Point by Point: खलिस्तानचं मॅटर आणि भारत-कॅनडा पंगा

कॅनडा आणि एकंदरीतच पाश्चिमात्य देशात सुरू असलेल्या खलिस्तानी चळवळीच्या कारवाया आणि भारत आणि कॅनडा या दोन देशांतील ताणलेले संबंध, हे सगळं आज प्रकर्षानं दिसतं आहे. पण हे सगळं नीट समजून घ्यायचं तर साधारणतः गेल्या सव्वाशे वर्षातील घटना पाहायला हव्यात. पुढे काही मुद्दे सोपे करून दिले आहेत. हा सविस्तर इतिहास नसला तरी, हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यावरून हा विषय सखोल कळू शकेल.

१. देशाच्या स्वातंत्र्याची चळवळ सुरू असताना, १९०९ मधेच मोर्ले-मिंटो सुधारणांच्या वेळी मुसलमानांनी जसं स्वतंत्र प्रतिनिधित्व मागितलं, तसंच शीखांनीही मागितलं. पुढे जेव्हा स्वातंत्र्य दृष्टीपथात येऊ लागलं तसं मुसलमानांचा पाकिस्तान तसाच शीखांचा खलिस्तान असावा, अशी मागणी जोर धरू लागली होती.

२. १९२९ सालात पंजाबची राजधानी लाहोर मध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालं. त्या अधिवेशनात मोतीलाल नेहरू यांनी संपूर्ण स्वराज्याची मागणी केली होती. पण तेव्हा तीन गटांनी नेहरूंच्या या मागणीचा विरोध केला होता. यात पहिला गट होता मुस्लिम लीगचा, ज्याचं नेतृत्व जीना करत होते. दुसरा गट होता दलितांचा, ज्याचं नेतृत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर करत होते. बाबासाहेब दलितांसाठी अधिकारांची मागणी करत होते. तर तिसरा गट होता अकालींचा, ज्याचं नेतृत्व तारा सिंग करत होते. त्यांनी शिखांसाठी वेगळ्या राज्याची मागणी केली होती.

३. १९४७ मधे स्वातंत्र्य मिळालं, पण ते फाळणीची भळभळती जखम घेऊनच. यात पंजाब प्रातांचीही फाळणी झाली. प्रचंड हिंसा, स्थलांतर, संपत्तीचा नाश आणि उध्वस्त घरदार अशी परिस्थिती पंजाबनं या सगळ्यात पाहिली. आजही पाकिस्तानातील पंजाब आणि भारतातील पंजाब असे दोन भाग आंतराराष्ट्रीय सीमारेषेने विभागलेले आहेत. त्यामुळे अनेक नातेसंबंध, श्रद्धास्थानं आणि संपत्ती विभागली गेली. त्याचंही शल्य शीख समुदायात दिसतं.

४. १९५०-६०च्या दरम्यान पंजाबची राजधानी सिमला ही होती. पण भाषावार प्रांतरचनेसाठी हिमाचल प्रदेश आणि हरियाना ही राज्ये वगळून स्वतंत्र पंजाब राज्याची मागणी जोर धरु लागली. यामुळे पंजाब राज्यात शीख हे अल्पसंख्य न ठरता बहुसंख्य होणार होते. अकाली दलानं पंजाबी सुभ्याची मागणी नेटानं पुढे रेटली. १९६६ ला भाषावार विभाजन झालं आणि आताचा पंजाब अस्तित्वात आला.

५. १९७१ मधे अकाली दलाचे महासचिव जगजितसिंग चौहान यांनी स्वतंत्र खलिस्तानची जाहीर मागणी केली. यामुळे त्यांना पक्षातून हाकललं गेलं. १९७९ मधे ते लंडनला गेले आणि तिथे स्वतंत्र खलिस्तानची मागणी करायला सुरुवात केली.  त्यांनी खलिस्तानचे वेगळे चलनही सुरू केले होते. १९८० मध्ये भारत सरकारने त्यांचा पासपोर्ट रद्द केला.

६. शीख हा धर्म हिंदू धर्मांतर्गत आहे, अशी अनेक हिंदूंची समजूत आहे. पण ती अनेक शीखांनाच मान्य नाही. शीख धर्माचा इतिहास आणि कायदेशीर अनेक गोष्टी याबद्दलही समाजात नाराजी असल्याचं अनेकदा बोललं गेलंय. शीख धर्माची ओळख पुसली जात असल्याचाही आरोप केला गेला आहे. 

७. अकाली दलाने १९७३ मधे आनंदपूर साहिब प्रस्ताव मंजूर केला. त्यात पंजाब राज्यासाठी जास्तीत जास्त स्वायत्ततेची मागणी करण्यात आली होती. यात परराष्ट्र धोरण, चलन, संरक्षण असे अधिकार केंद्राकडे ठेवून, उर्वरित अधिकार राज्याकडे मागितले होते. तसंच पंजाबसाठी स्वतंत्र राज्यघटनेचीही मागणी करण्यात आली होती. या प्रस्तावाची लोकप्रियता १९८० पर्यंत वाढतच गेली.  

८. १९८० च्या दशकात ही खलिस्तानवादी चळवळ प्रचंड वाढली. जर्नलसिंग भिंद्रनवाले त्याचं नेतृत्त्व करत होता. भिंद्रनवाले हा गुरुद्वाऱ्यात कीर्तन करणारा होता. मात्र खलिस्तानच्या मागणीमुळे तो दहशतवादी बनला. सुरक्षा यंत्रणांपासून वाचण्यासाठी भिंद्रनवाले अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात लपला. तिथून त्यानं मंदिरावरही आपला प्रभाव वाढवला.

९. सुवर्ण मंदिर हा दहशतवाद्यांचं मुख्य केंद्र बनल्यानं, केंद्र सरकारसाठी चिंतेचा विषय बनला. विभाजनवाद कोणत्या पातळीवर जाऊन ठेपेल याचा नेम नव्हता. राज्य सरकारची यंत्रणा खुद्द दहशतवाद्यांच्या आहारी गेली होती. कोणत्याही क्षणी स्वतंत्र खलिस्तान होईल असं दिसू लागलं होतं.

१०. सुवर्ण मंदिर हे सर्वच शीखांच्या दृष्टीनं सर्वात पवित्र धर्मस्थान असल्यानं त्यावर हल्ला करुन अतिरेक्यांचा खात्मा करण्याचा विचारही कोणाच्या मनात आला नसता. किंबहूना भिंद्रनवालेचीही हीच अटकळ असावी. पण पंतप्रधान इंदिरा गांधींनी ते धाडस केलं. ३ जून १९८४ला जनरल अरुणकुमार वैद्यांच्या देखरेखीखाली ले. जनरल कुलदिपसिंग ब्रार यांनी ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ या कारवाईचं नेतृत्व केलं. 

११. सुवर्ण मंदिराला वेढा घातला गेला. वाटाघाटी करण्याचाही प्रयत्न झाला. दहशतवाद्यांना शरण येण्याचं आवाहन केलं गेलं. मंदिरात असलेल्या शेकडो निष्पाप भाविकांना बाहेर पाठवण्याची विनंती केली गेली. शे-सव्वाशे वृद्ध आणि आजारी भाविकांचीच तेवढी सुटका झाली. नंतर जवळपास २४ तास कारवाई झाली.  शेकडो जवान आणि दहशतवादी यात मारले गेले. या गोळीबारात मंदिरातले निष्पाप भाविकही ठार झाले.

१२. महत्वाचं म्हणजे भिंद्रनवालेही यात ठार झाला. सुवर्ण मंदिर दहशतवाद्यांच्या तावडीतून मुक्त झालं. पण इथंच नव्या विनाशकारी हिंसाचाराची सुरुवात झाली. दंगली उसळल्या. त्यात हजारोंचा बळी गेला. यामुळे शीख पराकोटीचे संतप्त झाले होते. हा त्यांच्या धर्मश्रद्धेवर मोठा आघात होता.

१३. ब्लू स्टार ऑपरेशनमुळे इंदिरा गांधी या खलिस्तानवाद्यांच्या हिट लिस्टवर होत्या.  या सर्व धोक्यांची पूर्वकल्पना असूनही इंदिरा गांधी यांनी आपले शीख शरीररक्षक होते, ते तसेच ठेवले. हा निर्णय त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. ३१ ऑक्टोबर १९८४च्या सकाळी सतवंत सिंग आणि बेअंतसिंग यांनी गोळ्या घालून इंदिरा गांधींची हत्या केली. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर देशभर शीखविरोधी दंगे सुरु झाले. त्या दंग्यांमध्ये जवळपास ८ हजार लोकं मारले गेले.

१४. खलिस्तानवादी दहशतवादी फक्त भारतातच नाही तर युरोप-अमेरिका आणि कॅनडातही होते. २३ जून १९८५ ला एयर इंडियाचं एक विमान आयर्लंडच्या किनाऱ्यालगत आकाशातच उडवलं गेलं. यात ३२९ प्रवासी ठार झाले. त्यात कॅनेडीयन नागरीकच जास्त होते. शीख दहशतवादाचे पडसाद यामुळे जगभर उमटले. भारतात सर्वत्रच हिंसेचं थैमान उठलं. कोणतंही शहर त्याला अपवाद राहिलं नाही.

१५. पंजाबमधे तर हिंसेचं तांडव उठलं होतं. २९ एप्रिल १९८६ला स्वतंत्र खलिस्तानची घॊषणाही करण्यात आली. महाराष्ट्रातील पुण्यातही शीख दहशतवाद्यानी अनेक दिवस ठाण मांडून बँक लुटणं, सर्रास गोळीबार करत दहशत माजवणं असे प्रकार केले. याच पुण्यात ब्यू स्टार ऑपरेशनचे नेतृत्व करणाऱ्या निवृत्त जनरल अरुणकुमार वैद्य यांची १० ऑगस्ट १९८६ रोजी हत्या करण्यात आली. 

१६. खलिस्तानचं भूत भारताच्या मानगुटीवरुन उतरायला तयारच नव्हतं. शेवटी पोलिसांना थेट कारवाई सुरू केली. शेकडो दहशतवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. पोलिसांचा हा पवित्रा दहशतवाद्यांना अपेक्षित नव्हता, त्यामुळे ते अक्षरश: हबकून गेले.

१७. एका आत्मघाती दहशतवाद्याने ३१ ऑगस्ट १९९५ रोजी पंजाबचे मुख्यमंत्री बेअंत सिंग यांच्याजवळ स्वतःला उडवून घेतलं. त्यात बेअंतसिंग यांचा मृत्यू झाला. याच बेअंत सिंग यांना पंजाबमधील दहशतवाद समाप्त करण्यासाठी ओळखलं जातं होतं.

१८. खलिस्तानी चळवळ १९९४-९५ पर्यंत संपत गेली ती केवळ या पोलीसांच्या थेट कारवायांमुळे असं आता सारेच मान्य करतात. राजीव गांधी यांनीही शांततामय मार्गानं हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. राजीव-लोंगोवाल यांच्यात तसा करारही झाला. पण काही महिन्यांत लोंगोवालांचीच हत्या झाली.

१९. नव्वदच्या दशकात खालिस्ताननी दहशतवाद्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात आल्या त्यामुळे दहशतवाद कमी झाला. पण कॅनडा, अमेरिका, आणि इंग्लंडमधे आजही मोठ्या संख्येत खलिस्तानी समर्थक आहेत.

२०. गुरुपत सिंग पन्नू याने २००७ मध्ये अमेरिकेच्या न्यू जर्सीत शीख फॉर जस्टीस या संघटनेची स्थापन केलीय. सध्या कॅनडात जे सार्वमत घेण्यात आलं, ते यांच्यामार्फतच घेण्यात आलंय. कॅनडातील आठ लाख शीखांपैकी, केवळ १० ते १२ हजार लोकांनी या सार्वमताचा भाग घेतलाय. ही बाब भारतासाठी महत्त्वाची आहे.

२१. इंग्लंडमधे लंडनच्या ट्राफलगार चौकात २०१८ मधे ‘खलिस्तान’वादी शिखांचा मेळावा झाला होता. तसंच अमेरिकेतल्या ‘शीख फॉर जस्टिस’ या संघटनेनंही पंजाबात शीखांचं सार्वभौम राष्ट्र निर्माण करण्याची मोहीम सुरू केली. 

२२. अमृतसरपासून साधारणतः ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या अजनाला येथील पोलीस स्टेशनवर २२ फेब्रुवारी २०२३ रोजी शस्त्रधारी जमावाने हल्लाबोल केला. हा हल्ला अमृतसरमधील ‘वारीस पंजाब दे’ या संघटनेने केला होता.  यात सहा पोलीस जखमी झाले होते. ‘वारीस पंजाब दे’ या संघटनेचा प्रमुख अमृतपालसिंहने त्यावेळी पुन्हा खलिस्तानची मागणी देशातही उचलून धरली.

२३. हिंदूराष्ट्राची मागणी चूक नाही, तर खलिस्तानची मागणी चूक कशी? खलिस्तान चळवळ उद्ध्वस्त करण्याची भाषा करू नका, इंदिरा गांधींनी केलेली चूक पुन्हा करू नका, असा धमकीवजा इशारा पंजाबात पुन्हा डोकं वर काढणाऱ्या खलिस्तानवादी चळवळीचा म्होरक्या अमृतपाल सिंहने फेब्रुवारी २०२३ मधे दिला.

२४. टाईम मासिकाच्या संदर्भानुसार, भारतानंतर शिखांची सर्वाधिक लोकसंख्या कॅनडात राहते. तेथील एकूण लोकसंख्येच्या हे प्रमाण २.१ टक्के आहे. पण यातील अनेकजण हे खलिस्तानच्या मागणीला विरोध करणारेही आहेत. तरीही समर्थन करणाऱ्यांची चळवळ ही उग्र होत चालली आहे. भारत आणि कॅनडात यावरून अनेकदा खटके उडालेले आहेत.

२५. कॅनडामधे राहणाऱ्या भारतीयांची संख्या १८ लाखांच्या आसपास असेल. त्यातील सर्वात मोठा गट, म्हणजे जवळपास आठ लाखाच्या आसपास शीख आहेत. कॅनडाच्या संसदेत ३३८ जागा आहेत. २०१९ मधे झालेल्या निवडणुकीत येथे १८ शीख खासदार निवडून आले होते. एक काळ असा होता की, जस्टिन ट्रूडो सरकारच्या मंत्रिमंडळात चार शीखांचा समावेश होता.

२६. कॅनडात शीख हे एकोणिसाव्या शतकापासून आहेत. इंग्रजांनी भारत ताब्यात घेतल्यावर भारतातील लोक कॉमनवेल्थ देशात जाऊ शकत होते. तिथले नागरिकत्व मिळवू शकत होते. ब्रिटीश सैन्यातून निवृत्त झालेले अनेक लोक कॉमनवेल्थ देशांकडे वळले. त्यात कॅनडाचाही समावेश होता. यावेळी शीख नागरीक तिथे गेले असा एक संदर्भ सापडतो.

२७. कॅनडामधे सुरू असलेल्या खलिस्तानवादी चळवळीचे वाढते उद्योग पाहून, २०२३ च्या सुरुवातीला भारतानं कॅनडाच्या अधिकाऱ्यांना बोलावून समज दिली होती. जून २०२३ मधे कॅनडातील बाजारपेठेत खलिस्तानवादी नेते हरदीप सिंग निज्जर हत्या झाली. या हत्येनंतर कॅनडात भारतविरोधी आंदोलनं झाली. निज्जर यांच्या हत्येआधी परमजीतसिंह पंजवाड आणि अवतारसिंग खांडा यांचीही हत्या झाली होती.

२८. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो जी-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात आले होते. तेव्हाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोबत झालेल्या चर्चेत खलिस्तानचा मुद्दा उपस्थित केला होता. कॅनडातील फुटिरतावादी कारवाया आणि भारतीय अधिकाऱ्यांवर होत असलेले हल्ले याबद्दल मोदींनी चिंता व्यक्त केली होती.

२९. यावर कॅनडाने, भारत आमच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप करतोय, असा आरोप केला होता. याच परिषदेत ट्रुडो याच्या निवासावरून आणि त्यांच्या देहबोलीवरूनही वाद झाला होता.  ट्रडो यांचा परतीचा प्रवासही धड झाला नाही. त्यांच्या विमानात बिघाड झाला होता. नवं विमान मागवून ते परत गेले. हे असं होणं, हे अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकवणारं होतं.

३०. नरेंद्र मोदींनी केलेल्या आरोपाचं उत्तर देताना, कॅनडा हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शांततापूर्ण आंदोलनांचं नेहमी समर्थन करेल, असे भाष्य ट्रुडो यांनी केले होते. ट्रुडो कॅनडात परतले आणि १५ सप्टेंबर २०२३ रोजी भारत-कॅनडा मुक्त व्यापारी कराराची चर्चा थांबवत असल्याचे स्पष्ट केले.

३१. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी १८ सप्टेंबर २०२३ रोजी कॅनडाच्या संसदेत कॅनडाचे नागरीक आणि खलिस्तानवादी नेते हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येमागे भारतीय एजन्सींचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली. पण एवढ्यावर न थांबता, कॅनडाने तेथील दूतावासातील अधिकाऱ्यांना देश सोडण्यास सांगितला.

३२. कॅनडाच्या या गंभीर आरोपांवर भारतानं कठोर शब्दांत उत्तर दिलं. त्यांचे सर्व आरोप भारताने फेटाळलेच, पण कॅनडाच खलिस्तानी समर्थकांना आश्रय देत असल्याची भूमिका मांडली. भारत सरकारनंही कॅनडाच्या भारतातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याना देशाबाहेर जाण्यास सांगितले. 

३३. या वादानंतर भारताकडून कॅनडा येथील व्हिसा सेवा स्थगित करण्यात आली. तांत्रिक कारणामुळे भारताची व्हिसा सेवा स्थगित करण्यात आली, असं कारण कॅनडातील भारतीय व्हिसा सेंटरने दिलं आहे. भारत सरकारनं कॅनडात राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सूचनावली प्रसिद्ध केली आहे.

३४. संयुक्त राष्ट्रांच्या सभेसाठी न्यूयॉर्कला आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं की, कॅनडातील हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा संशय चिंताजनक आहे. या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरू आहे. पण हे रिपोर्ट चिंताजनक आहेत आणि आम्ही आमच्या सहकारी देशांसोबत या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत.

३५. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी म्हटलं आहे की, कॅनडाच्या पंतप्रधानांनी सार्वजनिक व्यासपीठावर केलेले आरोप आम्ही ऐकले. हे प्रकरण समोर आल्यानंतर आम्ही त्याच वेळी आमची प्रतिक्रिया जाहीर करून याबाबत चिंता व्यक्त केली होती. कायदा आणि सुव्यस्थेच्या दृष्टिकोनातून या प्रकरणाती दोषींवर कारवाई करण्यात आली पाहिजे.

३६. दरम्यान, ट्रूडो यांनी १९ सप्टेंबर २०२३ रोजी आणखी एक विधान केलं आहे. ते म्हणाले, ‘शीख फुटीरतावादी नेत्याच्या हत्येशी भारतीय एजंट्सचा संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यामागे आमचा हेतू भारताला चिथावणी देण्याचा नव्हता. पण, भारतानं हे प्रकरण योग्य प्रकारे हाताळावं अशी कॅनडाची इच्छा आहे.’

३७. २०२२ मधे भारत हा कॅनडाचा दहावा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. सध्या भारतात कॅनडाच्या आणि कॅनडात भारताच्या शेकडो कंपन्या कार्यरत आहेत. टीसीएस, इन्फोसिस, विप्रोसारख्या ३० भारतीय कंपन्यांनी कॅनडात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. कॅनडाच्या बॅलार्ड पॉवर सिस्टम्ससोबत भारताच्या अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडनेही हायड्रोजन इलेक्ट्रिक ट्रक विकसित करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केलीय.

३८. कॅनडाच्या आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासाच्या बाजारपेठेत भारतीय चौथ्या क्रमांकावर आहेत. कॅनडामध्ये शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांपैकी ४० टक्के भारतीय आहेत. या सगळ्यांसाठी भारतानं दिलेल्या सूचनावलीत म्हटलंय की, कॅनडात भारतविरोधी कारवाया,  हेट क्राइम आणि हिंसाचारात वाढीची शक्यता लक्षात घेता, तिथं राहणाऱ्या किंवा तिथं प्रवास करणाऱ्या सर्व भारतीयांना सतर्क राहावे.

३९. कॅनडानेही भारतातील प्रवासासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. यात कॅनडाने आपल्या नागरिकांना ‘अत्यंत सावध’ राहण्यास सांगितलं आहे. कॅनडानं ‘अभूतपूर्व सुरक्षा परिस्थितीमुळे’ आपल्या नागरिकांना भारतातील संवेदनशील राज्यात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.

४०. भारत आणि कॅनडा यांच्यातील बिघडलेले दोन्ही देशातील संबंध पुर्वपदावर यायला वेळ लागेल. दोन्ही देशात पुढील वर्षी निवडणुका आहेत. त्यामुळे सध्या घडत असलेल्या घटना, या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरही पाहायला हव्यात. दोन देशांचे संबंध कदाचित येणाऱ्या निवडणुकानंतर बदलू शकतील, असेही काहींचे म्हणणे आहे.

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Rajsthan Election 2023
संपूर्ण लेख

राजस्थानात भाजपमधील बंडाळी काँग्रेसच्या पथ्यावर?

राजस्थानात आजवर कोणत्याही पक्षाला सलग दोन वेळा सरकार बनविण्याची संधी दिलेली नाही. त्यामुळे यावेळीही काँग्रेसच्या अशोक गेहलोत यांच्या…
Toll issue in Maharashtra
संपूर्ण लेख

रस्त्यावरील ‘टोलचा झोल’ किती दिवस चालणार?

सामान्य जनतेला रस्ते असो वा कोणतीही सुविधा असो मोफत नको आहे. पण टोलवसुलीच्या नावे चाललेली जनतेची लूट लोकांना…
संपूर्ण लेख

प्रादेशिक पक्षांना गारवा देतोय कर्नाटकातल्या बंडखोरीच्या वणवा

कर्नाटकात भाजपच्या महत्त्वाकांक्षेला मतभेदाचा आणि बंडखोरीचा फटका बसलाय. तिकीटापासून वंचित असलेल्या अनेक ज्येष्ठ आणि प्रभावशाली नेत्यांनी वेगवेगळी चूल…
संपूर्ण लेख

धनगर आरक्षणाच्या आंदोलनाआधी, फडणवीसांना जाब विचारा!

 मराठा आरक्षणाच्या जालन्यामधील लाठीमारापर्यंत गेलेल्या आंदोलनानंतर, ओबीसींनी आंदोलनाचा इशारा दिला. आता धनगरांना भडकवलं जातंय. हे नक्की कशासाठी चाललंय…
संपूर्ण लेख

भागवतांच्या पुरोगामी विधानांमागे दडलंय काय?

आरएसएस ही मातृसंस्था असलेल्या भारतीय जनता पक्षाची सत्ता २०१४ मधे आल्यानंतर वर्षभराच्या अंतरानं, आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी…
संपूर्ण लेख

भाजपचं मराठा राजकारण विरोधकांना कधी उमगेल?

गेम ऑफ थ्रोन्स या गाजलेल्या वेबसिरीजमधील पीटर बेलीश नावाच्या एका अत्यंत धूर्त पात्राच्या तोंडी एक संवाद आहे. तो…