ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दप्रतिभेचा गणपती बाप्पा

‘ॐ नमो जी आद्या। वेदप्रतिपाद्या। 
जयजय स्वसंवेद्या। आत्मरूपा।।’
अशा प्रकारे ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायाच्या पहिल्याच ओवीत ज्ञानदेवांनी आद्य अशा आत्मरूपाला नमन केले. हे आत्मरूप कसे आहे तर वेदप्रतिपाद्य आणि स्वसंवेद्य आहे. आत्मरूप हे वेदांच्या प्रतिपादनाचा किंवा (शास्त्रीय) चर्चेचा विषय असल्यामुळे ज्ञानदेव त्याला वेदप्रतिपाद्या म्हणतात, परंतु ज्ञानदेवांच्या मते आत्मरूप हे केवळ शास्त्रीय ज्ञानाचा वा चर्चेचा विषय नाही, ते स्वसंवेद्यही आहे.

डॉ. सदानंद मोरे या संदर्भात म्हणतात, स्वसंवेद्यता ही प्राधान्याने सौंदर्यशास्त्रातील किंवा साहित्य-काव्यशास्त्रातील संकल्पना आहे. तिचा संबंध रसास्वादाशी आहे. ज्ञानदेवांना असं म्हणायचं आहे की, आत्मरूप ज्याप्रमाणे शास्त्रीय ज्ञानाचा, चर्चेचा किंवा व्युत्पत्तीचा विषय आहे; तसाच तो आस्वादाचा, प्रीतीचा किंवा आनंदाचाही विषय होऊ शकतो. एका बाजूस तो तत्त्वज्ञानाचा विषय आहे आणि दुसऱ्या बाजूला तो काव्यव्यवहाराचाही विषय आहे.

याच ओवीत ज्ञानेश्वर माऊलींनी ॐकाराचा जयजयकार केला आहे. ॐ हा मूलध्वनि आहे आणि शब्द ध्वनिरूप असल्याने संपूर्ण सारस्वत ही एक प्रचंड गणेश मूर्ती आहे अशी कल्पना करून माऊलींनी पहिली ओवी लिहिली आहे. माऊली म्हणतात, “मी निवृत्तीदास ज्ञानदेव सांगतो आहे, ऐकावे महाराज, अखिल सारस्वत-मग त्याचा कर्ता कोणीही असो, विषय काहीही असो, हेतू कोणताही असो, ते केवळ त्या एका आदिबीज ॐकाराचाच विस्तार आहे.

आरंभी शब्द होता आणि शब्दच देव होता

या संदर्भात डॉ. सदानंद मोरे म्हणतात, मानवी व्यवहारांमध्ये भाषेचे अथवा वाणीचे स्थान महत्त्वाचं किंबहुना अनन्यसाधारण आहे. महाभारतामधे एक इंद्र-काश्यप संवाद आहे. काश्यप हा काही कारणांमुळे आत्महत्या करण्यास प्रवृत्त झालेला असतो. त्याला या विचारापासून परावृत्त करण्यासाठी इंद्र चार समजुतीच्या गोष्टी सांगतो. त्यात मानवी जन्म किती महत्त्वाचा आहे याचाही विचार आलेला आहे. 

मानवप्राणी हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आणि श्रेष्ठ का आहे, याची मीमांसा करताना इंद्र सांगतो की, माणसाला हात आणि जीभ ही इंद्रिये असल्यामुळे माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ ठरला. त्यामुळे त्याने प्राण्यांवर प्रभुत्व प्रस्थापित केले. हात म्हणजे श्रमशक्ती (labour) आणि जीभ म्हणजे बोलण्याची शक्ती किंवा भाषा होय. 

भाषा हे विचार करण्याचे त्याचप्रमाणे विचार संक्रमित करण्याचे साधन आहे. त्यामुळे मानव एका पिढीतले विचारधन दुसऱ्या पिढीला अनायसे देऊ शकतो. किंबहुना असंही म्हणता येईल की, मानवाची वेगवेगळ्या क्षेत्रांना व्यापणारी जी निर्मितिक्षमता आहे तिचा भाषा किंवा शब्द हा आधार आहे. 

विचार आणि भाषा यांचा निकट संबंध असल्यामुळेच की काय ग्रीक भाषेत logos या शब्दाचे विचार व शब्द असे दोन्ही अर्थ होतात. त्यानुसार मनुष्य विचार करणारा प्राणी आहे याचा अर्थ, मनुष्य बोलणारा म्हणजे भाषेचा उपयोग करणारा प्राणी आहे, असाही होतो. आरंभी शब्द होता आणि शब्दच देव होता अशा प्रकारचा विचार पाश्चात्त्य परंपरेत रूढ होता. ‘तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव’ असे संत तुकाराम महाराजांनीही म्हटले आहेच. 

शब्दब्रह्माची संकल्पना व्यापक करणारे ज्ञानदेव

प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि व्याकरण यांच्यामध्ये शब्दब्रह्माची संकल्पना आढळते. ब्रह्म म्हणजे अंतिम सदवस्तू. जगाचे मूळ कारण. मग शब्दालाही ब्रह्म का म्हटले? त्याचं कारण असं की, शब्द आणि अर्थ यांच्यामध्ये वाच्यवाचकतेचा संबंध असतो. ब्रह्म हे वाच्य किंवा प्रतिपाद्य असेल तर त्याचा वाचक किंवा प्रतिपादक असा जो शब्द त्यालाही ब्रह्मच म्हणावे अशी यामागची भूमिका आहे.

तात्त्विक किंवा शास्त्रीय व्यवहार आणि काव्यात्म व्यवहार यांच्यातही एक महत्त्वाचे साम्य म्हणजे ते दोन्ही व्यवहार शब्दांनी भाषेने होतात. साहजिकच ज्ञानदेवांची शब्दब्रह्माची संकल्पनाही अधिक व्यापक बनली. भर्तृहरीच्या शब्दब्रह्मात वेद, वेदांगे, स्मृती, दर्शने यांचाच समावेश होतो, तर ज्ञानदेवांनी त्यांच्या शब्दब्रह्मात काव्य आणि नाटक यांचाही समावेश केला.

देखा काव्य नाटका ।
जे निर्धारिता सकौतुका ।
त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनी ll

या ओवीत ज्ञानदेवांनी शब्दब्रह्मात काव्य आणि नाटक यांचा समावेश केलेला आहे. काव्यनाटक हा रसनिर्मितीचा व आस्वादाचा भाग आहे हे लक्षात घेतले म्हणजे त्यांचा संबंध स्वसंवेद्यतेशी आहे हे समजते. विशेष म्हणजे काव्यनाटकांना घंटिका असे म्हणून ज्ञानदेवांनी आचार्य आनंदवर्धनांचा ध्वनिसिद्धान्त ( अर्थात रससिद्धान्तासह) सांगितला आहे. 

तत्त्वज्ञानांची आयुधे घेतलेला माऊलींचा गणेश

अस्सल काव्यातला (वा नाटकातला) अर्थ हा वाच्यार्थ वा लक्ष्यार्थ नसून ध्वन्यर्थ असतो असा आनंदवर्धनांचा व अभिनवगुप्तांचाही पक्ष आहे. या काश्मिरी शैव आचार्यांच्या तत्त्वज्ञानाशी ज्ञानदेवांचा चांगलाच परिचय होता. ध्वन्यर्थ म्हणजे काय हे स्पष्ट करताना हे आचार्य घंटेच्या अनुरणनाचा दृष्टान्त योजतात. 

घंटेवर टोल पडला असता पहिल्या आघाताच्या आवाजानंतर एकामागून एक आवाजाच्या लहरी उत्पन्न होतात. त्याप्रमाणे शब्दाच्या उच्चारानंतर, त्याचा वाच्यार्थ समजल्यानंतर ज्या अर्थलहरी किंवा तरंग निर्माण होतात तो ध्वन्यर्थ. हा अशा प्रकारे काव्याचा सूचित अर्थ होय. ज्ञानदेवांनी घंटेचाच दाखला दिलेला आहे. अर्थध्वनी म्हणजे ध्वन्यर्थ ध्वन्यार्थाचा रसप्रतीतीशी निकट संबंध आहे. प्रतिपादनाच्या व्यवहारात रसनिर्मितीचा प्रश्नच उद्भवत नाही. आस्वादाच्या व्यवहारात मात्र रस हा प्राण आहे.

पातंजल, सांख्य, वैशेषिक, न्याय, पूर्वमीमांसा (कर्मकांड) व उत्तरमीमांसा (वेदान्त) या सहा दर्शनास षड्दर्शने म्हणतात. हे गणपतीचे सहा हात आहेत. या सहाही दर्शनामध्ये एकवाक्यता नाही. असलाच तर विरोधच आहे. तेव्हा देवानी त्या तत्त्वज्ञानांची आयुधे केली. भक्तांच्या अज्ञानाचा नाश यातील कोणत्यातरी एक आयुधाने होईलच असा त्यांचा विचार असावा

अभ्यासाची एकेक रीत सांगणारी आयुधे

श्रीगणेशाच्या हातातील काही आयूधांचा आपण विचार करू. गणेशाच्या एका हातात तर्करुपी परशु आहे. श्री देवदत्त पटनायक परशु संदर्भात म्हणतात, परशु किंवा कुऱ्हाड हे विश्लेषणाचे प्रतीक आहे. कुठल्याही गोष्टीची घटकशः म्हणजेच छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये पाहणी करीत त्याच्या विश्लेषण-पृथःकरणासह त्यांच्या गाभ्यापर्यंत, अगदी अणू–रेणूपर्यंत आपल्याला जाता यायला हवे. अभ्यासाची ही रीतच परशूचे निदर्शन करते.

श्री गणेशाच्या दुसऱ्या हातात नीतीभेदरुपी अंकुश आहे. यासंदर्भात श्री देवदत्त पटनायक म्हणतात, गणेश नेहमी हातामध्ये (हत्ती नियंत्रक) अंकुश धारण केलेला आजवरच्या नानाविध प्रतिमात दर्शवला गेला आहे. हा अंकुश दोन टोकांचा – एक टोक – टोकदार– धारदार. ज्याच्या सहाय्याने माहूत हत्तीला आपल्या ताब्यात ठेवतो किंवा पुढे चलण्यासंबंधी आज्ञा देतो. 

दुसरे टोक असते वळणदार हुक. ज्याचा उपयोग करुन तो हत्तीला नियंत्रित करतो. एकूणच अंकुश हा नियंत्रक आणि प्रेरणा (सरंक्षक) या दोन्ही अंगाने उपयुक्त ठरतो. माहूत जंगली व पाळीव हत्तीला नियंत्रित वा प्रेरित करुन त्याच्या करवी आपली कामे करून घेतो. माहूताच्या या अंकुशाने हत्ती त्याच्या पूर्ण अधिपत्याखाली काम करतो. त्याचप्रमाणे गणेशाचा अंकुशही माणसाला आपली बुद्धी व भावभावना तसेच आपल्या इच्छा–आकांक्षा संयमित करण्यासाठी उपयुक्त ठरतो. 

द्वैत आणि अद्वैत या दोहोंचा उल्लेख

तसं पाहिलं तर प्रत्येकात काही ना काही प्रमाणात हिंसात्मकता, पाशवी शक्ती दडलेली असते आणि त्यावर अंकुश म्हणजेच आपली विवेकनिष्ठ आणि तरल सावधान अवधानता. सारांश, जीवन जगण्याची कला आत्मसात करीत संपूर्ण चांगुलपणात जगणं आणि आयुष्याचं पावित्र्य जपणं फार महत्त्वाचं आहे.

गणेशाच्या या वर्णनात आणखी एक लक्षणीय स्थळ आहे, ते तत्त्वज्ञानाच्या अंगाने जाणारे आहे, सतराव्या ओवीत ज्ञानदेवांनी म्हटले आहे,
“द्वैताद्वैत तेचि निकुंभ । सरिसे एकवटती इभ – । मस्तकावरी ॥ ”

यासंदर्भात डॉक्टर वि.रा. करंदीकर म्हणतात, भाष्यकारांच्या ग्रंथांतून ज्या निरनिराळ्या तत्त्वज्ञानप्रणालींचे दर्शन घडते, त्यांमध्ये शंकराचार्यांचे अद्वैत आणि रामानुजाचार्यांचे विशिष्टाद्वैत हे दोन सिद्धान्त ज्ञानदेवांच्या आधीच्या कालातील. ज्ञानदेवांच्या नंतर मांडली गेलेली जी मते आहेत त्यांमध्ये द्वैताद्वैत या नावाचेही एक आहे, ते येथे अभिप्रेत असणे अर्थातच शक्य नाही. शिवाय ओवीचा अर्थ पाहिला की, द्वैताद्वैत या समासाने द्वैत आणि अद्वैत या दोहोंचा उल्लेख ज्ञानदेवांना करावयाचा आहे हे आपोआप स्पष्ट होते. 

ज्ञानदेवांच्या दृष्टीने द्वैत-अद्वैत सारखेच

काय म्हणतात येथे ज्ञानदेव? गणपतीच्या मूर्तीचे वर्णन करताना वस्त्र, मेखला किंवा घंटिका यांचा उल्लेख येतो. यांचा संबंध मूर्तीच्या शरीराशी नाही. ही बाह्य भूषणे किंवा आभरणे आहेत. शुंडादंड म्हणजे सोंड हा शरीराचा भाग आहे. या सोंडेच्या वर लगत असणारे ते गंडस्थळ, हत्तीच्या गंडस्थळावर दोन बाजूंना एकासारखे एक उंचवटे असतात आणि ते दोन्ही मिळून होते ते त्याचे गंडस्थळ. 

ज्ञानदेव म्हणतात की, या गणेशाच्या गंडस्थळावर द्वैत आणि अद्वैत हे दोन उंचवटे आहेत आणि ते ‘सरिसे’ म्हणजे एकासारखे एक असलेले उंचवटे “इभमस्तकावरी एकवटती” म्हणजे एकरूप होतात. अद्वैत आणि विशिष्टाद्वैत या दोन प्रमुख विचारधारांमध्ये काही भेद असला, तरी काही साम्यही आहे. थोडीशी मुरड घातली तर त्या दोन सिद्धान्तांमध्ये एकवाक्यता साधता येते. 

द्वैत आणि अद्वैत हे दोन परस्परांना पूर्णपणे विरोधी असणारे सिद्धान्त आहेत. ते एकत्र कसे आणता येणार ? पण ज्ञानदेवांच्या दृष्टीने ते दोन्ही एकसारखे आहेत, म्हणजे अद्वैत महत्त्वाचे आहे तसेच द्वैतही महत्त्वाचे आहे, आणि हे दोन्ही गणेशाच्या मस्तकावर एकरूप झालेले आहेत. एका उंचवट्याने गंडस्थळाचे रूप प्रकट होत नाही. दोन बाजूंना दोन समान उंचवटे असतात आणि त्या दोहोंच्या समवायातून हत्तीचे एकरूप मस्तक डोळ्यांसमोर येते. 

शिव-शक्तीचे माऊलींना अभिप्रेत स्वरूप वेगळे

गणेश ही ज्ञानाची देवता. मस्तक हे ज्याप्रमाणे शरीरात सर्वोच्च स्थानी असते, त्याप्रमाणे द्वैत आणि अद्वैत ही दोन्ही जेथे एकरूप होतात तेथे अध्यात्मज्ञानाची सर्वोच्च सीमा येते, असाही या विचाराचा ज्ञानाच्या अंगाने अर्थ लागतो. तोही ज्ञानदेवांना अभिप्रेत आहे.

विश्वाच्या मुळाशी शिव आणि शक्ती अशी दोन तत्त्वे असून ती दोन्ही सारखीच महत्त्वाची आणि संपूर्णपणे समान आहेत, असा ज्ञानदेवांचा सिद्धान्त आहे. ही दोन तत्त्वे विश्वाच्या प्रारंभस्थानी आहेत. ती दोन असतील तरच विश्वाची उत्पत्ती होऊ शकते, या दोहोंचे दोनपण नष्ट होते तेथे विश्वाचा लय होतो. 

शिव आणि शक्ती ही दोन तत्त्वे हे द्वैत. जीवात्मा आणि परमात्मा अशी दोन तत्त्वे द्वैतसिद्धान्तात मानली जातात, पण त्या दोहोंत समरूपत्व नाही, काही भेद आहे आणि तो कधी न पुसला जाणारा आहे. तो राहणारच, कारण त्या दोहोंचे मूळ स्वरूपच तसे आहे. हा द्वैतमतातील सिद्धान्त आहे. शिव आणि शक्ती या विश्वारंभीच्या दोन मूलतत्त्वांचे ज्ञानदेवांना अभिप्रेत असलेले स्वरूप असे नाही. 

द्वैत तर आहे पण तरी स्वरूपतः अद्वैत

ती दोन आहेत, तेव्हा ती निरनिराळी आहेत. एवढेच नव्हे, तर त्यांच्या अतीत असणाऱ्या मूळ आत्मवस्तूच्या विश्वरूप आविष्कारामधील त्या दोहोंचे कार्य भिन्न आहे. तेव्हा या दृष्टीने पाहता त्या दोहोंत द्वैत आहे, पण त्याच वेळी ती परस्परांच्या तुलनेने कोणत्याही प्रकारे उणी अधिक नाहीत. शिवाय स्वरूपतः ती एकच आहेत.

शिव आणि शक्ती म्हणजे एकाच आत्मवस्तूचा दोन रूपांमध्ये होणारा आविष्कार आहे. या दृष्टीने त्या दोहींचे मूलतत्त्व अद्वैतच आहे. अनुभवामृताच्या प्रारंभी शिवशक्तींच्या समरूपत्वाप्रमाणेच या अद्वैताचा उल्लेख ज्ञानदेवांनी केला आहे. द्वैत तर आहे पण तरी स्वरूपतः अद्वैत आहे, अशी ही ज्ञानदेवांची मांडणी आहे. 

गणेशाच्या मस्तकावर असणाऱ्या दोन उंचवट्यांप्रमाणे द्वैत आणि अद्वैत हे दोन सिद्धान्त आहेत, आणि तसे असूनही उंचवटे दोन असले तरी त्या दोहोंनी मिळून बनणारे मस्तक एकच असते, त्याप्रमाणे द्वैत आणि अद्वैत ही दोन्ही जेथे विलीन होतात तेथे विश्वाच्या अतीत असणारी एकली एक अशी आत्मवस्तू गवसते, असे ज्ञानदेव सूचित करतात. 

गणेशाच्या मस्तकाचे वर्णन करताना आपल्या तत्त्वज्ञानातील गाभ्याच्या सिद्धान्तावर ज्ञानदेव जाताजाता सहज बोट ठेवतात.
 

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

जुन्या संसद भवनाचा इतिहास जपला गेला पाहिजे!

प्रतिष्ठित, ऐतिहासिक आणि अनेक घडामोडींचा साक्षीदार असलेल्या संसद भवनातील कामकाज नव्या भवनात स्थानांतरित करताना माझ्या मनात भावनांची गर्दी…
संपूर्ण लेख

प्राचार्य मदन धनकर नावाचा विदर्भातील कर्ता लेखक

पुरुषोत्तम हरीभाऊ धनकर हे नाव फार लोकांना माहीत नसले, तरी त्यांचं प्राचार्य मदन धनकर हे विदर्भातील सर्वज्ञात असं…
संपूर्ण लेख

पर्यावरणपूरक विसर्जन हाच योग्य पर्याय

पावसाळ्यात निसर्गानं सर्वत्र हिरवीगार उधळण केलेली असताना, निसर्गातील दुर्वा-फुलांनी, त्याच निसर्गातील मातीच्या गणपतीची पूजा करणं, म्हणजे गणेशोत्सव. त्यातही…
संपूर्ण लेख

नारायण सुर्वे यांच्या घामेजलेल्या कवितेची गोष्ट

नारायण सुर्वे यांचे जे कवितासंग्रह आहेत, ते आपल्याला माहिती आहेत. ‘ऐसा गा मी ब्रह्म’ (१९६२) अभिनव प्रकाशनचे वा.…
संपूर्ण लेख

नव्या पिढीनं संतांकडं कसं पाहावं? हे शिकवणारं रिंगण

रिंगण नावाचं एक वारकरी संतांवर निघणारं वार्षिक आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल मंदिरात प्रकाशित होत असतं.  पत्रकार सचिन परब…
संपूर्ण लेख

ना.धों.महानोर : शेतकऱ्यांचा शब्द पेरणारा कार्यकर्ता

पोराबाळांच्या डोळ्यात, आर्त आसू रूखे सुखे दुखान्तात गणगोत, पार झालेले पारखे खेडोपाडी मोडलेल्या, कुणब्यांना गर्भवास तुका उडून जाताना,…