भाजपचं मराठा राजकारण विरोधकांना कधी उमगेल?

गेम ऑफ थ्रोन्स या गाजलेल्या वेबसिरीजमधील पीटर बेलीश नावाच्या एका अत्यंत धूर्त पात्राच्या तोंडी एक संवाद आहे. तो म्हणतो, “always keep your foes confused. If they don’t know who you are or what you want, they can’t know what you plan to do next.” (तुमच्या शत्रूला कायम संभ्रमात ठेवा. तुम्ही कोण आहात हेच त्याला कळलं नाही तर तुम्ही पुढे काय करणार आहात हे त्याला कळण्याचा प्रश्नच येत नाही.)

लॉर्ड बेलीशचा हा प्रसिध्द डायलॉग आठवण्याचं कारण म्हणजे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चालू असलेल्या घडामोडी. गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीने पुन्हा एकदा उचल खाल्लीय.  हे सगळं नैसर्गिकरित्या घडतंय, असं वाटत असलं तरी त्यामागे बरंच काही सुरू आहे. भविष्यातल्या मोठ्या खेळींआधीच्या या छोट्या खेळी, नीट समजून घ्यायला हव्यात.

एकीकडे जरांगे पाटील आणि दुसरीकडे पंकजा मुंडे

जालन्यातील अंतरवली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले होते. पोलिसांनी हे आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यात झालेल्या लाठीचार्जमुळे आंदोलन आणखीनच चिघळलं. अखेर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या आंदोलकांची माफी मागावी लागली. 

जवळपास तीन आठवडे हे उपोषण चाललं आणि शासनाकडून काही आश्वासनं घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी हे उपोषण सोडलं. हे झालं न्यूज चॅनलच्या पडद्यावर दिसणारं चित्र! परंतु राजकारणातील खऱ्या घडामोडी या टीव्हीच्या पडद्यामागे घडत असतात. मराठा आरक्षणाची मागणी जोरावर असताना महाराष्ट्रात आणखी काय चालू होतं याचा थोडा धांडोळा घेऊ. 

एकीकडे जरांगे पाटील यांनी ‘गोदापट्टा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणून नेटाने आंदोलन सुरु ठेवलं होतं, तर दुसरीकडे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आठ दिवसांपूर्वी शिवशक्ती परिक्रमा या नावाने महाराष्ट्राच्या काही ठरावीक जिल्ह्यांमधून जाणारी एक राजकीय यात्रा जाहीर केली. नियोजनानुसार ही यात्रा ११ सप्टेंबर रोजी, सोमवारी परळी वैजनाथ येथील मंदिरात दर्शन घेऊन समाप्त झाली. 

पंकजा मुंडेंच्या यात्रेचा अर्थ कसा लावायचा?

पंकजा मुंडे यांचं राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून असलेलं स्थान पाहता या यात्रेला मिळालेला प्रतिसाद उत्तम होता. भाजपच्या राज्यस्तरीय नेतृत्वाकडून अपेक्षाभंग झाल्याने पंकजा मुंडे नाराज आहेत अशा चर्चा एव्हाना सामान्य झालेल्या आहेत. अर्थात त्या चर्चांना पुन्हा नव्याने चालना मिळेल अशी काही वक्तव्ये या यात्रेच्या दरम्यान पंकजा यांनी केली. 

राज्याच्या राजकारणात असलेलं स्वतःचं स्थान जोखण्याचा, कोणत्या भागात आपल्याला किती पाठिंबा आहे याची चाचपणी करण्याचा प्रयत्न पंकजा मुंडे यांनी केला. परंतु त्याही पलिकडे जाऊन, राज्याच्या काही ठरावीक जिल्ह्यांमध्ये फिरून, काही देवस्थानांना भेटी देऊन पंकजा मुंडे यांनी वैयक्तिक राजकारणाच्या पलीकडचं काहीतरी साध्य करण्याचा प्रयत्न केल्याचं या यात्रेच्या निमित्ताने दिसून आलं. 

यात्रेचे नियोजन आणि ज्या मार्गाने पंकजा यांनी प्रवास केला तो मार्ग, ते जिल्हे पाहिल्यास या राज्ययात्रेच्या हेतूचा अंदाज येऊ शकेल. ४ सप्टेंबर रोजी संभाजीनगर येथून ही शिवशक्ती परिक्रमा सुरु झाली आणि ११ सप्टेंबरला परळी येथील वैजनाथ मंदिरात तिची सांगता झाली. 

बहुजन जातींचे मोबिलायझेशन, हे सत्तेचं सूत्र

या आठ दिवसात नगर जिल्ह्यात कोपरगाव, नाशिक जिल्ह्यात येवला, निफाड, विंचूर, वणी, तिथून संगमनेर, पुणे, सासवड, जेजुरी, विटा, इस्लामपूर, कोल्हापूर, सांगली, कवठे महांकाळ, पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद, बार्शी, परांडा, करमाळा, जामखेड, खर्डा, परभणी, हिंगोली, परळी वैजनाथ असा प्रवास या यात्रेनिमित्त पंकजा मुंडे यांनी केला. म्हणजे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग असा या शिवशक्ती परिक्रमेचा मार्ग होता. 

या सर्व भागातील जातीय समुहांच्या राजकारणाचा अभ्यास केल्यास असं लक्षात येईल की साधारणतः मराठवाड्यात जालना, बीड, हिंगोली, परभणी या भागात ओबीसी प्रवर्गातील वंजारी हा जातसमूह बहुसंख्य आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ऊसपट्टा म्हणून ज्याला ओळखलं जातं त्या सातारा, सांगली, कवठे महांकाळ जत, इस्लामपूर, कोल्हापूर या भागात धनगर हा बहुजन जातसमूह तुल्यबळ आहे, तर नगर जिल्हा आणि नाशिकच्या येवला, दिंडोरी या भागात माळी हा आणखी एक बहुजन जातसमूह संख्येने मोठा आहे. 

बहुजन जातींचे मोबिलायझेशन करून भाजप सत्तेत येतो, हे समीकरण आता राज्याच्याच नव्हे, तर देशाच्याही राजकारणात वापरलं जात आहे. महाराष्ट्रातील ओबीसींचा विचार केल्यास माळी, धनगर आणि वंजारी म्हणजेच ज्यांना इंदिरा गांधींच्या काळापासून ‘माधव’ या संक्षिप्त रुपाने ओळखलं जातं, त्या तीन जाती बहुसंख्य आहेत. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात जो मराठाकेंद्री बहुजनवादाचा प्रयोग राबवला त्यातही या जातींना महत्त्व होतंच. 

मराठा समाजाचं काय करायचं?

तेव्हापासून महाराष्ट्रातल्या बहुजन राजकारणातील तीन मुख्य जातसमूह म्हणून या जातींकडे पाहिलं जातं. अर्थातच, महाराष्ट्रात राजकारण करायचं असेल तर एक मराठा आणि या तीन बहुजन जाती, यांचं गणित उलगडल्या शिवाय यश मिळवणं कोणत्याही पक्षाला शक्य नाही. विशेषतः ‘मंडल’च्या नंतरच्या काळात बहुजन ही वेगळी आयडेंटिटी तयार झाल्यानंतर तर या जातसमुहांचे हितसंबंध केटर करणं महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणात अत्यंत महत्त्वाचं बनलं आहे.

ही पार्श्वभूमी पाहता पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा आणि जालन्यात सुरु असलेलं मराठा आरक्षण आंदोलन या दोन्ही गोष्टी एकाच वेळी येणं हा योगायोग खचितच नाही. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. सुहास पळशीकर एका मुलाखतीत असं म्हणतात की, “काँग्रेस असो किंवा भाजप, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचं काय करायचं हा प्रश्न प्रत्येकच वेळी दिल्लीतील राजकीय धुरिणांना पडत आला आहे.” 

भाजपलाही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचं काय करायचं हा प्रश्न सोडवता आलेला नाही. गेल्या दोन वर्षांच्या काळात शिवसेना फोडून एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडून अजित पवार या दोन नेत्यांना भाजपने आपल्या गोटात घेतलं त्यामागचं हेही एक कारण असावं. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन मराठा चेहरे सोबत ठेवून एका अर्थाने भाजपने मराठा राजकारणच ‘आउटसोर्स’ केलं आहे.

मराठ्यांचा कौल कुणाच्या बाजुनं?

सध्या चालू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीत जर मराठा समाजाच्या हाती पुन्हा एकदा निराशा आली तर त्याचा राजकीय तोटा भाजपला कमी आणि शिंदे-पवार यांना जास्त होईल हे उघड आहे. मराठा जात समूहातील अंतर्गत स्तरीकरणही यात महत्त्वाचं आहे. गेल्या दोन दशकात झालेल्या शहरीकरणाच्या रेट्यात गाव सोडून शहरात गेलेल्या मध्यमवर्गीय मराठा कुटुंबांना देवेंद्र फडणवीस यांच्या काळात भाजपने जोडून घेण्याचा प्रयत्न केला. 

शहरीकरणाचे आणि नव्याने उदयास आलेल्या ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेचे लाभ घेत असलेला मराठा समाजातील हा भाग आरक्षणाच्या कारणाने भाजपच्या विरोधात जाण्याची फारशी शक्यता नाही. दुसरं म्हणजे छत्रपती संभाजीराजे यांनी आंदोलनस्थळी जाऊन थेट सरकारच्या विरोधात भूमिका घेतली असली, तरी सातारच्या उदयनराजे भोसले यांनी तितक्याच ठामपणे फडणवीसांची पाठराखण केली आहे.

थोडक्यात भाजपने मराठा राजकारणाचा पेच काहीसा आउटसोर्स करून का होईना, पण स्वतः पुरता सोडवला आहे. आता पुढचं पाऊल म्हणून अर्थात सध्या चालू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा फायदा कसा करून घेता येईल याचा विचार भाजपच्या धुरिणांनी केला असणार. पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमेला मिळालेला पाठिंबा या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा म्हणावा लागेल. 

महाराष्ट्रातील समाजिक पेच आणि राजकारण

महाराष्ट्रात मराठा जातसमूह आणि त्या त्या भागात संख्येने बलदंड असलेला बहुजन जातसमूह यांच्यात एक सुप्त संघर्ष दीर्घकाळापासून सुरु आहे. त्याची ऐतिहासिक कारणेही अनेक आहेत. वर उल्लेख केल्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्राच्या ऊसपट्ट्यात मराठा आणि धनगर, मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा आणि वंजारी, तर नगर जिल्हा आणि खानदेशच्या काही भागात मराठा आणि माळी, असा हा बहुस्तरीय, बहुजातीय संघर्ष आहे. 

विशेषतः मराठा आरक्षणाचा विषय येतो तेव्हा प्रबळ असणारे हे बहुजन जातसमूह आणि मराठा समाज यांच्यात थेट संघर्ष उभा राहतो. त्यातही मराठवाड्यातला मराठा-वंजारी संघर्ष हा तुलनेने जास्त प्रखर आहे. हे सामाजिक पेच महाराष्ट्रात आज नव्हे, तर गेल्या कित्येक दशकांपासून चालत आलेले आहेत.

असं असताना त्यांचा निवडणुकांच्या प्रत्यक्ष राजकारणात फायदा कसा करून घेता येईल, त्याचं अरिथमॅटिक जुळवून कसं आणता येईल याचा विचार येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपसारख्या पक्षाने करणं आश्चर्यकारक नाही. म्हणूनच जालन्यात मराठा आंदोलन सुरु असताना मराठवाड्यात वंजारी जातसमूहाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुंडे कुटुंबातील पंकजा मुंडे यांना योग्य वेळी राज्याच्या राजकारणात सक्रिय होण्याचा संदेश गेला असावा.

महाराष्ट्रातील मराठा राजकारणाचं बदलतं डायनॅमिक्स

पुन्हा एकदा डॉ. सुहास पळशीकर यांचा दाखला देऊन सांगायचं झाल्यास, “भाजपने डोळ्यासमोर ठेवलेली सामाजिक पुनर्रचनेची योजना नक्की काय आहे, हेच भाजपच्या विरोधकांना अजून कळलेलं नाही.” ओबीसींमधील प्रबळ जातसमूह आणि त्यांच्या सोबत छोट्या ओबीसी जातींच्या एकत्रीकरणातून भाजपला निवडणुका सोप्या होत आल्या आहेत. 

हे सगळं घडवून आणण्यासाठी जातसमूहाचे हितसंबंध काय असतात, त्याचे ऐतिहासिक-सांस्कृतिक संदर्भ काय असतात, याची जाणीव नेतृत्वात असावी लागते. ती जाणीव आज भाजपकडे आहे आणि भाजपच्या विरोधकांकडे नाही.  त्यामुळेच भाजपच्या रणनीतीचा भाग असलेलं हे ओबीसी मोबिलयझेशनचं राजकारण विरोधकांना उमगल्याचं सकृतदर्शनी तरी वाटत नाही. 

विरोधकांना संभ्रमात ठेवण्याची क्षमता हा राजकारणात महत्त्वाचा गुण मानला जातो, त्याप्रमाणे भाजपचं राजकारण सध्या सुरु आहे. गेम ऑफ थ्रोन्समधल्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या पीटर बेलीशच्या तत्वानुसार सुरु असलेलं भाजपचं राजकारण विरोधकांना कधी उमगेल त्यावर त्यांच्या पुन्हा सत्तेत येण्याच्या-न येण्याच्या शक्यता अवलंबून आहेत.

 

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Rajsthan Election 2023
संपूर्ण लेख

राजस्थानात भाजपमधील बंडाळी काँग्रेसच्या पथ्यावर?

राजस्थानात आजवर कोणत्याही पक्षाला सलग दोन वेळा सरकार बनविण्याची संधी दिलेली नाही. त्यामुळे यावेळीही काँग्रेसच्या अशोक गेहलोत यांच्या…
Toll issue in Maharashtra
संपूर्ण लेख

रस्त्यावरील ‘टोलचा झोल’ किती दिवस चालणार?

सामान्य जनतेला रस्ते असो वा कोणतीही सुविधा असो मोफत नको आहे. पण टोलवसुलीच्या नावे चाललेली जनतेची लूट लोकांना…
संपूर्ण लेख

प्रादेशिक पक्षांना गारवा देतोय कर्नाटकातल्या बंडखोरीच्या वणवा

कर्नाटकात भाजपच्या महत्त्वाकांक्षेला मतभेदाचा आणि बंडखोरीचा फटका बसलाय. तिकीटापासून वंचित असलेल्या अनेक ज्येष्ठ आणि प्रभावशाली नेत्यांनी वेगवेगळी चूल…
संपूर्ण लेख

Point by Point: खलिस्तानचं मॅटर आणि भारत-कॅनडा पंगा

कॅनडा आणि एकंदरीतच पाश्चिमात्य देशात सुरू असलेल्या खलिस्तानी चळवळीच्या कारवाया आणि भारत आणि कॅनडा या दोन देशांतील ताणलेले…
संपूर्ण लेख

धनगर आरक्षणाच्या आंदोलनाआधी, फडणवीसांना जाब विचारा!

 मराठा आरक्षणाच्या जालन्यामधील लाठीमारापर्यंत गेलेल्या आंदोलनानंतर, ओबीसींनी आंदोलनाचा इशारा दिला. आता धनगरांना भडकवलं जातंय. हे नक्की कशासाठी चाललंय…
संपूर्ण लेख

भागवतांच्या पुरोगामी विधानांमागे दडलंय काय?

आरएसएस ही मातृसंस्था असलेल्या भारतीय जनता पक्षाची सत्ता २०१४ मधे आल्यानंतर वर्षभराच्या अंतरानं, आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी…