शाहरुखचा ‘जवान’ हिट का झाला?

२०१७ मधे शाहरुखचा ‘रईस’ रिलीज झाला. एक चांगला ऍक्शन सिनेमा असूनही पायरसीचा फटका बसल्याने ‘रईस’ला म्हणावा तसा नफा बॉक्स ऑफिसवर कमवता आला नाही. त्यातच पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानच्या मुख्य भूमिकेमुळे अनेक देशप्रेमी संघटनांनी या सिनेमाला विरोध केला. याचाही वाईट परिणाम ‘रईस’च्या कमाईवर झाला. त्यानंतर आलेले जब हॅरी मेट सेजल आणि झिरो फारशी चमक दाखवू शकले नाहीत.

एकापाठोपाठ एक सिनेमा अनपेक्षित कामगिरी करत असल्याने शाहरुख खानची जादू संपल्याच्या चर्चेने जोर धरणं साहजिकच होतं. २०१८च्या ‘झिरो’नंतर मुख्य भूमिकेत न झळकणाऱ्या शाहरुखची अवस्था ‘आता उरलो कॅमिओपुरता’ अशीच झाली होती. त्याचा हा पाच वर्षांचा प्रदीर्घ उपवास ‘पठाण’ने सोडवला. या सिनेमाने शाहरुख आणि त्याच्या चाहत्यांना नवसंजीवनी देत शाहरुखची जादू अजूनही कायम असल्याचं सिद्ध केलं.

नुकत्याच रिलीज झालेल्या ‘जवान’ची तिकीटबारीवरची कमाई शाहरुखची ही जादू, हा करिश्मा कधीही संपणार नाही, असं दिमाखात सांगतेय. दिग्दर्शक ऍटलीचं दमदार कथानक, संगीतकार अनिरुद्धचं झिंग आणणारं संगीत, शाहरुखचा जबरदस्त अभिनय आणि पॅन इंडियन प्रेक्षकांना आपलंसं वाटणाऱ्या लोकप्रिय बहुभाषिक सिनेकलाकारांचा नॉर्थ-साऊथ कॉम्बो हे हटके समीकरण ‘जवान’च्या निमित्ताने पाहायला मिळतंय. या समीकरणाच्याच जोरावर जवान आज बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसलाय.

संकटमोचक दिग्दर्शक ऍटली

‘बाहुबली’च्या यशानंतर भारतातल्या व्यावसायिक सिनेमांचं गणितच बदललं. ज्याला त्याला आपण ‘बाहुबली’सारखा अवाढव्य सिनेमा बनवावा असंच वाटायला लागलं. हे असं वाटणं साहजिकच असलं तरी तसं प्रत्यक्षात करून दाखवणं अवघड होतं. भलेभले ‘बाहुबली’शी स्पर्धा करण्याच्या नादात स्वतःचं हसं करून बसले. त्यातलाच एक सिनेमा होता, पुली. या तमिळ सिनेमात दलपती विजयने मुख्य भूमिका साकारली होती.

‘पुली’ येईपर्यंत विजयच्या काही सिनेमांना संमिश्र प्रतिसाद मिळत होता. ‘पुली’च्या अपयशामुळे विजयचं गटांगळ्या खाणारं करियर इथंच थांबतं की काय असंच चित्र निर्माण झालं होतं. पण तरी विजय निर्धास्त होता कारण त्याचा ‘तेरी’ हा सिनेमा रिलीज होण्याच्या वाटेवर होता. ”तेरी’च्या यशाबद्दल विजयला प्रचंड आत्मविश्वास होता. या आत्मविश्वासाचं कारण होतं, ”तेरी’चा दिग्दर्शक – ऍटली कुमार!

‘तेरी’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई तर केलीच पण विजयलाही अपयशाच्या गर्तेतून बाहेर काढलं. त्यानंतर ‘मर्सल’, ‘बिगील’ या ऍटलीच्याच सिनेमांनी विजयला त्याचं निसटत चाललेलं स्टारडम पुन्हा एकदा मिळवून दिलं. ‘तेरी’पूर्वी फक्त एकाच सिनेमाचं दिग्दर्शन केलेल्या ऍटलीने विजयला तर त्याचं करियर सावरून दिलंच पण त्याचबरोबर तो आता भारतीय सिनेसृष्टीच्या बादशहासाठीही संकटमोचक ठरलाय.

२०१९मधे ‘बिगील’चं प्रमोशन सुरू असतानाच ऍटलीने शाहरुखसोबत नव्या सिनेमावर लेखक-दिग्दर्शक म्हणून काम करत असल्याची घोषणा केली होती. हा तोच काळ होता, जेव्हा शाहरुखच्या सिनेमांना अपेक्षित प्रतिसाद मिळणं अवघड झालं होतं. पण ऍटलीसोबत शाहरुख सिनेमा करतोय या नुसत्या चर्चेनेच ‘जवान’साठी अपेक्षित हाईप तयार झाली. त्यामुळे शाहरुख असेलही बाजीगर, पण त्याला त्याचा खरा जादूगर आता ऍटलीच्या रुपात सापडलाय, एवढं खरं!

नॉर्थ-साऊथची जुगलबंदी

हिंदी सिनेसृष्टी म्हणजेच बॉलीवूडचा शाहरुख आणि तमिळ सिनेसृष्टी म्हणजेच कॉलीवूडचा ऍटली हे बेसिक नॉर्थ-साऊथ समीकरण ‘जवान’ने पुढे आणखीनच मोठं केलं. दीपिका पदुकोणसोबतच कॉलीवूडची ‘लेडी सुपरस्टार’ नयनतारा ‘जवान’मधे सहनायिका म्हणून झळकली. खलनायकाच्या भूमिकेत कॉलीवूडच्या ‘मक्कल सेल्वन’ विजय सेतुपतीने रंग भरलाय. कॉलीवूडसोबत पूर्ण देशाला आपल्याला तालावर थिरकायला भाग पाडणाऱ्या अनिरुद्धने या सिनेमासाठी संगीत दिलंय.

या सिनेमात मराठी सिनेसृष्टीतल्या स्मिता तांबे, गिरीजा ओक, बॉलीवूडच्या सान्या मल्होत्रा, रिद्धी डोग्रा, लहर खान, संजिता भट्टाचार्य आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती प्रियमणी या अभिनेत्रींनी सहाय्यक भूमिका बजावल्यात. ‘जवान’च्या तमिळ व्हर्जनमधे सुप्रसिद्ध तमिळ अभिनेता योगी बाबूची झलक दिसते. हा असा वेगवेगळ्या सिनेसृष्टीतल्या सिनेकलाकारांचा भरणा पॅन इंडिया रिलीज झालेल्या ‘जवान’च्या पथ्यावरच पडलाय, हे खरं.

शाहरुख खानची जादू

कथानायकाच्या दुहेरी-तिहेरी भूमिका, वडील आणि मुलांच्या नात्यावर भाष्य करणारं उपकथानक आणि फ्लॅशबॅक्स ही तर दिग्दर्शक ऍटलीची खासियतच बनलीय. आपल्या सिनेमाच्या कथा तो स्वतःच लिहीत असल्याने त्याचं कथानक अगम्य वाटणार नाही, याची खबरदारी आपोआप घेतली जात असते. ‘जवान’मधेही कथानायकाचा डबल रोल आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा फ्लॅशबॅक आहे. कथानायकाचे वेगवेगळे लुक्सही आहेत.

जवळपास अडीच ते तीन तासांच्या सिनेमात एवढ्या सगळ्या कलाकारांना घेऊन हे सगळं आपल्या कथेत गोवण्याचं शिवधनुष्य ऍटलीने लीलया पेललंय. पण ऍटलीच्या या लेखन आणि दिग्दर्शनाला खरी धार चढवलीय ती शाहरुखच्या अभिनयाने. शाहरुखची भावुक करणारी संवादफेक, प्रेमात पाडणारं जंटलमन स्वरूप आणि टाळ्याशिट्ट्यांच्या कडकडाटात साजरी होणारी ऍक्शन स्टाईल क्षणाक्षणाला ‘जवान’चा सिनेनुभव अधिकच समृद्ध करत राहते.

वास्तविक शाहरुखचा काही महिन्यांपूर्वी आलेला ‘पठाण’ही बॉक्स ऑफिसवर हिट झालाच होता. पण त्यातला शाहरुख हा दमलेला, म्हातारा आणि तरीही तरुणपणाचा अवास्तव आविर्भाव आणणारा कथानायक वाटत होता. पण ‘जवान’मधे मात्र शाहरुख तरुण आणि वयस्कर अशा दोन्ही भूमिकांमधे ऍक्शन हिरो म्हणून आपली छाप पाडण्यात यशस्वी ठरलाय. विशेषतः यातला त्याचा वयस्कर लुक प्रेक्षकांना जास्त भावल्याचं दिसून येतं.

साठीच्या उंबरठ्यावर असलेल्या शाहरुखने ‘जवान’मधे म्हातारा बाप साकारत तो आपला सदाबहार रोमॅंटिक चार्म जपत अजून काही दशकं अशीच दमदार ऍक्शन करू शकतो, हे सप्रमाण दाखवून दिलंय. कधी जिप्सी म्हातारा तर कधी जेलर, कधी सैन्य अधिकारी अशा वेगवेगळ्या लूकमधला शाहरुख आजही बाजीगर आहे त्याची जादू सहजासहजी ओसरत नसते, हेच ‘जवान’च्या कमाईचे आकडे आपल्याला सांगू पाहतायत.

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

पर्यंटकांच्या गर्दीला युरोप नाही म्हणतंय, भारताचं काय?

कधी कधी स्वत:वर, तर कधी परिस्थितीवर रडावसं वाटतं. ज्या ठिकाणी आपण आनंद घेण्यासाठी जातो त्या सर्व ठिकाणांची आजची…
संपूर्ण लेख

भारतांनं चंद्रमोहिमेतून नक्की काय साधलं?

भारताचं चांद्रयान-३ ठरलेल्या दिवशी, नियोजित वेळी आणि निश्चित केलेल्या जागी चंद्राच्या भूमीवर उतरलं आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं…
संपूर्ण लेख

आशा भोसले : फक्त ९० वर्षांचा हिरवागार स्वरऋतू!

कल्पना करा, तुम्ही कोणत्या तरी कारणानं अत्यंत अस्वस्थ आहात, बैचेन आहात. मन लागत नाही आणि तितक्यात एक गाणं…
संपूर्ण लेख

‘एआय’मुळे फेक कंटेंटवाल्यांचा बाजार जोरात!

जगभरातील माणसं काय विचार करतात हे त्यांना काय माहिती मिळते, त्यावर ठरतं. ते जो विचार करतात तशी खरेदी…
संपूर्ण लेख

गांधीजींच्या शेवटच्या माणसाचा शोध घेणारी दोन पुस्तकं!

१९४० च्या दशकात महात्मा गांधी यांनी वैयक्तिक सत्याग्रह मोहिमेसाठी विनोबा भावे यांची पहिला लढवय्या म्हणून निवड केली. दुसरे…
संपूर्ण लेख

अंतराळातल्या मानवी कचऱ्यावर ‘इस्रो’चा उतारा

जगभरातील अंतराळ संशोधक, शास्त्रज्ञ सध्या अवकाशात फिरणाऱ्या कचर्‍याच्या समस्येबाबत चिंतेत आहेत. उपग्रह अणि रॉकेटसूचे निरुपयोगी सुटे भाग अंतराळात…