भारतीय हॉकीसाठी आता मिशन पॅरिस ऑलिम्पिक

सामना कोणताही असो, तो ज्याप्रमाणे एखाद्या मैदानात खेळला जातो, त्याचप्रमाणे ‘माईंड गेम’मधूनही खेळला जातो. फरक इतकाच असतो की मैदानातला खेळ दिसतो आणि ‘माईंड गेम’ तसा थेट दिसत नाही. तो फक्त ज्या-त्या संघातील खेळाडूंच्या बॉडी लँग्वेजमधून झळकतो. अशा खेळाडूंना परिणामांची पर्वा असत नाही. कारण, ते एकाच ध्येयाने पछाडलेले असतात, संघाला कोणत्याही परिस्थितीत वर्चस्व प्रस्थापित करुन देणे!  

अलीकडेच संपन्न झालेल्या आशियाई चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने याचीच प्रचिती दिली. कर्णधार हरमनप्रीत असेल, गुर्जंत सिंग असेल किंवा सुमीत! किती नावे सांगावीत? साम्य इतकेच यातील प्रत्येक जण संघाला कोणत्याही परिस्थितीत वर्चस्व प्रस्थापित करुन देण्याच्या एकमेव ध्येयाने पछाडलेला होता.

जपानविरुद्ध सुमीतचं धडाकेबाज गणित

जपानविरुद्ध उपांत्य सामन्यात सुमीतने केलेला धडाकेबाज गोल अवघ्या भारतीय हॉकीला स्फूरण देणारा होता. सुमीत त्यावेळी राईट-आऊट पोझिशनवरुन इतक्या चपळाईने मनप्रीतचा पास घेऊन पुढे गेला की, प्रतिस्पर्धी जापनीज खेळाडूंना क्षणभर काय होते आहे, याचेही भान राहिले नाही. सुमीतने चेंडूचा ताबा घेत बेसलाईनवरुन मुसंडी मारत शेवटचा फटका इतक्या ताकदीने हाणला की, जपानच्या बचाव फळीसमोर त्यावेळी क्षणभर जागेवरच स्तब्ध उभे राहण्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नव्हता.

वास्तविक, जापनीज गोलरक्षक जवळपास पूर्ण गोलपोस्ट कव्हर केल्याप्रमाणे आ वासून उभा होता. पण, सुमीतचे बुलंद इरादे रोखण्याची त्या गोलरक्षकाकडेही ताकद नव्हती. सुमीतेने रिव्हर्स स्टीकने फ्लिक केलेला फटका गोलपोस्टमधे केव्हा विसावला, हे कोणालाच कळाले नाही. 

आता सुमीतने हा गोल करताना कोणतीही जादूची कांडी अजिबात फिरवली नव्हती. पण, मैदानात कोण कुठे तैनात आहे आणि यातून गोलपोस्टपर्यंत कशी मुसंडी मारायची, याचे गणित त्याच्या मनात जणू एखाद्या मायक्रो सेकंदात तयार झाले होते.

‘डिफेंड टू प्ले’ नंतर ‘फुल्ल प्रेस’

सुमीतने गोलजाळ्याचा बेधडक पण अचूक वेध घेतला, त्यावेळी भारताने एव्हाना ३-० अशी एकतर्फी बाजी मारली होती. मलेशियाविरुद्ध फायनलमधे मात्र जणू आपले तोंडचे पाणी पळणं बाकी होते. पहिल्या ३० मिनिटानंतर भारतीय संघ १-३ फरकाने पिछाडीवर होता. मलेशियाने यावेळी वेळकाढूपणाचा बचावात्मक पवित्रा स्वीकारला असता तरी ते त्यांच्यासाठी जेतेपदावर आपली मोहोर उमटवण्यासाठी पुरेसे ठरु शकले असते. 

तोवर, भारतीय खेळाडूंनी क्रेग फुल्टन यांचा ‘डिफेंड टू प्ले’ हा मंत्र अगदी उराशी बाळगला होता. हा प्लॅन ए होता. पण, पहिल्या ३० मिनिटांचा खेळ झालेला असताना आणि १-३ अशा फरकाने पिछाडीवर असताना प्लॅन बीची गरज होती आणि तो प्लॅन बी होता, पारंपरिक स्वरुपाचा फुल्ल प्रेस.

फुल्ल प्रेस याचा थोडक्यात अर्थ असा की, आहे त्या सर्व ताकदीनिशी प्रतिस्पर्ध्यावर प्रत्येक कानाकोपऱ्यातून अक्षरश: तुटून पडायचे.  भारताने पहिली ३० मिनिटे पिछाडीत घालवल्यानंतर फिटनेस मंत्राच जणू त्यांच्या मदतीला धावून आला आणि त्यांनी याच बळावर जोरदार मुसंडी मारली.

खेळ मैदानावरचा आणि खेळ डोक्यातला

भारतीय हॉकीपटू आता कधी नव्हे इतके तंदुरुस्त तर आहेतच. पण, त्याही शिवाय ते मनौधैर्य खंबीर राहील, यावरही ते पुरेपूर भर देत आले आहेत. भारतीय हॉकी व्यवस्थापन पॅडी उप्टन यांना हॉकी संघाचे सायकॉलॉजिस्ट म्हणून नियुक्त करते, यातच सारे काही आलं.  खेळात मन खंबीर असण्याचा खूप मोठा फरक पडतो. 

शेवटच्या क्षणापर्यंत झुंजणारे खेळाडू आणि मैदानात उतरण्यापूर्वीच खांदे टाकलेले खेळाडू यातील फरक हा त्यांच्या देहबोलीतूनच ओळखता येण्यासारखा असतो. आजकाल प्रत्येक खेळ टेक्नोसेव्ही झाला आहे आणि हॉकीही त्याला अपवाद असण्याचे कारण नाही. 

सर्व खेळाडूंचा डाटा, त्यांचे स्वॅट नॅलिसिस, त्यांचे कौशल्य, त्यांच्या उणीवा हे सारे काही आता एका क्लिकवर स्क्रीनवर येऊ शकते. पण, ज्या त्या खेळाडूने मिळालेल्या संधीचे सोने करण्याची कल्पकता एखाद दुसर्‍या मायक्रो सेकंदात प्रत्यक्षात उतरवली तर यापेक्षा आणखी वेगळे करण्याची काहीच आवश्यकता शिल्लक राहण्याचे कारण नाही.

भारताच्या स्पर्धेतील विजयावर शिक्कामोर्तब

मलेशियन संघाविरुद्ध पहिल्या ३० मिनिटांचा अपवाद वगळून देऊ. पण, त्यानंतर अगदी प्रत्येक ३० सेकंदाला त्यांचा खेळ कसा बहरत गेला, हे कोणत्याही हॉकी मास्टर माईंडसाठीही आदर्शवत ठरावे. भारतीय हॉकीपटूंनी यावेळी इतका वेगवान व अचूक खेळ केला की, त्यानंतर सातत्याने दडपणाखाली रहावे लागलेल्या मलेशियन खेळाडूंकडून त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा चुका होतच राहिल्या.

हरमनप्रीतने पेनल्टीवर गोलजाळ्याचा अचूक वेध घेतला तर गुर्जंतने मैदानी गोलने प्रतिस्पर्ध्यांना विस्मयचकित करुन टाकले. एकवेळ ३-१ अशा फरकाने आघाडीवर असलेल्या, पण, त्यानंतर काहीच मिनिटात ३-३ अशा बरोबरीवर यावे लागलेल्या मलेशियन संघासमोर यावेळी बचावात्मक पवित्र्यावर जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण, कधी कधी बचावच असा बुमरँगप्रमाणे उलटून येतो, होते नव्हते, ते सारे उदध्वस्त करुन जातो.

अति बचाव म्हणजे एक प्रकारे गरम दुधाने जीभ पोळल्यानंतर ताकही फुंकून पिणे. मलेशियाला नेमका असाच अनुभव आला. त्यांनी ताकही फुंकून प्याले. अति बचावाच्या प्रयत्नात त्यांच्या मर्यादा चव्हाट्यावर आल्या आणि ५६ व्या मिनिटाला आकाशदीप सिंगने अप्रतिम गोल नोंदवत भारताच्या स्पर्धेतील सर्वात सनसनाटी विजयावर शिक्कामोर्तब करुन दिले.

आक्रमण आणि बचाव यांचा उत्तम मिलाफ

भारताचे माजी प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनी भारताला मलेशियाविरुद्ध विशेषत: पेनल्टी कॉर्नरवर अधिक दक्ष रहावे लागेल, असे १४ हजार किलोमीटरवरुन बजावून सांगितले होते. नेमके तेच घडले. मलेशियाचे ३ पैकी दोन गोल पेनल्टी कॉर्नरवरील होते. हरेंद्र सिंग नेहमी म्हणायचे, ‘आक्रमकता सामना जिंकून देते, बचावात्मकता चॅम्पियशिप जिंकून देते’

आक्रमण आणि बचाव यांचा उत्तम मिलाफ साधणार्‍या भारतासाठी हे तंतोतंत खरे ठरले. वास्तविक, मलेशियाचा संघही तोडीस तोड प्रत्युत्तर देण्याच्या प्रयत्नात होता. पण, त्यांच्याकडून चूक अशी झाली की, ज्यावेळी आक्रमकतेवर भर देण्याची गरज होती, त्यावेळी त्यांनी बचावात्मकतेचे बटण दाबले आणि भारतीय खेळाडूंनी या चुकीचा लाभ घेण्यात किंचीतही कसर सोडली नाही.

भारताच्या या विजयाने दोन बाबी अधोरेखित झाल्या. पहिली बाब अशी की, भारत फिटनेसच्या आघाडीवर आता कमी पडत नाही आणि दुसरी बाब अशी की, प्लॅन ए यशस्वी ठरत नसल्यास प्लॅन बी अंमलात आणून तो यशस्वी करुन दाखवण्याची जिगरही संघात ठासून भरलेली आहे.

वेध पॅरिस ऑलिंपिकचेच!

भारतीय संघ यानिमित्ताने युरोपियन हॉकी-ऑस्ट्रेलियन हॉकी आणि आपली हॉकी यातील तफावत भरुन काढण्यासाठी वेगाने यशस्वी ठरतो आहे, हे देखील अधोरेखित होते आहे. यापूर्वी २०१० व २०१८ आशियाई उपांत्य फेरीत भारताला मलेशियाविरुद्ध नामुष्कीजनक पराभव पत्करावे लागले, त्यावेळी भारताची फिटनेसच्या आघाडीवर पिछेहाट झाली होती. पण, आता आपल्या खेळाडूंनी कात टाकली आहे, हेच यंदाच्या आशियाई स्पर्धेतील जेतेपदाने अधोरेखित केले आहे.

तूर्तास, ही स्पर्धा आशियाई खंडातील होती आणि आशियात फिटनेसच्या निकषावर आपल्या जवळपास कोणी नाही, हे भारताने अप्रत्यक्षरित्या अधोरेखित केले आहे. मात्र, यानंतर ऑलिम्पिकसारख्या सर्वोच्च व्यासपीठावर ऑस्ट्रेलियन्स, युरोपियन्स सारेच तयारीने उतरतील, त्यावेळी भारताच्या या ‘फिटनेस मंत्रा’ची खरी कसोटी लागणार आहे. 

आपल्या सुदैवाने हॉकीतील सारे गतवैभव आपल्या साक्षीला आहे आणि अलीकडील कालावधीत आपण विविध आघाड्यांवर केलेली प्रगती देखील परस्परपूरक ठरते आहे. गरज आहे ती अशा प्रयत्नात सातत्य राखण्याची. सरतेशेवटी आपले पुढील लक्ष्य एकच असेल ते म्हणजे २०२४ चं पॅरिस ऑलिम्पिक!

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

पर्यंटकांच्या गर्दीला युरोप नाही म्हणतंय, भारताचं काय?

कधी कधी स्वत:वर, तर कधी परिस्थितीवर रडावसं वाटतं. ज्या ठिकाणी आपण आनंद घेण्यासाठी जातो त्या सर्व ठिकाणांची आजची…
संपूर्ण लेख

शाहरुखचा ‘जवान’ हिट का झाला?

२०१७ मधे शाहरुखचा ‘रईस’ रिलीज झाला. एक चांगला ऍक्शन सिनेमा असूनही पायरसीचा फटका बसल्याने ‘रईस’ला म्हणावा तसा नफा…
संपूर्ण लेख

भारतांनं चंद्रमोहिमेतून नक्की काय साधलं?

भारताचं चांद्रयान-३ ठरलेल्या दिवशी, नियोजित वेळी आणि निश्चित केलेल्या जागी चंद्राच्या भूमीवर उतरलं आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं…
संपूर्ण लेख

आशा भोसले : फक्त ९० वर्षांचा हिरवागार स्वरऋतू!

कल्पना करा, तुम्ही कोणत्या तरी कारणानं अत्यंत अस्वस्थ आहात, बैचेन आहात. मन लागत नाही आणि तितक्यात एक गाणं…
संपूर्ण लेख

‘एआय’मुळे फेक कंटेंटवाल्यांचा बाजार जोरात!

जगभरातील माणसं काय विचार करतात हे त्यांना काय माहिती मिळते, त्यावर ठरतं. ते जो विचार करतात तशी खरेदी…
संपूर्ण लेख

गांधीजींच्या शेवटच्या माणसाचा शोध घेणारी दोन पुस्तकं!

१९४० च्या दशकात महात्मा गांधी यांनी वैयक्तिक सत्याग्रह मोहिमेसाठी विनोबा भावे यांची पहिला लढवय्या म्हणून निवड केली. दुसरे…