नारायण सुर्वे यांच्या घामेजलेल्या कवितेची गोष्ट

नारायण सुर्वे यांचे जे कवितासंग्रह आहेत, ते आपल्याला माहिती आहेत. ‘ऐसा गा मी ब्रह्म’ (१९६२) अभिनव प्रकाशनचे वा. वि. भट यांनी प्रकाशित केला. नंतर १९६६ मधे ‘माझे विद्यापीठ’ आलं. १९७५ मधे ‘जाहीरनामा’ आणि १९९५ मधे ‘नव्या माणसाचे आगमन.’ ‘ऐसा गा मी ब्रह्म’ची दुसरी आवृत्ती पॉप्युलर प्रकाशनाने काढली. अन्य काव्यसंग्रह पॉप्युलरनेच काढले. 

२०११ मधे ‘सर्व सुर्वे’ या शीर्षकाचं पुस्तक आलेलं आहे. त्यात नारायण सुर्वे यांची समग्र कविता आहे. श्रेयस आवृत्ती आहे. त्या पुस्तकाला प्रकाशक हर्ष भटकळांनी निवेदन जोडलेलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, ‘‘१४५ कविता सुर्व्यांच्या नावावर आहेत. तुलनेनं हे संख्यात्मकदृष्ट्या कमी लेखन आहे. पण १४५ कविता लिहिल्यानंतर मराठी साहित्यात सुर्व्यांना जो लौकिक मिळाला तो अभूतपूर्व आहे.’’

हिंदी-उर्दूशी सलगी असलेला कवी

एक गोष्ट अधोरेखित केली पाहिजे की, संख्यात्मक वाढ महत्त्वाची की गुणवत्ता महत्त्वाची? अर्थातच गुणवत्ता! १९५६ पासून म्हणजे वयाच्या तिशीपासून सुर्वे कविता लिहीत. सुर्व्यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९२६ चा. त्यांचं निधन झालं १६ ऑगस्ट २०१० रोजी. म्हणजे त्यांना ८४ वर्षांचं आयुष्य मिळालं. 

हिंदी आणि उर्दू या दोन भाषा त्यांना अवगत होत्या. उर्दू ते जाणिवपूर्वक शिकले. ते मुंबई महापालिकेत चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी होते. खान नावाचा त्यांचा एक सहकारी होता. त्याच्याकडून सुर्वे उर्दू शिकले. दुसरा एक संदर्भ मला असा माहीत झाला की, खेतवाडी परिसरात प्रगत साहित्यसभा होत असे. कैफी आझमी वैगेरे लोक त्यात असत. उर्दूतील मोठे शायर त्यात येत असत. 

डाव्या विचारांच्या कवी आणि लेखकांचा एक गट होता. खेतवाडी परिसराच्या आजुबाजूला सगळी कामगारवस्ती होती. कामाठीपुरा वगैरे. मुस्लिमबहुल परिसरही होता. त्याचा एक संस्कार सुर्व्यांवर झाला होता. सुर्व्यांवर तसा पाश्चात्य कवींचा प्रभाव नाही. हिंदी कवींचा नाही. सुर्व्यांनी स्वतःची वाट शोधली. आणि अतिशय निष्ठेनं, बांधिलकीनं ते कविता लिहित राहिले.

नेमकं पण ताकदीचं लेखन म्हणजे सुर्वे

१९९५ ला ते परभणीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. तेव्हा त्यांचे एक प्रतिस्पर्धी उमेदवार होते, त्यांनी असे उद्गार काढले की, ‘काय चार-पाच कवितासंग्रह आणि हा माणूस अध्यक्षपदासाठी उभा राहिलाय.’ पण नारायण सुर्वे घसघशीत मतांनी निवडून आले. संग्रहांची गुणवत्ताच महत्त्वाची ठरली. 

तेव्हाही मी लोकमतच्या नागपूर आवृत्तीत एक लेख लिहिला होता. श्रीपाद भालचंद्र जोशी रविवार पुरवणीचे संपादक होते. त्या लेखाला शीर्षक दिलं होतं ‘साठोत्तरी सूर्योदय.’ फार छान लेआऊट करून नेटकेपणाने पहिल्या स्वतंत्र पानावर जोशींनी लेख छापला होता. मी तो लेख सुर्व्यांना पाठवून दिला होता. त्यांचं फार छान पत्र मला आलं होतं.

कविता येते कुठून, हे सुर्वेंनी स्वतःच सांगितलंय

त्यांचे दोन लेखसंग्रह महत्त्वाचे आहेत. पहिला संग्रह आहे, ‘माणूस, कलावंत आणि समाज’ आणि दुसरा लेखसंग्रह आहे, ‘कहाणी कवितेची’. सुर्वे व्यक्ती आणि माणूस म्हणून समजून घ्यायचे असतील किंवा त्यांच्या कवितेची निर्मितीप्रक्रिया समजून घ्यायची असेल तर ही दोन पुस्तके वाचली पाहिजे. 

कविता सुचते कशी? कविता कशी लिहिली जाते? हा निर्मितीव्यवहार कसा असतो? सुर्व्यांनी असे लिहिले आहे, ‘माझे विद्यापीठ ही ७२ ओळींची कविता, चार बंध आहेत. शेवटचा बंध आधी सुचला.’ म्हणजे कवितेचा शेवट त्यांना आधी सुचला. प्रारंभ नंतर सुचला. ‘माझे विद्यापीठ’ हा कवितासंग्रह लिहितांना सुर्व्यांची एक वर्ष दमछाक झाली. 

लक्षात घ्या किती गंभीर निर्मितीव्यवहार आहे हा. ते म्हणतात, ‘त्या एक वर्षानंतर सहा महिने मी लिहू शकलो नाही.’  श्री.पु. भागवतांनी कविता वाचल्यावर त्यांना विचारलं. ‘या कवितेत जी अंतर्गत लय आणि कोलाहल आहे, तो तुम्ही कसा पकडला? ’ सुर्व्यांचं उत्तर होतं, ‘मला डोंबलाचं कळत नाही. तुम्ही जे म्हणताय ना ते मला कळत नाही, पण मी लिहिलं.’ 

सुर्वे यांचं विद्यापीठ असं साकारलं

ती कविता लिहिली तेव्हा ते स्लम एरियात राहायचे. बोगदा चाळ म्हणायचे त्याला. त्यांच्या बाजूच्या एका चाळीत केशव मेश्राम राहायचे. मेश्राम आणि एकदा संध्याकाळी उशीरा नऊ-दहा वाजता त्या झोपडपट्टीच्या परिसरात वाहते गटार आणि नगरपालिकेचे दिवे अशा वातावरणात एका कट्‌ट्यावर बसलेले. त्याठिकाणी नारायण सुर्व्यांनी केशव मेश्राम यांना ‘माझे विद्यापीठ’ आणि ‘सत्य’ या दोन कविता वाचून दाखवल्या. 

मेश्रामांनी या कविता ऐकल्यावर सांगितले, ‘फारच सुंदर कविता आहेत या.’ सुर्वे म्हणाले, ‘आता छापणार कोण? या कविता छापायला मासिकाची किमान दोन पाने जातील.’ मेश्राम म्हणाले, ‘या दोन्ही कविता तुम्ही मला द्या. आमच्या परळच्या महर्षी दयानंद महाविद्यालयात व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून राम पटवर्धन शिकवायला येतात. ते सत्यकथेचे संपादक आहेत. त्यांना मी या कविता देतो.’ 

मेश्रामांनी राम पटवर्धनांना त्या कविता दिल्या. तीन-चार दिवसांनी सुर्व्यांना निरोप आला, ‘सत्यकथेच्या ऑफिसमधे भेटायला या.’ ते गेले भेटायला. सुर्वे हे अतिशय संकोची व्यक्ती होते. सत्शील आणि सज्जन. आपला आब राखून वावरणं, समोरच्याचा सन्मान करणं, कुठलीही टोकाची प्रतिक्रिया न देणं, संयमाने समोरच्याचं ऐकून घेणं, आवश्यक असेल तेव्हा नेमकेपणाने बोलणं हे सुर्व्यांनी कमावलं होतं.  

सुर्वे आणि सत्यकथेचं नातं जुळलं

हे एकदम मिळत नाही तर ते कमवावं लागतं. व्यासंग आणि अनुभव त्यांच्या जवळ होता. ते सत्यकथेच्या कार्यालयात गेले तेव्हा राम पटवर्धन त्यांना म्हणाले, ‘‘तुमच्या दोन्ही कविता आम्ही स्वीकारल्या आहेत. ‘माझे विद्यापीठ’ ही कविता येणाऱ्या सत्यकथेच्या दिवाळी अंकात आणि ‘सत्य’ ही कविता मौजच्या दिवाळी अंकात छापणार आहोत. 

एक तुम्हाला विचारतो, तुमच्या कविता मी वाचल्या आहेत. तुमचा कवितासंग्रह निघालेला आहे. तुम्ही सत्यकथेपासून दूर कसे काय राहिलात?’’ त्या काळातील सत्यकथेचा दबदबा विचारात घेता ही घटना साधारण नाही. 

सुर्व्यांनी त्यांना उत्तर दिलं, ‘अहो, सत्यकथेत जे कवी, लेखक लेखन करतात त्यांच्याबद्दल मला आदर आहे. पण सत्यकथेमधून येणारा लेखनाचा बाज वेगळा आहे, तो माझा नाही. त्यामुळे मी सत्यकथेपासून दूर राहिलो.’ मग पटवर्धन म्हणाले, ‘तुम्ही याच्यावरच एक टिपण लिहून द्या ना. नेमकं काय आहे, गडबड काय आहे, आम्ही कुठं चुकतो आहोत?’ 

सुर्वे म्हणाले, देईन. पण पुढं ते काही झालं नाही. तिथून पुढे सुर्व्यांचे सत्यकथेबरोबर संबंध प्रस्थापित झाले. केशव मेश्रामांनी जर पटवर्धनांना कविता दिल्या नसत्या तर सुर्वे सत्यकथेपासून लांबच राहिले असते असं आपल्याला दिसतं. 

जाती-धर्मापासून लांब असलेले सुर्वे

सुर्व्यांबद्दल आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे, भारतीय समाजव्यवस्थेमधे आपण जन्म घेतो तेव्हा आपली एक मनोरचना आपोआप तयार होते. जात आणि धर्म हा जन्मापासून चिकटतो. नंतर पुढे त्या व्यक्तीची वाटचाल त्याच्या एकूण सामाजिक, कौटुंबिक पर्यावरणाशी संबंधीत असते. 

व्यक्तीची जडणघडण होत जाते तसतसं लक्षात येतं की, हे अदृश्य घटक जडणघडणीत कार्यरत असतात. ते तिच्या नेणिवेमधेपण असतात. फार कमी लोक याच्यातून जाणिवपूर्वक बाहेर पडतात. हे कळतं अनेक लोकांना, पण त्याप्रमाणे जगणं खूप कमी लोकांना जमतं. 

या संदर्भात नारायण सुर्व्यांकडं पाहिलं तर गंगाराम सुर्वे या माणसानं संगोपन केलेला हा मुलगा आहे. जो मुलगा रस्त्यावर सापडलेला, अनाथ आहे. जात-धर्म नावाचा काही मुद्दाच नव्हता. गंगाराम सुर्वे ज्या कोणत्या जाती-धर्माचे असतील तिथे ते वाढले आणि त्यांची जडणघडण झाली. पण सुर्वे बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टींतून बाजूला झालेले दिसतात. 

जे पाहिलं, त्यातून काही तरी सुचत गेलं

कष्टकऱ्यांच्या, गिरणी कामगारांच्या वस्तीत. रस्त्यावर वाढलेला हा मुलगा सकाळी सात वाजता भोंगा सुरू झाला की कामावर जायचं आणि संध्याकाळी घरी यायचं. त्यांनी एका ठिकाणी लिहिलंय की, ‘सगळे कामगार कामगार म्हणून गिरणीमधे जायचे. कष्टकरी कामगार म्हणून काम करायचे. 

पण गिरणीतून सुटल्यावर ते आपापल्या वस्त्यांमधे परत जायचे. ते विषम समाजरचनेत परत यायचे. दिवसभर ते कामगार आहेत आणि जेव्हा ते परततात तेव्हा ते भारतीय विषम समाजरचनेत त्या-त्या जातीत विभागून जातात.’ हा विरोधाभास त्यांनी एका ठिकाणी टिपलेला आहे. 

आपल्याकडे जेव्हा औद्योगिकरण झालं आणि नेहरू पंतप्रधान असताना वेगवेगळे प्रकल्प उभे राहिले, मोठे कारखाने उभे राहिले. तेव्हा असं वाटायला लागलं की, जात नावाचा घटक आता नामशेष होऊन जाईल. पण हे समाधान फार काळ टिकलं नाही. नंतर त्या कामगारांच्या जातीच्या संघटना झाल्या. त्यांच्या जातीच्या वस्त्या झाल्या. म्हणजे जात हा घटक काही सुटला नाही. 

लाल बावटा आणि मार्कसबाबा

सुर्व्यांच्या कवितेमधे हे आलेलं आहे. मी असं मानतो की, सुर्व्यांच्या कवितेतील ही स्टेटमेंटस्‌ आहेत. जातधर्माच्या बाहेर माणूस म्हणून पाहायला पाहिजे. या सगळ्या सामाजिक पर्यावरणात सुर्वे वाढताहेत. त्यांची जडणघडण होत आहे. त्यात कामगार संघटना आहेत. वेगवेगळ्या युनियन आहेत. लाल बावटा आहे. 

कम्युनिस्ट विचारप्रणालीची संघटना आहे. डांगे वगैरे ही मंडळीही होती. साहजिकच नारायण सुर्वे यांच्यावर मार्क्सवादी विचारधारेचा परिणाम झालेला आहे. मार्क्सवादी जाणिवा त्यांच्या कवितेतून व्यक्त झालेल्या आहेत. दिगंबर पाध्येंनी त्यांच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिताना एक फार महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. 

‘सुर्व्यांच्या कवितेची शक्तिस्थळे जशी मार्क्सवादी जाणिवेमुळे दिसतात तशा काही मर्यादा पण आल्यात का?’ त्यांनी पुढे विवेचन करून असं सांगितलं की, ‘त्या मर्यादा दिसत नाहीत, कारण त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी माणूस आहे.’ जिथं माणूस केंद्रस्थानी असतो तिथं मानवी मूल्य असतं. जेव्हा माणूस केंद्रस्थानी असतो तेव्हा जात-धर्म-लिंग-भाषा-प्रदेश आपोआपच बाजूला होतात. 

सच्च्या जीवनानुभवाचा उत्कट आविष्कार

या सगळ्या संग्रहांतील कविता वाचल्यानंतर मला नारायण सुर्वे यांच्या कवितेची काही वैशिष्ट्ये जाणवली, ती सांगतो. पहिलं वैशिष्ट्य होतं, सच्च्या जीवनानुभवाचा उत्कट आविष्कार. कारण त्यांच्या जीवनाची जडणघडण अशी झाली, की जीवनाकडे ते फार गांभीर्यानं पाहायला लागले. असा माणूस पानं-फुलं, निसर्ग यात जगूच शकत नाही. 

ज्याला ‘जगण्याची लढाई’ लढाई रोज करावी लागते. त्याच्याजवळ तेवढा निवांतपणा नाहीये. आयुष्याला एक स्थिरता असावी लागते ती नाहीये. त्याच्यामुळे सातत्याने दमछाक होते. मग त्यांना असं वाटतं की, ‘हा जो माझा जीवनानुभव आहे. शाळेतला असेल, कारखान्यातला असेल, युनियनमधला असेल, सहकाऱ्यांबरोबरचा असेल तोच मला महत्त्वाचा वाटतो. तोच माझा काव्यविषय होऊ शकतो.’

सुर्व्यांच्या कवितेचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्याजवळ एक वैचारिक स्पष्टता आहे. गोंधळ अजिबात नाही. कोणती वैचारिक स्पष्टता? मी कोणासाठी, कशासाठी आणि काय लिहितो आहे याची स्पष्टता. आपण कवी आहोत याची लख्ख जाणीव सुर्व्यांजवळ आहे. मी लेखक आहे. मी कवी आहे. म्हणजे मी कुणीतरी जबाबदार माणूस आहे. म्हणून या भूमिकेतून मी सगळ्या गोष्टी नीटपणे पाहीन. 

कवी असणं ही जबाबदारी आहे

एक प्रसंग सांगतो. नारायण सुर्वे कविता वाचनाला जायचे. अनेक ठिकाणी जायचे. भारतभर फिरायचे. कविसंमेलनामधे ते फार प्रभावीपणे कविता सादरीकरण करायचे. मुंबईला एका युनियनच्या कार्यक्रमासाठी गेले आणि तिथं त्यांनी ‘आई’ नावाची कविता वाचली. दुसऱ्या दिवशी त्या कार्यक्रमाला हजर असलेले दोन कार्यकर्ते सुर्व्यांच्या घरी आले. त्यांनी एक फोटो आणला होता. 

त्या संदर्भात सुर्व्यांनी असं लिहिलं आहे की, ‘‘बोगदा चाळीतच राहात होतो मी. मग आल्याआल्या त्यांना काही कळालं नाही. पूर्ण अंधार होता घरात. थोड्या वेळाने त्यांचे डोळे निवळले आणि मग त्यांना थोडं घरातलं दिसायला लागलं. त्यांना विचारलं, काय काम काढलं.’ ते म्हणाले, ‘काल तुम्ही आईवरची कविता वाचली. खूप छान कविता आहे. आम्हाला ती फार आवडली. आमचा एक कार्यकर्ता होता, त्याचा हा फोटो आहे. हा फोटो आम्हाला कार्यालयात लावायचा आहे. तुम्ही याच्यावर कविता लिहून द्या.’’ 

सुर्वे म्हटले, ‘मला क्षमा करा. मी कविता नाही लिहू शकत.’ मग ते कार्यकर्ते निघून गेले. हे उदाहरण सांगितले याच्यासाठी की, सुर्वे स्वतःला कवी आहे असं मानतात. त्याचा अर्थ, काय लिहिणार ते मी ठरवणार, कोणत्या अमिषाला बळी पडणार नाही. आपण कवी आहोत आणि कवी असणं ही जबाबदारी आहे, असं ते स्वतःला बजावताहेत.  कवी म्हणून गाफिल राहायचंच नाही.

माझी माणसं जसं बोलतात तेच कवितेचे शब्द

सुर्व्यांच्या कवितेचं तिसरं वैशिष्ट्य असं की, त्यांच्या कवितेतील शब्दरचना अचूक, नेमकी आणि अतिशय चोखंदळ स्वरूपाची आहे. शब्दरचनेमधे अजिबात ढिलाई नाही. सुर्वे रचना करताना गोळीबंद करतात, व्यवस्थित. शब्दाचा टाका घालतात. त्यांचे गद्यलेखनही मार्मिक आहे. त्यांची ‘मनीआडर’ नावाची कविता आहे. 

त्या कवितेमधे एक कुटुंबवत्सल वेश्या आहे. तिच्या भावना त्या कवितेत आल्या आहेत. एका मित्राने सुर्व्यांना सांगितले की, तुमची ‘मनीआडर’ कविता फार सुंदर आहे, पण एक चूक तुम्ही केली. काय तर तुम्ही शीर्षक चुकवलं आहे. ‘मनीऑर्डर’ असं पाहिजे ‘मनीआडर’ नाही. 

सुर्वे म्हटले, ‘मी जे शीर्षक दिलं आहे तेच बरोबर आहे. त्याचं कारण माझ्या सभोवताली असलेले लोक व्यवहारातील भाषेत कसं बोलतात तेच मला महत्त्वाचं वाटतं. तुमच्या प्रमाणभाषेत जर ते बोलत नसतील, पुस्तकी भाषेत ते बोलत नसतील तर ते चुकीचं नाहीये. त्यातून त्यांची संवेदना आणि भावना व्यक्त होते. म्हणून ते जर माझ्या कवितेचे नायक असतील किंवा त्यांच्या जीवनासंबंधी मी चित्रण करत असेल तर त्या व्यवहारामधे ते जसं बोलतात तसंच माझ्या कवितेमधे येईल.’ 

स्पष्ट भूमिका यालाच म्हणतात. गोंधळ नाही त्यांच्या मनामधे. ‘तुमचंच नाव लिवा’मधे लिवा असंच म्हटलं त्यांनी, लिहा नाही म्हटलं. किंवा ‘नेहरू गेले त्यावेळची गोष्ट’ ही एक कविता आहे, ‘क्या हुआ है सुन रे, आज लोबन मत जला, नेहरू गये.’ देहविक्रय करणाऱ्या महिला एकमेकांशी बोलताहेत. ती त्यांची भाषा आहे. 

नेहरू गेले तेव्हाची गोष्ट

भाषेतून त्यांची संवेदना आणि भावना व्यक्त होते. ती सुर्वे बरोबर पकडतात. त्यांनी एका ठिकाणी लिहिलंय, ‘नेहरू गेल्याची बातमी आली संध्याकाळी रेडिओवर तर मी बेचैन मनाने फिरत होतो. अत्यंत अस्वस्थ झालो.’ नेहरूंबद्दल त्या पिढीच्या मनात आदरभाव होता. ते अंधभक्त नव्हते. स्वातंत्र्यानंतर नेहरूंनी पंतप्रधान म्हणून देशाची जी जडणघडण केली त्याचे ते साक्षीदार होते. 

‘पोस्टर’ नावाची कविता आहे बघा. इसल्या, सलीम वगैरे चार पोरं आहेत त्या कवितेत. पोस्टर घेऊन फिरतात ते. नेहरूंच्या जाहीर सभा असतील तेव्हा रात्री ही मुलं पोस्टर लावत फिरायची. त्या कवितेत एक संवाद आहे. एकजण दुसऱ्याला म्हणतो, ‘त्या खिडकीपाशी नको रे डकवू’ दुसरा म्हणतो, ‘कैकु रे’. मग तो म्हणतो, ‘उसकी मैना रहती है ना उधर, सबकी नजर लगेगी तो वांदा’. आता हे जे काही निरीक्षण आहे, सर्वसामान्य वस्तीतल्या लोकांचं आहे, ते फारच ग्रेट आहे. तुम्ही जमीन पकडून असाल तरच हे दिसतं अन्यथा नाही दिसत ते.

पुस्तकांच्या कपाटात स्फूर्ती शोधली नाही

चौथे वैशिष्ट्य जाणवतं त्यांच्या कवितेचं. त्यांनी त्यांच्या समकालातून प्रेरणा घेतली. डोळस निरीक्षण केलं आणि सखोल चिंतन केलं. त्यांच्या ‘ऐसा गा मी ब्रह्म’ या पहिल्या कवितासंग्रहाला कवी कुसुमाग्रज यांनी प्रस्तावना लिहिली. त्या प्रस्तावनेमधे एक वाक्य आहे. ‘सुर्व्यांनी पुस्तकांच्या कपाटात लेखनाची स्फूर्ती शोधली नाही.’ 

कुसुमाग्रजांनी सुर्व्यांच्या कवितेची निर्मितीप्रेरणा सांगितली. जीवनातला जो झगडा आहे, लढाई आहे, संघर्ष आहे तो त्यांनी पाहिला आणि जीवनाला ते भिडले. आयुष्याला भिडणारा माणूस, त्याच्याशी दोन हात करणारा माणूस. जे काही त्याला अनुभवातून मिळतं, ते त्यांनी कवितेतून मांडलं. 

वाचकाला कविता त्याची वाटली, हे केवढं मोठं यश

सुर्व्यांची कविता सशक्त कविता का आहे? ती अनेक लोकांना आपली कविता का वाटते? कष्टकऱ्यांना, कामगारांना ती आपली कविता का वाटते? तर ते समष्टीचं जगणं आहे, समुहाचं जगणं आहे. त्या सगळ्यांचं जगणं एकजण शब्दांतून मांडतोय आणि सगळे म्हणतात, अरे हे तर माझंच जगणं आहे. ते ‘मनीआडर’ कविता कविसंमेलनांमधून वाचायचे. 

ग्रंथालीची ‘अभिनव वाचक चळवळ’ होती. त्यात अरूण साधू, कुमार केतकर वगैरे मंडळीही होती. ते सोलापुरला गेले. तिथला कार्यक्रम झाल्यावर ते बार्शीला गेले. बार्शीजवळ एक छोटं गाव आहे. त्या गावाचं नाव वैराट. गावातील शाळेत कविसंमेलन भरलेलं होतं. तिथं सुर्व्यांनी ‘मनीआडर’ ही कविता वाचली. कार्यक्रम संपल्यावर काही महिला आणि मुलं सुर्व्यांना भेटायला आले. 

ते म्हणाले, ‘ओ साहेब, ही कविता कुठून आणली तुम्ही. ती आमची कविता आहे. ही पोरं आहे ना त्यांच्या आया मुंबईला आहेत. त्यांची मनीआर्डर येते.’ सुर्वे एकदम थरारून गेले. सुर्व्यांनी लिहिलंय, ‘मुंबई महापालिकेच्या शाळेत शिपाई म्हणून मी काम करायचो तेव्हा पालिकेची परिपत्रकं सगळ्या शाळांना द्यावी लागायची. 

कवितेचं नाटक व्हावं, असं पहिल्यांदाच घडलं

तेव्हा जिने चढून जाऊन मुख्याध्यापकाला ते द्यावे लागायचे. पोस्टाने पाठवण्यापेक्षा, तेव्हा पोस्टात पाच पैसे तिकीट होतं. ते पाच पैसे वाचवण्यासाठी किंवा दोन-तीन दिवसांनी ते पत्र मिळेल म्हणून वेळ वाचवण्यासाठी शिपायांमार्फत ती पत्रं वाटली जायची. ती पत्रं वाटत फिरत असताना मी वेगवेगळ्या वस्त्यांमधे जायचो. वेगवेगळे मोहल्ले बघायचो. त्यात मला ही माणसं दिसायची. 

तिथल्या पोस्ट ऑफिसमधे सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत या देहविक्रय करणाऱ्या महिला असायच्या आणि लिहिणारे  वेंडर लोक वगैरे असायचे. त्यांना त्या सांगायच्या पत्र लिहायला.’ तर सुर्वे जे जे अनुभव घेतात त्याचं एक चिंतन करतात आणि आपल्या मनाच्या तळाशी ते ठेवतात आणि त्याचा आविष्कार आपल्या कवितेतून करतात. 

त्यांच्या कवितेवर नाट्यप्रयोग झाले. ‘मनीआडर’, ‘पोस्टर’, ‘आई’,  ‘चार शब्द’, ‘शिगवाला’, ‘कार्ल मार्क्स’, ‘माझे विद्यापीठ’, ‘थरकू नकोस’ इत्यादी कवितांवर हे प्रयोग झाले होते. विजय तेंडुलकरांनी एक प्रयोग पाहिला होता. ते म्हणाले, ‘भारतातला हा पहिला प्रयोग आहे, कुणाच्या तरी कवितेवर नाट्यप्रयोग होतो आहे.’ 

सुर्वेंना माणसं कशी भेटत जातात?

पुढचं निरीक्षण माझं असं आहे, सुर्व्यांच्या कवितेत व्यक्तिचित्रं येतात, ती रूढार्थाने व्यक्तिपरिचय म्हणून येत नाहीत. तर ती एकदम सुर्व्यांच्या पद्धतीने येतात. सुर्वे त्यांच्याकडे कसे बघतात? ‘कार्ल मार्क्स’, ‘माझी आई’, ‘मर्ढेकरांशी एक बातचित’, ‘पोर्टरची स्वगते’.

रेल्वेमधे चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी असतात पोर्टर, म्हणजे झेंडा दाखवणारे किंवा पडेल ते काम करणारे. स्टेशनमास्तर त्यांना कामे सांगतात. सुर्वे जेव्हा उमेदीच्या वयात दादर स्टेशनवर बुक्स स्टॉलवर पेपर विकणाऱ्या पोऱ्याचं काम करायचे तेव्हा त्यांनी हे प्रत्यक्ष पाहिलं आहे. पोर्टर ही कविता वाचताना मी थोडासा अडखळलो. 

सुर्व्यांनी पोर्टरची स्वगते कशी काय लिहिली असावी? हा प्रश्न मला पडला. कारण विषय एकदम वेगळा आहे. रेल्वेशी ज्याचा संबंध येतो किंवा स्टेशन मास्तरचं कार्यालय ज्याला माहिती आहे त्यालाच हे कळतं. आणि मी का अडखळलो तर हे मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. कारण माझे वडील रेल्वेमधे स्टेशन मास्तर होते. 

रेल्वे स्टेशनातल्या पोर्टरचा अनुभव सुर्वेंनाच कळला

स्टेशन मास्तरांचे बंगले स्टेशनच्याजवळच असायचे. त्यांचे सगळे कर्मचारी, हाताखालची माणसं, पोर्टर वगैरे त्या बंगल्याच्या आसपासच्या खोल्यांमधे राहायची. तेव्हा वीज नव्हती. रस्त्यावर सिगनलमधे प्रत्यक्ष दिवे लावायला लागायचे. 

पोर्टर जे जे बोलतो ते आपल्याला माहिती आहे, ते सुर्व्यांना कसं काय माहिती आहे असं मला वाटलं. ते तर कामगार वस्तीत राहायला होते.  पण मी शोध घेतला तेव्हा लक्षात आलं की, सुर्वे दादरच्या स्टेशनवर पुस्तक विक्रेत्याकडे पेपर विकणारा पोरगा म्हणून काम करीत होते. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांशी त्यांचा संबंध येत होता. त्यामुळेच पोर्टरशी संबंध आला आणि त्या अनुभवावर त्यांनी भाष्य केलं. तर आपला प्रत्येक अनुभव हा मौलिकच आहे. महत्त्वाचाच आहे, तो दुर्लक्षित करण्यासारखा नाही. ही दृष्टी सुर्व्यांजवळ होती. 

लक्षात घ्या सामान्य माणसाचा जीवनानुभव हा जसा सामान्य असू शकतो तसा तो असामान्यदेखील असू शकतो. तुम्ही त्याच्याकडे कसं पाहता त्याच्यावर ते ठरतं. आणि सुर्वे कवी असल्यामुळे, आपल्या अनुभवाकडे पोएटिक नजरेने पाहतात. त्यांना त्यामधे काव्य दिसते. त्या अनुभवातलं काव्य ते बरोबर हेरतात आणि त्याची कविता म्हणून मांडणी करतात.

माणसावरच्या निष्ठेनं केलेलं लेखन

पुढचं निरीक्षण असं आहे की, स्त्री-पुरूष प्रीतीसंबंधी त्यांनी एका कवितेत भाष्य केलं आहे. पण रूढार्थाने ती प्रेमकविता नाही. त्यात सहजीवन, परस्पर सामंजस्य यांवर भाष्य केले आहे. ‘गलबलून जातो तेव्हा’ किंवा ‘सत्य’ तसेच ‘येतेस दमून’ या कवितांमधे हे आपल्याला दिसतं. 

सुर्व्यांनी स्वतःच्या कवितेवर दोन ओळींचं भाष्य केलं आहे ते असं- ‘इतर समकालीन कवींच्या तुलनेत मी भरपूर प्रमाणात काव्यलेखन केलं नाही. जे काही थोडंफार लेखन केलं ते कवितेवरच्या आणि माणसावरच्या निष्ठेनं केलं.’ सुर्वे स्वतःच सांगतात, माझ्या निर्मितीची प्रेरणा काय? आणि अभ्यासकांची सोय करून ठेवतात. 

एका ठिकाणी ते म्हणतात, ‘मी सगळं जाहीरच करून टाकलं होतं की, मी अनाथ आहे. रस्त्यावर सापडलेला आहे. गंगाराम सुर्व्यांनी मला सांभाळलेलं आहे. आता हा तुमचा विषय झाला. माझ्या बाजूने काही नाही.’

तरीही, जाता नाही ती जात 

नारायण सुर्व्यांच्या मुलासाठी कुसुमाग्रजांनी स्थळ शोधलं तेव्हा ते सुर्व्यांना म्हणाले, ‘नारायणराव तुमच्या मुलासाठी मी स्थळ शोधलं आहे. बघा तुमचं काय म्हणणं आहे.’  सुर्वे म्हणाले, ‘पण तात्या आताच्या नव्या पिढीचा काय भरोसा नाही. त्याने काही ठरवलं असेल तर ते बघावं लागेल.’ त्यांनी मुलाला विचारलं, ‘तात्यांनी स्थळ आणलंय. तुझं काही म्हणणं असेल तर सांग.’ मुलगा म्हटला, ‘तात्यांनी स्थळ आणलं म्हटल्यावर करून टाकू. माझं काही म्हणणं नाही.’  ते सगळे तात्यांकडं गेले. 

चर्चा करून रजिस्टर पद्धतीनं लग्न करायचं ठरलं. सावंत नावाच्या बाई होत्या, त्यांची मुलगी होती. त्या म्हणाल्या, ‘आम्हाला कुणी विचारलं तर नारायण सुर्व्यांबद्दल काय सांगायचं?’ कुसुमाग्रज म्हटले, ‘मला नाही कळालं तुम्हाला काय म्हणायचं ते.’ त्या म्हणाल्या, ‘नारायण सुर्वे यांची जात कोणती हे जर आम्हाला कुणी विचारलं तर काय सांगायचं?’ 

कुसुमाग्रज एकदम ताडकन म्हणाले, ‘तुम्ही सांगा तो माझा दत्तक मुलगा आहे म्हणून. काय होईल पुढं ते बघू आपण. त्याची जबाबदारी मी घेतो.’ मग ते लग्न झालं. म्हणजे या सगळ्या व्यवस्थेमधे तुम्ही तुमच्या बाजूने खूप प्रामाणिक असूनही व्यवस्था कशी काम करीत असते? कसे प्रश्न उपस्थित करीत असते? 

मास्तरांची उंची, सुर्वे मास्तरांच्या शब्दांना

ज्या प्रश्नांपासून आपण दूर जाण्याचा प्रयत्न करतो, जी गोष्ट आपल्याला नको आहे, जी गोष्ट आपल्याला आवडत नाही तीच गोष्ट पुनःपुन्हा समोर येते. हे सुर्व्यांनी कवितेतून मांडलेलं आहे. म्हणून नारायण सुर्वे या कवीचं जगणं आणि कवितेचं घट्ट नातं आहे. ते त्यांच्या कवितेतून आपल्याला दिसतं. म्हणून नारायण सुर्व्यांची कविता ही जनसामान्यांची कविता झाली. कष्टकऱ्यांची कविता झाली.

जातिधर्माच्या पलीकडच्या माणसांची कविता झाली. देहविक्रय करणाऱ्या बाईचं मन ते उलगडून दाखवताहेत. देहविक्रय करणाऱ्या महिलेला माहीत नाहीये तिच्या अपत्याचा बाप कोण आहे ते. ‘तुमचंच नाव लिवा’ असं ती मास्तरला म्हणते. मास्तरवर किती भरोसा. 

मास्तरचं स्थान काय. ‘तुमचंच नाव लिवा’ असं जेव्हा ती म्हणजे, तेव्हा काय उंचीची माणसं त्यांच्या कवितेमधे भेटतात. त्यांच्या कवितेमधे उंचीची माणसं येतात, नायक येतात, नायिका येतात. त्याचं कारण खुद्द नारायण सुर्वे यांची उंची फार मोठी होती.

शब्दांकन : सिद्धार्थ लांडे

(मनोहर जाधव यांनी पुणे येथील रसिक मित्र मंडळातर्फे २५ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित ‘नारायण सुर्वे आणि त्यांची कविता’ या व्याख्यानाचे हे शब्दांकन आहे. साप्ताहिक साधनामधून साभार)

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

जुन्या संसद भवनाचा इतिहास जपला गेला पाहिजे!

प्रतिष्ठित, ऐतिहासिक आणि अनेक घडामोडींचा साक्षीदार असलेल्या संसद भवनातील कामकाज नव्या भवनात स्थानांतरित करताना माझ्या मनात भावनांची गर्दी…
संपूर्ण लेख

प्राचार्य मदन धनकर नावाचा विदर्भातील कर्ता लेखक

पुरुषोत्तम हरीभाऊ धनकर हे नाव फार लोकांना माहीत नसले, तरी त्यांचं प्राचार्य मदन धनकर हे विदर्भातील सर्वज्ञात असं…
संपूर्ण लेख

ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दप्रतिभेचा गणपती बाप्पा

‘ॐ नमो जी आद्या। वेदप्रतिपाद्या।  जयजय स्वसंवेद्या। आत्मरूपा।।’ अशा प्रकारे ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायाच्या पहिल्याच ओवीत ज्ञानदेवांनी आद्य अशा…
संपूर्ण लेख

पर्यावरणपूरक विसर्जन हाच योग्य पर्याय

पावसाळ्यात निसर्गानं सर्वत्र हिरवीगार उधळण केलेली असताना, निसर्गातील दुर्वा-फुलांनी, त्याच निसर्गातील मातीच्या गणपतीची पूजा करणं, म्हणजे गणेशोत्सव. त्यातही…
संपूर्ण लेख

नव्या पिढीनं संतांकडं कसं पाहावं? हे शिकवणारं रिंगण

रिंगण नावाचं एक वारकरी संतांवर निघणारं वार्षिक आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल मंदिरात प्रकाशित होत असतं.  पत्रकार सचिन परब…
संपूर्ण लेख

ना.धों.महानोर : शेतकऱ्यांचा शब्द पेरणारा कार्यकर्ता

पोराबाळांच्या डोळ्यात, आर्त आसू रूखे सुखे दुखान्तात गणगोत, पार झालेले पारखे खेडोपाडी मोडलेल्या, कुणब्यांना गर्भवास तुका उडून जाताना,…