आशा भोसले : फक्त ९० वर्षांचा हिरवागार स्वरऋतू!

कल्पना करा, तुम्ही कोणत्या तरी कारणानं अत्यंत अस्वस्थ आहात, बैचेन आहात. मन लागत नाही आणि तितक्यात एक गाणं तुमच्या कानी पडतं- छोड दो आंचल, जमाना क्या कहेगा… तुम्ही सारा ताण विसरुन त्या गाण्यात सामील होऊन जाता. आशाताई आणि किशोरदांच्या या चारेक मिनिटांच्या गाण्यानं तुमच्या मनावरचा मोठ्ठा बोजा पार हलका करुन टाकलेला असतो. 

दुसरा एक प्रसंग डोळ्यापुढं आणा… तुम्ही कोकणात प्रवासाला निघाला आहात. एफएमवर (अधून मधून ऐकू येणार्‍या) त्याच-त्याच गाण्यांना विटला आहात. मग, ‘ऋतू हिरवा’ ऐकायला सुरवात करा. मन भावन, हा श्रावण….नभी उमटे इंद्रधनू….एकेक शब्द कानात नकळत साठले जातात..आणि मनातही जणू पाऊस सुरु होतो. 

तो आनंद मिळणे सुरु होईस्तोवर, ‘घनरानी’ ऐकू येतं…. तो गोडवा उरात पाझरेस्तोवर ‘फुलले रे क्षण माझे’ सुरु होतं आणि खरोखर एका अलौकीक नादब्रह्मात आपण रममाण होऊन जातो. आपल्या रुक्ष जगण्यावर स्वप्नांचं चांदणे शिंपित जाते.  आशाताईंची अशी कितीतरी गाणी जगण्यावर नितांत प्रेम करायला लावतात. त्यात भरलेलं चैतन्य भवतालाचा गाभारा भारून टाकतात.

गगनाला गवसणी आणि जमिनीवरील अदाकारी

आशाताईंचा आवाज कोणत्या शब्दांत वर्णावा? तो अवखळ आहे, खळखळता आहे, तो निरालस आहे, तो प्रवाही आहे, तो डोळ्यांतूनही गातो आणि मनातून वाहतो, तो बंदिस्त करता येत नाही आणि त्याची सुटकाही करता येत नाही. ‘बस् एक बार मेरा कहा, मान लिजिए’ या शब्दांना या आवाजाखेरिज कुणीच न्याय देऊ शकत नाही. 

‘कहिये तो आसमां को जमीन पर उतार लाए’ असा गगनाला स्पर्शू पाहणारा आवाज तितक्यात नजाकतीनं हळुवार जमीन पर उतारला जातो आणि पुढे ‘मुश्किल नही हैं कुछ भी अगर ठान लीजिए’ म्हणत एका विलक्षणाचं गारुड आपल्या मनावर घालून जातो. 

खय्याम साहेब यांनी उमराव जान मधील गाणी आशाताईंच्याच आवाजात करण्याचं का ठरवलं होतं, याचं उत्तर तेव्हा अनेक टिकाकारांना या गाण्यांचं रेकॉर्डिंग झाल्यानंतर आपसुकच मिळालं आणि आजही त्यातील प्रत्येक गझल रसिकांच्या मनात घट्ट रुतून बसली.

लतादीदीचं माधुर्य आणि आशाताईंचा गोडवा!

खरं तर मंगेशकर भावंडांना संगीताचा वारसा त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच मास्टर दीनानाथ मंगेशकरांकडून लाभलेला. मात्र, वारसा या शब्दाच्या पलीकडे जात, त्यांना ईश्वराने स्वरांची दैवी देणगीही दिली होती. मंगेशकर भावंडांचे बालपण अत्यंत खडतर परिस्थितीत गेलं. 

सर्वात मोठ्या लतादीदी यांनी आपल्या गायकीच्या बळावर घरची धुरा सांभाळली. पाठोपाठ आशाताईही आल्या. उषा मंगेशकर यांनीही मराठी पार्श्वगायनात आपला ठसा उमटविला. पं. हृदयनाथ यांनी गायक आणि संगीतकार म्हणून मोठा लौकीक मिळविला. अनेकदा आशाताईंची लतादीदींशी तुलना केली जाते. काहींना वाटते, की लतादीदींला लाभलेले कौतुक आशाताईंच्या वाटेला आले नाही. 

असे असले तरी, या दोघीही आपापल्या ठिकाणी महान आहेत. त्यांची गायनशैली एकमेकांपासून निराळी राहिली आहे. लतादीदींच्या इतक्या जवळ असूनही आशाताईंनी आपल्या गायकीवर त्यांची सावली पडू दिली नाही. त्यांनी स्वतःची शैली निर्माण केली. आवाजातील सहजता, उत्स्फूर्तता आणि नजाकत ही त्यांच्या शैलीची वैशिष्ट्ये ठरतात. 

लतादीदींच्या आवाजातील माधुर्य आणि आशाताईंच्या आवाजातील गोडवा हे आपापल्या ठिकाणी केव्हाही श्रेष्ठ. माधुर्यात आपसूकच गोडवा असतो आणि गोडव्यात नकळत एक माधुर्यही असतं…तसं हे अद्वैत…म्हटलं तर एकच, म्हटलं तर स्वतंत्र. जिथे हे एकत्र उमलले, नांदले, ते म्हणजे मंगेशकर कुटुंब.

आव्हानांना तोंड देत सजलेला सूर

१९५० च्या सुमारास आशाताईंनी पार्श्वगायनास सुरवात केली. मात्र तेव्हा लतादीदी, गीता दत्त, शमशाद बेगम अशा गायिकांचं राज्य होतं. घरची परिस्थितीही खडतर आव्हानांनी भरलेली होती. तरीही, आशाताईंनी वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचं आव्हान स्वीकारलं आणि आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर ते पूर्ण करुन दाखवलं. 

तब्बल सात दशकांहून अधिक असा त्यांचा गानप्रवास आणि त्यातील विविध टप्पे केवळ स्तिमित करुन टाकतात, ते त्यामुळे. आशाताईंना खरा ब्रेक मिळाला तो १९५७ मधे, सचिनदेव बर्मन यांच्यामुळे. काला बाजार, लाजवंती, नौ दो ग्यारह, सुजाता, चलती का नाम गाडी अशा एकाहून एक चित्रपटांमुळे आशा भोसले हे नाव रसिकांच्या मनात रुजलं गेलं आणि पुढे आणखी फुलत गेलं. 

ओ.पी. नय्यर आणि आशाताईंची स्वतःची अशी केमिस्ट्री होती. ६० च्या दशकातील त्यांच्या बहुतांश चित्रपटांत आशाताईंचीच गाणी होती आणि ती प्रचंड हीट झाली. आशाताईंच्या गाण्यातलं वेगळंपण, त्यातील उत्स्फूर्तता ओ.पी.नय्यर यांनी हेरली आणि त्यास पुरेपूर न्याय देणार्‍या रचना संगीतबद्ध केल्या. 

‘फीर वही दिल लाया हू’ मधील ‘आखोंसे जो उतरी है दिल मैं’ हे प्रवाही गाणं असो वा ‘चैन से हमको कभी आपने जीने ना दिया’ सारखं अलग ठहेराव असणारं गाणं आशाताईंचा आवाज दोन्ही ठिकाणी तुमच्यात त्यातील भाव पाझरत नेतो.

आशाताईंचा चुकलेला शब्द आणि किशोरदाची जादू

आशाताईंचा आवाज म्हणजे एक प्रकारे परीसच. ज्या-ज्या शब्दांना तो लाभला, त्यांचं सोनं झालं. आता गुलाम अलींसोबतचा त्यांच्या गझलसंग्रह मिराज-ए-गझलचं घ्या. सलोना सा सजन है आजही प्रत्येकाला साद घालतं. ‘करुं ना याद मगर, किस तरह भुलाऊ उसे..’ असं म्हणत पुढं जेव्हा ‘गझल बहाना करु और भुलाऊं उसे’ हे शब्द कानी येतात, तेव्हा ते कानातून नाही तर स्पंदनातून मनात विसावतात. 

आशाताईंचं आणि गझलगायकीचं हे असं अद्वैत रसिकांना कायमच भुरळ घालत राहतं. अलीकडच्या काळातही, आपल्या जरा हटके स्टाइलमधे त्यांनी आज जाने की जिद ना करो, ही जुनी आपल्या शैलीत सादर केली, ती प्रचंड गाजली.

किशोरदांचं आणि आशाताईंचं ट्युनिंगही लै भारी होतं. त्यांची कित्येक युगलगीतं आजही प्रचंड लोकप्रिय आहेत. बाप रे बाप या चित्रपटासाठी ‘पिया पिया पिया, मेरा जिया पुकारे’ या गाण्याचं रेकॉर्डिंग होताना एक ठिकाणी, आशाताईंनी चुकून किशोरदांसाठी असणारी ओळ गायला सुरवात केली आणि ते लक्षात येताच थांबल्या. पण किशोरदांनी ते गाणं पूर्ण केलं. 

चित्रपटाचे नायक किशोरदाच होते. त्यांनी या गाण्याच्या चित्रिकरणावेळी आशाताईंचा ती अर्धवट म्हटली गेलेली ओळ येताच, आपल्या नायिकेच्या तोंडावर अलगद हात ठेवला आणि पुढची ओळ आपल्याच आवाजात डब केली. अर्थात, हे सारं इतकं बेमालूमपणं जमून गेलं की प्रेक्षकांना पडद्यावर ते गाणं पाहताना, किशोरदांची ही अदा एकदम पसंद पडली. 

९० वर्षं सतत रिलेव्हंट वाटणं सोप्प नाही

सचिनदा बर्मन यांच्या कित्येक गाण्यांमधून आशाताई आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत. दिवाना मस्ताना हुआ दिल, आखोंमें क्या जी, ये रातें ये मौसम, हाल कैसा है जनाब का अशा कितीतरी गाण्यांनी आपल्या मनात चैतन्य भरलं आहे. जयदेव यांच्या अभी ना जाओ छोडके या गीताबाबतही तेच. तोरा मन दर्पण कहेलाए यासारखं गाणं कधीही, कुठूनही कानी पडलं की आपोआप अंतर्मूख व्हायला होतं. 

पंचमदांची आणि आशाताईंची गाणी हा देखील स्वतंत्र लेखाचा विषय ठरतो. तब्बल सात दशकांचा पार्श्वगायकीचा हा प्रवास पाहता, आशाताईंचा आवाज इतका लोकप्रिय का राहिला असा कुणी प्रश्न विचारला तर त्याची उत्तरं अनेक आहेत. मात्र, एक निश्चित आहे, तो म्हणजे हा आवाज कायम समकालीन किंवा रेलेव्हंट राहतो.

१४ भाषा आणि हजारो गाणी

आशाताईंनी जवळपास १४ भाषांमधे कैक हजार गाणी गायली आहेत. मात्र, आपणा सर्वांना अभिवान वाटावा तो भाग म्हणजे त्यांनी आपल्या मायबोली मराठीतही तितकंच विलक्षण काम केलं आहे. नाट्यगीत, भक्तीगीत, गझल, भावगीतं, चित्रपटगीतं असे सारेच प्रकार त्यांनी हाताळले आहेत. आजही आशाताईंचं गाणं ऐकलं नाही, असा एकही दिवस जात नाही. 

झाले युवती मना, कठीण कठीण किती, शुरा मी वंदिले अशी नाट्यगीतं असोत, की काल पाहिले मी स्वप्न गडे, रिमझिम पाउस पडे सारखा, अरे मनमोहना, आज चांदणे उन्हात हसले, आज प्रीताला पंख हे लाभले, एका तळ्यात होती, कारे दुरावा, गेले द्यायचे राहून, चंद्र आहे साक्षीला, कानडाऊ विठ्ठलू ….किती किती गाणी सांगायची. 

प्रत्येकाचा बाज वेगळा. प्रत्येकातून मिळणारा आनंद आगळा. भाऊ चित्रपटातील सुरेश वाडकरांसोबतचं ‘गंध फुलांचा गेला सांगून’ ऐकल्यानंतर काय जाणवतं, हे शब्दांत कसं लिहिणार. ‘राधा गौळण करीती मंथन अविचरत हरीचे मनात चिंतन’ या आवाजातून लाभलेला चिरंतर आनंद आणखी कुठं लाभू शकतो? सुधीर मोघेंच्या अनेक रचनांना आशाताईंनी आपल्या आवाजातून अजरामर करुन टाकलंय. 

रसिकांना दिलेलं अक्षय संगीतदान

‘एकाच या जन्मी जणू, फिरुनि नवे जन्मेन मी’ हे आशादायी शब्द खुद्द आशाताईंच्याच आवाजात ऐकायला मिळतात, तेव्हा अशी गाणी ऐकण्यासाठी तरी फिरुन फिरुन जन्म घ्यावासा वाटतो. आरती प्रभुंची ‘गेले द्यायचे राहुनि’ असो वा शांताबाईंची ‘जीवलगा राहिले रे दूर घर माझे’ अशा मनात हूरहूर पेरणार्‍या रचना असोत, की ‘सैनिकहो तुमच्यासाठी..’ सारखी देशभक्तांच्या भावना व्यक्त करणारी अजरामर रचना असो, आशाताईंच्या प्रत्येक गाण्यानं आपलं स्थान रसिकांच्या मनात अढळ करुन टाकलं आहे. 

‘जगाच्या पाठीवर’ मधील ‘तुला पाहते रे, तुला पाहते’ कितीही वेळा ऐकलं तर मन भरत नाही. याच चित्रपटातील ‘बाई मी विकत घेतला शाम’ ऐकणं म्हणजे, स्वतःलाच वेगळ्या उंचीवर घेऊन जाणं. बाबूजींसमवेत, म्हणजेच सुधीर फडके यांसमवेतही त्यांची कित्येक युगलगीतं मराठी रसिकमनात सदैव गुणगुणली जातात.

‘मलमली तारुण्य माझे’ हे १९७० मधील घरकुल चित्रपटातील गीत आठवतंय. तब्बल पाच दशकं होऊन देखील हे गाणं तितकंच तरुण आहे. सुरेश भटांच्या या गझलेचं गीतात रुपांतर होतानाचा प्रवास कसा झाला असेल, याची नुसती कल्पना केली तरी अंगावर रोमांच उभे राहतात. 

पांघरावे हा शब्द ऐका, गुंतवावे, पेटवावे हा प्रत्येक शब्दोच्चर आणि शेवटी, रे तुझ्या बाहुत माझ्या, रुपगंधा जाग यावी असं म्हणत अखेरिस मलमली तारुण्य माझे असं द्रूतात व सरतेशेवटी ‘तू पहाटे पांघरावे’ असं मंद लयीत शब्दोच्चार होतो तेव्हा जो काही इफेक्ट साधला जातो, तो तस्साच्या तस्सा…गेली ५० वर्षे आहे. 

स्वतःचाच शोध घ्यायला भाग पाडणारा सूर

विचार करताना, ही शब्दांची जादू की स्वरांची हे कोडं आपलं अर्ध आयुष्य कुरतडतो…पण गाणं पुन्हा ऐकताना, कोडं उलगडणं दूर, त्या गाण्यात आपण इतकं गुंतून जातो, की या शब्दसूरांनी आपल्या भावभावनांना रोज पुन्हा पुन्हा पांघरावे असंच वाटू लागतं.

अशा अशा कैक चिरतरुण गीतांचं विश्वरुप दर्शन आपणा सर्वांना घडविणार्‍या आशाताईंचा नव्वदीतील प्रवास म्हणजे त्यांच्या चैतन्यमयी स्वरांचा नव्या तारुण्यात प्रवेश असं वर्णन केल्यास ते चुकीचं ठरणार नाही. आशाताईंचा आवाज कशातच बंदीस्त करता येत नाही.

अगदी वय आणि वर्षांमधेही. ते आपलं चांदणं शिंपित जातं. चैतन्याची पखरण करत जातं. जाणीवांना जागवत राहतं आणि कधी कधी. घनरानी वाट चुकवित जातं. स्वतःच्या सच्चेपणाला, अस्सलतेला आणि अस्तित्वाला शोधण्यासाठी! 

 

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

पर्यंटकांच्या गर्दीला युरोप नाही म्हणतंय, भारताचं काय?

कधी कधी स्वत:वर, तर कधी परिस्थितीवर रडावसं वाटतं. ज्या ठिकाणी आपण आनंद घेण्यासाठी जातो त्या सर्व ठिकाणांची आजची…
संपूर्ण लेख

शाहरुखचा ‘जवान’ हिट का झाला?

२०१७ मधे शाहरुखचा ‘रईस’ रिलीज झाला. एक चांगला ऍक्शन सिनेमा असूनही पायरसीचा फटका बसल्याने ‘रईस’ला म्हणावा तसा नफा…
संपूर्ण लेख

भारतांनं चंद्रमोहिमेतून नक्की काय साधलं?

भारताचं चांद्रयान-३ ठरलेल्या दिवशी, नियोजित वेळी आणि निश्चित केलेल्या जागी चंद्राच्या भूमीवर उतरलं आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं…
संपूर्ण लेख

‘एआय’मुळे फेक कंटेंटवाल्यांचा बाजार जोरात!

जगभरातील माणसं काय विचार करतात हे त्यांना काय माहिती मिळते, त्यावर ठरतं. ते जो विचार करतात तशी खरेदी…
संपूर्ण लेख

गांधीजींच्या शेवटच्या माणसाचा शोध घेणारी दोन पुस्तकं!

१९४० च्या दशकात महात्मा गांधी यांनी वैयक्तिक सत्याग्रह मोहिमेसाठी विनोबा भावे यांची पहिला लढवय्या म्हणून निवड केली. दुसरे…
संपूर्ण लेख

अंतराळातल्या मानवी कचऱ्यावर ‘इस्रो’चा उतारा

जगभरातील अंतराळ संशोधक, शास्त्रज्ञ सध्या अवकाशात फिरणाऱ्या कचर्‍याच्या समस्येबाबत चिंतेत आहेत. उपग्रह अणि रॉकेटसूचे निरुपयोगी सुटे भाग अंतराळात…