एका प्रचंड गर्दीसमोर आपले विचार मांडले. 

त्यात गांधीजी म्हणाले होते की, आता आपल्या सगळ्यांना बलिदानासाठी सज्ज राहायचं आहे. पण हे सगळं करताना अहिंसेचा मार्ग सोडू नका. इतरांना नुकसान होईल असं वागू नका. आपल्याला स्वातंत्र्याची ही लढाई सत्याच्या आणि अहिंसेच्या मार्गानेच लढायची आहे. देव आम्हांला स्वातंत्र्यासाठी दुःख सहन करण्याची आणि त्याग करण्याची शक्ती देवो.

आझादीची लढाई आजही संपलेली नाही

१५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळालं, त्याचा जल्लोष संपूर्ण देशभर झाला, तसाच तो मुंबईतही झाला. आजही दरवर्षी स्वातंत्र्य दिन मोठ्या धामधुमीत होतो, पण या आझाद मैदानावर असा काही खास काही कार्यक्रम होत नाही. ज्या मैदानानं या शहराला स्वातंत्र्याचं स्वप्न दाखवलं, त्यासाठी रक्त सांडलं त्या मैदानाला मुंबईकरांनी आणि देशवासियांनीही विसरून चालणार नाही.

या स्मृती जपल्या जाव्यात म्हणून शिवसेनेचे राज्यसभा खासदार भारतकुमार राऊत यांच्या प्रयत्नातून २००८ मधे तिथं शहीद स्मारक उभारण्यात आलं. पण आज ते असून नसल्यासारखं आहे. सध्या मेट्रोच्या कामामुळे तर ते पूर्णपणं काळवंडून गेलंय.  गंगा केडिया आणि सय्यद हुसेन या आद्य हुतात्म्यांचं नाव सर्वांना लक्षात राहील असा या स्मारकाचा जिर्णोद्धार व्हायला हवा.

याच आझाद मैदानार सावित्रीबाई फुले यांनी विधवा स्त्रियांचं केशवपन करणार नाही, असं सांगत नाव्ह्यांचा संप घडवून आणला होता, असं ऐकिवात आहे. गिरणी कामागार, माथाडी कामगार, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आदिवासी, बेरोजगार अशा अनेकांनी इथं कित्येक आंदोलनं केलीत. भ्रष्टाचारविरोधात अण्णा हजारे यांचं उपोषणही इथंच झालं होतं आणि अनेक राजकीय नेत्यांनी इथंच लाखोंची गर्दी जमवून शक्तिप्रदर्शन केलंय.

आजही हे आझाद मैदान अनेक वंचितांच्या आणि शोषितांच्या आंदोलनाची जागा आहे. लोकशाहीमधे लोकांचा आवाज ही एक मोठी ताकद असते.  कितीही अडचण असली तरी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येऊन इथं आंदोलन करतात आणि सरकारला जाब विचारतात. त्यामुळे देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळालं असलं, तरी प्रत्येकाची आझादीची लढाई अद्याप संपलेली नाही. आझाद मैदान त्यासाठी अहोरात्र जागं होतं आणि यापुढेही राहील.

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
amphibians endangered
संपूर्ण लेख

उभयचर नष्ट होताहेत, उरलेल्या जीवसृष्टीवरही धोक्याची घंटा!

जगप्रसिद्ध ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान…
संपूर्ण लेख

‘लिव्ह इन’ की ‘लग्न’ यावर उत्तर कसं शोधणार?

‘लिव्ह इन’ अर्थात लग्नाशिवाय शारीरिक संबंधात राहण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या…
संपूर्ण लेख

सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य उलगणारा ‘बेन्नू’तील खजिना

पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘नासा’नं २०१६ मधे यान पाठवलं होतं. ते यान या लघुग्रहावजवळ…
संपूर्ण लेख

लॅटिन अमेरिका ही पर्यावरणपुरक जगासाठी नवी अर्थशक्ती

लॅटिन अमेरिकेत,  दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ३३ देशांचा समावेश होतो. लॅटिन हे नाव सर्वप्रथम फ्रान्सचे सर्वेसर्वा असलेल्या तिसऱ्या…
संपूर्ण लेख

फक्त ८० रुपयात ‘लिज्जत’ हा ब्रँड घडविणाऱ्या आज्जी गेल्या

ही गोष्ट आहे, १९५९ मधली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो भारावलेला काळ होता. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू देशाची नवी…
संपूर्ण लेख

सत्यशोधक पत्रकारितेचे विस्मृतीत गेलेले अतुलनीय योगदान

एकोणिसाव्या शतकातील नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा आणि आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले…