चंद्रावर भारताचं सॉफ्टलँडिंग यशस्वी झाल्यानंतर साऱ्या देशात फक्त चंद्रविजयाचाच माहोल होता. तरीही या सगळ्या जल्लोषातही देशातील कोट्यवधींच लक्ष अझरबैजानकडे लागलं होतं. रमेशबाबू प्रज्ञानंद नावाचा भारताचा १८ वर्षाचा बुद्धिबळपटू, जगातील अव्वल खेळाडू असलेल्या मॅप्स कार्लसनला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आव्हान देत होता.
पहिल्या आणि बुधवारी दुसऱया क्लासिकल फेरीत बरोबरी करून त्यांनं कार्लसनला कोंडीत पकडलं होतं. आता निकाल टायब्रेकरने ठरणार होता. चंद्रविजयासोबत हेही यश मिळालं, तर भारतात दुहेरी जल्लोष झाला असता. पण तसं झालं नाही. बुद्धिबळाचा फिडे विश्वचषक जिंकण्याचे प्रज्ञानंदचं आणि देशाचंही स्वप्न ‘या वर्षासाठी’ भंगलं. पण त्याचं वय पाहता, त्याचं इथपर्यंत पोहचणंही जग जिंकण्यापेक्षा कमी नाही.
टीव्हीचं वेड कमी करण्यासाठी बुद्धिबळ
प्रज्ञानंदची बहीण वैशाली हिला अति टीव्ही पाहण्याची सवय होती. ती सवय मोडून काढण्यासाठी आई-वडिलांनी तिला बुद्धिबळाकडे वळवले. तिच्यासोबत तिचा लहान भाऊ प्रज्ञानंदही बुद्धिबळाच्या क्लासला जाऊ लागला. पुढे या बहीण-भावांना ‘चेस गुरुकुल’ या चेन्नईतील नामवंत अकादमीत प्रवेश मिळाला. या सगळ्यामुळे प्रज्ञानंद बुद्धिबळाकडं वळला आणि बुद्धिबळाचाच झाला.
प्रज्ञानंदचा प्रशिक्षक आर. बी. रमेश हे स्वत: उत्तम ग्रॅण्डमास्टर होते. पण त्यांनी पूर्णपणे प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाला वाहून घेतले. भारतीय ऑलिम्पियाड संघाचाही ते प्रशिक्षक म्हणून काम पाहतात ते सांगतात की, प्रज्ञानंदची एकाग्रता पाहून मला कधी कधी भीती वाटते. जेव्हा त्याची सर्वात लहान ग्रॅण्डमास्टर बनण्याची संधी हुकली होती, त्यावेळी मी अस्वस्थ झालो. पण त्यानं साधा खेदही व्यक्त केला नाही.
एवढ्या लहानपणात त्यांनी कमालीची प्रगल्भता कमावली आहे. हे त्याच्या आईवडलांची आणि त्याचं फार मोठं यश आहे. स्पर्धा, प्रतिस्पर्धी, विक्रम यांचे कोणतेही दडपण न घेता तो अत्यंत आक्रमक खेळतो. नवनवीन ओपनिंग, व्यूहरचना चटकन आत्मसात करतो. या सगळ्यामुळेच आज तो एवढ्या लहानपणीच जग्गजेता होण्याचं स्वप्न पाहू शकतोय.
१२ व्या वर्षी तो ग्रँडमास्टर झाला
प्रज्ञानंदा हा भारतातील तामिळनाडूचा रहिवासी आहे. त्याचा जन्म १० ऑगस्ट २००५ रोजी चेन्नई येथे झाला. त्याचे वडील रमेशबाबू तामिळनाडू स्टेट कॉर्पोरेशन बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून काम करतात, तर आई नागलक्ष्मी गृहिणी आहेत. प्रज्ञानंद २०१६ मध्ये वयाच्या १० व्या वर्षी सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ मास्टर बनला.
२०१८ हे वर्ष प्रज्ञानंदसाठी खास होते. वयाच्या १२ व्या वर्षी तो ग्रँडमास्टर झाला. देशातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर होण्याचा बहुमान त्याच्या नावावर आहे. विश्वनाथन आनंद वयाच्या १८ व्या वर्षी ग्रँडमास्टर बनले होते. तर प्रज्ञानंद जगातील दुसरा सर्वात तरुण ग्रँडमास्टर ठरला. याबाबतीत युक्रेनचा सर्जी क्राजाकिन त्याच्या पुढे आहे. १९९० मध्ये वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी तो ग्रँडमास्टर बनला होता.
‘फिडे वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप स्पर्धेतील उपांत्य फेरीत प्रज्ञानंदने जागतिक क्रमवारीत तिसर्या क्रमांकावर असलेल्या फॅबियानो कारुआनाचा पराभव केला होता. यानंतर त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या. तब्बल २२ वर्षांनंतर वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत घडक मारणारा तो भारताचा दुसरा बुद्धिबळपटू ठरला होता. यापूर्वी विश्वनाथ आनंदने २००० आणि २००२ मधे या स्पर्धेतील अंतिम फेरीत धडक मारली होती.
प्रज्ञानंदच्या पाठीशी त्याचं कुटुंब उभं
प्रज्ञानंदच्या यशात त्याच्या कुटुंब आणि विशेषकरून आईचा मोठा वाटा आहे. प्रज्ञानंदच्या वडलांना पोलिओची लागण होऊनही त्यांनी हिंमत न हारता, कसं जगायचं हे मुलांना शिकवलं. बुद्धिबळाच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्याची आई त्याला अनेक ठिकाणी घेऊन जायची. मुलगी वैशाली आणि मुलगा प्रज्ञानंद यांना बुद्धिबळात विशेष प्रावीण्य मिळविण्यासाठी तिची प्रेरणा महत्त्वपूर्ण ठरली.
प्रज्ञानंद सुरुवातीला सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत बुद्धिबळाच्या प्रशिक्षणासाठी जात होता. यानंतर घरी आल्यावर तो आईसह होमवर्क पूर्ण करायचा. त्याची बहीण वैशालीही उत्तम बुद्धिबळ खेळते. त्यामुळेच प्रज्ञानंदने जेव्हा सुरुवात केली, तेव्हा त्याची ओळख वैशालीचा लहान भाऊ अशी होती. पण आज वैशालीला प्रज्ञानंदची बहीण म्हणून ओळखलं जातं. या दोन बहिणभावांचं नातं दृष्ट लागावं असं आहे.
परदेशात प्रज्ञानंदला आवडणारं दाक्षिणात्य जेवण मिळणं अवघड जातं. म्हणून त्याची आई सोबत एक इंडक्शन स्टोव्ह आणि दोन स्टीलची भांडी सोबत ठेवायच्या. जिथे असेल तिथं ते या स्टोव्हवर रस्सम आणि भात तयार करून मुलाला खाऊ घालायच्या. त्याच्या पहिल्या काही स्पर्धांपासून अगदी आताच्या विश्वचषकाच्या फायनलपर्यंत हा शिरस्ता कायम राहिला.
प्रज्ञानंदचा रँकिंगचा प्रवास
२०१३मध्ये वयाच्या आठव्या वर्षी प्रज्ञानंदने जागतिक युवा बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकली होती. तो सात वर्षांचा असताना त्याला *फिडे मास्टर’ पदवी मिळवली. त्याशिवाय, वयाच्या १० वर्षे, १० महिने आणि १९ दिवसांत, २०१५ मध्ये १० वर्षांखालील विजेतेपद पटकावल्यानंतर प्रज्ञानंदाने इतिहासातील सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय मास्टर बुद्धिबळपटू बनला.
२०१७मध्ये प्रज्ञानंदने वर्ल्ड ज्युनिअर चेस चॅम्पियनशिप जिंकत ग्रँडमास्टर बनला. त्याने १७ एप्रिल २०१८ रोजी ग्रीसमधील हेराक्लिओन फिशर मेमोरियल जीएम नॉर्म स्पर्धेत बुद्धिबळात त्याचा दुसऱ्यांदा ग्रँडमास्टर बनला.
२३ जून २०१८ रोजी इटलीतील उर्तिजी येथे झालेल्या ग्रेडाईन ओपनमध्ये, प्रज्ञानंदने ‘तिसेरे ग्रँडमास्टर विजेतेपद जिंकले. यावेळी त्याचे वय १२ वर्षे, १० महिने होते. याव्यतिरिक्त, विजेतेपदाचा दुसरा सर्वात तरुण विजेता होता. १२ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रज्ञानंदने जागतिक युवा चॅम्पियनशिपच्या १८ वर्षांखालील विभागात प्रथम क्रमांक पटकावला.
भविष्यातील विश्वनाथन आनंद
प्रज्ञानंद हा भारताचा नवा सुपरस्टार अजून, तो २० वर्षांचाही झालेला नाही. तरीही त्याचं एलो मानांकन हे २७०० पेक्षा जास्त आहे. हे सहजासहजी घडत नाही. ही फार मोठी कामगिरी आहे. अद्यापही प्रज्ञानंदसाठी पूर्ण कारकीर्द हाताशी आहे. त्यामुळे भविष्यात तो विश्वनाथन आनंदसारखा जागतिक टॉपर होईल, असा सर्वांना विश्वास आहे.
स्वतः विश्वनाथन आनंद यांनं ट्विट करून त्याचं कौतुक केलंय. जगभरातील माध्यमांनी आज प्रज्ञानंदच्या यशाची दखल घेतलीय. भारताचं आणि बुद्धिबळाच्या ६४ घरांचं नातं काही आजचं नाही. हे नातं आणखी दृढ करण्याची फार मोठी संधी प्रज्ञानंदला मिळणार आहे. ती तो नक्कीच यशस्वी करेल, अशा शुभेच्चा त्याला सर्वांनीच द्यायला हव्यात.
प्रज्ञानंदच्या अंतिम सामन्यानंतर एक मिम सोशल मीडियावर व्हायरल झालं. त्यात चंद्रयान आकाशातून प्रज्ञानंदला सांगतं की, अरे गेल्या वेळी मीही अपयशी ठरलो होतो, पण आज बघ चंद्रावर पाऊल ठेवून मी जग जिंकलंय. त्यामुळे तू निराश होऊ नकोस, पुढल्या वेळी यश तुझंच आहे.
आपणही प्रज्ञानंदला पुढल्या विश्वविजयासाठी शुभेच्छा देऊयात!