सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य उलगणारा ‘बेन्नू’तील खजिना

पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘नासा’नं २०१६ मधे यान पाठवलं होतं. ते यान या लघुग्रहावजवळ पोचलं २०१८ साली. त्यानंतर तब्बल दोन-अडीच वर्ष त्या लघुग्रहाला असंख्य प्रदक्षिणा घालून, अखेर ते लघुग्रहावर उतरलं. तिथली दगडमाती घेऊन प्रचंड प्रवास करून हे यान आत्ता २०२३ मधे पृथ्वीवर परतलंय. यातून माणसाला शोधायचंय ते सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य.

२४ सप्टेंबर २०२३ रोजी ‘नासा’च्या ओसिरिस-रेक्स या यानानं पृथ्वीच्या कक्षेत एक कुपी सोडली. ‘बेन्नू’ या लघुग्रहावरून आणलेल्या नमुन्यांची ती कुपी पॅराशूटच्या मदतीनं अमेरिकेच्या उटाह नावाच्या वाळवंटामध्ये अलगद उतरली. पक्ष्याचं एखादं पीस हवेतून जसं मंदगतीनं आणि सहजपणे जमिनीवर येतं, तितक्‍याच सहजपणे ही कुपी जमिनीवर उतरवण्यात ‘नासा’ला यश आलं.

ठरलेल्या वेळेपेक्षा तीन मिनिटं अगोदरच वाळवंटामध्ये उतरलेल्या या कुपीची संशोधक वाटच पाहत होते. त्यांनी ही कुपी ‘नासा’च्या जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये नेली. तिथं त्या कुपीतील ‘बेन्नू’हून आणलेला खजिना अलगदपणे बाहेर काढून त्याची तपासणी करण्यात येणार आहे. त्या दृष्टीनं संशोधकांनी आपलं काम सुरू केलं आहे.

अनेक देशात होणार, या दगडमातीवर संशोधन

अगदी सुरुवातीच्या तपासणीतून, या खजिन्यामुळं आपल्या हाती काय घबाड ‘पडणार आहे, याचा अंदाज संशोधकांना येईल. ती माहिती *नासा’ येत्या ११ ऑक्टोबरला जाहीर करणार आहे. ओसिरिस-रेक्सनं पृथ्वीवर आणलेला खजिना म्हणजे ‘बेन्नू’वरची माती आणि दगड आहेत. तेच इथपर्यंत एका कुपीतून आणले आहेत.

या कुपीचा आकार एखाद्या मोटारीच्या टायरसारखा आहे. त्यामध्ये एक डबी आहे. त्या डबीमध्ये ‘बेन्नू’वरची माती आणि दगड आहेत. त्यांचं एकंदर वजन आहे, २५० ग्रॅम. म्हणजे पाव किलो. त्यामधे असलेल्या दगडांचे अगदी लहान लहान काप करण्यात येतील. लहान म्हणजे किती? तर बटाट्याच्या कापांसारखे त्यांचे काप करण्यात येतील

साधारणतः आपल्या वहीच्या पानाच्या कागदापेक्षाही कमी रुंदीच्या या चकत्या असतील. या कापांची विविध वैज्ञानिक कसोट्या वापरून तपासणी केली जाईल. ही तपासणी फक्त ‘नासा’मध्ये केली जाणार नाही, तर जगातल्या ज्या संशोधन संस्थांचा या मोहिमेमध्ये सहभाग आहे, त्या प्रत्येक संस्थेतील संशोधकांना हे नमुने पाठविण्यात येतील.

सूर्यमालेतील फारसा बदल न झालेला लघुग्रह

या अभ्यासातून आपल्याला काय मिळालं आहे, हे समजण्यासाठी आपल्याला साधारणपणे दोनएक वर्ष तरी थांबावं लागेल, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. या काळात हे दगड आणि माती यांच्यामध्ये कोणते घटक आहेत, कोणती खनिजं आहेत याचा शोध घेतला जाईल.

या शोधातूनच आपल्याला आपल्या सौरमालेच्या जन्माचं रहस्य समजेल, असा विश्‍वास संशोधकांना वाटतो आहे. याचं कारण ४६० कोटी वर्षांपूर्वी आपली सूर्यमाला तयार झाली, तेव्हाच हा लघुग्रहही अस्तित्वात आला. तेव्हापासून ते आतापर्यंत या लघुग्रहामध्ये कोणतेही फारसे बदल झालेले नाहीत. या लघुग्रहावर कार्बन आणि त्यासारखे अन्य सेंद्रिय पदार्थ आहेत.

त्यावरील काही घटक हे आपल्या पृथ्वीचा जन्म होण्याच्याही अगोदरपासून असलेले असू शकतील. ‘बेन्नू’वरच्या खजिन्यात कार्बोनेट खनिजं, कॅल्शियम आणि अल्युमिनियम असू शकतील, असं संशोधकांना वाटतं. याचं कारण आपल्या सौरमालेमध्ये पहिल्यांदा हेच घटक तयार झाले आहेत! हे सारेच घटक पृथ्वीवर असलेलं सजीव जग आकाराला येण्यास जबाबदार आहेत.

अनेक प्रश्नांची उत्तरं सापडणार

आपल्या सूर्याच्या भोवताली असणार्‍या ग्रहांमध्ये किंवा विश्‍वाच्या पसार्‍यात दुसरीकडं कुठे हे घटक असतील, तर ते तिथं सजीव जग असण्याचे संकेत देत आहेत का, या दृष्टीनंही ‘बेन्नू’वरच्या धुळीच्या आणि दगडांच्या अभ्यासाचा फार मोठा उपयोग होऊ शकणार आहे.

आपली पृथ्वी कशी तयार झाली? ती सजीवांसाठी पोषक अशी का तयार झाली? इथं पाणी कुठून आणि कसं आलं? इथलं वातावरण कसं तयार झालं? आपल्या पृथ्वीवरच्या सजीव सृष्टीला आवश्यक असणारे सेंद्रिय घटक आले तरी कुठून? अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरं शोधण्यासाठी ‘बेन्नू’वरचे दगड आणि माती उपयोगी पडू शकेल, असं संशोधकांना वाटतं.

सात वर्षांचा भलामोठ्ठा प्रवास

त्यामुळेच तर आपल्या पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटर दूरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘शोधकयान पाठवायचं नासामधल्या संशोधकांनी ठरवलं आणि त्याप्रमाणं ८ सप्टेंबर २०१६ या दिवशी आपलं ओसिरिस-रेक्स हे शोधकयान ‘बेन्नू’च्या अभ्यासासाठी पाठवलं.

हे यान ‘बेन्नू’ या लघुग्रहावजवळ पोचलं ते २०१८ सालामध्ये! त्यानंतरची जवळपास दोन-अडीच वर्ष त्यानं या लघुग्रहाच्या भोवती असंख्य प्रदक्षिणा घातल्या. त्या घालतानाच त्यांनी या लघुग्रहाची सर्व अंगानं अगदी बारकाईनं पाहणी केली.

ती करतानाच लक्षात आलं की, या लघुग्रहातून अधूनमधून माती आणि दगड यांचे फवारे त्याच्या भोवतालच्या अवकाशात उडत आहेत. या लघुग्रहाची जमीन गुळगुळीत असेल, असं वाटत होतं. पण ती गुळगुळीत नाही, तर अगदीच ओबडधोबड आहे. लहानमोठ्या दगडांनी भरलेली आहे.

सकटांना न डगमगता मिळवलं यश

जमीन खाचखळप्यांची असल्यामुळं या यानाची कामगिरी थोडी अधिक कठीण झाली. पण एखादा अवघड प्रसंग अचानकपणं उभा ठाकला तर टणक मनाची माणसं हातपाय गाळत नाहीत. उलट कंबर कसून कामाला लागतात आणि आलेली अडचण दूर करतात, या यानाला पृथ्वीवरच्या नियंत्रण कक्षात बसून रेडिओ सिमलल्स पाठवणाऱ्या संशोधकांनीसुद्धा तेच केलं. तसं ते करायलाच हवं होतं. याचं कारण असं की, हे यान ‘बेन्नू’च्या जमिनीवर दहा सेकंद उतरणं आवश्यक होतं.

त्या काळात या यानाचं एक यांत्रिक उपकरण ‘बेन्नू’च्या जमिनीवर जाऊन तिथली धूळ आणि दगड गोळा करणार आणि लागलीच ‘बेन्नू’च्या जमिनीचा निरोप घेऊन हे यान ‘बेन्नू’च्या अवकाशात झेपावणार, असं नक्की करण्यात आलं होतं. ठरल्याप्रमाणं सर्व पार पाडायचं, तर कुठं उतरायचं ती जागा ठरवणं आवश्यक होतं.

रंगपंचमीच्या पिचकारीसारखी युक्ती

दोन-अडीच वर्षांच्या पाहणीनंतर ‘ती’ जागा नक्की करण्यात आली. त्यानंतर यान ‘बेन्नू’च्या जमिनीच्या दिशेनं गेलं. अगदी जमिनीजवळ पोचताच त्यातून एक यांत्रिक हात बाहेर आला. त्या हाताच्या टोकाशी एक गोल आकाराची डबी होती. त्या डबीत ‘बेन्नू’वरची धूळ आणि दगड सहजपणं जमा करता यावेत म्हणून एक युक्‍ती वापरण्यात आली.

रंगपंचमी खेळताना रंगीत पाण्यानं भरलेली पिचकारी उडवावी, तशी नायट्रोजन वायूची एक पिचकारी ‘बेन्नू’च्या जमिनीवर वेगानं उडवली गेली. ती इतकी वेगवान आणि जोरदार होती की, तिच्यामुळं ‘बेन्नू’च्या जमिनीवर आठ मीटर व्यासाचा एक खड्डा तयार झाला. ‘बेन्नू’वरची माती आणि धूळ आपली जागा सोडून वर, सर्व दिशांनी उसळली.

त्यातलेच काही त्या यांत्रिक हातामध्ये असलेल्या गोलाकार डबीत पकडले गेले. आता परतीचा प्रवास सुरू करायचा होता. पण पुढचे जवळपास सहा महिने ते यान ‘बेन्नू’च्या भोवती फिरत राहिलं आणि १० मे २०२१ या दिवशी त्यानं ‘बेन्नू’चा निरोप घेतला. ते पृथ्वीच्या दिशेनं यायला निघालं. त्यासाठी यानानं आपलं मुख्य इंजिन सात मिनिटं सुरू केलं आणि ताशी ९६६ किलोमीटर वेगानं ते ‘बेन्नू’पासून दूर जाऊ लागलं.

इजिप्तची पुराणकथा आणि सूर्यमालेचं रहस्य

पुढचा प्रवास ठरल्याप्रमाणं झाला आणि वेळापत्रकाप्रमाणं त्यानं पृथ्वीवर कुपी पाठवली. या लघुग्रहाला ‘बेन्नू’ हे नाव कोणी आणि का दिलं, हेसुद्धा गमतीशीर आहे. या लघुग्रहाला नाव सूचवा, अशी एक स्पर्धा ‘नासा’नं जाहीर केली होती. या स्पर्धेत अमेरिकेतल्या नॉर्थ कॅरोलिनामधल्या मायकेल पुझियो नावाच्या एका नऊ वर्षांच्या मुलानं भाग घेतला होता. त्यानं या लघुग्रहाला ‘बेन्नू’ हे नाव द्यावं, असं सूचवलं आणि ते मान्य झालं.

‘बेन्नू’ हे इजिप्तमधील पुराणकथेतील एका पक्ष्याचं नाव आहे. हा पक्षी सूर्य, निर्मिती आणि पुनर्जन्म याच्याशी संबंधित आहे. आपला सूर्य, त्याच्याभोवती फिरणारे ग्रह, मंगळ आणि गुरू यांच्या मधल्या पट्ट्यात हजारोंच्या संख्येनं असणारे लघुग्रह हे सगळे कसे निर्माण झाले? ४६० कोटी वर्षांपूर्वी असं काय घडलं की, त्यातून हे सारं अस्तित्वात आलं? हा प्रश्‍न आजही आपल्याला सुटलेला नाही.

‘बेन्नू’ या लघुग्रहावरच्या धुळीचा आणि दगडांचा अभ्यास केला तर त्यातून आपल्याला याचा शोध घेता येईल, असाही एक विचार ‘बेन्नू’वरची मोहीम आखण्यामागं होता. या मोहिमेतून आपल्या हाती काव लागलं, ते समजायला किमान दोन वर्षं तरी थांबावं लागेल!

आता वेध अपोपिसचा शोधाचा

बेन्नू या लघुग्रहावरून आणलेला खजिना पृथ्वीच्या कक्षेत सोडल्यानंतर ओसिरिस-रेक्स यान आपल्या पुढच्या मोहिमेसाठी निघालं आहे. ‘ही मोहीम आहे ‘अपोपिस’ या लघुग्रहाच्या अभ्यासाची. १२१० फूट व्यास असलेला हा लघुग्रह सध्या पृथ्वीपासून सुमारे २९ कोटी किमी अंतरावर आहे.

हे कोट्यवधी किमीचं अंतर पार करून ओसिरिस-रेक्स हे यान त्याच्याजवळ दि. ८ एप्रिल २०२९ या दिवशी पोचेल. त्यानंतर १८ महिने हे यान या लघुग्रहाची पाहणी करेल. त्याची विविध छायाचित्रं काढेल. त्याचे नकाशे तयार करेल आणि त्याच्या पृष्ठभागाखाली काय दडलं आहे, याचा वेध घेईल. आपल्यासाठी माहितीचा ‘एक नवीन खजिना मिळेल.

0 Shares:
You May Also Like
amphibians endangered
संपूर्ण लेख

उभयचर नष्ट होताहेत, उरलेल्या जीवसृष्टीवरही धोक्याची घंटा!

जगप्रसिद्ध ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान…
संपूर्ण लेख

‘लिव्ह इन’ की ‘लग्न’ यावर उत्तर कसं शोधणार?

‘लिव्ह इन’ अर्थात लग्नाशिवाय शारीरिक संबंधात राहण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या…
संपूर्ण लेख

लॅटिन अमेरिका ही पर्यावरणपुरक जगासाठी नवी अर्थशक्ती

लॅटिन अमेरिकेत,  दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ३३ देशांचा समावेश होतो. लॅटिन हे नाव सर्वप्रथम फ्रान्सचे सर्वेसर्वा असलेल्या तिसऱ्या…
संपूर्ण लेख

फक्त ८० रुपयात ‘लिज्जत’ हा ब्रँड घडविणाऱ्या आज्जी गेल्या

ही गोष्ट आहे, १९५९ मधली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो भारावलेला काळ होता. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू देशाची नवी…
संपूर्ण लेख

सत्यशोधक पत्रकारितेचे विस्मृतीत गेलेले अतुलनीय योगदान

एकोणिसाव्या शतकातील नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा आणि आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले…
संपूर्ण लेख

मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटवू नये

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने लाखोंचे मोर्चे काढले. पण त्यात शांततेला कुठं धक्का लावला नाही. पण तोच मराठा बांधव…