अल्लू अर्जुन आणि राष्ट्रीय पुरस्कारामागचं राजकीय गणित

२०२१साठीचे राष्ट्रीय सिनेपुरस्कार नुकतेच जाहीर झाले. १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत ज्या सिनेमांना सेंट्रल बोर्डाचं सर्टीफिकेशन मिळतं, फक्त त्याच सिनेमांचा विचार हा पुरस्कार देताना केला जातो. या पुरस्कारांवरून सगळीकडे उलटसुलट चर्चा सुरु आहे. त्यातला एक चर्चेतला पुरस्कार म्हणजे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, जो तेलुगू सिनेसृष्टीतल्या ‘स्टायलिश स्टार’ अल्लू अर्जुनला दिला गेलाय.

हुकमाचा एक्का अल्लू अर्जुन

खरं तर या पुरस्कारासाठी बऱ्याच लोकप्रिय अभिनेत्यांना त्यांच्या दर्जेदार सदरीकरणासाठी नामांकन मिळालं होतं. पण यात ‘पुष्पा’च्या अल्लू अर्जुनने बाजी मारली. हा त्याचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार आहेच, पण त्याचबरोबर अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा तो पहिलाच तेलुगू अभिनेता ठरलाय. एवढंच नाही तर याच सिनेमातल्या गाण्यांसाठी संगीतकार डीएसपीला म्हणजेच देवी श्री प्रसादलाही राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय.

याबरोबरच ऑस्कर गाजवणाऱ्या ‘आरआरआर’लासुद्धा एकूण सहा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. ही सहा विरुद्ध दोन पुरस्कारांची तुलना रकमेच्या भाषेत साडेचार लाख विरुद्ध एक लाख अशी करता येते. अशावेळी ‘आरआरआर’चं पारडं वरचढ वाटणं साहजिकच आहे. पण इथं प्रत्यक्षात जिंकलाय किंवा जिंकवला गेलाय, तो अल्लू अर्जुन!

खरं तर अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ हा ‘द काश्मीर फाईल्स’सारखं सत्ताधाऱ्यांना आवडणाऱ्या विचारसरणीचं उघड समर्थन करत नाही. ‘आरआरआर’ किंवा ‘सरदार उधमसिंग’सारखा कुठल्या क्रांतिकारकाची कथा सांगत देशप्रेम जागवत नाही. तरीही त्याला पुरस्कार मिळालाय. कागदोपत्री हा पुरस्कार पन्नास हजारांचा असला तरी राजकीयदृष्ट्या तो लाखमोलाचा ठरणार आहे. कारण तो पुरस्कार सिनेमाचा नसून त्यातल्या अल्लू अर्जुन या हुकमी एक्क्याचा आहे.

स्टारडमने भरलेलं सिनेकुटुंब

अल्लू अर्जुन हा अल्लू-कोनिडेला या सिनेकुटुंबातून येतो. या कुटुंबाच्या जवळपास तीन पिढ्या सिनेमातच आहेत. यातल्या अल्लू कुटुंबाची सुरवात अल्लू अर्जुनच्या आजोबांपासून म्हणजेच पद्मश्री अल्लू रामलिंगैय्यांपासून होते. ते तेलुगू सिनेसृष्टीतल्या महान नटांपैकी एक होते. अल्लूचे वडील अल्लू अरविंद हे नामवंत निर्माते आणि वितरक असून, त्याचा भाऊ ‘यंग हिरो’ अल्लू शिरीषसुद्धा अभिनेता आहे.

कोनिडेला कुटुंब म्हणजेच मेगा फॅमिलीचा प्रमुख अल्लू अर्जुनच्या आत्याचा नवरा म्हणजेच ‘मेगा स्टार’ चिरंजीवी आहे. चिरंजीवीचा भाऊ ‘पॉवर स्टार’ पवन कल्याण, पोरगा ‘मेगा पॉवर स्टार’ राम चरण तेजा, पुतण्या ‘मेगा प्रिन्स’ वरुण तेज आणि सख्खे दोन भाच्चे म्हणजेच ‘सुप्रीम स्टार’ साई धरम तेज आणि ‘मेगा सेन्सेशन’ पंजा वैष्णव तेज हेही याच कुटुंबाचा भाग आहेत.

अशा या सगळ्याच ताऱ्यांची आकाशगंगा म्हणजे हे अल्लू-कोनिडेला सिनेकुटुंब. यावर्षी तब्बल दहा राष्ट्रीय पुरस्कारांशी या कुटुंबाचा जवळून संबंध आलाय. त्यातले सहा राम चरण तेजाच्या ‘आरआरआर’ला, दोन अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ला तर ‘उप्पेना’ आणि ‘कोंडा पोलम’ या वैष्णव तेजच्या दोन सिनेमांनाही एकेक राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. त्यात ‘उप्पेना’ला प्रादेशिक श्रेणीतून राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय, हे विशेष.

या दहा राष्ट्रीय पुरस्कारांची एकत्रित किंमत आहे साडेनऊ लाख. पण या पुरस्कारांच्या पाच-पन्नास हजारांपेक्षा या सगळ्यांच्या स्टारडमची किंमत एकंदर राजकारणाच्या दृष्टीने बरीच मोठी आहे. कारण तेलुगू भाषिक मतदारांचा भरणा असलेल्या आंध्रप्रदेश आणि तेलंगणात या दोन्ही राज्यांत या स्टारमंडळींचा भरपूर वट आहे. त्यामुळे निवडणुकीत हे स्टार प्रचारक आपल्या गाठीशी असणं कुठल्याही पक्षाला फायद्याचंच वाटत असतं.

सारं काही जातीय वोटबँकसाठी

या वर्षाच्या शेवटाला तेलंगणामधे विधानसभा निवडणूक होतेय. इथं सध्या टीआरएस सत्तेत आहे. इथं सत्ता मिळवण्यात भाजपला अजूनही यश आलेलं नाही. अगदी वर्षभरापूर्वी तेलंगणातल्या एका पोटनिवडणुकीसाठी गृहमंत्री अमित शहा यांनी यंग टायगर म्हणजेच ज्युनियर एनटीआरची भेट घेतली होती. त्यावरून भाजप एनटीआरच्या कम्मा जातसमूहाला आपली वोटबँक बनवतोय, असं दिसून आलं. पण तेव्हाही भाजपला यश आलं नाही.

दुसरीकडे, अल्लू अर्जुनचा कपू जातसमूहही आंध्रप्रदेश आणि तेलंगणामधे आपलं मोठं वर्चस्व राखून आहे. त्यामुळे या वोटबँकवर नजर टाकत अल्लू अर्जुनला आपल्याकडे वळवून घेण्यासाठी भाजपने हे राष्ट्रीय पुरस्काराचं कार्ड आता पुढं केलंय. सोबत ‘आरआरआर’च्या पारड्यात ६ पुरस्कार टाकत कम्मा आणि कपू जातवर्गाची मोट बांधायचाही प्रयत्न भाजपने सुरू केलाय. पण हे जितकं दिसतं तितकं सोपं मुळीच नाही.

स्टार प्रचारकांची मागणी

अल्लू अर्जुनच्या सासऱ्याला टीआरएसकडून आमदारकी हवी आहे. त्यामुळे तिकीट मिळाल्यावर जावई आपला स्टार प्रचारक असेल असं त्याला वाटतंय. तर दुसरीकडे अल्लू अर्जुनच्या दुसऱ्या मामाआळीत म्हणजेच मेगा फॅमिलीत थोडं वेगळं वातावरण आहे. त्याचा मामा चिरंजीवी काँग्रेससोबत आहे तर पवन कल्याणने भाजपची साथ सोडून ‘जन सेना पक्ष’ हा स्वतःचा पक्ष काढलाय.

अगदी काही वर्षांपूर्वी ‘काँग्रेस हटाओ, देश बचाओ’ हे आपलं घोषवाक्य बनवून प्रचार करणाऱ्या पवन कल्याणने भाजपशी फारकत घेऊन आपल्या पक्षासोबत वेगळी वाट धरली. सध्या तो माजी मुख्यमंत्री एनटीआर यांच्या स्टाईलमधे रॅली काढत गर्दी जमवतोय. अशावेळी स्टार पॉवर हाताशी हवी असा हट्ट धरणाऱ्या भाजपला पवन कल्याणची जागा अल्लू अर्जुन घेईल असं वाटू लागलंय.

खरं तर अल्लू अर्जुनलाही राजकारणात रस आहे. २०१७मधेही भाजपने त्याला ऑफर दिल्याची अफवा चांगलीच पसरली होती. पण अल्लू अर्जुनला त्यावेळी त्याचं स्टारडम चिरंजीवी आणि पवन कल्याणपेक्षा कमी वाटायचं आणि ते खरंच आहे. चिरंजीवी आणि पवन कल्याण यांचं स्टारडम तिकडे बरंच मोठं आहे. त्यांना पाहायला लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.

या गर्दीचं अपेक्षित रुपांतर मतपेटीत दिसत नसलं तरीही त्यांचं स्टारडम काही कमी होत नाही. त्यामुळे अल्लू अर्जुनच काय, त्याच्या पिढीतल्या सगळ्याच अभिनेत्यांना या आधीच्या पिढीबद्दल प्रचंड आदर आहे. अल्लू अर्जुनचा हा स्वतःच्या स्टारडमबद्दलचा समज असाच तयार झालेला नाही. म्हणूनच अशावेळी त्याचा हा समज दूर करण्यासाठी हा राष्ट्रीय पुरस्कारच त्याला मदत करेल, असं भाजपला वाटणं साहजिकच आहे.

विषय भाषिक-प्रादेशिक-धार्मिक अस्मितेचा

आता या पुरस्कारामुळे अल्लू अर्जुन तेलुगू सिनेसृष्टीतला पहिलाच असा अभिनेता ठरलाय, ज्याला अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. जे त्याच्या आधीच्या दोन्ही पिढीतल्या अत्यंत लोकप्रिय असलेल्या अभिनेत्यांना एवढ्या वर्षात जमलं नाही, ते अल्लू अर्जुनने करून दाखवलंय. त्याचं आंध्रप्रदेश आणि तेलंगणामधलं स्टारडम लक्षात घेता, अल्लू अर्जुनची ही पुष्पामधली ‘पक्का तेलुगू’ ओळख भाजपला फायद्याची ठरणार आहे.

या पडद्यावरच्या भूमिकेसोबतच अल्लू अर्जुनचं पडद्यामागचं जगणंही भाजपला फायद्याचं ठरतंय. कारण अल्लू अर्जुन सदैव त्यांच्याकडच्या परंपरा आणि संस्कृतीचं उघड प्रदर्शन करताना दिसतो. त्यामुळे या अभिनेत्यांची संस्कृतीरक्षकछाप प्रतिमा मिरवणं सत्ताधाऱ्यांना सोयीचं पडतं. त्यामुळेच अल्लू अर्जुनच्या राष्ट्रीय पुरस्काराची रक्कम बघून ‘फ्लॉवर’च वाटणारा हा पुष्पा राजकीय गणितांच्या दृष्टीने ‘फायर’ असल्याचं सहज स्पष्ट होतं.

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

पर्यंटकांच्या गर्दीला युरोप नाही म्हणतंय, भारताचं काय?

कधी कधी स्वत:वर, तर कधी परिस्थितीवर रडावसं वाटतं. ज्या ठिकाणी आपण आनंद घेण्यासाठी जातो त्या सर्व ठिकाणांची आजची…
संपूर्ण लेख

शाहरुखचा ‘जवान’ हिट का झाला?

२०१७ मधे शाहरुखचा ‘रईस’ रिलीज झाला. एक चांगला ऍक्शन सिनेमा असूनही पायरसीचा फटका बसल्याने ‘रईस’ला म्हणावा तसा नफा…
संपूर्ण लेख

भारतांनं चंद्रमोहिमेतून नक्की काय साधलं?

भारताचं चांद्रयान-३ ठरलेल्या दिवशी, नियोजित वेळी आणि निश्चित केलेल्या जागी चंद्राच्या भूमीवर उतरलं आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं…
संपूर्ण लेख

आशा भोसले : फक्त ९० वर्षांचा हिरवागार स्वरऋतू!

कल्पना करा, तुम्ही कोणत्या तरी कारणानं अत्यंत अस्वस्थ आहात, बैचेन आहात. मन लागत नाही आणि तितक्यात एक गाणं…
संपूर्ण लेख

‘एआय’मुळे फेक कंटेंटवाल्यांचा बाजार जोरात!

जगभरातील माणसं काय विचार करतात हे त्यांना काय माहिती मिळते, त्यावर ठरतं. ते जो विचार करतात तशी खरेदी…
संपूर्ण लेख

गांधीजींच्या शेवटच्या माणसाचा शोध घेणारी दोन पुस्तकं!

१९४० च्या दशकात महात्मा गांधी यांनी वैयक्तिक सत्याग्रह मोहिमेसाठी विनोबा भावे यांची पहिला लढवय्या म्हणून निवड केली. दुसरे…