जया वर्मा सिन्हा : भारताची पहिली रेल्वे वुमन

देशात १८३७ मधे पहिली रेल्वे धावली. त्यानंतर १९०५ मधे रेल्वे मंडळाची विधिवत स्थापना झाली. रेल्वेच्या १८ विभागांचे महाव्यवस्थापक या मंडळाच्या मार्गदर्शनात काम करतात. आता या सर्वांना जया वर्मा सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली काम करावे लागणार आहे. अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले असल्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा भारतीय रेल्वेला मिळेल, यात संदेह नाही.

खरं तर जया वर्मा सिन्या या महिनाभरातच रेल्वेच्या चेअरमन पदावरून निवृत्त होणार होत्या. मात्र, मोदी सरकारने त्यांना आणखी वर्षभरासाठी मुदतवाढ दिली आहे. एक वर्ष हा फार मोठा काळ नसला तरी या कालावधीत त्यांना आपले प्रशासकीय आणि तांत्रिक कौशल्याचा फायदा देशाला मिळवून देण्याची संधी लाभली आहे. ३१ ऑगस्ट २०२४ रोजी त्या या पदावरून निवृत्त होतील. अथवा, त्यांना पुन्हा मुदतवाढही मिळू शकेल.

जया या मूळच्या उत्तर प्रदेशातील. १८ सप्टेंबर १९६३ रोजी त्यांचा जन्म प्रयागराज येथे झाला. त्यांचे वडील महालेखा नियंत्रक विभागात अधिकारी होते. त्यांनी तत्कालीन अलाहाबाद विद्यापीठाच्या बीएस्सीपर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी मानसशास्त्रात पदव्युत्तर पदवी संपादन केली. १९८८ मधे त्या रेल्वे सेवेत आल्या. 

रेल्वे ही जाणीवपूर्व केलेली निवड

१९८६ साली त्यांनी भारतीय लोक सेवा आयोगाची परीक्षा दिली. त्यावेळी गुणवत्ता यादी म्हणजेच मेरीट लिस्टमध्ये त्यांचे नाव वरच्या क्रमांकावर होते. ठरवले असते तर त्यांना तेव्हा भारतीय पोलिस सेवेत सहज भरती होता आले असते. महसूल खात्याचा पर्यायही त्यांच्यापुढे हात जोडून उभा होता.

त्यांच्यासोबत ज्या अन्य महिला उमेदवारांची निवड झाली होती, त्यांनी भारतीय पोलिस सेवा किंवा महसूल सेवेला प्राधान्य दिले होते. याचे दुसरे कारण म्हणजे या दोन्ही सेवांत कार्यालयात बसून काम करावे लागते. फारशी धावपळ करावी लागत नाही. 

रेल्वे ट्रॅफिक विभागातील परिस्थिती नेमकी याच्या उलट. तेथे पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे काम करावे लागते. मुख्य म्हणजे रेल्वे ट्रॅफिक विभागातील बड्या अधिकार्‍यांचा दिवस पहाटे चार वाजता सुरू होेतो. कारण, त्यांना अनेक विभागांशी समन्वय साधायचा असतो. 

शिवाय सिग्नल यंत्रणेची तपासणी करण्यासाठी छोट्या इंजिनमधून अनेक लोहमार्गांवर भटकंती करावी लागते. हे सगळे काम जोखमीचे आणि अत्यंत आव्हानात्मक असते. म्हणूनच जया यांना रेल्वे खात्यात काम करायचे होते. कारण, त्यांना सुरुवातीपासून रेल्वेबद्दल वेगळेच आकर्षण होते.

रेल्वेच्या संगणकीकरणात मोलाचा वाटा

आपले सुरुवातीचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर जया यांची पहिली नियुक्ती सहआयुक्त म्हणून उत्तर प्रदेशातील कानपूर येथे झाली. त्यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक असे पद नव्हते. या पदाला विभागीय अधीक्षक असे संबोधले जात असे. नंतर त्यांना विभागीय व्यवस्थापक (वाणिज्य) म्हणून पदोन्नती मिळाली. रेल्वेच्या संगणकीकरणात त्यांनी महत्त्वाचे योगदान आहे. 

रेल्वेचे संगणकीकरण करण्यासाठी तत्कालीन रेल्वेमंत्री माधवराव शिंदे यांनी पुढाकार घेतला होता. त्यावेळी जया यांनी याकामी मोठी भूमिका बजावली होती. रेल्वेची ‘फ्रेट ऑपरेशन इन्फर्मेशन सिस्टिम’ विकसित करण्याच्या प्रकल्पात त्यांचा मोलाचा वाटा होता. 

रेल्वेतील परिचालन, वाणिज्य, आयटी आणि दक्षता विभागातील कामांचा त्यांना दांडगा अनुभव आहे. उत्तर रेल्वे, दक्षिण पूर्व रेल्वे, पूर्व रेल्वेत त्यांनी विविध पदे भूषविली. प्रधान मुख्य वाहतूक व्यवस्थापकपदही सांभाळणार्‍या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या.

पती-पत्नी दोघेही लोकसेवेत

अनेक महत्त्वाची पदे भूषवल्यानंतर त्यांची नियुक्ती बांगला देशाची राजधानी ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयात करण्यात आली. तिथे त्या चार वर्षे रेल्वे सल्लागार होत्या. याच काळात कोलकाता ते ढाका ही ‘मैत्री एक्स्प्रेस’ सुरू झाली. हा क्षण त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला. याखेरीज अनेक महत्त्वाचे पूल उभारणे आणि अन्य कित्येक प्रकल्पांत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

जया यांना आयपीएस होण्याची संधी चालून आली होती. ती त्यांनी स्वीकारली नाही. मात्र, ही कमतरता त्यांनी वेगळ्या पद्धतीने भरून काढली. जेव्हा त्या भारतीय लोक सेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत होत्या, तेव्हा नीरज सिन्हा यांच्याशी त्यांची मैत्री झाली. 

योगायोगाची गोष्ट म्हणजे नीरज यांची निवडदेखील भारतीय रेल्वे सेवेत झाली होती. मात्र, त्यांना भारतीय पोलिस सेवा खुणावत होती. त्यामुळे त्यांनी नव्याने भारतीय लोक सेवा आयोगाची परीक्षा दिली आणि त्यांचे स्वप्न वास्तवात उतरले.

यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांचे शुभमंगल झाले. आता जया वर्मा यांचे नामकरण जया वर्मा सिन्हा असे झाले. आयपीएस झाल्यानंतर नीरज यांना बिहार कॅडर मिळाले. त्यावेळी बिहारचे विभाजन झालेले नव्हते. म्हणजेच झारखंड हे राज्य बिहारचाच एक भाग होते. 

बिहारची उन्हाळ्यातील राजधानी रांची येथे नीरज यांना सर्वात पहिली पोस्टिंग मिळाली. तेथे ते पोलिस अधीक्षक म्हणून रुजू झाले. पाठोपाठ जया यांनीही आपली बदली रांचीला करून घेतली. त्यावेळी रांचीत रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम सुरू होते. याच प्रकल्पावर जया यांची नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून हे जोडपे विविध ठिकाणी एकत्र कार्यरत आहे. सध्या नीरज हे बिहारच्या नागरी पोलिस दलात महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.

बालासोर अपघातानंतर चर्चेत

ओडिशातील बालासोर येथे यंदाच्या जूनमध्ये तीन ट्रेनची धडक होऊन भीषण  अपघात घडला होता. सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे हा अपघात घडला होता. या जटिल सिग्नल यंत्रणेची माहिती जया वर्मा सिन्हा यांनी माध्यमांना सोप्या शब्दांत उलगडून दाखवली होती. 

एवढेच नव्हे तर पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) त्यांनी या अपघातासंदर्भातील विशेष सादरीकरणही केले होते.  साहजिकच तेव्हापासून जया चर्चेत होत्या. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊनच सरकारने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

रेल्वेची गाडी रुळावर आणण्यासाठी मोठा निधी

भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष, रेल्वेचे सर्वोच्च अधिकारी असतात. त्यांचा सध्याचा पगार सुमारे २.२५ लाख रुपये प्रति महिना आहे. यासोबतच त्यांना विशेष भत्ता, घर, प्रवास आणि इतर सुविधांसारखे फायदेही मिळतात. रेल्वे विभागाचे अध्यक्ष हे भारतीय रेल्वेतील सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. 

या पदावरील व्यक्ती रेल्वे सेवांच्या दिशा, विकास आणि संचालनाशी संबंधित निर्णय घेत असते. रेल्वे मंडळाला केंद्र सरकारकडून रेल्वे अर्थसंकल्प २०२३-२४ मधे विक्रमी म्हणजे २.४ लाख कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या पार्श्वभूमीवर, जया वर्मा-सिन्हा रेल्वे मंडळाचा कार्यभार सांभाळणार आहेत. देशाची रक्तवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या रेल्वेला प्रथमच एवढा भरघोस निधी मिळाला आहे.

कर्तव्यदक्ष अधिकारी ते कलंदर छायाचित्रकार

जया वर्मा सिन्हा शालेय वयातच एक हुशार आणि चुणचुणीत विद्यार्थिनी म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांची भाऊ जयदीप हे उत्तर प्रदेश रोडवेजमध्ये प्रथम वर्ग अधिकारी म्हणून कार्यरत होते. सध्या ते राजधानी लखनौमध्ये निवृत्तीचे जीवन आरामात जगत आहेत. जेव्हा बहीण जया यांची निवड रेल्वे मंडळाच्या अध्यक्षपदी झाली तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. 

आमच्यासाठी ही कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. तर वडील व्ही. बी. वर्मा आणि आई सावित्री यांनी, आम्ही आमच्या दोन्ही मुलांवर केलेल्या उत्तम संस्कारांचे हे फळ असल्याचे सांगितले. स्वतः जया या अव्वल दर्जाच्या छायाचित्रकार आहेत. त्यांना प्रामुख्याने पक्ष्यांचे मूड आपल्या कॅमेर्‍यांत टिपायला आवडते. त्यासाठी कितीही पायपिट करायची त्यांची तयारी असते. 

त्यांच्याकडे स्वतः टिपलेल्या पशुपक्ष्यांच्या छायाचित्रांचे अनेक अल्बम्स आहेत. याखेरीज त्यांना संगीताची केवळ आवडच नव्हे तर उत्तम जाणही आहे. किशोर कुमार हे त्यांचे आवडते गायक आहेत. फावल्या वेळात त्या किशोरदांची गाणी ऐकतात. जया आणि नीरज या जोडप्याला एक मुलगी असून तिचे नाव अवनिका आहे. सध्या दिल्लीत तिचे शिक्षण सुरू आहे.

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
amphibians endangered
संपूर्ण लेख

उभयचर नष्ट होताहेत, उरलेल्या जीवसृष्टीवरही धोक्याची घंटा!

जगप्रसिद्ध ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान…
संपूर्ण लेख

‘लिव्ह इन’ की ‘लग्न’ यावर उत्तर कसं शोधणार?

‘लिव्ह इन’ अर्थात लग्नाशिवाय शारीरिक संबंधात राहण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या…
संपूर्ण लेख

सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य उलगणारा ‘बेन्नू’तील खजिना

पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘नासा’नं २०१६ मधे यान पाठवलं होतं. ते यान या लघुग्रहावजवळ…
संपूर्ण लेख

लॅटिन अमेरिका ही पर्यावरणपुरक जगासाठी नवी अर्थशक्ती

लॅटिन अमेरिकेत,  दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ३३ देशांचा समावेश होतो. लॅटिन हे नाव सर्वप्रथम फ्रान्सचे सर्वेसर्वा असलेल्या तिसऱ्या…
संपूर्ण लेख

फक्त ८० रुपयात ‘लिज्जत’ हा ब्रँड घडविणाऱ्या आज्जी गेल्या

ही गोष्ट आहे, १९५९ मधली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो भारावलेला काळ होता. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू देशाची नवी…
संपूर्ण लेख

सत्यशोधक पत्रकारितेचे विस्मृतीत गेलेले अतुलनीय योगदान

एकोणिसाव्या शतकातील नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा आणि आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले…